July 26, 2024
Ramesh Salunkhe article on Education after Globalization
Home » हर शख्स परेशानसा क्यों हैं ?
मुक्त संवाद

हर शख्स परेशानसा क्यों हैं ?

जागतिकीकरणोत्तर समाज आणि पर्यायाने समाजातला प्रत्येक माणूस कुठल्या तरी बेटावर रहात असल्यासारखा दिसतो आहे. तो आपल्या समाजापासून, माणसांपासून, नातेसंबंधांपासून तुटून विलग झाल्यासारखा आहे. शहरयार यांची एक सुंदर गजल आहे. सिनेमे जलन, आँखो में तुफान सा क्यों है ! इस शहरमें हर शख्स परेशानसा क्यों हैं? चाळीस एक वर्षांपूर्वीच्या या गझलमधील ओळी आजही तंतोतंत खऱ्या ठरत आहेत. उलट त्यातली भयावहता अधिकच चिंताग्रस्त करते आहे.

-रमेश साळुंखे.
प्रमुख, मराठी विभाग, देवचंद महाविद्यालय, अर्जुननगर जि. कोल्हापूर

ज्या दिशेनं आणि ज्या गतीनं आपण भविष्यकाळाकडे वाटचाल करतो आहोत ते पाहिलं की कोणत्याही संवेदनशील माणसाला धास्तावल्यासारखे होते. तसे आपण सगळेच मानसिक, शारिरीक, बौद्धिक दृष्ट्या आनंदी असल्यासारखे दिसतो आहोत. सगळीकडे आबादीआबाद कोणतेच प्रश्न नसल्यासारखे वागतो बोलतो आहोत. पण आपल्या समाजाला आलेली ही सूज थोडीशी खरवडून काढली तर आपल्या समोरचं आत्ताचं आणि वीस-पंचवीस वर्षांनंतरचं आपल्या समाजाचे चित्र विलक्षण चिंताजनक दिसतं आहे. समाजकारण, राजकारण, आरोग्य, शिक्षण, अर्थकारण, भाषा आदी क्षेत्रात जे काही आपल्या सर्वांच्याच अनुभवाला येणारं चाललं आहे ते सर्वकाही सर्वसामान्य माणसाला गृहीत धरून चालले आहे का? असे प्रश्न निदान संवेदनशील माणसाला हरघडी पडताहेत.

जगणे अर्थकेंद्री झाल्याचे विदारक वास्तव्य

समाज आणि माणसाचं जीवनव्यवहार यांच्यात परस्परपूरकतेचं नातं असतं. समाजव्यवहार नियत व्हावेत, ते सर्वांकरिता सुलभ आणि सुरक्षित व्हावेत, या हेतूने लिखित अथवा अलिखित नियमांचे पालन माणसाला करावं लागतं. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचारी वागणं समाजाच्या नजरेत भरतं, आणि समाजच त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्नही करतो. हे प्रयत्न जेव्हा कमी पडतात, अथवा स्वैराचारी – मनमानी जीवनव्यवहार जेव्हा समाजात मोठ्या प्रमाणात कार्यरत होतात; तेव्हा ‘समाजाची घडी बिघडली किंवा विस्कटली’, ‘समाजस्वास्थ्य धोक्यात आले’ अशी हाकाटी पिटली जाते. अशा स्वरुपाची विधाने ऐकू यायला लागतात. सद्याचा काळ हा अशा स्वरुपाची विधाने वारंवार ऐकू येण्याचा आहे. शिक्षणाचे क्षेत्रही याला अर्थातच अपवाद नाही. मानवी विचार, भावना, कल्पना यांचे व्यवस्थापन सुयोग्य पद्धतीने झाले नाही; तर अनेक प्रकारच्या समस्यांना आपणास सामोरे जावे लागते. हे जर असेच दिशाहीनतेनं पुढेही चालत राहिलं तर एक समाज म्हणून त्याचे अतिशय गंभीर परिणाम आपणास भोगावे लागतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणसाचे त्याच्या जीवनातील शिक्षणाचे स्थान. मानवी विकासाचा पायाच आहे तो. कारण सत्य, शिव आणि सुंदर ही अशी अनेक शाश्वत मूल्ये शिक्षणातूनच माणसाला मिळत असतात. पण दुर्देवाने याच क्षेत्राकडे अक्षम्य दुर्लक्ष होते आहे. भविष्यकालीन समाजाची मूल्यात्मक वाढ व्हावी या अनुषंगाने सज्जड असे धोरणात्मक निर्णय होताना दिसत नाहीत. सगळे जगणेच अर्थकेंद्री होत असल्याचे विदारक वास्तव आपणासमोर उभे राहिले आहे की काय असं वाटावं असच सार्वत्रिक चित्र आज तरी दिसते आहे.

शिक्षण व्यवस्थापनाकडे अक्ष्यम्य दुर्लक्ष

शिक्षण हे मानवी जीवन जगण्याचे अत्यंत परिणामकारक माध्यम आहे. विद्येविणा सर्वच जाते असे महात्मा फुले यांनीही समर्पक शब्दात सांगितले आहेच. शिक्षण या क्षेत्राकडे आणि शिक्षणाच्या एकूणच व्यवस्थापनाकडे आपण अक्ष्यम्य दुर्लक्ष केले आहे, हे मान्यच केले पाहिजे. 1990 नंतर विज्ञान, तंत्रज्ञान, भांडवलशाही, जागतिकीकरण या सर्वांमुळे ज्ञानाची क्षितीजे कधी नव्हती इतकी विस्तारली. इंटरनेट सारख्या माध्यमामुळे सर्व प्रकारची माहिती जणू काही ग्राहकाच्या / वाचकांच्या पायाशी लोळण घेते आहे. वास्तविक या ज्ञानविज्ञानाच्या स्फोटामुळे समाजव्यवहार अधिक उन्नत सुखी आणि सुरक्षित व्हावयास हवा होता. तथापि आजचे चित्र देशातील आणि परदेशातीलही याउलटच दिसते आहे. विज्ञानाच्या क्रांतीमुळे भौतिकदृष्ट्या माणूस प्रगत झाला / सुखी झाला असे दिसते, मात्र ते तसे नाही. मानसिक, बौद्धिक, भावनिक, आत्मिक पातळीवर तो कमालीचा परात्म झाला आहे. माणसामाणसाली जिव्हाळा, प्रेम, आत्मियता यांचा लोप होऊन तो अधिकाधिक असुरक्षित ठरला आहे.

या सर्वांचा विचार करता महात्मा फुल्यांना अपेक्षित असलेली ही विद्या आहे का? असली तर इतके अनर्थ आज का दिसत आहेत? असे प्रश्न उभे ठाकतात. या प्रश्नांची सोडवणूक करून सामाजिक स्वास्थ्यासाठी प्रबोधन करणे गरजेचे नाही का? शिक्षणातून अभिव्यक्त होणाऱ्या मानवी मूल्यांचे व्यवस्थापन करण्यात आपण कमी पडतो आहोत. आजचा शिक्षक, विद्यार्थी, शैक्षणिक संस्था, आपली राजकीय ध्येयधोरणे कमी पडताहेत का असे म्हणायला जागा आहे.

मूल्यात्मक घटकांकडे गांभिर्याने पाहण्याची गरज

इंटरनेटसारख्या माध्यमातून माहितीचा प्रचंड साठा आज आपल्यासमोर उपलब्ध आहे. माहिती आणि ज्ञान यात आपण विशेषत: बुद्धिवंतांनी फार मोठी गल्लत करून घेतली आहे. व्यासंग, वाचन, चिंतन, मनन, ध्यास, अवलोकन, आकलन, खंडनमंडन या गोष्टी माणसाच्या ज्ञानाच्या कक्षा वाढवितात, जीवनविषयक जाणिवा व्यापक करतात. अशा प्रकारचे ज्ञान समाजाभिमूख, समाजाला दिशादिग्दर्शन करणारे असते. अशा ज्ञानग्रहणातील आणि ज्ञानदानातील आनंद शाश्वत स्वरुपाचा असतो. असा आनंद अर्थातच कष्टसाध्य पण चिरंतन स्वरुपाचा असतो. तथापि स्पर्धेच्या युगात-ती स्पर्धाही निकोप नसलेल्या युगात आपल्याकडे बौद्धिक कष्ट करण्याला, त्यातून मिळणाऱ्या आनंदाच्या प्राप्तीकरिता थांबण्यास वेळच नाही. खुष्कीच्या मार्गाने शॉर्टकट शोधण्याच्या नादात माहितीलाच ज्ञान समजून कटिंग आणि पेस्टिंगला ज्ञानाची, सर्जनशीलतेची निर्मिती समजून माहितीच एकमेकांच्या कानांवर ठोकून दुर्देवाने आपण बुद्धिवंतांचा आव आणत आहोत. खरे तर हे एकप्रकारचे केवळ पोकळ शब्द असलेले ज्ञानयुद्धच नव्हे काय? यातून आपण स्वत:साठी आणि पर्यायाने समाजासाठीही काहीही साध्य करीत नाही आहोत; हे आपल्या ध्यानीच येत नाही. जरी आले तर आपण सारेच याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करतो आहोत. त्यामुळे आदर्श अशा प्रकारच्या शिक्षणातून मिळणाऱ्या मूल्यात्मक घटकांकडे आपण गांभिर्याने का पाहू नये?

काहीतरी नवीन करायचे या भ्रमात ध्येयधोरणे

शिक्षणातून मिळणाऱ्या मूल्यांचा आणि राजकारणाचा राजकीय-ध्येयधोरणाचा संबंधही अत्यंत निकटचा आहे. प्रश्न असा उपस्थित होऊ शकतो; की सत्ताधाऱ्यांना शिक्षणाविषयी, शिक्षणातून साध्य होणाऱ्या मूलभूत मूल्यांविषयी आस्था किती मोठ्या प्रमाणात आहे. जी ध्येयधोरणे शासन शिक्षणाच्या संदर्भात राबविते, त्यातून उपयोजनाच्या संदर्भात, माणूस स्वत:च्या पायावर उभा राहण्यात, शिक्षणाचा संबंध केवळ नोकरीशी न जोडण्यात कितपत सहाय्य होते. प्राथमिक स्तरापासून पदवी पद्व्युत्तर पातळीपर्यंत तसेच इतर ज्ञानशाखांसंदर्भातसुद्धा (इंजिनिअर, डॉक्टर, वकील, तंत्रज्ञ, वैज्ञानिक इ.) शिक्षण क्षेत्रातील राजकीय हस्तक्षेप, ध्येयधोरणे पाहता आपल्या राज्यकर्त्यांनाही शिक्षणाचे व्यवस्थापन पुरेशा गांभिर्याने आकलन झाले आहे; किंवा त्याची मांडणी सुयोग्य पद्धतीने झाली आहे असे म्हणता येत नाही. शिक्षणाशी दुरान्वयेही संबंध नसेलेले राजकारणी शिक्षणाची ध्येयधोरणे ‘काहीतरी नवीन करायचे’ या भ्रमाखाली ठरवीत असतात, असे चित्र दिसते.

शिक्षण आणि भाषेचा (माध्यमाचा) प्रश्न, शिक्षण आणि मूल्यात्मकतेचा प्रश्न, शिक्षण आणि पर्यावरणाचा प्रश्न, शिक्षण आणि फी अथवा डोनेशनचा प्रश्न, शिक्षण आणि रोजगारााचे प्रश्न, शिवाय शिक्षण आणि आरोग्य, शिक्षणाचा मनाशी, भावनेशी, शारीरिकतेशी व आरोग्याशी असणारे नाते यांच्याशी संबंधित असणारे प्रश्न आणि या प्रश्नांच्या सोडवणुकीतून सिद्ध झालेली उत्तरे फारशा समाधानकारकरित्या आजच्या राजकारण्यांकडे सापडत नाहीत. कारण शिक्षण हे क्षेत्र बाकीच्या त्यांच्या महत्त्वाच्या क्षेत्रांमधील सर्वात शेवटच्या क्रमांकाचे ठरले आहे; असे म्हणता येते.

डॉ. धनागरे यांचे विचार

या संदर्भात डॉ. द. ना. धनागरे यांचे ‘उच्च शिक्षण : ध्येयवादाकडून बाजारपेठेकडे’ग्रंथातील पुढील अवतरण चिंतनीय आहे, ते म्हणतात,‘‘कसेही करून, पैसे फेकून व्यावसायिक पदवी पदरात पाडून घ्या, पुढचे पुढे पाहू ! ही प्रवृत्ती राज्यातील तरुण तरुणींमध्ये बळावते आहे. इतरही राज्यात ती फारशी चांगली नाही, हे सुद्धा मान्य केले पाहिजे. विद्यापीठ व महाविद्यालयीन उच्च शिक्षण ही धनदांडग्यांची मक्तेदारी बनली आहे. तिला मोकाट रान मिळणे ही गोष्ट समताधिष्ठित, सामाजिक न्यायाशी बांधिलकी मानणाऱ्या राज्याला लांच्छनास्पद आहे. गेल्या पन्नास वर्षात ‘तवा गरम आहे तोवर आपली पोळी भाजून घ्या’ या क्षणिक लाभाच्या राजकारणाने महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाची पार वाट लावली आहे. उच्च शिक्षण कशासाठी व कोणासाठी, आणि उच्च शिक्षणाचे मुख्य प्रयोजन काय, विकासाची दिशा काय असावी यासंबंधीची तिळमात्र जाण नसलेल्या नेतृत्वाच्या हाती उच्च शिक्षणाचे भवितव्य सोपवले गेले आहे. त्यामुळे सुस्पष्ट धोरण नसलेल्या महाराष्ट्रात उच्च शिक्षण व विद्यापीठांची अवस्था भरकटलेल्या तारूसारखी झाली आहे असे खेदाने म्हणावे लागते. योग्य धोरण आणि उचित नेतृत्वाचा शोध हाच या समस्येवर उपाय आहे; असे म्हणता येईल.’’ अर्थातच आपले राजकारणही शिक्षणाचे, शिक्षणाशी संबंधित प्रश्नांचे नीट व्यवस्थापन करू शकले नाही.

पळशीकरांचे महत्त्वपूर्ण विचार

आधुनिक काळातल्या या व्यवस्थापकीय अनाराचाराच्या संदर्भात आपण काय करू शकतो? हाही एक महत्वाचा कळीचा प्रश्न आहे. शिक्षणाचे – ज्ञानाचे व्यवस्थापन म्हणजे काय? ते कसे करावयाचे असते? या प्रश्नांची उत्तरेही आपणाकडे आहेत. म्हणजे ती उत्तरे आपणास ठाऊकही आहेत. या संदर्भात आपण काय करावयाचे आहे, हे ही आपणास कळते, पण ते वळत मात्र नाही; अशी आजची आपली अवस्था आहे. सन्माननीय अपवाद नाहीत असे नाही. पण अशांची संख्या अत्यल्प आहे. ती वाढली मात्र पाहिजे. या संदर्भात वसंत पळशीकर यांनी मांडलेले विचार महत्त्वपूर्ण वाटतात; ते म्हणतात,‘‘विचाराच्या क्षेत्रात लहानमोठे कार्य करणाऱ्या, विचारांविषयी आस्था असणाऱ्या मंडळींनी विचाराच्या क्षेत्रातील शोचनीय परिस्थिती सुधारण्याचे काम अंतर्मुख होऊन प्रथमत: हाती घ्यायला हवे आहे. ही गोष्ट विचारवंतांची एक संघटना बांधून वा पक्ष स्थापन करून, मागण्या सादर करून व त्या पदरात पाडून घेण्याचे राजकारण करून साध्य होणार नाही. वैयक्तिक व छोट्या समूहांच्या पातळीवर चोख, कसदार विचार करावयास लागणे हा एक मार्ग आहे. आपल्या सहविचारवंतांच्या वैचारिक कृतींची चोख समीक्षा करणे, व एक अंतर्गत जिवंत चर्चा उपस्थित करणे हा दुसरा मार्ग आहे. लोकांमध्ये जाऊन विचार त्यांच्यासह करणे हा तिसरा मार्ग आहे.’’ चौकटीबाहेरचे चिंतन (संपादक. किशोर बेडकिहाळ) या ग्रंथात वसंत पळशीकर यांनी मांडलेले विचार निश्चितच मूल्ययुक्त आहेत.

मातृभाषेकडे अक्षम्य दुर्लक्ष

भाषेच्या संदर्भात विचारकरता आपलं आपल्या मातृभाषेकडे अक्षम्य दुर्लक्ष होतं आहे; हे मान्यच केले पाहिजे. भाषेबद्दलची आस्था, अभिमान शिवाय दैनंदिन जीवनात या भाषेचे उपयोजन आपल्या हातून कमालीच्या उदासीनपणाने होते आहे. इंग्रजीचा इंग्रजी शिक्षणाचा नको तितका हव्यास वाढतो आहे. कोणतीही भाषा वाईट नसते. तथापि आपल्या मातृभाषेतून घेतलेले शिक्षण माणसाला अधिक मूल्ययुक्त आणि कोणत्याही प्रकारचा ज्ञानव्यवहार आकलनाच्या कक्षेत येण्यास अधिक मदत करत असतो. अशा प्रकारचे विचार जगातील अनेक विचारवंतांनी, समाजसुधारकांनी, साहित्यिकांनी व्यक्त केलेले आहेत. तेव्हा आपल्या मातृभाषेकडे डोळसपणे पाहून अंध आणि अनुकरणीय वावगी भक्ती सोडून दिली पाहिजे. शिवाय आपल्या शेजारी गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या अनेक प्रकारच्या प्रादेशिक भाषेचे महत्त्वही जाणलं पाहिजे.

इंग्रजीचा अनाठायी वापर

आजकाल केवळ इंग्रजी या भाषेचे महत्त्व सर्वसामान्यांच्या मनावर बिंबवून प्रादेशिक भाषा संपविण्याचे उद्योग जगभर होताना दिसत आहेत. याला बळी पडून अनेक भाषा ऱ्हास पावत आहेत. कित्येक भाषा मृत्यूमुखी पडलेल्या- कायमच्या संपून गेल्या आहेत. इंग्रजीचा अनाठायी वापर वाढला आहे. ‘‘भावीकाळात जर संपूर्ण महाराष्ट्रात बालवर्गापासूनच इंग्रजी माध्यम राहिले आणि शालेय अभ्यासक्रमातून मराठी विषय आजिबातच काढून टाकला तर मराठी वापर आणि त्याचा वाचकवर्ग या गोष्टी भूतकाळात जमा होतील असे सुधीर रसाळ यांनी वाचनवेध या ग्रंथात आपले मत नोंदविले आहे.’’ इंग्रजी भाषेचा दुस्वास नाही ते टाळताही येणार नाही. ती जगाकडे पाहण्याची ते समजून घेण्याची एक खिडकी आहे हे मान्य पण खिडकी म्हणजे घर नाही हे ध्यानात ठेवले पाहिजे.

साहित्य, संस्कृतीपासून समाज दूर लोटतोय

भाषेचं संपणं म्हणजे आपलं साहित्य-संस्कृती-इतिहास संपण्यासारखं आहे; हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपण आपापल्या प्रादेशिक भाषेत जितक्या चांगल्या प्रकारे व्यक्त होतो तितक्या चांगल्या प्रकारे इतरांच्या कोणत्याही भाषेत व्यक्त होऊ शकत नाही. आपली चळवळींची, बंडाची, अन्यायाविरूद्ध लढण्याची धार बोथट बनत जाते. तेव्हा तेव्हा भाषा असेल तरच आपले खरे अस्तित्त्व आहे हे विचारपूर्वक ध्यानी घेऊन आपल्या मातृभाषा जपणे, वाढविणे, तिचे भरणपोषण करणे हे खूप महत्त्वाचे आहे. भाषा कोणतीही असो तिला तिचा म्हणून एक इतिहास असतो, संस्कृती असते आणि ती मूल्ययुक्त संस्कृती माणसाच्या जगण्या-वागण्यात सतत पाझरत असते. हे असे सत्वयुक्त पाझरत राहणे समाजस्वास्थ्यासाठी अत्यंत गरजेचे असते. ते आजकाल कठीण ठरते आहे. त्यामुळे आपला समाज आता पूर्वीसारखा एकजिनसी राहिलेला दिसत नाही. जागतिकीकरणोत्तर समाज आणि पर्यायाने समाजातला प्रत्येक माणूस कुठल्या तरी बेटावर रहात असल्यासारखा दिसतो आहे. तो आपल्या समाजापासून, माणसांपासून, नातेसंबंधांपासून तुटून विलग झाल्यासारखा आहे. शहरयार यांची एक सुंदर गजल आहे. सिनेमे जलन, आँखो में तुफान सा क्यों है ! इस शहरमें हर शख्स परेशानसा क्यों हैं? चाळीस एक वर्षांपूर्वीच्या या गझलमधील ओळी आजही तंतोतंत खऱ्या ठरत आहेत. उलट त्यातली भयावहता अधिकच चिंताग्रस्त करते आहे. आपला समाज जर अशाच आपल्या साहित्यापासून, संस्कृतीपासून आणि आपल्या भाषेपासून उत्तरोत्तर दूर होत गेला तर यंत्र आणि तंत्रात सापडलेला तो एक कठपुतळी होण्यास फारसा अवधी लागणाार नाही.

शिक्षणाचे नीट व्यवस्थापन काळाची गरज

मूल्ययुक्तपणे जगणे, मानवी मूल्यांची/जीवनमूल्यांची (सत्य, शिव, सुंदराची) जोपासना करणे, आपल्या व्यवसायात शाश्वत मूल्ये रूजवण्याचा प्रयत्न करणे, नैतिकतेच्या आचार विचाराला केंद्रस्थानी मानने, विचार आणि कृती यात एकवाक्यता साधणे, भौतिक साधनांपेक्षा साध्या पण उत्कट राहणीमानाचा पुरस्कार करणे, वाचन, चिंतन, मनन अशा ज्ञानसाधनेत सातत्य ठेवणे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक बांधिलकी, धर्मनिरपेक्षता प्रमाण मानून त्यानुसार आचरण ठेवणे महत्त्वाचे आहे. कारण या सर्वांमधूनच आपले पर्यायाने विद्यार्थ्यांचे/समाजाचे सामाजिक वर्तन सिद्ध होत असते. याकरिता शिक्षणाचे चांगले व्यवस्थापन व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवर होणे महत्त्वाचे असते; ते होत नाही म्हणून समाजस्वास्थ्य बिघडल्याची तक्रार नेहमी ऐकू येते ही तक्रार कमी व्हायची असेल तर मुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, विठ्ठल रामजी शिंदे यांना अभिप्रेत असलेले शिक्षण आणि त्या शिक्षणाचे नीट व्यवस्थापन आपण सर्वांनीच केले पाहिजे. अन्यथा धुळीतून धुक्याकडे असाच आपल्या सर्वांचाच प्रवास अटळ आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

‘एक वैश्विक मराठी ब्रँड’ बनविण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न खरोखरीच स्तुत्य

राधानगरी धरणाचा स्वयंचलित चौथा दरवाजा उघडतानाचा क्षण…

पळस (ओळख औषधी वनस्पतीची)

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading