July 27, 2024
Danapur Marahti Boli Sahitya Samhelan Acharya N G Thute speech
Home » बोली भाषेच्या संवर्धनाचा जागर…
विशेष संपादकीय

बोली भाषेच्या संवर्धनाचा जागर…

मराठी बाेली साहित्य संघ नागपूरचे 8 वे राज्यस्तरीय मराठी बाेली साहित्य संमेलन दाणापूर ता. तेल्हारा जि. अकाेला येथे झाले.  स्व. बापुसाहेब ढाकरे कला अकादमी आणि  कै. शामरावबापू सार्वजनिक वाचनालय, दाणापूर यांनी या संमेलनाचे आयोजन केले होते. या  संमेलनाचे अध्यक्ष आचार्य ना. गाे. थुटे यांच्या अध्यक्षीय भाषणाचा संपादित अंश…


साहित्य संस्कृतीचे माय-बाप तुम्ही ।
स्पर्शिताे चरण, इथे आपुले मी ।।

गाैरवशाली दाणापूर गाव

सातपुडा पर्वताच्या सानिध्यातले पुरातन गाव म्हणजे हे गाैरवशाली दाणापूर गाव हाेय. अनेक  नैसर्गिक चमत्कारांनी नटलेले हे गाव आहे. पर्वतरांगा, नदी-नाले, शेती, वनश्री व सूर्य-चंद्र-ताऱ्यांच्या  प्रकाशाची बरसात असलेलं हे गाव. वाण नदीच्या झुळझुळत्या प्रवाहाचे संगीत इथे आहे. नंद राजाचे  कूळ इथे राहत असल्याचेही सांगितले जाते. देवगिरीचे महाराज यादवराय ह्यांच्या मावशीचे वास्तव्य या  गावास लाभले आहे. इथली माणसे साधी-भाेळी व सज्जनवृत्तीची असल्याची प्रतिमा आहे. आधात्मिक,  सांस्कृतिक, साहित्यिक अशा विविध क्षेत्रांतही या गावाची कर्तबगारी दिसून येते. ब्रम्हलीन राष्ट्रसंत  तुकडाेजी महाराज यांचा अस्थिकलश या गावाने आणून ताे जपून ठेवलेला आहे. इथेच गुलाबबाबा या संताचा आश्रमही आहे. 

याच गावात सेवाभावी शिक्षक व दाणापूरचे आद्यकवी शामराव कुकाजी ढाकरे  उर्फ बापू गुरुजी ह्यांच्या सत्कार्याचा परिमल इथे दरवळत आहे. महत्वाचे म्हणजे बापू गुरुजी हे आपल्या  प्रतिमाताई इंगाेले यांचे आजाेबा आहेत.  कैलासवासी शामरावबापू वाचनालयाची ग्रंथसंपदा व वाचन  संस्कृती इथे चांगल्यारितीने नांदत आहे. प्रतिमाताईंचे माहेर म्हणजे हे दाणापूर गाव आणखीही अनेक  वैशिष्टयांनी व उपवैशिष्ट्यांनी विनटलेले आहे. या रमणीय गावाने आपणा सर्वांस जिव्हाळ्याने बाेलावून  चांगले आतिथ्य प्रदान केले आहे. त्याचा आपण सर्वजन आनंद घेत आहाेतच. प्रतिमाताईंची माहेरची  अनावर ओढ विलक्षण आहे. त्यामुळेच त्यांचा जीव इथल्या कणाकणांत अडकलेला दिसताे. त्यांनी या  संमेलनासाठी माहेरी केलेली कष्टप्रद धडपडही हेच सांगते.
म्हणूनच बहिणाबाई चाैधरी म्हणतात-
माझ्या माहेरच्या वाटे, जरी आले पायी फोड
पाय चालले चालले, अशी माहेराची ओढ

दाणापूर येथील राज्यस्तरीय 8 वे मराठी बाेली साहित्य संमेलन –

संयाेजक व आयाेजक संस्थांच्या वतीने महाराष्ट्र राज्य मराठी बाेली साहित्य संघ नागपूरच्या या  राज्यस्तरीय 8 व्या मराठी बाेली साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद सर्वसम्मतीने मला बहाल केल्याचे  मा. डाॅ. हरिश्चंद्र बाेरकर व मा.डाॅ. प्रतिमा इंगाेले यांनी कळवून माझे अभिनंदन केले आणि मला सन्मान दिला त्यामुळे मी सद्गदित झालाे. मी ह्या सर्वांचा खूप आभारी आहे. आजवरच्या सातही  संमेलनांच्या अध्यक्षपदी असलेल्या व्यक्ती महाराष्ट्रात महनीय व ख्यातकीर्त आहेत. डाॅ. रा. र.  बाेरांडे, डाॅ. विठ्ठल वाघ, डाॅ. गंगाधर पानतावणे, डाॅ. हरिश्चंद्र बाेरकर, डाॅ. प्रभाकर मांडे, डाॅ.  प्रतिमा इंगाेले, डाॅ. किसन पाटील ही ती नावे आहेत. ह्यांच्या साहित्यातील दैदिप्यमान कर्तृत्वाने  आमच्यासारख्यांची छाती दडपून जाते अशा ह्या थाेर व्यक्ती आहेत. ह्या थाेरांच्या पंगतीत मलाही  बसवून आपण माझा माेठा मान वाढविला आहे. मागील सातही बाेली साहित्य संमेलनांतून वाहत  आलेला मराठी बाेली साहित्याचा प्रवाह या 8 व्या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून पुढेही अधिक  समृध्दीसह खळाळत वाहत नेण्याचे संकल्प करून ते सिध्दीस नेण्याचे प्रयत्न आपण सर्वजण करूया.  त्यासाठीच आपण आजच्या 8 व्या संमेलनाचे सहभागी व साक्षीदार झालाे आहाेत.

हे आठवे संमेलन आहे. आठ हा आकडा अनेकांना अशुभ वाटताे आठ या अंकामुळे अनेक  प्रकारचे आट निर्माण हाेतात, अडथळे तयार हाेतात अशी खुळचट धारणा काहींची असते. मा या  बाबतीत मात्र आठ हा अंक शुभदायी ठरला आहे. आठव्या झाडीबाेली साहित्य संमेलनाचा मी सन  2001 मध्ये अध्यक्ष राहिलेलाे आहे. त्यावेळी प्रतिमाताई इंगाेले ह्या सुध्दा अतिथी म्हणून उपस्थित  हाेत्या. तसेच आज 8 व्या राज्यस्तरीय मराठी बाेली साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणूनही  प्रतिमाताईंच्या गावी आपणापुढे हजर आहे. इतरही प्रसंगी आठ या अंकाचे मला सहाय्यच झालेले आहे.  खरे तर काेणताच अंक, क्षण किंवा वस्तू अशुभ नसते. आपल्या आचार-विचारांत व कृतीत मात्र  अशुभता येऊ न देणे हेच महत्वाचे आहे.

प्राचीन काळापासून मराठी बाेलींचा वावर –

महाराष्ट्रात व त्याच्या सीमावर्ती भू-भागात फार प्राचीन काळापासून सुमारे 2000 वर्षाच्या  आधीपासून लाेकांमध्ये मराठी बाेलींचा वावर हाेता असे दाखले मिळाले आहेत. ह्या विविध बाेली  बाेलणाऱ्या सर्व भागांत फिरस्ती करणारे संत-महात्मे, साहित्यिक, विचारवंत, कलावंत ह्यांना ह्या सर्व  बाेली बाेलणाऱ्या लाेकांमध्ये मिसळायचे असल्याने त्यांच्या व्यवहारात, साहित्यात, संवादात, कलेत  ह्या विविध भागांतील बाेलींचे शब्द येत गेले. त्यामुळे अनेक भागांतील मराठी बाेलींचे प्रतिबिंब ह्या जुन्या  जाणत्या लाेकांच्या काव्यलेखनात व गद्य लेखनातून उमटून दिसते. ह्या पूर्वकालीन बाेलींची रूपे प्राचीन  काळापासून महाराष्ट्री, अपभ्रंश, प्राकृत, मराठी अशी हाेत आल्याचे भाषातज्ज्ञ सांगतात. प्रारंभी ह्या बाेली बाेलणाऱ्या त्या-त्या लाेकसमुदायांच्या नावांनी ओळखल्या जात असल्याचे  दिसते. उदा. अहिरांची अहिराणी बाेली. पुढे पुढे या बाेलींची व्यापकता वाढून त्या गावांच्या शहरांच्या किंवा प्रदेशांच्या नावांनी परिचित झाल्या, जसे काेल्हापुरी, नागपुरी, वऱ्हाडी, खानदेशी,  मालवणी इ. ह्या बाेलींतूनच लाेकसाहित्य निर्माण झाले आहे. बाेलींच्या या सर्वसमावेशक वापरामुळे  प्राचीन संत साहित्यात किंवा लाेकसाहित्यात महाराष्ट्रातील ठिक-ठिकाणच्या विविध बाेलींचे शब्दधन  संपन्नतेने विखुरलेले आहे. यामुळेच प्रत्येक बाेलीच्या चाहत्याला आपल्या बाेलीची रूपावली या  साहित्यात दिसून आल्याने त्या जुन्या साहित्याचा विशेष अभिमान वाटताे. शाहिरी वाङ्मयालाही  जनसामान्यांचाच मराठी बाेलींचा रांगडा पाेत लाभला आहे हे लक्षात येते. संस्कृत ही भाषाही प्राचीन  भारतीय जनगणांच्या बाेलींचे संस्कारित रूप असल्याचे अलिकडील अभ्यासक सांगतात. तात्पर्य हेच  की आजच्या समृध्द भाषांची मुळे बाेलींमध्येच रूजलेली आहेत. त्यामुळे बाेलींचे महत्व अधाेरेखित हाेते. 

प्रमाण मराठी भाषेचा वरचष्मा व अन्य बाेलींकडे दुर्लक्ष –

भारतात सन 1818 पासून इंग्रज शासकांची राजवट सुरू झाली. पुढे त्यांनी भारतीय  लाेकांसाठी प्रादेशिक भाषांमधून शाळा सुरू केल्या व महाराष्ट्रात पुणे येथील उच्चवर्णीय शिक्षितांची  मराठी बाेली पाठ्यपुस्तकांची प्रमाण भाषा म्हणून मान्य केली. नंतर इतर भागांतील-प्रदेशांतील  मराठीच्या अन्य बाेलींकडे दुर्लक्ष झाले.त्यामुळे ह्या बाेलींची उपेक्षा हाेऊन त्यांना मागास ठरविण्याचा  प्रकार घडत गेला. ह्या बाेली बाेलणाèयांची कुचेष्टा हाेऊ लागली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर  स्वातंत्र्य-समता-बंधुता-न्याय या तत्वांवर आधारित लाेकशाही निर्माण करणारी भारतीय राज्यघटना  डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेतील मसुदा समितीने तयार केली. तिला संपूर्ण भारताने मान्यता  दिली. या घटनेमुळे शिक्षणाची दारे सर्वांना खुली झाली आणि कित्येक वर्षे शिक्षणाचा गंध नसलेल्या  लाेकांच्या पिढ्या लिहू-वाचू लागल्या. आजवर मागासलेला मुका समाज लेखनीतूनही अभिव्यक्त हाेऊ  लागला. स्त्री शिक्षणालाही चालना मिळाली. तरीही महाराष्ट्रात पुस्तकांची भाषा जुनीच पुणेरी  प्रमाणभाषा म्हणून कायम असल्याने अन्य मराठी बाेलींच्या लाेकांची-लेखकांची घुसमट हाेत राहिली.  वास्तविक प्रमाण मराठीच्या समर्थकांनी मराठीच्या अन्य बाेलींचे शब्दधन घेऊन मराठीला अधिक  समृध्द करायला पाहिजे हाेते. पण मनमाेकळेपणाने असे झाले नाही.

मराठी बाेलींचे अस्मितावर्धक कार्य-

अशा घुसमटलेल्या स्थितीत बाेलींच्या प्रमुख मंडळीने आपआपल्या बाेलींचा डंका वाजवून  आपली अस्मिता व समृध्दी प्रकट करण्याचा प्रयत्न केला. खरे तर असे म्हटल्या जाते की, भाषा म्हणजे  लाेकसंस्कृती-प्रवाह- अस्मिता असते. एखाद्या भाषेच्या बाेलीभाषा जितक्या जास्त तेवढी ती भाषा  ऐश्वर्यसंपन्न बनते. काेणतीही बाेली मूळ प्रमाण भाषेला समृध्द करते. याच अनुषंगाने वऱ्हाडी बाेली  अहिराणी, मालवणी, झाडी बाेली, काेल्हापुरी व अन्य बाेलींच्या समर्थकांनी आपआपल्या बाेलींचा  अभिमान बाळगून साहित्यिक समृध्दीच्या दिशेने प्रयत्न केले.

वऱ्हाडी बाेलीतील दे. ग. साेटे, डाॅ. विठ्ठल वाघ, उध्दव शेळके, डाॅ. मधुकर वाकाेडे, मनाेहर  तल्हार, शंकर बडे, अहमद बेग, डाॅ. प्रतिमा इंगाेले व अन्य जणांनी वऱ्हाडी बाेलीचा आवाज आपल्या  वाययीन प्रज्ञेने महाराष्ट्रात बुलंद केला. वऱ्हाडातील काव्यवाचन व कथाकथन आणि साहित्य निर्मिती  तथा साहित्य संमेलने विशेष प्रशंसनीय ठरली आहेत. एकेकाळी तरुण भारत या दैनिकातील बंडी  उलार झाली हे वऱ्हाडीतील सदर खूप गाजले हाेते. विठ्ठल वाघांची काळया मातीत मातीत तिफन  चालते ही काव्यधून महाराष्ट्रभर गाजली आहे. या बाेलीची प्राचीनताही या बाेलीच्या संशाेधकांनी  अभिव्यक्त केली आहे.

गाेंदिया-भंडारा-चंद्रपूर व गडचिराेली या चार जिल्ह्याच्या झाडीपट्टीतील बहुसंख्य लाेकांच्या  बाेलीचे झाडीबाेली असे नामकरण डाॅ. हरिश्चंद्र बाेरकर यांनी केले व गेल्या 30-40 वर्षापासून या  बाेलीची चळवळ सुरू केली आहे. कवी हिरामण लांजे, डाॅ. हेमकृष्ण कापगते, डाॅ. राजन जयस्वाल,  घनश्याम डाेंगरे, वसंत चन्ने, राम महाजन, दिवाकर माेरस्कर, कटकवार, रामचंद्र डाेंगरवार, डाेमा  कापगते, विठ्ठल लांजेवार, द.सा.बाेरकर, ना.गाे.थुटे, डाॅ. भा.शि. भाेयर, लखनसिंह कटरे, साै.  अंजनाबाई खुने, बापुराव टाेंगे, बंडाेपंत बाेढेकर, मा. तु. खिरटकर, प्र. ग. तल्लारवार, नरेंद्र नारनवरे व  अशा अनेक मान्यवरांनी लाेकाश्रयाने झाडीबाेलीचा नाद-निनाद पुण्या-मुंबई पर्यंत ऐकविला या  बाेलीची आजवर 27 साहित्य संमेलने झालीत, तसेच विविध साहित्य यात्रा निघाल्यात.

झाडीबाेलीतील पहिले मासिक लाडाची बाई सन 2010 साली खटीमा (उ.प्र.) येथे प्रकाशित झाले. झाडीबाेलीतील पहिले प्रकाशित  पुस्तक म्हणून माझ्या सपनधून या काव्यसंग्रहास मान मिळाला. तसेच झाडी बाेली साहित्य मंडळाची पहिली शाखा वराेरा येथे सुरू करण्याचे कार्यही माझ्याकडून घडले याची धन्यता वाटते. मा. लखनसिंह  कटरे संमेलनाध्यक्ष असलेल्या वराेरा येथील 11 व्या झाडीबाेली साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपदही  मी सांभाळले आहे. तसेच साहित्य संमेलने घेण्यास इतरांनाही मला प्रवृत्त करता आले. 1999 पासून  झाडीबाेलीच्या साहित्य चळवळीत वाङ्मयीन कार्यात सतत कार्यरत असल्याचा मला अभिमान वाटताे.  डाॅ. हरिश्चंद्र बाेरकर ह्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य स्तरावरील मराठी बाेली साहित्य संघ,नागपूर या  संस्थेची 2003 मध्ये निर्मिती झाली. ही सुध्दा ऐतिहासिक घटना ठरली आहे.

खानदेशातील अहिराणी बाेलीतील साहित्याच्या प्रांतात बहिणाबाई चाैधरीचे नाव येतेच. पण  अन्य शिलेदारांमध्ये वसंतराव चव्हाण, वसंतराव देसले, अरुण निकम, रमेश सूर्यवंशी, रामदास वाघ,  डाॅ. सुधीर देवरे, दत्ता राम, अंसारी भाई, सुभाष अहिरे, दा. गाे. बाेरसे, कै. राजा महाजन, कृष्णा पाटील,  डाॅ. बापुराव देसाई, अहिरराव, संजीवकुमार साेनवणे, कवि काेतवाल, नामदेव महाजन, जगदिश  देवपुरकर व अशाच अनेक जणांनी अहिराणीतील साहित्य संमेलने, ग्रंथनिर्मिती, त्रैमासिके, चित्रपट,  कथाकथन, कार्यक्रम संचालन इ. क्षेत्रांत या बाेलीची ख्याती महाराष्ट्रात सर्वत्र पसरविलेली आहे.

मालवणी बाेली ही सुध्दा मराठीची एक प्रगत बाेली आहे. तिचा गाेडवा, लय, ठसका, अनाेखे  नादमाधुर्य ही तिची वैशिष्ट्ये आहेत. मालवणीत गेल्या 60-70 वर्षात लिखित स्वरूपाचे वायय तयार  झाले आहे. वि. कृ.  नेरूरकर, गंगाधर कदम, कॅ. मा. कृ. शिंदे, आबासाहेब आचरेकर, शंकर शिंदे,  दा. र.  दळवी, ना. शि. परब, सूर्यकांत तारी, महेश केळूसकर, अविनाश वापट, दादा मडकईकर, नामदेव  गवळी, साै. सुनंदा कांबळे  आदींनी काव्य लेखन केले. या बाेलीत सुमारे 45 नाटके लिहिली गेलीत. कथा,  कादंबरी, एकांकिकांचीही निर्मिती झाली आहे. या बाेलीतील म्हणी व शब्दकाेष सुध्दा तयार झाले  आहेत. या बाेलीचे लाेकवाङ्मयही संपन्न आहे. येथील साहित्य व कला विश्वात मच्छिंद्र कांबळी,  बाळकृष्ण लळीत आदींचे याेगदान भरीव आहे. आकाशवाणी, दूरदर्शन केंद्र आदीवरूनही मालवणीचे  आविष्कार प्रकट हाेत आहेत.

याशिवाय काेल्हापुरी बाेलीचा ठसठसितपणा व रांगडेपणाही तिकडील जनलाेकांनी जपलेला  आहे. चंदगड तालुक्यातील चंदगडी बाेलीही आपली वैशिष्ट्ये घेऊन अस्मिता दर्शवित आहे. इतरही  मराठी बाेली आपापल्या भागात आपापले अस्तित्व राखून आहेत.

महाराष्ट्रातील विविध जाती-समुहांच्या बाेलींवरही मराठीचा प्रभाव असल्याचे दिसून येते. मराठी  मुलखात राहिल्याने मराठी बाेलीतील अनेक शब्द अनेक जाती-समुहांच्या बाेलीभाषेत आढळतात.  त्यामुळे ही मंडळी आपली स्वबाेली बाेलत असले तरी मराठी बाेली बाेलणाऱ्यास त्यांचा ढाेबळ भावांश  कळून येताे. एकंदरित ह्या सर्व बाेली एकमेकींच्या जवळ आल्याचे चित्र दिसते.

बाेलींच्या जवळीकेतून झालेली कार्यसिध्दी –

बाेली चळवळीतून माणसे जवळ आलीत व ती विचार विनिमय करू लागली. त्यातून अनेक  साहित्यिक उपक्रम जन्मास आले. झाडीबाेली साहित्य चळवळीद्वारे डाॅ. हरिश्चंद्र बाेरकर यांच्या  संकल्पनेतून झाडीबाेलीच्या संशाेधनाच्या अंगाने झाडीपट्टीत साहित्यिकांची वैनगंगा यात्रा काढण्यात  आली. तसेच आंभाेरा येथून मराठीचा आद्यग्रंथ विवेकसिंधु लिहिणारे मुकुंदराज ह्यांच्या खेडला (म.प्र)  येथील समाधीपर्यंत मुकुंदराजांच्या जाण्याच्या मार्गावरील नामसमाधींचे दर्शन व माहिती घेत साहित्यिकांची यात्रा संपन्न झाली. याशिवाय आंभाेरा ते आंबेजाेगाई पर्यंतची साहित्य साैहार्द्र यात्रा  काढून मुकुंदराजाने विवेकसिंधु हा ग्रंथ आंभाेरा येथेच लिहिल्याचे यातून बिंबविण्यात आले. या तिन्ही  यात्रेत मला सक्रीय सहभागी हाेता आले आहे. याशिवाय महत्वाची यात्रा म्हणजे डाॅ. हरिश्चंद्र बाेरकर यांचे  गाव रंगेपार ते मुंबई अशी राज्यस्तरीय साहित्यिकांच्या संपर्कासाठीची साहित्य संवाद यात्रा ऑगष्ट  2003 मध्ये काढण्यात आली. या यात्रेतून ठिकठिकाणच्या प्रमुख बाेली व मराठी साहित्यिकांशी  हितगुज करून- संवाद साधून मराठीच्या सर्व बाेलींची एक राज्यस्तरीय साहित्य संस्था मराठी बाेली  साहित्य संघ, नागपूर या नावाने निर्माण करण्यात आली. या संवाद यात्रेतही मी एक सदस्य व  संवादकर्ता हाेताे. या राज्यस्तरीय बाेली संस्थेच्या कार्यकारिणीतही दिड दशक पर्यंत कार्यरत राहिलाे  असल्याचे भाग्य मला लाभले आहे.

मराठी बाेली साहित्य संघाच्या माध्यमातून महाराष्ट्र स्तरावरील बाेलींची माणसे जवळ आली.  आपापसात संवाद साधू लागली. एकमेकांच्या साहित्यिक कार्यात-उपक्रमांत सहभागी हाेवू लागली.  सर्व बाेलींच्या बाबतीतली साहित्यसंमेलनेही महाराष्ट्रातल्या विविध भागातील शहरांत संपन्न झाली.  माेझरी, आंबेजाेगाई, भुसावळ, यवतमाळ, शिरूर (पुणे), इचलकरंजी, पाचाेरा आदी ठिकाणी ही संमेलने  झाली व आज आपण दाणापूरच्या संमेलनात हितगुज करीत आहाेत.  या संमेलनांची  फलश्रुती म्हणून निरनिराळ्या बाेलींची साहित्यिक मंडळी एकमेकांजवळ आली. यातून त्यांचा परस्पर  संवाद वाढून मित्रता व सद्भाव वाढला. एकमेकांकडे येणे-जाणे सुरू झाले. तसेच राज्यस्तरीय  संमेलनांमुळे बाेली-भाषांची कार्यात्मकता व उपयुक्तता शासनास, कलाक्षेत्रास व जनतेस कळू लागली.  विविध बाेलींचा मेळ झाल्याने प्रत्येकजण आपापली बाेली अधिक चांगल्या प्रकारे उठून दिसावी म्हणून  अधिक कार्यप्रवृत्त झाले.

याशिवाय डाॅ. हरिश्चंद्र बाेरकर यांच्या साेबत कवी हिरामण लांजे व मी उत्तरप्रदेश, उत्तराखंड,  ओरिसा, राजस्थान आदी प्रांतातील हिंदी बाल साहित्य संगाेष्ठींच्या कार्यक्रमास ठिकठिकाणी गेलाे  आहाेत. तसेच दुबई-अबुधाबी येथील हिंदी साहित्य संगाेष्ठीतही मी व लांजे सरांनी 2018 मध्ये हजेरी  लावली आहे. तसेच पंजाबचे साहित्यिक देव भारद्वाज ह्यांच्या नेतृत्वातील एका संस्थेद्वारे दरवर्षी  भरविण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय साहित्य जत्रांमध्येही आमचे त्रिकुट आग्रा, जयपुर, वर्धा, इंदाैर आदी  शहरांत सहभागी झाले आहे. महाराष्ट्राबाहेरील ह्या सर्व संमेलनांत आम्ही बाेली विषयक चर्चेत सहभाग दिला आहे. डाॅ. हरिश्चंद्र बाेरकर यांनी बाेली वाचवा, भाषा वाचवा आणि Boli (बाेली) अर्थात ब्युराे  ऑफ लॅंग्वेजेस् इन इंडिया या संकल्पनांचा येथे उद्घाेष केला आहे.

भाषा विषयक सर्वेक्षणे व घेण्यात आलेली बाेलींची दखल –

विसाव्या शतकाच्या प्रारंभात सुमारे 100 वर्षापूर्वी ब्रिटीश काळात सन 1898 ते 1928  पर्यंतच्या काळात जाॅर्ज ग्रिअर्सनने भारतीय भाषांचे सर्वेक्षण केले हाेते. त्यात महाराष्ट्रातील मराठी व  अन्य बाेलींचाही समावेश हाेता. अलिकडेच भारतात गणेश देवी ह्यांच्या नेतृत्वात भारतातील सध्या  अस्तित्वात असणाऱ्या म्हणजे सन 2010 ते 2012 सालांमधील भाषांची सद्यस्थिती पाहून मांडणी  करण्याचा प्रकल्प भारतीय भाषांचे लाेक सर्वेक्षण या नावाने राबविला गेला. हा प्रकल्प शासनप्रणित  नसून जनतेच्या मदतीने व विविध संस्थांच्या सहकार्यातून केलेला उपक्रम आहे. महाराष्ट्रातील भाषांच्या  संदर्भात भारतीय भाषांचे लाेक सर्वेक्षण महाराष्ट्र या खंडात सदर प्रकल्पात मिळालेली माहिती देण्यात  आलेली आहे. या खंडाचे संपादन अरुण जाखडे यांनी केले आहे. या प्रकल्पासंबंधात असेही नमूद केले  आहे की, हे सर्वेक्षण म्हणजे त्या त्या भाषांचा अतिशय संशाेधनात्मक अभ्यास वा सर्वेक्षण नाही.

उपराेक्त सर्वेक्षणाच्या महाराष्ट्र खंडात विभाग- एक (अ) मध्ये मराठी आणि मराठीची रूपे, अन्य  रूपे व काही सामाजिक उपरूपे या शिर्षकांतर्गत मराठी, अहिराणी, आगर, काेहळी, खानदेशी लेवा,  चंदगडी, झाडी, तावडी, पाेवारी, मालवणी, वऱ्हाडी, वाडवळी, सामवेदी, संगमेश्वरी आदीचा उल्लेख आहे.  यात मराठीची रूपे हा शब्द मराठी बाेलींसाठी वापरण्यात आला आहे. याशिवाय सिंधी, उर्दू भाषांचीही  नाेंद येथे आली आहे. साेबतच आदिवासींच्या अनेक भाषांचा यात उल्लेख आहे. त्यात कातकरी,  काेकणा, काेरकू, काेलामी, गाेंडी, गाेंडी-माडिया, ठाकरी, वारली, हलबी, भिल्ली आदी 23 भाषांचा निर्देश  आहे. तसेच भटक्या-विमुक्तांच्या भाषांमध्ये कैकाडी, काेल्हाटी, गाेसावी, घिसाडी, डाेंबारी, नंदिवाले,  पारधी, बेलदार, वडारी, वैदू आदी 19 भाषांचा समावेश आहे. तद्वतच अन्य भाषा सदरात दख्खणी, नाॅ  लींग भाषा घेतलेल्या आहेत. नाॅ लींग ही काेकणातील एका गावात बाेलली जाणारी भाषा हाेय.  अशाप्रकारे महाराष्ट्रात मराठी व मराठीच्या उपबाेलींसाेबत मराठीच्या सानिध्यातील अन्य जनजाती  समुहांच्या बाेली एकमेकींच्या शेजारी आपआपल्या वैशिष्ट्यांनी आपले अस्तित्व व अस्मिता राखून  आहेत.

2001 च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रात मराठी बाेलणारे 72 टक्के लाेक आढळलेत. अन्य  भाषिकांमध्ये हिंदी 11 टक्के, उर्दू 8 टक्के, गुजराती 3 टक्के, तेलगू 2 टक्के, सिंधी 1 टक्के, कन्नड 1 टक्के, काेकणी 1 टक्के,  अन्य 1 टक्के लाेक असल्याचे कळते. मागील 35 वर्षापासून मुंबईवरून प्रकाशित हाेणाऱ्या समग्र  महाराष्ट्र  दर्शन या दिनदर्शिकेतून दरवर्षी महाराष्ट्रातील वैशिष्ट्ये प्रदर्शित करण्याचा प्रयत्न हाेत आहे. त्यात  2006 साली काही बाेलीभाषांचा परिचयात्मक समावेश या दिनदर्शिकेत केलेला हाेता आणि 2017  मध्ये झाडी बाेली व अन्य 11 बाेलींचा परिचय या दिनदर्शिकेने करून दिलेला आहे. या दिनदर्शिकेने  महाराष्ट्रातील बाेलींची घेतलेली ही दखल सुध्दा महत्वाची आहे.

काही बाेलींची छटादर्शक झलक –

महाराष्ट्राच्या मराठी मुलखात अनेक मराठी बाेली आपआपल्या वैशिष्ट्यांसह अजूनही लाेकांच्या  ताेंडी आहेत. त्यांचा आगळा-वेगळा बाज, हेल, ठसका व गाेडवा लक्षणीय आहे. काही बाेलींची धाटणी  व त्यांची शब्दरूपे लक्षात येणास या बाबतची अल्पशी छटा दर्शविणारे छाेटे काव्यांश इथे नमूद करीत  आहे

झाडी बाेली –

नाेकाे उडू सिमनेबाई (नकाे उडू चिमणेबाई)
भराेसा तू माजा धर (विश्वास तू माझा कर)
मालं येक भावं, सये (मला एक ठावे, सखे)
तुजा गाेदा, माजा घर ( तुझे घरटे, माझे घर)

वऱ्हाडी बाेली –

बाप म्हणे लेकी कपायी खटखट  
लाेखंडाच्या भिती, पाय देजाे बयकट
मांडवाच्या दारी बामन मंगलमाेती
आयकून घेजाे लेकी जाेळा जलमाचा सांगाती 

अहिराणी –

लाडकीवं लेक, तुन्हा लाड आसा कसा !  
गगनना चंद्र तूले धरी देवू कसा ?
भरतारनं सूक, काेरा राजनन पाणी
कितलं उपसू पानी माले वरजे ना काेन्ही
(या लाडक्या मुलीला तिच्या हट्टापायी तिला आकाशीचा चंद्र तरी कसा पकडून द्यावा ? भ्रताराचे सुख नव्या काेऱ्या रांजनाच्या थंडगार पाण्यासारखे आहे, ते मी कितीही उपसून काढले ते मी उपभाेगले तरी मला कुणीही मनाई करीत नाही.)

मालवणी –

आमच्या गावात नवीनच ग्रामसेवक ईलाे ।
कसाे काेण जाणा माजाे जीव त्याच्यावर गेलाे ।
राेज बगून बगून त्येच्या प्रेमात पडतय कसा
तेची सुदा तशीच गत झालली माका दिसा ।।

खानदेशी लेवा –

माय म्हतली म्हतली (माय म्हटली म्हटली)  
जशी ताेंडातली साय (जशी ताेंडातली साय)
बाय म्हतली बिराणी (बाई म्हटली परकी)
जशी भरली दाय ( जशी भरडली दाळ)

चंदगडी बाेली

बंधु मुराळी माझा यला गं (मुराळी भाऊ माझा आला)  
त्यला वळकीलं शिवारातु (त्याला ओळखले मी शेतातून)
शेन केराचे माझ्ये हातु (शेण कचऱ्याचे माझे हात)  
ज्वारी बुडवील रांजणातु ( ते कसे बुडवू भांड्यात)

हलबी

गाेदना गाेदालिस जाले (गाेंदण गाेंदवून झाले)
काेन राजाले गाेदालिस नाेनी (काेणत्या राजाला गाेंदवलेस मुली)
काेन राजाले गाेदालिस (काेणत्या राजाला गाेंदवलेस)
डाेंगराचाे गाेदिन आया (डाेंगरावरून गाेंदनकार आला)
दुआर बढाते रले आया ( अंगणातून ताे आला)

गाेंडी

वरा विरदा, वरा वरा (ये पावसा, ये ये)
बती ढब्बू सले, फेरा फेरा (पण ढब्बू नाहीत, माेठे माेठे)
नन आर्का खाेटाल, निम आकी घट्याल ( मी पडेन खाेटा, तू हाेशील माेठा)

संगमेश्वरी बाेली

काजू नि आंबा, चिकू नि नाराल देतात पिक भारी (काजू,आंबा,चिकू, नारळ देतात पिक भारी)
मिरी नि जायफल दाळचिणि लाेवंग आंतर (मिरी, जायफळ, दालचिनी, लवंग पिके सगळी तालेदार)
पिके सारी आंतार (पिके सगळी तालेदार)
आमी काेकनवासी डाेंगरच्ये राजे ( आम्ही काेकणवासी डाेंगरचे राजे)

भाषा-बाेली टिकविण्याचे काही उपाय –

जगभरात अनेक बाेली व भाषांचा वापर न झाल्याने त्या अस्तंगत झाल्या व अजूनही मृत हाेण्याच्या अवस्थेत आहेत. भाषेचे-बाेलीचे अस्तित्व टिकवण्यासाठी लाेकव्यवहारातील तिची  उपयाेगिता वाढली पाहिजे. लाेकांना, कलावंतांना व शासनालाही तिची गरज निर्माण व्हायला हवी.  तिच्या वापरातून आर्थिक समस्या सुटल्या पाहिजेत. तसेच सांस्कृतिक व सामाजिक समृध्दी व साैहार्द्र  वाढला पाहिजे. असे झाल्यासच भाषांची किंवा बाेलींची कार्यात्मकता व कलात्मकता ह्यांना उभारी  मिळते. यासाठी बाेली व भाषा समृध्दीचे विविध व्यावहारिक उपाय शाेधणे महत्वाचे आहे करिता पुढील  प्रमाणे काही बाबी करण्यायाेग्य ठरू शकतील –

* आपल्या बाेलीचा आपल्या मनातील हीनगंड काढून टाकून तिची अस्मिता व उपयाेगिता  वाढविण्यासाठी श्नय तेथे त्या बाेलीतून व्यवहार करणे उचित ठरेल. उदा. बाेलीतून बाेलणाऱ्या  व समजणाऱ्या सुशिक्षित व अशिक्षितांशी बाेलीतूनच संवाद साधता येऊ शकताे.
* आपल्या बाेलीतून लेखन करणे, पुस्तक निर्मिती करणे महत्वाचे आहे. यामुळे बाेलीचे वाचक- रसिक वाढतील व त्या बाेलीचा लिखित दस्तऐवजही तयार हाेईल.
* पुरुषांसाेबत स्त्रियांनीही बहुसंख्येने बाेलीभाषांच्या साहित्यात लेखन करणे आवश्यक आहे.  त्यातून स्त्री वर्गाचे प्रतिबिंब उमटू शकेल.
* अनेक कलाविष्कार-लाेकाविष्कांरांतील सादरीकरण श्नयताे बाेलीतून करता आल्यासही  फायदेशीर ठरेल. जसे-नाटक, खडीगंमत, दंडार, दशावतार, शाहीरी, सिरीअलस् इ. मधून  बाेलीचा बाज दिसल्यास बाेली अधिक लाेकाभिमुख हाेईल.
* मुला-मुलींच्या अभिरूचीचे बाल साहित्य त्यांच्या बाेलीतून निर्माण झाल्यास बालकांना  साहित्याची ओढ लागेल.
* आपल्या बाेलीतील उत्कृष्ट वाययीन पुस्तकांना व कलाप्रकारांना बक्षिसे व पुरस्कार देऊन  सन्मानीत केल्यास अशा कार्यास अधिक प्रेरणा मिळेल.
* शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात बाेलीसाहित्याचा अंतर्भाव हाेण्यास प्रयत्न करणेही  महत्वाचे आहे. यातून बाेलींची ओळख विद्यार्थ्यांना व शिक्षकांनाही हाेते.
* आपल्या बाेलीची नाेंद शासन दरबारातही हाेण्यासाठी संधी शाेधता येतील. उदा. भाषा विषयक  सर्वेक्षणे, कायदे करण्याच्या भाषेत, शासकीय दप्तरांतील नाेंदींमध्ये व अशा अन्य ठिकाणी  बाेलीचा वापर करण्याचा प्रयत्न करणे. मराठीतील काेणत्याही बाेलीत बाेलले, लिहिले तरी  कार्यसिद्धी हाेईल अशी स्थिती निर्माण करता यावी.
* बाेलीच्या विविधांगी प्रकटीकरणास दृक-श्राव्य साधनांचा वापर केल्यास ताे लाेकांना आवडेल. * व्हाट्सअ‍ॅप, फेसबूक, इन्स्ट्राग्राम, ट्विटर आदी समाज माध्यमांतून बाेलींमधला मजकूर व्हायरल  करणेही संयुक्तिक ठरते.
* प्रमाण मराठीतील अनेक बाबतीतला बाेजडपणा घालविण्यास बाेलीतील सुलभ उच्चारणे व  साेप्या व्याकरणविषयक बाबींची उपयुक्तता नकळत लाेकांच्या लक्षात आणून देता यावी. * आपल्या बाेलींसाेबतच मराठीच्या इतर बाेलींचाही आदर करणे आवश्यक आहे. * प्रमाण मराठीच्या लाेकांनी तिच्या विविध बाेलींतील सुयाेग्य शब्द, वाक्प्रचार, म्हणी, उखाणे, इ.  चा स्वीकार करून मराठीची समृध्दी वाढविण्यात सहयाेग द्यावा. इंग्रजीसारखी जागतिक भाषा  सुध्दा विविध भाषांमधील शब्दभांडार सातत्याने स्विकारून ती स्वतः समृध्द हाेत आहे हे लक्षात  घ्यावे.
* उत्कृष्ट बाेली साहित्याचा अनुवाद इतर भाषांमध्ये हाेण्याचे प्रयत्न करून तिची वाययीन  गुणवत्ता परभाषिकांपर्यंत पाेहचविणे कल्याणकारी ठरेल.
* उपयुक्त व श्रवणीय बाेली साहित्याचे अभिवाचन करून त्यावर चर्चा घडवून आणणेही श्रेयस्कर  ठरावे.
* अन्य भाषांमधील उत्कृष्ट साहित्य अभ्यासून आपली वाययीन समज व आकलन अधिक प्रगल्भ  करता येईल.
* स्वतःच्या बाेली साहित्य चळवळीत आणि मराठी बाेली साहित्य संघ, नागपूर तथा या संस्थेच्या  अन्य शाखांमधील साहित्यिक उपक्रमांत सक्रियता दर्शवून सहभाग देणेही हितकारक ठरते. * बाेली विषयक कार्य करणाèया व्यक्ती व संस्थांच्या उपक्रमांतही आपला पाठिंबा व याेगदान देता  यावे. पुणे येथे चंद्रकांत शहासने ह्यांनी महाराष्ट्रातील अनेक बाेलींचा शाेध घेऊन ते बाेली  विषयक विविध उपक्रम राबवित आहेत.
* सध्याच्या जागतिकीकरणाच्या काळात व महानगरीय संस्कृतीच्या परिप्रेक्षात बाेलींच्या  उपयाेगितेची गरज लाेकांना वाटावी असे नवनवे बाेलीतील आविष्कार प्रकट करणेही, बाेली  साहित्यिकांची जबाबदारी ठरते.
* आपण प्रत्येकजण आपल्या कुटुंबाचा एक प्रमुख घटक आहाेत. तसेच आपण आपल्या गावचे  तथा भारत देशाचे नागरिक आहाेत. साेबतच हल्ली आपणास जगाचेही नागरिकत्व प्राप्त झाले  आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने आपण जगाच्या संपर्कात आलाे आहाेत. त्या दृष्टीने स्थानिक-प्रादेशिक-देशी व विदेशी भाषा-बाेलींचेही आवश्यकतेनुसार त्या प्रमाणात आकलन हाेणे व  तशी समज यायला हवी आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे काैशल्यही प्राप्त करुन घेणे  महत्वाचे आहे. संगणकीय साक्षरता असणे काळाची गरज ठरली आहे. नवनवीन ज्ञानस्त्राेतांची  जाण व्हायला हवी. ज्यांना हे जमत नाही ते विद्वान असुनही अशिक्षित ठरून मागे पडू शकतात.
* हल्लीच्या जागतिक बाजारपेठेत जगातील विविध देशांच्या व त्यातील प्रदेशांच्या ग्रामीण व नागरी  लाेकसमुदायांच्या बाेलीतून व भाषेतून इले्नट्राॅनिक प्रसार माध्यमांच्या सहाय्याने उद्याेजक व  उत्पादक आपआपल्या वस्तू विक्रीसाठी जाहिराती देत आहेत. त्यांना बाेलींची माहिती हवी  असते. बहुसंख्य व अल्पसंख्यांक लाेकांच्या बाेलींनाही यामुळे महत्व आल्याचे दिसते. या  कारणाने अनेकजण बाेलींचे दूत बनू शकतील.
* येत्या भारतीय जनगणनेत भाषिक माहितीच्या रकान्यात माहिती देतांना आपापल्या स्वबाेलीचा  उल्लेख नाेंदविणेही आवश्यक आहे. त्यामुळे शासकीय दस्तऐवजात आपल्या बाेलींची नाेंद  हाेऊन तिची दखल घेतल्या जाईल. या अनुषंगाने डाॅ. हरिश्चंद्र बाेरकर ह्यांच्या मार्गदर्शनात  झाडीपट्टी मध्ये असे जनजागरण सुरू आहे.

बाेलीचा-भाषेचा विविध स्तरावरील उपयाेग –

अखेर बाेली किंवा भाषा आपण कशासाठी वापरताे? आपले जीवन जगत असतांना गरजेनुसार  अन्य माणसांशी विचार विनिमय करण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी बाेली – भाषा वापरताे.  ही देण केवळ मानव प्राण्यासच निसर्गाकडून मिळालेली आहे. जीवन जगण्यास्तव भाषेची गरज असेल  तर काेणती किंवा काेणत्या भाषा वापरल्याने जीवन सुलभ व सुखकर आणि आनंदी हाेईल? याचे उत्तर  जी बाेली-भाषा त्या त्या जीवनस्तरावर उपयाेगाची वाटेल ती ती भाषा-बाेली माणसाला गरजेची ठरते.  जन्मल्याबराेबर प्रारंभी आईची भाषा-मातृभाषा कामी पडते. शाळेत-महाविद्यालयात शिक्षण घेताना  आणखी काही नव्या भाषा-बाेली उपयुक्त ठरतात. परप्रदेशात-विदेशात संपर्क करायचा असेल तर  त्यांच्या तेथील बाेली-भाषांची जुजबी तरी माहीती आपणास असावी लागते. जागतिक स्तरावरील  संपर्कासाठी इंग्रजीसारख्या ज्ञानभाषेचेही गरज असते. एखादा नवीन शाेध ज्या बाेलीच्या व्यक्तिने  लावून ताे त्याच्याच बाेलीत शब्दांकीत केला असेल किंवा त्या बाेलीतील वायय उत्कृष्ट ठरले असेल  तर त्या बाेलीचेही महत्व वाढून ती बाेली शिकणे आवश्यक ठरते. अशाप्रकारे बाेली-भाषांचा उपयाेग  निरनिराळ्या स्तरांवरून हाेणे संभवते.

बाेलीच्या-भाषेच्या माध्यमांतून आपण आपली वैचारिकता व्यक्त करताे. तिची इतरांना  बाेलीच्या माध्यमांतून माहिती देताे आणि त्या दृष्टीने कार्यात्मकता घडून येते आणि सामुहिक आचार-  विचारांची संस्कृती निर्माण हाेते. यासाठी विज्ञानवादी विचारांतून मानवतेकडे नेणारी संस्कृती तयार  करण्याच्या कार्यात आपली शब्दसेवा समर्पित व्हावी असे जाणत्या शब्दकारांना नक्कीच वाटेल यात  नवल नाही. जुन्या संतांच्या व विचारवंतांच्या कालसुसंगत विचारांचीही प्रस्तुती करता येऊ शकते.  अलिकडेच संत गाडगे बाबांनी बाेलीच्या माध्यमातून किर्तनकलेच्या सादरीकरणाने सांस्कृतिक व  सामाजिक जनजागरण केले. राष्ट्रसंत तुकडाेजी महाराजांनीही बाेलीचा वापर करून, भजने लिहून ती  त्यांनी कार्यक्रमातून गायली, भाषणे दिली व क्रांती केली. ग्रामगीतेसारख्या त्यांच्या ग्रंथात बाेलीचाच  वापर केलेला आहे. त्यांच्याच कार्याचा वसा घेऊन सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज व इंजि. भाऊ  थुटे इ. मंडळींनी बाेली भाषेतून किर्तनाच्या सहाय्याने लाेकप्रबाेधन केलेले आहे.

 सद्यकालीन समस्या व साहित्यिकांचे कर्तव्य –

सध्याच्या वेगवान यंत्रयुगात मानवी इंद्रियांकडून हाेणारी कामे यंत्रे किंवा यंत्रमानव करू लागली  आहेत. कृत्रिम बुध्दीमत्तेचे प्रयाेग सुरू आहेत. माणसांच्या हातापायांना- अवयवांना- मेंदूला जर काही  काम नसेल तर माणूस सर्व अंगानी आळसी हाेऊन पांगळा बनेल व त्यास जडत्व प्राप्त हाेऊ शकते.  रिकाम्या दिर्घकालीन वेळेचा दुरूपयाेग हाेऊन व्यसनाधिनताही वाढू शकते. त्यादृष्टिनेही लेखक-कवींना जनजागरणाचे कार्य पार पाडावे लागेल.

अलिकडच्या काळात माणूसपण कमी हाेतांना दिसते.  माणसांतील शेजारधर्म, नाती-गाेती, मैत्री इ. माैलिक बाबी कमी झाल्यात. आजचे संमेलन विदर्भात  हाेत आहे. विदर्भाचे वऱ्हाड प्रांत व झाडीपट्टीचा मुलुख असे दाेन भू-भाग आहेत. या दाेन्ही भागांतील  लाेकांचा शेजारधर्म, जिव्हाळा, नाती-गाेती खूप घट्ट हाेती. प्रतिमाताई इंगाेले ह्या गाेंदिया जिल्ह्यातील  साैंदड येथील एका संमेलनाच्या अध्यक्ष असतांना या झाडी व वऱ्हाडाच्या संबंधाबद्दल त्यांनी  लाकगीताचा पुढीलप्रमाणे दाखला दिला हाेता-

संबाला लागला पाना, झाडीच्या गराड्यात
शायनी पार्बती, पत्र धाडते वराडात
ना. गाे. थुटे हे त्यांच्या सपनधून काव्यसंग्रहात हा संबंध सांगताना म्हणतात- 
इदर्भाच्या मातीमंधी
सब्दाेसब्दी दिसं गाबा
झाडी-वऱ्हाडी बयनी बयनी
मराठीची आये साेबा

हल्ली मात्र सर्वत्र पैसा प्रिय हाेऊ लागला आहे. त्यासाठी सर्व क्षेत्रांत पैसा प्राप्तीसाठी भ्रष्टाचाराचे  प्राबल्य वाढले आहे. हे सर्वांना दिसत असूनही त्या भ्रष्टाचारास दूर करण्याचे उपाय न सापडणे ही  चिंतेची बाब आहे. या संबंधात देशाचे धुरीण असणाऱ्या राज्यकर्त्यांनीच स्वतःपासून भ्रष्टाचाराची घाण  नष्ट करण्याचा व यातील स्वच्छता माेहीम राबवण्याचा प्रयत्न केल्यास हे लाेण तळागाळातीला  लाेकांपर्यत पाेहचू शकेल. या अनुषंगाने तरुण वर्ग जागृत झाल्यास हे भ्रष्टाचाराचे भूत पळून जाऊ  शकते. या तरुणांना उद्युक्त करण्यास साहित्यिकांचे साहित्यही कामी येऊ शकते.  

आपणास स्वातंत्र्य मिळाले व ते उपभाेगण्यासाठी आपण स्विकारलेले संविधान अबाधित  ठेवण्याचे कर्तव्यही प्रत्येक नागरीकाचे आहे. तसेच जागरूक नागरिक म्हणून साहित्यिकावरही ही  जबाबदारी विशेषत्वाने येते. हल्ली स्वातंत्र्याबाबत व अन्य महत्वाच्या मूल्यांबाबत बेताल व्यक्तव्ये  ऐकायला मिळतात. स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली तरीही गरीबी व अनेक कारणांनी व्यथित  असलेल्या लाेकांचे दुःख व अन्यदात्या शेतकèयांच्या मरणयातना इ. बाबतही मान्यवर साहित्यिकांनी  अभिव्यक्त हाेणे हे राष्ट्रीयतेच्या दृष्टीने माेलाचे ठरते.

आनंददायी व कल्याणकारी शब्दयात्रा

आपण सर्वजण आपआपल्यापरिने स्वतःच्या शब्दयात्रेचा आनंद घेत असताे व इतरांनाही देत  असताे. मा या एका कवितेत मी मा या शब्दयात्रेबद्दल पुढीलप्रमाणे अभिव्यक्ती केलेली आहे त्यातील  काही अंश पुढीलप्रमाणे-
शब्दांनी करावे । जनांना उन्मन
म्हणून हे धन । त्याना देई
शब्द माझे साधे । नसे रत्न-माेती
पांघरती माती । अंकुराया
अंकूर ङ्खुलुनी । शब्ददाणे येती
भूक भागविती । गरजूंची
पशुंची विकृती । दिसे माणसांत
संस्कृतीसाेबत । शब्द माझे

आजवरची मा या नावावर पन्नाशीच्या काठी गेलेली पुस्तकसंख्या व त्या पुस्तकांवर अन्य  लेखकांनी लिहिलेली डझनभर पुस्तके तद्वतच मा या साहित्यावर पीएच.डी. चा झालेला अभ्यास तथा  अनेक संस्थांनी घेतलेल्या मा या मुलाखती आणि अनेकांना लिहिते करण्याचे माझे कार्य याबाबतची  उर्जा ही बाेली साहित्य चळवळीतूनच मिळाली आहे. डाॅ. अनंता सूर या विद्वान प्राध्यापकाचे  महाराष्ट्रातील विविध प्रवाहांच्या साहित्य संमेलनांतील निवडक 15 संमेलनाध्यक्षांच्या भाषणांचा  समावेश असलेले पुस्तक मागील वर्षी प्रकाशित झाले आहे. त्यात मा या 8 व्या झाडीबाेली साहित्य  संमेलनाच्या भाषणाचा समावेश करण्यात आला ही बाेलीच्या अंगाने घेतलेली विशेष स्वरूपातील दखल  असल्याचेच सिध्द हाेते. प्रत्येकच साहित्यिक-शब्दकार आपापल्यापरी आपापली अनुभूती अभिव्यक्त  करीत असतात. आपली प्रत्येकाचीच शब्दयात्रा अधिक आनंददायी व सर्वांना कल्याणकारी ठराे अशी  सदिच्छा व्यक्त करताे. मला आपण सर्वांनी ऐकून घेतले करिता आपणास धन्यवाद देताे. या संमेलनाच्या  संयाेजकांनी-आयाेजकांनी मला अध्यक्षपद बहाल करून सन्मानित केल्याबद्दल पुनःश्च कृतज्ञता व्यक्त  करताे ।

जय बाेली ! जय भाषा ! जय भारत ! जय जगत !


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

जेव्हा नव्हते चराचर । तेव्हा होते पंढरपूर ।

‘श्रीशब्द ‘ काव्य पुरस्कारासाठी कविता संग्रह पाठवण्याचे आवाहन

नाशिकजवळ घोरपडीच्या  781 पुरुष प्रजनन अवयव जोडी आणि 19.6 किलो मृदू प्रवाळ जप्त

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading