🥗 सुधारित तंत्राने करा ब्रोकोली लागवड 🥗
ब्रोकोली या भाजीपाला पिकाच्या लागवडीसाठी मध्यम काळी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. गादीवाफ्यांवर रोपनिर्मिती करून सरी वरंबे पद्धतीने लागवड करावी.
एस. एस. यदलोड, ए. एम. भोसले
ब्रोकोली या परदेशी भाजीची लागवड सध्या वाढू लागली आहे. तिचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.
हवामान –
ब्रोकोली पिकास थंड हवामान मानवते. साधारणपणे १२ ते २० सेल्सिअस तापमानात या पिकाची वाढ चांगली होते. गड्डे लागल्यानंतर उष्ण व कोरडे हवामान असल्यास घट्ट गड्डे येण्याऐवजी विरळ गड्डे येतात.
जमीन –
मध्यम ते काळी कसदार, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन (सामू – ५.८ ते ७.०) निवडावी. जमीन सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध असावी. भारी जमिनीत लागवड करू नये.
जाती – गणेश ब्रोकोली
पूर्वमशागत –
जमिनीची खोल नांगरट करावी. वखराच्या उभ्या-आडव्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या वखरणीपूर्वी जमिनीत प्रतिहेक्टरी चांगले कुजलेले शेणखत २० ते २५ टन मिसळावे. जमिनीच्या उतारानुसार ६० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात.
लागवड –
सरी वरंबे पद्धतीने ६० x ६० सें.मी. किंवा ४५ x ६० सें.मी. अंतरावर लागवड करावी. ऑक्टोबर महिना ते नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा या काळात लागवड पूर्ण करावी. लागवड शक्यतो सायंकाळी करावी. प्रत्येक ठिकाणी एकच जोमदार रोप लावावे. लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे. लागवडीनंतर आठवडाभरात तूट भरून काढावी.
खत व्यवस्थापन –
प्रतिहेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश द्यावे. त्यापैकी अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीवेळी द्यावे. उर्वरित नत्र लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी द्यावे.
पाणी व्यवस्थापन –
पिकास लागवडीनंतर ताबडतोब हलके पाणी द्यावे. त्यानंतर जमिनीच्या मगदुरानुसार नियमित ६ ते ७ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
आंतरमशागत –
तणाच्या प्रादुर्भावानुसार पुनर्लागवडीनंतर १० ते १५ दिवसांनी एक खुरपणी करावी. झाडाच्या खोडांना मातीची भर द्यावी.
गादीवाफ्यांवर रोपनिर्मिती –
गादीवाफ्यासाठी उंचावरील, पाण्याचा निचरा होणारी जागा निवडावी. जागेत पावसाळ्यात पाणी साचणार नाही. गादीवाफा तयार करण्यापूर्वी जमीन उभी-आडवी नांगरून, वखरून भुसभुशीत करावी. काडीकचरा, तण, आधीच्या पिकाची धसकटे वेचून जमीन स्वच्छ करावी.प्रत्येक वाफ्यात २ ते ३ टोपले शेणखत, १ ते १.५ किलो मिश्रखत मिसळावे. त्यानंतर १ मीटर रुंद, ३ ते ५ मीटर लांब व १२ ते १५ सें.मी. उंच गादीवाफे बनवावेत. दोन वाफ्यांतील अंतर ६० सें.मी. ठेवावे. त्यामुळे वाफ्यास पाणी देणे व आंतरमशागत करणे सोपे जाते. रोपवाटिकेत गादीवाफ्यावर रोपे तयार करून घ्यावीत. निरोगी, जोमदार रोपनिर्मितीसाठी खात्रीलायक ठिकाणावरून बियाणे घ्यावेत. एक हेक्टर क्षेत्रावर लागवडीसाठी ५०० ते ६०० ग्रॅम बियाणे लागते.कार्बेन्डाझिम २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून वाफे भिजवावे. त्यामुळे रोपांना मर रोग तसेच बुरशीचा प्रादुर्भाव होत नाही. वाफा तयार झाल्यानंतर काकरीने रेषा ओढून बियाण्याची पेरणी करावी. रोपे साधारणतः २५ ते ३० दिवसांची झाल्यावर लागवडीसाठी वापरावीत. तयार रोपे काढताना वाफे पाण्याने भिजवून घ्यावेत. त्यामुळे रोपांच्या मुळ्या तुटणार नाहीत व रोपांना इजा होणार नाही.
📲 अधिक माहितीकरिता संपर्क-
एस. एस. यदलोड,
(उद्यानविद्या विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)
🌳 संकलन – कृषिसमर्पण 🌳