पृथ्वीतलावरील मानवी राजा जसे प्रजेला अनेक सोयी सुविधा देऊन त्याचे जीवनमान सुधारतो ,अगदी तसेच आंबा सुद्धा प्रत्येकाच्या मुखात गोडी, माधुर्य निर्माण करतो आणि त्यांचे सुख समाधान वाढवितो आणि प्रत्येकाच्या जीवनात राजसुख वृध्दींगत करतो तसेच प्रत्येकाचे जीवन राजेशाही बनवतो म्हणूनच आंब्याला फळांचा राजा हेच नाव सार्थ आहे.
महादेव पंडीत

महादेव पंडीत
सांगली येथील वॅालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे १९८९ च्या बॅचचे स्थापत्य अभियंता.
जिओटेक्नीकल व स्थापत्य सल्लागार म्हणुन जवळ जवळ ३० वर्षाचा मेरेथॅान अनुभव.
ईमेल : mip_68@hotmail.com
भ्रमनध्वनी : ९८२००२९६४६
फळांचा राजा आंबा. आंबा ही कोकणची राजेशाही. माझे बालपण हिरण्यकेशी नदीच्या काठावरील मौजे हाजगोळी बुद्रुक, पोस्ट मडिलगे, ता. आजरा, जि. कोल्हापूर येथे गेले. गावात साधे पोस्ट ऑफीस सुद्धा नाही यावरूनच आपणास कल्पना येईल की गाव किती आडवळणी असेल ? पण आडवळणी असले तरी शतप्रतिशत नैसर्गिक होते. मी गावामध्ये जन्मापासून ते जून 1983 पर्यंत म्हणजे भारत आपला पहिला विश्वकप जिंकेपर्यंत होतो. त्यानंतर जून 1989 पर्यंत उन्हाळी सुट्टीला म्हणजेच फक्त आंब्याच्या हंगामामध्ये गावी असायचो, म्हणजेच काय जन्मापासून ते पंचविशीपर्यंत आंब्याच्या सहवासातच.
गावच्या आंब्याची गोडी अवर्णनीय
माझी पहिली पंचविशी अगदी खऱ्या अर्थाने फळाच्या राजासोबत तर दुसरी पंचविशी फक्त आणि फक्त बाजारपेठेतल्या राजाच्या तात्पुरत्या सहवासात. आज कितीही गोड व मधूर आंबा, मग तो देवगड हापूस असो की रत्नागिरी हापूस पण पूर्वीचे राजासोबतचे दिवस काही औरच होते त्या माधुर्याची गोडी अगदी अवर्णनीय व अविटच होती. साधारणपणे डिसेंबरमध्ये आंब्यांना मोहर येतो. मार्च महिन्यात साधारणपणे कैऱ्या मिळण्यास सुरुवात होते. लहान लहान कैऱ्या खाण्यासाठी आम्ही भावंडे खूप आसुसलेलो असायचो. शेजाऱ्यांच्या आंब्याच्या झाडांच्या कैऱ्या चोरून आणून त्याला चटणी मीठ लावून खाण्यात खुप मजा यायची. आंबा फोडी, चटणी व मीठ यांच्या मिश्रणाला करम असे म्हटले जायचे. शेतावर सुद्धा दुपारी जेवताना बरेच शेतकरी कैरी सोबत चटणी भाकर खात असत.
आमच्या गावी आमची स्वतःची खुपच आंब्याची झाडे होती, ती काही हापूस, पायरीची नव्हती पण वेगवेगळ्या प्रकारची होती. त्यामध्ये एकदम पिवळा जर्द गोटी आंबा, काळा आंबा (गडद हिरवा), नारळी आंबा, शेपू आंबा, खोबरी आंबा, लोणची आंबा व चपटी कोय असणारा मांसल आंबा असे अनेक नानाविध प्रकार. मित्रहो हे सर्व आंबे चाखण्याचे भाग्य आमच्या गावाने आम्हाला दिले.
असा ओळखायचा पाडाचा आंबा
आंब्याला साधारणपणे गुढीपाडव्याच्या नंतर म्हणजेच दोन एक आठवड्यांनी चांगला पाड येतो. गुढीपाडवा या शब्दातच पाड हा शब्द आहे आणि पाडव्यानंतर आंबा पाडाला येतो म्हणजेच त्यामधील मधुरता व गोडी वाढते आणि गोडी म्हणजे शुभ संकेत व शुभ काळ, आणि ह्या शुभ काळात आपल्याला राजासोबत रोज मस्त मनमुराद ताव मारता येतो. आंबा पाडाला आल्यानंतर पिकवण्यासाठी तो कधी झाडावरून उतरवायचा याचा अचुक अंदाज माझ्या काकांना येत असे. माझे काका गुढीपाडव्यानंतर रोज भल्या पहाटे शेतावर व आब्यांच्या बागेत फिरायला जायचे आणि तेव्हा आंब्याच्या झाडाखाली काही पिकलेले आंबे पडलेले असायचे. हे आंबे खाण्यास खुपच मजा यायची. कारण ते आंबे झाडावरच अगदी नैसर्गिकरीत्या पिकलेले असायचे. निसर्गात आंबा पिकला आहे आणि त्यामधील कोणता आंबा खूप गोड आहे याची अचूक पारख पहिल्यांदा पाखरांना व पक्षांना येते. पक्षी आपल्या चोचीने एखादा आंबा अर्धा अधिक झाडावरच खातात आणि असा अर्धा आंबा झाडावर लटकताना दिसला की समजायचे आता आंब्याला खूप चांगला पाड आलेला आहे. माझे काका स्वतः बरोबरच पक्ष्यांनी खाल्लेल्या आंब्यावरूनच एकदम रास्त अंदाज बांधून कोणत्या आंब्याचे कधी आंबे उतरायचे याचे अचूक नियोजन करायचे.
देवाने दिलेले फळ देवालाच अर्पण
मार्च अखेरीस सर्वांच्या परीक्षा संपलेल्या असायच्या इतर सर्व भावंडे गावी आलेली असायची. मग सर्वांसोबत काकांच्या अंदाजाप्रमाणे झाडावरचे आंबे उतरणे, वाटून घेणे, घरी आणणे नंतर एक दिवसांनी चांगल्या स्वच्छ फडक्याने पूर्ण आंबा पुसून घेणे, डालग्यात पयानाच्या गवतासोबत किंवा पिंजरासोबत पिकत घालणे. सर्वात पहिल्यांदा डालग्यामध्ये खाली गवताचा थर त्यावर आंब्याचा थर, मग कागद परत गवत परत आंबे असे करत करत पूर्ण डालगे भरल्यानंतर सर्वात शेवटी गवताच्यावर थोडे फळकुटाचे वजन, हे सर्व प्रकार करण्यास खूपच गम्मत वाटायची. मध्येच कोणीतरी काकांना प्रश्न विचारायचे आजोबा मला सांगा आता आम्हाला पिकलेले आंबे कधी खायला मिळणार ? आठ दहा दिवस थांबरे लेकरा, असे म्हणून माझे काका प्रत्येकाला गोडीने समजावयाचे. आंबे पिकल्यानंतर पहिल्यांदा गावच्या देवळात सुद्धा देवासाठी पाच पाच आंबे ठेऊन नमस्कार करून यायला काका सांगायचे. बघा माझे काका देवाने दिलेले फळ पहिल्यांदा देवालाच अर्पण करण्यास सांगायचे यावरुनच त्याच्या श्रध्देची कल्पना येते.
असे उतरले जायचे आंबे
मी सात वर्षाचा होईपर्यंत काका मला झाडावर चढू द्यायचे नाहीत. काका स्वतः शिडी लावून आंब्याच्या झाडावर चढायचे. आंब्याची झाडे खूप मोठी असायची. आंबे झाडावरून अलगत व अगदी हळूवारपणे उतरवायचे असतात. आंब्याच्या कोणत्याही फळाला झाडाचा तसेच जमिनीचा मार लागता कामा नये. आपटलेला आंबा आढीमध्ये लवकर खराब होत असे आणि कधी कधी एका खराब आंब्यामुळे पुर्ण आंब्याची आढीच खराब होण्याची भिती असते. त्याचप्रमाणे आंबा फळाचा राजा असल्यामुळे त्याला अलगत व हळुवारपणे हाताळणे अत्यंत आवश्यक, नाहीतर गोडाचे सुख कसे मिळणार ? आंब्याच्या फांदीवर आंब्याचे घसच्या घस लटकलेले असायचे ते बघतानाच खूप मजा यायची.

आंब्याच्या झाडांचा विस्तार खुप मोठा असायचा त्यामुळे फांदीवर लटकलेले आंबे उतरण्यासाठी एक लहानसे औजार असायचे त्याला आंब्याचे बल्ले असे म्हणायचे. एका लहानश्या सहा ते आठ फूट बांबूच्या काठीला एक लहानशी जाड पिशवी किंवा बैलाच्या मुसक्याच्या आकाराची घरीच कातलेली पिशवी बांधलेली असायची. बल्ल्याची काठी सर्व साधारणपणे 6 ते 8 फूट लांब असायची. पिशवीच्या मुखावर एक त्रिकोणी आकाराची लहान धारधार पट्टीची बांधणी असायची. त्रिकोणाच्या पट्टया धारधार असायच्या त्यामुळे बल्ल थोडसं स्वतःकडे खेचले तरी आंबा देठापासून तुटून बल्ल्याच्या थैलीत अलगत यायचा. एका बल्ल्यात चार ते पाच आंबे बसायचे. एकतर बल्ल्यातील आंबे झाडावरून एका बांधलेल्या पिशवीत जमा करायचे आणि नंतर ती पिशवी हळू हळू खाली सोडायची किंवा बल्ल्यातील एक एक आंबा खाली फेकायच पण तो एका दुसऱ्या जुगाडामध्ये टाकायचा जेणे करून या फळांच्या राजाला कोणतीही दुखापत होऊ नये. आंबा झेलण्याची दोन जुगाडे. एका जुगाडामध्ये फेकलेला आंबा एका जाड गोणपाटामध्ये एकदम अलगत झेलायचा, यामध्ये आंबा फेकणारा व झेलणारा एका विशिष्ट आवाजाने एकमेकाला संदेश द्यायचे आणि झाडावरील फळांच्या राजाला मार न लागता अलगत झेलायचे. खरंच ही कला काही मोजक्याच भावंडांना जमायची. कधी कधी आंबा एकदम झाडाच्या विस्ताराच्या बाहेर झेलायला लागायचा त्यामुळे आपले डोळे व कान एकाच वेळी कार्यमग्न झाले पाहिजेत नाहीतर मग राजाने मार खाल्लाच समजायचा. दुसऱ्या जुगाडामध्ये झाडाच्या खाली चार भावंडे एका जाड अशा घोंगड्याचे चार कोपरे हातामध्ये ताणून उभे राहायचे आणि मग काका एक एक आंबा झाडाच्या फांदीचा अंदाज घेऊन अगदी बरोबर झोल्यात सोडायचे. या जुगाडामध्ये फारसे कौशल्य नसायचे. काही भावंडे सर्व आंब्याची रास किंवा ढीग तयार करायचे. आंब्याचे मोठ मोठाले ढीग बघूनच मन प्रसन्न व्हायचे. आंबे उतरण्यासाठी मित्रमंडळी, शेजारी पाजारी तसेच पाहुणे रावळे यायचे. आंबे उतरण्यासाठी आलेल्या प्रत्येकाला काका पाच पन्नास आंबे द्यायचे नंतर शिल्लक राहिलेले आंबे आम्ही अर्धे अर्धे वाटून घ्यायचो. नंतर सर्वजण आंबे घरी घेऊन यायचे आणि नंतर एक दिवसांनी आंबे पिकवण्यासाठी प्रक्रिया चालू व्हायची.
पिळून आंबा चाखूण खाण्याची मजा औरच
साधारणतः 30 ते 35 वर्षापूर्वी गावी वातावरण खूपच नैसर्गिक व शुद्ध होते त्यामुळे आंब्यांना कोणत्याही प्रकारची किड लागायची नाही. गावातल्या मंडळींना जमिनीवर पडलेले तसेच पाखरांनी खाल्लेले आंबे सुद्धा खाण्यास कोणतीच शंका नसायची. माझ्या बालपणापासून ते सर्वसाधारणपणे 1990 पर्यंत आम्ही भावंडांनी आंबे कापून खाल्लेले आठवतच नाही. आडीतून काढलेल्या आंब्याचा अलगद देठ काढायचा नंतर आंबा दोन्ही हातात पकडून हळूवार दाबाने देठाचा भाग खाली धरून पिळायचा लगेचच देठा मधून आंब्याच्या रजलेल्या चिकांसोबत थोडासा आमरस बाहेर सोडायचा आणि मग आंब्याच्या गोडीची व माधुर्याची अविट चव घेत घेत आंबा थोडा थोडा दाबत पूर्ण आमरसाचा आस्वाद घ्यायचा. पिकलेला आंबा तोंडाने चाखून चाखून खाण्याची मजा अगदी आनंददायीच. आंबे चोखून चोखून कितीही खा कोणताही त्रास होत नाही. एका एका वेळी आम्ही भावंडे दहा दहा आंबे फस्त करायचो. आंबा कापून खाणे किंवा आंब्याचा आमरस खाणे यापेक्षा पारंपारिक चोखून खाण्याचा प्रकार खरोखरच मधुरयोग व राजयोग आहे. आंब्यातील आमरस संपत आल्यानंतर अलगद हाताच्या दाबाने आतील आंब्याची कोय बाहेर काढून तिला चाखून चाखून पांढरी करण्यातील मजा अगळी वेगळीच असे. नंतर आंब्याच्या सालीच्या पॅकमधील सर्व आमरसाचा मनमुराद आनंद लुटायचा आणि त्या पॅकमधील सर्व आमरस संपल्यानंतर त्या सर्व साली गाईला द्यायच्या. काका या सर्व कोयीमधील काही मोजक्या आंब्याच्या कोयी छप्परावर सुकत ठेवायचे आणि मृग नक्षत्राच्या वेळी पुन्हा नैसर्गिक चक्राचा समतोल राखण्यासाठी जमिनीत रुजवत असत. आमच्या शेतावरील सर्वच आंबे काही ब्रँडेड नव्हते पण ह्या वेगवेगळ्या आंब्याची नैसर्गिक चव व मजा आजच्या हापूसला नक्कीच मागे ढकलण्यासारखी होती. काही मोजकीच झाडे कलमी होती पण ती काही रत्नागिरी किंवा देवगड हापूसची नव्हती. माझ्या काकांना व वडिलांना कलम बांधून नवीन नवीन आंबे तयार करण्यात खूप आनंद वाटायचा.
काळ्या आंब्याची आठवण
आज मुंबईमध्ये रुपये 500 पासून रुपये 1500 प्रत्येक डझनाला देऊन मोजकेच आंबे घरी आणतो. दराप्रमाणे त्यांच्या साइजमध्ये फरक असतो. रोज दोन ते तीन आंबे कापून खातो आणि त्याच्या साली व कोयी घनकचऱ्यात फेकतो कारण शहरात साली खाण्यासाठी गाईच नाहीत. गावी जवळ जवळ दोन महिने आंब्याचा हंगाम चालू असायचा. गावी मुबलक आंबे होते. कधीही आंब्याचा कंटाळा आला नाही कारण अनेक चवीचे आंबे खायला मिळायचे. काही आंब्यांना केशर खुप प्रमाणात असायचे. आजच्या शहरातील या हापूसच्या, तोतापूरीच्या किंवा लंगड्या आंब्याच्या जमान्यापेक्षा आमच्या बालपणीच्या पहिल्या पंचविशीमधील आंब्याच्या सिझन खुप आनंददायी आणि मनमुराद असायचा. पहिल्या दहा वर्षापर्यंत अंगात घातलेला शर्ट सुद्धा काहीवेळा पिवळा झालेला बघायला मिळायचा. माझ्या बालपणी आंबे खाण्यासाठी अगदी एकही पैसा खर्च होत नव्हता आणि आज मला या गोष्टीचे खुप कौतुक वाटते. आमची आंब्याची झाडे कमीतकमी 100 ते 150 फूट विस्ताराची होती त्यामुळे पावसाळ्या व्यतिरिक्त उरलेल्या 8 महिन्यासाठी ह्या आंब्याच्या झाडांचा शेतकरी मंडळींना घटकाभर आराम करण्यासाठी उपयोग होत होता. आमचा काळा आंबा प्रत्येक सिझनला कमीतकमी हजार दोन हजार आंबे आम्हाला देत होता. आंब्याचा रंग गडद हिरवा होता म्हणून त्याला त्याला आम्ही काळा आंबा म्हणायचो. आमचा काळा आंबा म्हणजे मला माझे आजोबाच वाटायचे. आंबे पिकल्यानंतर आम्ही ते आंबे आजूबाजूच्या शेजाऱ्यांना, पाहुणे मंडळींना तसेच मित्र मंडळींना घेऊन जात होतो. आमचे पाहुणे रावळे सुद्धा आमच्या काळ्या आंब्याची वाट पाहत असायचे.
आंबा माणसे जोडतो, गोडी आणतो
खरंच आंबा माणसे जोडतो, आंबा प्रत्येकाच्या तोंडाला गोडी आणतो. आंब्याची पाने शुभकार्यात वापरतात. आंब्याची मेढ लग्न मंडपात मुहूर्तमेढ म्हणून उभा करतात. आंब्यावर निसर्गात पशु पक्षी आपला उदरनिर्वाह भागवतात. उन्हाळ्यात विश्रांतीसाठी आंब्याच्या झाडांची सावली उपयोगी पडते. फळे येण्याची क्षमता कमी झाली की त्याच्या मुख्य खोडाच्या फर्निचरच्या लाकडासाठी उपयोग होतो त्याचप्रमाणे इतर फांद्यांचा जळाऊ लाकूड म्हणून उपयोग होतो. लोणची आंब्याचे लोणचे शेतकरी मंडळींना पावसाळाभर जेवणात खुप आनंददायी मेजवानी देत असायचे. पाला पाचोळ्याचा सेंद्रीय खतासाठी वापर होतो. यावरूनच आपणास लक्षात येईल की गावी पूर्वीचे लोक फळांच्या राज्यासोबत मनसोक्त जगायचे. एक आंब्याचे झाड कित्येक लोकांचे, पक्षांचे तोंड गोड करते. आंबा माणसे जोडतो व त्यांच्यामध्ये गोडी निर्माण करतो म्हणूनच त्याला फळांचा राजा म्हणतात आणि राजासोबत पहिली पंचवीशी आनंदात गेल्यामुळे आम्ही राजेशाहीत वाढलो आहोत, असे अभिमानाने सांगू शकतो. आज आंब्यावर लाखो रुपये खर्चुनसुद्धा आमच्यासारखे फळांच्या राजासोबतचे राजेशाही बालपण व त्यातील अगळी वेगळी मौजमजा आजच्या बालकांना कधीच मिळणार नाही आणि आज याचेच दुःख आहे. आज कोणीही निसर्गचक्राला हातभार लावत नाही, त्यामुळे जुन्या आमराई सारख्या नैसर्गिक बागाच तयार होत नाहीत.
पृथ्वीतलावरील अगदी मानवी राजा जसे प्रजेला अनेक सोयी सुविधा देऊन त्याचे जीवनमान सुधारतो अगदी तसेच आंबा सुद्धा प्रत्येकाच्या मुखात गोडी, माधुर्य निर्माण करतो आणि त्यांचे सुख समाधान वाढवितो आणि प्रत्येकाच्या जीवनात राजसुख वृध्दींगत करतो तसेच प्रत्येकाचे जीवन राजेशाही बनवतो म्हणूनच आंब्याला फळांचा राजा हेच नाव सार्थ आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.