April 25, 2024
Enlightenment of science ideas along with spirituality in Dnyaneshwari
Home » ज्ञानेश्वरीत अध्यात्मबरोबरच विज्ञान विचारांचेही प्रबोधन
विश्वाचे आर्त

ज्ञानेश्वरीत अध्यात्मबरोबरच विज्ञान विचारांचेही प्रबोधन

आई आणि मुलाचे जसे प्रेमळ नाते असते असे नाते, अशी ओढ इतर प्राणीमात्राशी आपली असायला हवी. आपली त्यांच्याकडे पाहाण्याची दृष्टी तशा पद्धतीची असायला हवी. जगा व जगू द्या हे यातूनच तर आले आहे. असा विचार प्रत्येक मानवाने केल्यास जैवविविधतेचे संवर्धन निश्चितच होईल.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

आतां बाळाचां हितीं स्तन्य । जैसें नानाभूती चैतन्य ।
तैसें प्राणिमात्रीं सौजन्य । आर्जव तें ।। ११३।। ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा

ओवीचा अर्थ – आतां स्तनांतील दूध जसें लहान मुलांचे हित करणारे असतें अथवा भिन्न भिन्न प्राण्यांच्या ठिकाणी जसे चैतन्य सारखे असते त्याप्रमाणे प्राणीमात्रांशी वागण्याचा जो सर्रास भलेपणा, ते आर्जव होय.

आईचे दुध हे मुलासाठी हितकारक असते. याबाबत नव्यापिढीतही प्रबोधन करावे लागते. या गोष्टीचे महत्त्व पटवून सांगावे लागते. ज्ञान-विज्ञानाचे प्रबोधन जनसामान्यांच्यात करत संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्म त्यांच्यात रुजविण्याचा प्रयत्न केला. संत ज्ञानेश्वर एका दगडात दोन पक्षी मारत आहेत. अध्यात्माबरोबरच विज्ञानाचे प्रबोधन ते येथे करतात. अशी अनेक उदाहरणे ज्ञानेश्वरीत त्यांनी सांगितली आहेत. आईच्या दुधाचे महत्त्व त्यांनी या ठिकाणी विषद केले आहे. स्तनपानामुळे मुल आईच्या जवळ जाते. बाळाच्या जडणघडणीत स्तनपानाला अतिशय महत्त्व आहे. या दोघांच्यातील प्रेम, सौजन्य, आपुलकी, लळा या भावनिक गोष्टीतून मिळणारा आनंद हा सुखकारक असतो. मनाला बलशाली बनवणारा असतो.

आईचे दुध हे बाळासाठी अमृतच असते. जन्मानंतर बाळाची योग्य ती काळजी घेणे खूप गरजेचे असते. बाळाला संसर्ग होण्याचा धोका असतो. अशावेळी त्याचे योग्य संगोपण होणे आवश्यक असते. आईच्या दुधात प्रतिजैविके, रोग प्रतिकारक शक्ती निर्माण करणारे घटक असतात. तसेच आईच्या दुधात पांढऱ्यापेशी मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे त्याची अनेक संसर्ग व्याधींविरुद्ध प्रतिकारकक्षमता वाढते.

आईच्या दुधात असणारे लॅक्टोफेरिन नावाचे तत्त्व, लोहतत्व योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी मदत करते. ज्यामुळे बाळाचे अॅनिमियापासून बचाव होतो. विविध विषाणूंच्या संसर्गापासून लॅक्टोफेरिन बाळाचे संरक्षण करते. आईच्या दुधात असणारे ओलगोस्कॅरीड्स हे बाळाच्या मेंदूच्यावाढीसाठी उपयुक्त असते. तर हेमलेट प्रकारातील पेशी भावीकाळात होऊ शकणाऱ्या कर्करोगापासून सुद्धा संरक्षण करतात. आईच्या दुधातील पेशीमध्ये इतर दुसऱ्या पेशी निर्माण करण्याची ताकद असते. मज्जापेशी, यकृतपेशी ही तत्त्वे असतात. असे अनेक फायदे आईच्या दुधापासून मिळतात. दुधात असणारे लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, संप्रेरके मुलांच्या वाढीसाठी पोषक असतात. या सर्व घटकांमुळेच बाळाची मानसिक, शारिरिक आणि बौद्धिक वाढ उत्तम होते.

आई आणि मुलाचे जसे प्रेमळ नाते असते असे नाते, अशी ओढ इतर प्राणीमात्राशी आपली असायला हवी. आपली त्यांच्याकडे पाहाण्याची दृष्टी तशा पद्धतीची असायला हवी. जगा व जगू द्या हे यातूनच तर आले आहे. असा विचार प्रत्येक मानवाने केल्यास जैवविविधतेचे संवर्धन निश्चितच होईल. विचार केला तर असे लक्षात येईल की जैवविविधतेचे संवर्धन करण्याचा विचार संतांकडून असा वेगळ्या पद्धतीने रुजविला गेला असावा. पण माणूस आपल्या हव्यासा पोटी तसेच अहंकाराने आंधळा झाला आहे. त्याला हे दिसत असूनही तो याकडे दुर्लक्ष करतो आहे. पण आता तो काळ नाही. निसर्गाशी वैर हे त्याला आता संपवू शकते. यासाठीच मानवाने नैसर्गिक नियमांचे पालन करत जगण्याचा प्रयत्न केला पाहीजे. तरच भावीकाळात पृथ्वी वाचू शकेल. हे करण्यासाठीत त्याच्यात सौजन्य निर्माण होण्याची गरज आहे. तसा विचार प्रत्येक मानवात निर्माण झाल्यास पृथ्वीवरील ऱ्हासाला आळा बसेल. निसर्गाशी संवाद साधण्याचा प्रयत्न मानवाने करायला हवा तरच निसर्ग त्याच्याकडे आपुलकीने पाहील. वाघ, सिंह हे हिंस्रप्राणी सुद्धा माणसाळतात मग मनुष्यामध्ये माणुसकी का निर्माण होऊ शकणार नाही ? खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे.

Related posts

जाणून घ्या…देशी वृक्षांच्या बीजांचा संग्रह करण्याचा हंगाम

सद्गुरुच तारणहार असल्यानंतर बुडण्याची भिती कसली

सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेवून स्वराज्याची निर्मिती – डॉ. इस्माईल पठाण

Leave a Comment