May 22, 2024
Importance of Courage in Meditation article by Rajendra Ghorpade
विश्वाचे आर्त

दुःख, भयाला धैर्याने सामोरे जा

दारिद्र अनुभवल्याशिवाय दारिद्र समजून येत नाही. अचानक आलेले दारिद्र पचवता यायला हवे. यासाठी दारिद्राच्या हालअपेष्ठांचा अनुभव हा जीवनात असायलाच हवा. जीवनात येणाऱ्या चढउतारात तो अनुभव निश्चितच मार्गदर्शक ठरतो.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल 9011087406

दैन्य दुःखी न तपे। भवशोकीं न कंपे ।
देहमृत्यू न वासिपे । पातलेनि ।। 492 ।। ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा

ओवीचा अर्थ – दारिद्रापासून होणाऱ्या त्रासामुळे दुःखी होत नाही आणि भय व शोक यांनी कांपत नाही. शरीराला मृत्यू आला असता भयाने याची गाळण उडत नाही.

संपत्ती आज आहे उद्या नाही. पैसा कायम मिळतोच असे नाही. धंद्यात चढउतार असतात नोकरीतही तिच स्थिती असते. पगारवाढ दरवर्षी होईल याची काही शाश्वती नाही. इतकेच काय नोकरीही टिकेल की नाही हे सुद्धा सांगता येणे कठीण असते. जीवनात चढउतार हे येत असतात. अशांना सामोरेजातच आपण आपला जीवनप्रवास चालू ठेवायचा असतो. दुःखाने होणारा त्रास निश्चितच असह्य असतो. पण सहनशिलता सोडता कामा नये. दुःख पचवण्याची ताकद आपल्यात हवी.

सर्वसामान्यांची, दारिद्राची सुख-दुःखे समजून घेण्यासाठी, प्रजेला भेडसावणारे प्रश्न समजून घेण्यासाठी राजे घराण्यामध्ये राजवाडा सोडून सर्वसामान्यांच्यात जाऊन राहाण्याची पद्धत होती. राजकुमार त्यांच्यात राहाताना तो राजा नाही तर सर्वसामान्य नागरिक म्हणून वावरायचे असते. सर्वसामान्यांचा पोशाख, राहाणीमान ठेवायचे असते. तेव्हाच प्रजेचे खरे दुःख समजून येऊ शकते. सामान्यांच्या सोबत सामान्यांच्या सारखे राहील्यानंतर एक समज यातून येते. बऱ्याच गोष्टी शिकायलाही मिळतात. सर्वसामान्यांचे जीवन सर्वसामान्य होऊन अभ्यासायचे म्हणजे पुढे राज्य करताना सर्वसामान्यांच्या यातनांची जाणिव निश्चितच होते.

दारिद्र अनुभवल्याशिवाय दारिद्र समजून येत नाही. अचानक आलेले दारिद्र पचवता यायला हवे. यासाठी दारिद्राच्या हालअपेष्ठांचा अनुभव हा जीवनात असायलाच हवा. जीवनात येणाऱ्या चढउतारात तो अनुभव निश्चितच मार्गदर्शक ठरतो. अचानक आलेले दारिद्र सहन झाल्याने आत्महत्येच्या घटना घडतात. सततच्या दुःखानेही आत्महत्येचे प्रकार होतात. कारण दुःख समजून घेण्याची कुवत त्यांच्यात नसते. दारिद्र आल्याने भिती न बाळगता आलेल्या परिस्थितीशी दोनहात करण्यासाठी पुढे यायला हवे.

उतारवयात मृत्यूचे भय सतावते. या भितीनेच मुख्यतः उतारवयात अनेक आजार जडतात. भिती आणि मनात होणारी अनेक विचारांची कालवाकालव याचा परिणाम आरोग्यावर होतो. आरोग्य उत्तम राखायचे असेल तर मनाची तयारी ही गरजेची आहे. मन कोणत्याही अडअडचणींना खंबीरपणे उभे राहणारे असायला हवे. असे असेल तर कितीही चढ-उतार आले तरी मनाचा समतोल कायम असल्याने त्याचा त्रास होत नाही. दारिद्र, दुःख, उतारवयातील आजार, मृत्यूचे भय, जीवनात येणाऱ्या क्लेशकारक घटना या सर्व पचवण्याची ताकद असायला हवी.

साधना करतानाही अनेक भयकारक स्थिती उत्पन्न होते. पण तेथेही न घाबरता आलेल्या स्थितीवर मात करत साधनेतून मन विचलित होणार नाही याची काळजी घ्यायची असते. न भिता मनाचा समतोल ढळू न देता साधनेने आत्मज्ञानी व्हायचे असते.

पुस्तकांसाठी संपर्क – 9011087406

Related posts

गडचिरोलीच्या छायेतील कविता : “इतिहास आढळत नाही”

Happy Republic Day : संचालनात महाराष्ट्राची वारली कला

गदिमा साहित्य पुरस्कार जाहीर

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406