March 19, 2024
Pradeep Gabale article on Tapovan Asharam
Home » तपोवन आश्रमाची स्थापना
विशेष संपादकीय

तपोवन आश्रमाची स्थापना

काही गोष्टींचे आणि घटनांचे लक्षात राहण्यासारखे योग जुळून येत असतात. विद्यापीठ हायस्कूल १९१७ साली स्थापन झाल्यानंतर जवळ जवळ एक वर्षाने, विद्यापीठाचे संस्थापक दीक्षित गुरुजी हे तपोवनावर राहण्यासाठी म्हणून गेले. तो दिवस होता अनंत चतुर्दशीचा आणि तारीख होती १९ सप्टेंबर, १९१८.आज बरोबर १०३ वर्षांनी या तारखेचा आणि अनंत चतुर्दशीच्या पुनरावृत्तीचा योग जुळून येत आहे. आजच्या १९ सप्टेंबर, २०२१ रोजी अनंत चतुर्दशीला तपोवन आश्रमाचा शतकोत्तर तिसरा वर्धापन दिन साजरा होत आहे. त्यानिमित्ताने…

प्रदीप गबाळे


एकशेतीन वर्षापूर्वीचा तो दिवस, गुरुवार. म्हणजेच १९ सप्टेंबर, १९१८. गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा दिवस. त्यादिवशी विद्यापीठ हायस्कूलचे संस्थापक गं. य. दीक्षित गुरुजी भल्या पहाटे उठून कळंबा रस्त्यावरील शाहू महाराजांनी शाळेसाठी दिलेल्या जागेकडे मार्गस्थ झाले. शंकरराव गुळवणी, रामभाऊ भुर्के, आबा वाळिंबेसह एकूण सात शिलेदारांनी उजाडत असतानाच ती जागा गाठली. हे सर्व थिऑसाॅफीच्या म्हणजेच विश्वबंधुत्वाच्या तत्त्वाने झपाटलेले तरुण होते.

छत्रपती शाहू महाराजांच्या मनात असणारा, विश्वबंधुत्वाचा तत्वावर चालणारा आश्रम त्यांना स्थापन करावयाचा होता. या जागेला नाव काय द्यायचे याचा विचार दीक्षित गुरुजीनी खूप दिवसांपूर्वीच केला होता. नावामध्ये ‘आश्रम’ हा शब्द अनिवार्य होता, कारण खुद्द छत्रपती शाहू महाराजांचेच ते विचार होते. आ + श्रम म्हणजे या ठिकाणी अखंड ,सतत श्रम करणारे, श्रमप्रतिष्ठाला जपणारे आणि श्रम देवतेची उपासना करणारे शिष्यगण तयार व्हावेत अशी महाराजांची इच्छा होती. हे श्रम म्हणजे केवळ शारीरिक श्रम असा त्याचा अर्थ नव्हता तर गावापासून दूर असणाऱ्या, मनाला उत्साहित करणाऱ्या, सदाबहार निसर्गाच्या सानिध्यात, बुद्धी योग आणि कर्मयोग यांची तपस्या अपेक्षित होती.

गुरुजन वर्गासमोर स्वतःच्या आचरणातून अनोखी गुरु-शिष्य परंपरा येथे निर्माण निर्माण करण्याचे आव्हान होते. पृथ्वीतलावरील सर्व धर्मांचे अंतिम तत्त्व केवळ मानव कल्याण आणि त्यासाठी अस्तित्वात आलेला ‘मानव धर्म’ असून तो जाणून घेण्यासाठी, या मानवी धर्माच्या मूलभूत मूल्यांच्या तत्वांची जोपासना इथं करावयाची होती. यासाठी फार मोठी साधना करायची होती. प्रयत्नांची साधना, श्रमाची साधना आणि बुद्धीची साधना. ही साधना करत असताना मूलभूत विश्वबंधुत्वाचे तत्वही वाढीस लावावयाचे होते. जात, पात, धर्म, लिंग या भेदांच्या पलीकडे असणाऱ्या मानवधर्माचे तप इथं करावयाचं होते आणि यासाठी फक्त एकच शब्द दीक्षित गुरुजीना योग्य वाटत होता. ‘ तपोवन’ तपोवन आश्रम. असं नंदनवन की जीथं कोणीही येऊन निसर्गाच्या सानिध्यात तप करावं, स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करावा.म्हणूनच नाव ठरलं ” तपोवन आश्रम “. विद्यापीठ शाळेच्या स्थापनेनंतर जवळ-जवळ एक वर्षाने म्हणजेच १९ सप्टेंबर ,१९१८ साली, अनंत चतुर्दशीला दीक्षित गुरुजीनी तपोवन आश्रमाचा प्रारंभ केला.

गुरुजींच्या मनातील आश्रमाला हळूहळू मूर्त रूप येत होतं. आश्रमातील मुले दिवसातील काही काळ सोडला तर इतर पूर्णवेळ गुरुजींच्या सहवासातच राहत होती. आपल्या प्रत्येक हालचालीचा, बोलण्याचा, विचारांचा संस्कार या मुलांवर होत आहे याचे भान गुरुजींना होते. त्यामुळेच गुरुजी या आश्रमीय मुलांचे केवळ गुरुजी नव्हते तर ते त्यांचे आई – वडीलही होते. आश्रमातील दिनचर्या काटेकोरपणे अमलात आणली जात होती. पहाटे सर्वजण लवकर उठत. नैसर्गिक विधी उरकल्यानंतर स्नानासाठी तपोवनाच्या पूर्वेला असणाऱ्या जयंती आणि गोमती नदीच्या संगमावर स्नानासाठी जात असत. तेथून परत येताना प्रत्येकाने एक कळशीभर पाणी आणायचे असा रिवाज होता. एका आश्रमवासीयाच्या कळशीतील पाण्याने वाटेतील माळावर लागणाऱ्या मारुतीच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आणि सकाळी सात पूर्वी तपोवनात प्रार्थनेसाठी जमायचे, असा दिनक्रम सुरू झाला.

एक दिवस सकाळी दीक्षित गुरुजी आश्रमीय मुलांच्या फौजे सह संगमावर अंघोळी करून तपोवनात परत येत होते. गुरुजींच्या खांद्यावर पाण्याने भरलेली कळशी होती, तसेच इतर सर्वांच्या कडे तशाच कळश्या होत्या. इतक्या सकाळी, भरलेल्या कळशा घेऊन येणारी ही वानरसेना बघून, कात्यायनीकडे शिकारीला चाललेल्या छत्रपती शाहू महाराजांना आश्चर्य वाटले. महाराज म्हणाले,
“गुरुजी हे कशासाठी आणताय?”
” मुलाला घेऊन संगमावर अंघोळीला गेलो होतो. येताना प्रत्येकी एक कळशी आम्ही पाणी पिण्यासाठी म्हणून आणतो. ” गुरुजी म्हणाले.
” का ? तपोवनात पाणी नाही का? “
” आहे. तपोवनाच्या वायव्येला एक डबकं आहे पण त्यातील पाणी खराब आहे. “
” अस्सं. ” महाराज सोबतच्या माणसांकडे वळत म्हणाले,
” तुम्ही इथेच थांबा मी जरा गावात जाऊन येतो.” कात्यायनीच्या जंगलात शिकारीला चाललेल्या त्या दृष्ट्या राजानं मनात काही विचार करून आपली गाडी परत गावाकडे वळवली. तासाभरात नळ खात्याचे अधिकारी, मुकादम, आणि चाळीस कैदी घेऊन महाराज परत आले. कळंबा रस्त्याच्या पूर्व बाजूला, शंभर-दोनशे फुटावर कळंबा तलावातून पाण्याच्या खजिन्याचाकडे जाणारा पाण्याचा भुयारी पाट होता. महाराज म्हणाले, ” या पाण्याच्या मुख्य पाटातून एक पाट काढायचा आणि तो तपोवनात न्यायचा. आजच्या आज. तपोवन आश्रमातल्या मुलांना पाण्यासाठी अशी वणवण करायला लागता कामा नये.”

महाराज अधिकाऱ्याकडे वळून पुढे म्हणाले, ” दिरंगाई करू नका आणि काही खुसपटं काढू नका. मी कात्यायनीहून येताना मला तपोवनात या पाटाचं पाणी प्यायला मिळालं पाहिजे.”
महाराज सूचना देऊन कात्यायनीकडे मार्गस्थ झाले. अधिकारी, मुकादम आणि ४० कैदी कामाला लागले. कैद्यांनी फावडी, कुदळी, पहारा असे साहित्य बरोबर आणले होते. पाहता पाहता चार-पाचशे फुटाचा पूर्व-पश्चिम नवा पाण्याचा पाट तयार झाला. महाराज बोलल्याप्रमाणे संध्याकाळी तपोवनात आले. पाण्याची झालेली व्यवस्था पाहून महाराज खूप आनंदी झाले. हात पाय धुऊन महाराज ते थंडगार पाणी प्यायले. तृप्त झाले. महाराजांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. केवळ मुलांसाठी, त्यांचे कष्ट पाहून व्यथीत होणारा राजा आणि त्या मुलांचे कष्ट कमी व्हावेत म्हणून आपल्या राजे पणाचा तात्काळ उपयोग करणारा हा कनवाळु राजा, आपल्या पाठीशी उभा आहे हे पाहून दीक्षित गुरुजीही मनोमन धन्य झाले. ” मानव सेवेतून ईश्वराची प्राप्ती “, हे विद्यापीठाचे तत्व, आश्रयदाते असणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कृतीमधून सर्वांसमोर ठेवले.

पाहता-पाहता दीक्षित गुरुजींनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तपोवनाचे नंदनवन केले. तपोवन वासियांच्या कष्टातून त्या ठिकाणी एकूण सात फुलबागा निर्माण झाल्या. थोर व्यक्तींनी आणि विभूतीनीं तपोवन आश्रमाला भेट देऊन आश्रमास पवित्र केले. संत मेहेरबाबा, संत तुकडोजी महाराज, विश्वनाथ बुवा केसकर महाराज, आचार्य स. ज. भागवत, आचार्य दादा धर्माधिकारी, विमलाताई ठकार इत्यादी महान संत मंडळींची चरण धुली तपोवन आश्रमास लागली. महात्मा गांधी, मोरारजी भाई देसाई, डॉ. अॅनी बेझंट, डॉ राधाकृष्णन, लोकनेते जयप्रकाश नारायण, यशवंतराव चव्हाण, डॉ अरुंडेल इत्यादी महान नेत्यांनी तपोवनास भेटी दिल्या. वि. स. खांडेकर, ना. सी. फडके, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, कवी माधव ज्युलियन अशा कित्येक लेखक आणि कवी मंडळीनी तपोवनास भेट देऊन वृक्षारोपण केले.

Related posts

एक जिल्हा एक उत्पादन योजनेबद्दल उत्तर प्रदेशातील विश्वकर्मांनी पंतप्रधानांचे मानले आभार

मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे संत साहित्य पुरस्कार जाहीर

गुंफण अकादमीतर्फे विनोदी कथा स्पर्धेचे आयोजन

Leave a Comment