December 7, 2022
Home » माझें नृसिंहत्व लेणें । जयाचियें महिमे ।। ( एकतरी ओवी अनुभवावी)
विश्वाचे आर्त

माझें नृसिंहत्व लेणें । जयाचियें महिमे ।। ( एकतरी ओवी अनुभवावी)

 काट्याने काटा काढायचा असा निसर्गाचा नियम आहे. तसेच काहीसे साम्य निसर्गताहा या भूतलावर पाहायला मिळते. सृष्टीच्या निर्मितीमध्येही समानता पाहायला मिळते. साम्यावस्था हा निसर्गाचा नियमच आहे. दृष्ट प्रवृत्ती वाढल्या की त्यावर प्रतिबंध बसवण्यासाठी कोणीतरी उत्पन्न होतोच. साम्यावस्था राखली जाते. 

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 9011087406


पाहें पां भक्तीचेनि आथिलेपणें । दैत्यीं देवा आणिलें उणें । 
माझें नृसिंहत्व लेणें । जयाचियें महिमे ।। 450 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 9 वा 

ओवीचा अर्थ – अर्जुना पाहा, भक्तीच्या संपन्नतेनें राक्षसांनी देवांनाही कमीपणा आणला ज्या प्रल्हादाच्या भक्तिमहात्म्यासाठीं मला नरसिंहरुप अलंकार धारण करावा लागला. 

खांबातून नृसिंह प्रकटला, संत ज्ञानेश्‍वरांनी रेड्यामुखी वेद वदवले. अशी उदाहरणे आजच्या घडीला न पटणारी अशीच आहेत. चमत्कारच्या गोष्टी विज्ञानापुढे टिकणे कठीण आहे. पण चमत्काराच्या या प्रकारामागचा भाव मात्र जाणून घ्यायला हवा. त्याचा खरा शोध घ्यायला हवा. वैद्यकिय शोध विचारात घेतले तर या गोष्टी चमत्कार वाटणार नाहीत. 

काट्याने काटा काढायचा असा निसर्गाचा नियम आहे. तसेच काहीसे साम्य निसर्गताहा या भूतलावर पाहायला मिळते. सृष्टीच्या निर्मितीमध्येही समानता पाहायला मिळते. साम्यावस्था हा निसर्गाचा नियमच आहे. दृष्ट प्रवृत्ती वाढल्या की त्यावर प्रतिबंध बसवण्यासाठी कोणीतरी उत्पन्न होतोच. साम्यावस्था राखली जाते. वैद्यकीय शास्त्रात एखाद्या रोगावरील उपाय शोधताना कसा अभ्यास केला गेला आहे. हे पाहावे म्हणजे नैसर्गिक नियमांची ओळख आपणास होईल. 

गोकर्णाचे फुल कानासारखे दिसते. यावरून ही वनस्पती कानाच्या विकारावर गुणकारी असल्याचे प्रयोग केले गेले. गुळवेल किंवा खाऊचे पान हृद्‌याच्या आकाराचे आहे म्हणजे हे हृद्‌याच्या विकारावर गुणकारी ठरू शकेल. आक्रोडचे फळ हे मेंदुच्या आकाराचे आहे. त्यावरील रेषा मेंदूवरील रेषांशी साम्य करतात. यावरून हे मेंदूच्या विकारावर गुणकारी आहे असे संशोधन करण्यात आले. गुंजीची फळे डोळ्यासारखी आहेत यावरून ही वनस्पती डोळ्यांच्या विकारावर गुणकारी आहे का हे तपासले गेले. 

नेचे वर्गीय वनस्पती अनेक वर्षे पाण्याविना जीवंत राहतात. पाणी मिळाले नाही तर त्या मृत होत नाही. त्यातील जीवंतपणा टिकूण राहातो. पाणी मिळाले की पुन्हा त्या टवटवीत होतात. हिरव्यागार दिसतात. यावरून ही वनस्पती कोमातील किंवा बेशुद्धावस्थेत गेलेल्या व्यक्तीवर शुद्धीवर आणण्यासाठी गुणकारी ठरू शकते. असे अनुमानही काही संशोधकांनी मांडले आहे. हे निसर्गाचे चमत्कारच म्हणावे लागतील. निसर्गात साम्यावस्था अशाच प्रकारे राखली गेली आहे. 

भक्त प्रल्हाद आणि नृसिंह अवतार याकडेही याच दृष्टीने पाहायला हवे. प्रल्हादाच्या तोंडी सदैव नारायण…नारायण..नारायण हा जप सुरु असायचा. सदैव तो त्यात गुंग होऊन जायचा. आपण भक्त प्रल्हादासारखी साधना करू लागलो तर आपणासाठीही सद्‌गुरु प्रकट होऊ शकतात. विठ्ठल…विठ्ठल..विठ्ठल..चा जप करणाऱ्या वारकऱ्यांना साक्षात विठ्ठलाचे दर्शन झाल्याचे अनेक अनुभव आहेत. अशी भक्ती असेल तर आपण आत्मज्ञानी निश्‍चितच होऊ. आपणासही आत्मज्ञानाचा हा ठेवा सद्‌गुरु देणार यात शंकाच नाही. मग तो सद्‌गुरुंचा झालेला नृसिंह अवतारच म्हणावे लागेल ना ! 

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत – 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी – 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी – 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क – मोबाईल – 8237857621

Related posts

सद्गुरुंचा प्रसाद…

प्रेम करा आनंदी जीवनासाठी…

स्वयंपूर्ण झाल्यासच शेतीत अधिक फायदा

Leave a Comment