December 4, 2024
in-search-of-good-poem-ajay-kandar-article
Home » चांगल्या कवितेच्या शोधात
मुक्त संवाद

चांगल्या कवितेच्या शोधात

स्त्रीमुक्तीची कविता लिहून स्वतःच्या आयुष्यात फरक पडणार आहे का ? त्यामुळे समग्र जगण्याला भिडणारी कविता लिहायला वैदिक परंपरा अडसर ठरत आहे, हेही कवयित्रींनी समजून घ्यायला हवे. कारण कविता लेखन म्हणजे फक्त जगण्यावर भाषण नाही तर कविता लेखन म्हणजे जगण्यातील कृतिशीलतेचा उद्गगार असतो.

अजय कांडर
लेखक विख्यात कवी,व्यासंगी पत्रकार आहेत. ९४०४३९५१५५

दिवाळी अंकातील कविता वाचताना अनेक प्रश्न मनात उभे राहतात. पहिला प्रश्न म्हणजे चांगली कविता लिहू पाहणारा कवी चांगल्या कवितेपर्यंत पोहोचतच नाही. दुसरा प्रश्न म्हणजे चांगल्या कवितेचा शोध घेण्यासाठी आपल्या पारंपारिक मानसिकते मध्ये बदल करायला हवा हाही प्रश्न कवीला पडत नाही. स्वतःच्या जगण्याविषयी, निखळ माणूस म्हणून घडत जाण्याच्या धारणांविषयीचे प्रश्न कवीला पडले नाहीत तर चांगल्या कवितेपर्यंतचा प्रवास होणे शक्य नसते.

आज लिहिल्या जाणाऱ्या मराठीतील कवी आणि कवयित्रींच्या दिवाळी अंकांमधील कवितांचा धांडोळा घेताना अपवाद काही चांगली कविता वगळता अनेक कवींच्या कविता म्हणजे घटनेचा वृत्तांतच! शेवटी कवीने वाचकांसमोर कवितेच्या नावाखाली घटना- प्रसंग ठेवणे आणि कवितेच्या शब्दात काव्यात्मक भाव जपत घटनेच्या पलीकडे काव्यानुभव घेणे यात फरक राहतोच !

या सगळ्या पार्श्वभूमीवर कवयित्रींच्या कवितांचा विचार करताना त्यांच्या मानसिक जडणघडण संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होतात. स्त्रीने सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे. स्त्री आणि पुरुष असा भेद करता येऊ शकत नाही. एवढं स्त्री पुरुषाच्या बरोबरीने काम करते आहे, तरीही स्त्रीला दुय्यम स्थान दिलं जातं. यामागे वैदिक परंपरेची मानसिकता आहे, हे समजून घेतलं पाहिजे. वैदिक परंपरा अनुसरणाऱ्या समाजातील स्त्रियांचे आयुष्य खूप कठीण होत जाते. वैदिक परंपरेने जातीव्यवस्था अधिक घट्ट केली आणि कुठल्याही जाती व्यवस्थेत स्त्रीलाच अधिक त्रास सहन करावा लागतो हा आजवरचा इतिहास आहे.

वैदिक परंपरेमुळे स्त्रियांचा प्रगतीचा दर्जा खालावला गेला. पुरुषी वर्गाला स्त्री ही एक पैसे मिळवून देणारी साधन वाटू लागली.आजही यात फरक नाही. दरम्यान आपण हेही समजून घ्यायला हवे, की वैदिक परंपरेनुसार स्त्रिया स्वतःसाठी स्वतःचं आयुष्य स्वतःच्या विचाराने जगू शकत नाहीत. उच्च पदे शोधू शकत नाहीत. वैदिक स्त्रियांना त्यांच्या मर्जीनुसार फिरण्याची स्वतःच्या विचारानुसार कार्ये करण्याची परवानगी नाही आणि त्यांना राजकारणात येण्याची परवानगी नाही. शिवाय, लग्नाची मार्गदर्शक तत्त्वे वधूसाठी घालून देण्यात आली आहेत.

वैदिक स्त्रियांना मूलभूत समानतेचे अधिकार नव्हते आणि त्या त्यांच्या घरगुती जीवनाचाही आनंद घेऊ शकत नाहीत. वैदिक स्त्रियांना फारच कमी अधिकार दिला जातो. स्त्रीला पुरुषांचा समान जोडीदार म्हणून नव्हे, तर संततीसाठी उपयुक्त ठरणारी अशाच प्रकारे स्त्रीकडे वैदिक परंपरेत पाहिलं जातं. स्त्रियांना त्यांच्या संपत्तीपासून वंचित ठेवण्यात आले होते आणि त्यांना राजकीय, आर्थिक विकासासाठी आवश्यक मानले जात नव्हते. हे एवढे विस्ताराने लिहिण्याचे कारण, की आजही स्त्रीला वैदिक परंपरेने जगावं लागतं आणि ते जगताना स्त्रीने कुंकू लावाव, की टिकली याचा आदेश पुरुष देऊन स्त्रीवर पुरुषच पहारा ठेवताना दिसतो आहे.

स्त्रीवर लादल्या गेलेल्या या वैदिक परंपरेच्या बंधनाचा कवयित्री सखोलपणे विचार करताना दिसत नाहीत. याचं कारण अनेक कवयित्री आजही वैदिक परंपरा स्वीकारताना दिसतात आणि रोजचं जगणं तसच जगतानाही दिसतात. मग स्त्रीमुक्तीची कविता लिहून स्वतःच्या आयुष्यात फरक पडणार आहे का ? त्यामुळे समग्र जगण्याला भिडणारी कविता लिहायला वैदिक परंपरा अडसर ठरत आहे, हेही कवयित्रींनी समजून घ्यायला हवे. कारण कविता लेखन म्हणजे फक्त जगण्यावर भाषण नाही तर कविता लेखन म्हणजे जगण्यातील कृतिशीलतेचा उद्गगार असतो.

वैदिक परंपरेत देवाला मोठे स्थान आहे आणि देवाच्या स्थानी स्त्रीला जाण्याची परवानगी नाही, स्त्रीच्या मासिक धर्म दिवसात मंदिरात गाभाऱ्यात प्रवेश नाकारला जातो. किंबहुना मंदिरातच प्रवेश नाकारला जातो. जिथे आपल्याला सन्मानाने स्वीकारलं जात नाही, तिथे आपण जावंच कशाला? या निकषापर्यंत जोपर्यंत विचारशील कवयित्री येत नाहीत, तोपर्यंत जगण्याच्या संबंध व्याममिश्रतेला कवितेतून भिडणे कठीणच आहे, हेही कवयित्रींनी समजून घ्यायला हवे. ब्राह्मणी आणि अब्राह्मणी विचारधारा आजवर समजूनच घेतली गेली नाही. ब्राह्मणी विचारधारा म्हणजे वैदिक परंपरा आणि अब्राह्मणी विचारधारा म्हणजे वैदिक परंपरा नाकारून आपल्या मुळांचा शोध घेणे. आपल्या मुळांचा शोध घेण्याची वृत्ती कवयित्रींमध्ये वाढीस लागायला हवी. तरच त्या अधिक सकस कविता लिहू शकतील.

आजच्या कवितेच्या बाजारीकरणात स्वतःच्या कवितेचं सत्व टिकवण ही आजची अतिशय कठीण गोष्ट आहे. कवितेचे बाजारीकरण हा एक नवा शब्द आता प्रचलित होऊ लागला आहे आणि याच्या मुळाशी जाताना जागतिकीकरणाच्या रेट्यात आपण सोशल मीडियाच्या दिशेने ज्या वेगाने धावतो आहोत तो वेग पकडता पकडता आपलंही बाजारीकरण कसं झालं आहे याचाही अंदाज आपल्याला येत नाही आहे. या बाजारीकरणात उत्पादनाचा दर्जा महत्त्वाचा नाही तर त्याचं मार्केटिंग महत्त्वाचं. कवितेच्या उत्पन्नाचा दर्जा कवींना आता दुय्यम वाटू लागला आहे. मात्र कवितेचं मार्केटिंग जोरात चालू आहे.

अर्थात काळाबरोबर ज्या सुविधा तुम्हाला तुमच्या घरापर्यंत येतात त्याचा उपयोग तुम्ही करणे हे काही वाईट नाही; पण आपली तीच मानसिकता बनणे म्हणजे आपण नव्या युगाच्या सुविधेचे मनोरूग्न होणे असते. अनेक लोक सोशल मीडियामुळे मनोरुग्ण झाले आहेत, हे तर वारंवार समाज अनुभवतो आहे. त्यात कवी काही अपवाद नाही. पूर्वी कवी कविता लिहायचा त्या कवितेवर पुन्हा पुन्हा काम करायचा त्यानंतर ती कविता एखाद्या महत्त्वाच्या साहित्यिक नियतकालिकासाठी तो पाठवायचा. त्या नियतकालिकाच्या संपादकाचे पत्र कविता स्वीकारल्याचं येते, की नाही ही वाट बघण्यात अनेक दिवस जायचे आणि जेव्हा संपादक तुमची कविता स्वीकारत आहोत, असं पत्र पाठवत असे.

तेव्हा कवीला झालेला आनंद कोणत्याही मोठ्या सन्मानापेक्षा जास्त मोठा असायचा. आज सोशल मीडियामुळे तुमची कविता तुम्हीच लिहिणार, तुम्हीच त्या कवितेचे संपादक असणार आणि तिचे प्रसिद्धीचे माध्यमही तुमच्याच हातात असणार. वीस पंचवीस लाईक झाल्या, की कवीचा ऊर भरून येणार. अशावेळी चांगल्या कवितेची गुणवत्ता शोधण्याचे कष्ट कोणीही घेत नाहीत आणि चांगल्या कवितेकडे जाण्याचा कठीण मार्ग कोणीही स्वीकारत नाही. अशावेळी आपल्या वाचनात आलेल्या कवितेच्या गुणवत्तेचा तटस्थपणे विचार करावा लागतो. आणि हा विचार करताना बऱ्याच वेळा कवितेचं सपाटीकरणच झालेलं दिसतं. चांगल्या कवितेचा शोध शेवटी कवीला स्वतःलाच घ्यायचं असतो याचा गंभीरपणे विचार होण्याची गरज निर्माण झाली आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading