जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे बालसाहित्य संमेलन
अमरावती – बालसाहित्य बालकांच्या व्यक्तिमत्व विकासाचा आत्मा आहे. उत्कृष्ट मूल्य संवर्धन करणारे बाल साहित्य निर्माण झाले पाहिजे व ते बालकांनी वाचले पाहिजे. वाचन चळवळ वाढली पाहिजे. ग्रंथालये देवालये झाली पाहिजेत. बालकांच्या व्यक्तिमत्वाचा विकास राष्ट्र विकास आहे, अशा आशयाचे उद्गार कादंबरीकार व बालसाहित्यिक डॉ. श्रीकांत पाटील यांनी काढले.
जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेतर्फे श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरी येथे आयोजित बाल साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. बालसाहित्य संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोधे यांनी केले. त्यांनी राष्ट्रसंतांचा बाल विकासाचा दृष्टिकोन स्पष्ट करून समाजाला राष्ट्रसंतांच्या विचाराची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. याप्रसंगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गाडगेबाबा अध्यासन केंद्राचे प्रमुख प्राचार्य दिलीप काळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी गाडगेबाबांचा बाल विकासाचा विचार मांडला.
उद्घाटन प्रसंगी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड मुंबई यांचा त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष डॉ. सतीश तराळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बालकांच्या प्रेमातून व बालकांविषयीच्या जिव्हाळ्यातून उत्कृष्ट बालसाहित्य निर्मिती होऊ शकते. माझ्या साहित्य अकादमी पुरस्काराचे श्रेय माझ्या विद्यार्थ्यांना आहे.
एकनाथ आव्हाड
आपल्या भाषणात एकनाथ आव्हाड यांनी बाल कथा सांगून बालकविताही सादर केली. उद्घाटन सत्र भगवानजी रामुजी जाधव यांच्या स्मृती प्रीत्यर्थ आयोजित करण्यात आले होते. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन डॉ राजेश मिरगे यांनी केले. यावेळी प्रा. डॉ. मंदा नांदुरकर यांच्या फुलकई या बाल कवितासंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
स्व. मधुकरराव नारायणराव तराळ स्मृतीसत्र या दुसऱ्या सत्रात बालसाहित्य वास्तव आणि अपेक्षा या विषयावर परिसंवाद झाला .परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सतीश तराळ होते. या परिसंवादात प्राचार्य एकनाथ तट्टे, प्राचार्य राज यावलीकर, प्रा. डॉ. प्रशांत राऊत, प्रा. डॉ. अलका गायकवाड, नीता कचवे यांनी आपले विचार मांडले. प्राचार्य एकनाथ तट्टे यांनी बालसाहित्याची आवश्यकता व महत्त्व स्पष्ट केले. प्राचार्य राजावलीकर यांनी बालसाहित्य बालकांच्या अभिरुची प्रमाणे निर्माण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
आज कॉन्व्हेंट संस्कृतीमुळे बाल जाणीवा हरवल्या आहेत अशावेळी उत्कृष्ट बालसाहित्याची गरज आहे. मराठीत बालसाहित्याला दुय्यम स्थान दिले गेले. बालसाहित्य व बालसाहितकांची उपेक्षा झाली. बालसाहित्य निर्मिती कठीण बाब आहे .बालसाहित्यातून जिज्ञासा वृत्ती निर्माण झाली पाहिजे व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास झाला पाहिजे.
प्रा. डॉ. प्रशांत राऊत
मुलांच्या व्यक्तिमत्व विकासात बालसाहित्याचा वाटा मोठा असतो. बालसाहित्याने बालमानसशास्त्राचे भान ठेवावे सकस आणि दर्जेदार बालसाहित्य मुलांना वाचायला मिळणे हा बालकांचा हक्क आहे. उत्तम बाल साहित्याची निर्मिती व प्रसार ही काळाची गरज आहे. बाल साहित्याची चळवळ गतिमान झाली पाहिजे.
प्रा. अलका गायकवाड
बालसाहित्याचे खरे प्रयोजन बालकांना योग्य दृष्टी आणि दृष्टिकोन बहाल करणे हे आहे.
नीता कचवे
परिसंवादाचे अध्यक्ष जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश म्हणाले रशिया ही जागतिक बालसाहित्याची तर बंगाली मराठी बालवाड.मयाची जननी आहे. तेराव्या शतकात चक्रधर स्वामी यांनी सांगितलेले व लीळाचरित्रात आलेले दृष्टांत हीच मराठी साहित्याची खरी सुरुवात आहे. बालबोध मुक्तावली हे बाल साहित्याचे पहिले पुस्तक असून स. का. छत्रे विनायक कोंडदेव हे आरंभीच्या काळातील महत्त्वाचे लेखक आहेत. रंजन व मूल्य संस्कार ही बाल साहित्याची प्रमुख ध्येय आहेत. मराठीने साने गुरुजीं सारखा बालसाहित्याचा दीपस्तंभ वैश्विक बालसाहित्याला दिला. बालसाहित्य कलावादी असू शकत नाही. मराठी बालसाहित्यात सर्वजन समावेशकता नाही. मराठी बालसाहित्यात श्यामची आई आहे पण भीमाची आई, केरूची आई नाही. बोलीभाषेतून बालसाहित्य निर्माण झाले पाहिजे. जनसामान्य, ग्रामीण, आदिवासी यांच्या जीवनाशी संबंधित बालसाहित्य निर्माण झाले पाहिजे. बालसाहित्याची सैद्धांतिक अवस्था वाईट आहे. मराठी साहित्य इतिहासात साहित्याचा इतिहास नाही. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणात बालसाहित्याचा उल्लेख नाही. बालसाहित्यात विनोदी व विज्ञान साहित्याचा अभाव आहे. बालसाहित्यालातंत्रज्ञानाची जोड दिली पाहिजे. बालसाहित्याची चळवळ ही व्यक्तिमत्व विकासाची राष्ट्र विकासाची चळवळ आहे
स्व. माणिकराव नांदुरकर स्मृतीसत्र या तिसऱ्या सत्रात नांदेडचे प्रसिद्ध बालसाहित्यिक बबन शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कथाकथनात प्रा. विजया मारोतकर, डॉ. शोभा गायकवाड, प्राचार्य अनिल प्रांजळे, प्रा. डॉ. मंदा नांदुरकर, विनोद तिरमारे, बबलू कराळे यांनी बालकथा सांगितल्या. स्व. प्रमोद काळे स्मृतीसत्र या चौथ्या सत्रात रवींद्र जवादे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन संपन्न झाले. यात संदीप वाकोडे, रामदास गजेगावकर, मोहन काळे, प्रा. डॉ. गजानन घोंग, संजय अडिकणे, सुनील लव्हाळे, गणेश खडके, कुमारी स्वराली वाणी, शिला चीवरकर, कांचन उल्ले, संजीवनी काळे, डॉ. योगिता पिंजरकर, प्रा. सिमरेला देशमुख धोबे, छाया पाथरे, अंजली वारकरी, कुमारी नित्या प्रदीप नांदुरकर यांनी आपल्या कविता सादर केल्या. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन नागपूरच्या प्रा. डॉ. पद्मिनी दूरुगकर खोसेकर यांनी केले.
स्वर्गीय विश्वासराव यावलीकर स्मृतीसत्र या पाचव्या समारोपीय सत्राच्या प्रमुख अतिथी म्हणून मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय अमरावतीच्या प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख उपस्थित होत्या. त्यांनी बालसाहित्याची ध्येय ,उद्दिष्टे निर्मिती व उपयोगीता याबाबत विवेचन केले. हे संमेलन गुरुदेव विद्या मंदिर गुरुदेव नगर मोझरी व मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय अमरावती यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. गुरुदेव कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मनोज कडू ,सचिन जगताप व विद्यालयाचे शिक्षक बंधू भगिनी निमंत्रक अमोल बांबल यांनी संमेलन यशस्वी करण्यासाठी खूप परिश्रम घेतले. संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी सकाळी आठ वाजता गुरुदेव विद्यामंदिरच्या हजार विद्यार्थ्यांची ग्रंथ दिंडी काढण्यात आली. गुरुदेव विद्यालयापासून प्रारंभ झालेली ही ग्रंथ दिंडी गावातून राष्ट्रसंतांच्या समाधीस्थळी गेली. भगव्या टोप्या घालून सर्व विद्यार्थी यात सहभागी झाले होते.
संमेलन यशस्वी करण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात अमरावती जिल्हा अध्यक्ष प्राचार्य राज यावलीकर ,प्राचार्य मनोज कडू , संमेलनाचे निमंत्रक अमोल बांबल, कांचन उल्ले, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे डॉ. राजाभाऊ बोधे, जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. राजेश मिरगे, उपाध्यक्ष संदीप तडस, प्रा. अलका गायकवाड, सचिव गणेश खडके, प्रा. सुगंध बंड, प्रा. मंदा नांदुरकर, छाया पाथरे, सिमरेला देशमुख, राणी नागापुरे, प्रशांत शेंदुरकर, प्रवीण चिंचे, संजीवनी काळे, संजय तायवाडे, श्रीकृष्ण कुलट आदींनी परिश्रम घेतले. संमेलन शिस्तबद्ध संमेलनाचे शिस्तबद्ध नियोजन करून ते यशस्वी केल्याबद्दल संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्राचार्य मनोज कडू व संमेलनाचे निमंत्रक अमोल बांबन यांचा जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.