- संत साहित्य, चिंतनपर ग्रंथ आणि ललित लेखनाचा गौरव;
- विविध गटांत सात पुस्तकांची पुरस्कारासाठी निवड
पुणे : संत साहित्याचा विचार समाजापर्यंत पोहोचविणाऱ्या आणि आध्यात्मिक वाङ्मयाला प्रोत्साहन देणाऱ्या मातृमंदिर विश्वस्त संस्था, निगडी (पुणे) यांच्या वतीने प्रतिवर्षी दिल्या जाणाऱ्या संत वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा या उपक्रमाचे २८ वे वर्ष असून, परीक्षणासाठी आलेल्या २८ ग्रंथांमधून परीक्षकांनी विविध गटांतील पुरस्कारप्राप्त पुस्तकांची निवड केली आहे. चिंतनपर आणि विवेचनपर पुस्तकांच्या गटात लक्ष्मण सूर्यभान धुगे लिखित ‘योगी पावन मनाचा’ या पुस्तकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या वर्षीच्या पुस्तकांचे परीक्षण डॉ. सुनीताताई सहस्रबुद्धे आणि डॉ. भालचंद्र कापरेकर यांनी केले. दोन्ही परीक्षकांनी एकमताने पुरस्कारप्राप्त पुस्तकांची निवड केली. पुरस्काराच्या रकमेत लेखकांना ६० टक्के, तर प्रकाशकांना ४० टक्के वाटा दिला जाणार आहे.
चिंतनपर अन् विवेचनपर पुस्तकांचा गट
या गटात प्रथम क्रमांकाचा आठ हजार रुपयांचा पुरस्कार ‘योगी पावन मनाचा’ या पुस्तकाला मिळाला आहे. या पुस्तकाचे लेखक लक्ष्मण सूर्यभान धुगे असून, मुक्त आर्ट्स पब्लिकेशन, पुणे हे प्रकाशक आहेत.
द्वितीय क्रमांकाचा सहा हजार रुपयांचा पुरस्कार संध्या सत्रे लिखित ‘भगवद्गीता – जीवन व्यवस्थापनशास्त्र’ या पुस्तकांना जाहीर झाला आहे. या पुस्तकांचे प्रकाशक डायमंड पब्लिकेशन्स, पुणे आहेत.
तृतीय क्रमांकाचा चार हजार रुपयांचा पुरस्कार डॉ. रवींद्र भामरे लिखित ‘नैसर्गिक आपत्तीत मराठी संतांचे मनोविज्ञान’ या पुस्तकांना मिळाला आहे. या पुस्तकांचे प्रकाशन स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे यांनी केले आहे.
विशेष पुरस्काराने दोन पुस्तकांचा गौरव
संस्थेने लेखकांसाठी विशेष पुरस्कारही जाहीर केले आहेत. तीन हजार रुपयांचा हा पुरस्कार केवळ लेखकांना दिला जाणार आहे. यामध्ये डॉ. सी. कांचन जोशी लिखित ‘सद्गुरू, सच्चिदानंद आणि साधना’ या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे. या पुस्तकाचे संपादन वरदा प्रकाशन, पुणे यांनी केले आहे. तसेच नागेश शेवाळकर लिखित ‘परमपूज्य श्री पूर्णानंद महाराज समर्थ कथामृत’ या पुस्तकाचीही विशेष पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या पुस्तकाचे प्रकाशक श्री श्याम श्रीकृष्ण वारकरी (शेवाळकर), हिंगोली हे आहेत.
संत जीवन आणि ललित साहित्याचा स्वतंत्र गट
संत जीवन आणि ललित साहित्य या दुसऱ्या गटात प्रत्येकी अडीच हजार रुपयांचा पुरस्कार दोन पुस्तकांना जाहीर झाला आहे. नागेश शेवाळकर लिखित ‘पवनपुत्र हनुमान’ या पुस्तकाला पुरस्कार मिळाला असून, त्याचे प्रकाशक लाडोबा प्रकाशन, पुणे आहेत. डॉ. लता पाडेकर लिखित ‘प्रकाश पेरण्यासाठी’ या पुस्तकाचीही पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या पुस्तकाचे प्रकाशक विश्वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे आहेत.
२२ नोव्हेंबरला पुरस्कार वितरण
या पुरस्कारांचे वितरण रविवारी २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२ या वेळेत ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी, पुणे ४४ येथील मनोहर सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमास विजय कुळकर्णी प्रमुख अध्यागत म्हणून उपस्थित राहणार आहेत.
