पंचगंगेच्या काठावर वसलेलं वडणगे ही दक्षिण करवीर काशी, सधन गाव अशी वडणगेची नानापरीने जिल्ह्यात ओळख. राजकीय, सामाजीक, कला, क्रीडा, सांस्कृतिक समृध्द म्हणूनही गावची ओळख. अनेक परंपरानी समृध्द असलेल्या वडणगे गावाला कबड्डीची समृध्द परंपरा आहे. ‘कबड्डी म्हणजे जय किसान मंडळ’ आणि ‘जय किसान मंडळ म्हणजे कबड्डी‘ हे समीकरण ४७ वर्षापासून दृढ झाले आहे. वडणगेचे नाव कबड्डीच्या माध्यमातून जिल्ह्यात आणि राज्यात पोहचविण्याचे सारे श्रेय जाते, ते जय किसान क्रीडा मंडळाला जाते. व्यसनमुक्त पिढी घडविण्याबरोबरच व्यायामातून शरीर संपदा मिळविणे आणि वैयक्तिक कौशल्यातून, सांघिक ताकदीतून वडणगे गावचे नाव उज्वल करणारया जय किसान क्रीडा मंडळाचा शनिवारी २८ जानेवारीला ४७ वा वर्धापनदिन होत आहे. त्यानिमित्त….
सर्जेराव नावले
वरिष्ठ उपसंपादक, दै. सकाळ, कोल्हापूर
८३८००९४६४२.
माजी जिल्हा परिषद सदस्य, उत्कृष्ट संघटक, उत्कृष्ट कुस्तीपटू यांनी १९७६ च्या काही वर्ष अगोदर गोविंद बराले, निवृत्ती साखळकर, हिंदूराव पाटील (भादोले), पांडूरंग तथा पी.वाय. माने, हसनूदिन मुल्ला, संभाजी ठमके आदींना सोबत जय किसान क्रीडा मंडळाची मुहुर्तमेढ रोवली.
अगदी सुरूवातीच्या काळात किरूळकर माळात मैदान तयार करून कबड्डीचा सराव सुरू केला. त्यानंतर काही दिवस मराठी शाळेच्या मैदानावर रात्री लाईट पोलखाली सराव सुरू केला.
कालातंराने सध्या असलेल्या मंडळाच्या जागेत माळरानावर लालमातीचे मैदान तयार करून कबड्डीचा सराव सुरू झाला. गावातील पोरं काही तर वेगळं करतात म्हटल्यावर दानशूर लोकांची मदतीचा हात दिला. जय किसान क्रीडा मंडळ बाल्याअवस्थेत असताना. अनेकांनी बळ दिले. या बळातूनच पोरांना प्रोत्साहन मिळत गेले. आणि नवी हुरूप घेत गावची पोरं कबड्डीचा सराव करू लागली. गरीब, श्रीमंत, जात-पात असा भेदभाव न पाळता गावचे तरूण मंडळाच्या मैदानावर घाम गाळू लागले.
मंडळाला जय किसान नाव दिले…
सुरूवातीला मंडळाला नाव काय द्यावे, असा विचार सुरू झाला. मंडळाच्या पोरांनी यावर चर्चा करत श्री नामदेव परीट व बाळू यशवंत शेलार यांनी मंडळात शेतकऱ्यांची पोरं कबड्डी खेळतात. मंडळाचे नाव जय किसान द्यावे असे सुचविले. आणि मग त्यावर एकमत होवून मंडळाला जय किसान क्रीडा मंडळ असे नाव दिले. मंडळाचे रितसर संचालक मंडळ नेमले. सुरूवातीला बी.एच पाटील, शिवाजी कचरे, बी.के.जाधव, सदाशिव पाटील- मास्तर, के.एस.पाटील, नंतरच्या काळात टी.एस. जाधव, रावसाहेब चौगले आदींचा संचालक मंडळाच समावेश करण्यात आला.
कोणतेही तांत्रिक मार्गदर्शन नसताना केवळ कौशल्य आणि खेळण्याची चिकाटी यातून कबड्डीत जम बसविण्यास सुरूवात केली. हळूहळू तालुका, जिल्हा, महाविद्यालय, विद्यापीठ, राज्य आणि देशपातळीवर जय किसान हे नाव अल्पावधीतच झळकू लागले. पोर खेळतात, नाव कमावतात म्हटल्यावर घरच्यांसह गावकऱ्यांनीही पोरांना प्रोत्साहन द्यायला सुरूवात केली.
त्याकाळचे पहिल्या फळीतील तरूण शाळा, कॉलेज तसेच शेतीची कामे करत संध्याकाळी मंडळाच्या मैदानावर सरावासाठी जमायचीत. घाम गाळून व्यायाम करायचीच आणि मग कबडडी खेळायचे. घरचे मुबलक दूध-दुभत्याचा खुराकाचा आधार असायचा. सुरूवातीच्या काळात बी.एच.पाटील, शिवाजी देवणे, राम शेलार, कुंडलिक पाटील, सदाशिव जौंदाळ, जगन्नाथ चौगले, संभाजी ठमके, श्री.कचरे कै. सरदार चौगले आदींनी जय किसानची पहिली दमदार टीम केली. दरम्यानच्या काळात बी.एच पाटील दादा हे पतियाळा(पंजाब) येथे वर्ल्ड इंटर युनिव्हर्ससिटी स्पर्धेच्या निमित्ताने कोल्हापूरचे पाचजण १ महिना तेथे थांबले होते. यावेळी बी.एच.दादांनी यांनी पतियाळा येथे असणारे भव्य स्टेडियम, मैदान पाहिल्यानंतर वडणगे गावातही कबड्डीसाठी एखादे मैदान असावे. अशी सुप्त इच्छा त्यांच्या मनात घर करून राहिली. परत आल्यानंतर मंडळासाठी किमान १० बाय २० बांधकामाची इमारत असावी यासाठी सहकाऱ्यांसमोर तशी कल्पना मांडली.
कंत्राटदार कै.बळवंत माने वस्ताद यांनी या बांधकामासाठी होकार दर्शविला. इंजिनियर डी.के.शिंदे यांनी यासाठी बांधकाम प्लन तयार केला. बांधकामासाठी अर्थिक जोडणी करण्यासाठी मंडळातर्फे जादुगार रघुवीर यांचा ग्रामपंचायतीच्या पंटागंणावर जादूचा प्रयोग ठेवला. या प्रयोगातून ४५०० रूपये राहिले. आणि या पैशातून जय किसान मंडळाचे बांधकाम सुरू झाले. १९७६ साली गोविंद जाधव, बंडू शेलार यांच्या हस्ते मंडळाच्या इमारतीचा पायाभरणी झाला. दरम्यानच्या काळात गावातील शिवपार्वती झाडवाट कुरूण मंडळाने २० हजारांची रक्कम मंडळाच्या बांधकामासाठी दिली. मदतीचा ओघ पाहून इंजिनियर शिंदे यांनी १० बाय २० च्या इमारतीचा प्लन बदलला आणि आता उभ्या असलेल्या इमारतीचा पुन्हा नव्याने आराखडा केला. आणि भव्य अशा मंडळाच्या इमारतीचे बांधकाम सुरू झाले.
मंडळाच्या तरूणांनी, गावकऱ्यांनी मंडळाच्या इमारतीसाठी मदतीचा हात दिला. कुणी ट्रॅक्टर दिला. कुणी स्वतः श्रमदान केले. इमारतीसाठी खाणीतून श्रमदानातून दगड काढले. देवणे माळ येथील खाणीतून कै. मारूती धनवडे, रामचंद्र खवरे यांनी दगड गोळा केले. तर हे दगड खाणीतून वर काढण्यासाठी कुणी बैलजोड्या दिल्या, बैलजोड्या लावून दगड खाणीतून वर काढले. आणि ते दगड ट्रॅक्टर- ट्राॅलीतून मंडळापर्यत आणले.
बांधकामासाठी लागणारी वाळू परिसरातील ओढ्यातून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी श्रमदानातून ट्राॅलीतून आणली. परिसरातील असा एकही ओढा वाळू आणायचा तरूणांनी राखला नाही. पदरची भाकरी खावून अहोरात्र मंडळासाठी या तरूणांनी मेहनत घेतली. कान्ट्रक्टर बळवंत माने यांनी केवळ मजुरीवर बांधकाम सुरू केले. तर गवंडीकाम कै.दिनकर चेचर यांनी पायापासून ते शेवटपर्यत करून दिले. इंजिनियर शिंदे यांनी ओढ्यातील वाळू स्लॅबसाठी चालणार नाही म्हटल्यावर एकाच दिवशी ३८ ट्रॅक्टर घेवून नांद्रे (ता.मिरज, जि.सांगली) येथील कृष्णा नदीतून श्रमदानातून वाळू आणली. आणखी एका स्लॅबसाठी निपाणीजवळील यमगर्णी येथून वेदगंगा नदीतून एकाच दिवशी २२ ट्राॅली वाळू भरून आणली. ही कामे करत असताना मंडळाच्या कार्यकत्यांनी घरच काम असल्यासारखे अहोरात्र राबून केले. जेष्ठ नेते कै. बाबासाहेब पाटील-भुयेकर यांनी मंडळाच्या इमारतीला सिमेंट देवू केले. तर तत्कालीन कै.खासदार उदयसिंग गायकवाड यांनी दरम्यानच्या काळाच १० लाख रूपये देवू केले. तत्कालीन शाहुवाडीचे आमदार संजयदादा गायकवाड यांनी त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री असताना बी.एच.दादा व अन्य मंडळींना मुंबईला बोलावून घेवून २५ हजारांची मदत दिली होती. करवीरचे तत्कालीन आमदार दिग्विजय खानविलकर यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री रामराव आदिक यांच्याकडून २५ हजारांचा निधी त्याकाळी मिळवून दिला होता. तत्कालीन आमदार बजरंग देसाई यांनीही मंडळाच्या इमारतीला आमदार फंडातून निधी दिला.
मंडळाच्या मुख्य इमारतीसमोर जो हाल बांधला त्याला विद्यमान आमदार पी.एन.पाटील यांनी १० लाखांचा निधी उर्वरित महाराष्ट्र वैधानिक मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष उल्हासदादा पवार यांच्या फंडातून मिळवून दिला. सध्याची उभी असलेली मंडळाची भव्य इमारत ही खेळाडूंच्या, गावकऱ्यांच्या घामातून श्रमदानातून तसेच राजकीय नेते आणि दानशुरांच्या मदतीतून दिमाखात उभी आहे.
सुरुवातीच्या काळामध्ये मंडळाला बी.एच.पाटील, शिवाजी देवणे, राम शेलार, कुंडलिक पाटील, सदाशिव जौंदाळ, कै. बी.वाय. पाटील, जगन्नाथ चौगले यासारखे राष्ट्रीय खेळाडू निर्माण झाले. शहाजी व शाहू कॉलेजमधून खेळणारे खेळाडू मंडळामध्ये मात्र एकत्र सराव करीत होते. नंतरच्या काळामध्ये ही परंपरा पुढे अशीच चालू राहीली व कष्टाच्या व जिद्दीच्या जोरावर सलग २६ वर्षे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा जिंकण्याचा इतिहास याच मंडळाचा आहे.
पुढच्या फळीत अशोक पाटील- घोळसकर सर, राजू पाटील-आबा, प्रकाश पाटील (पोलिस), नंदकुमार देवणे, कृष्णात शेलार, विकास अस्वले, कै. तानाजी मुरावणे आबा, बाळासाहेब (बी.आर.) पाटील, जोतिराम खवरे, उमेश पोवार, तर अलिकडच्या काळात रणजित जांभळे, धनाजी दिंडे, विकी पोवार, राहूल जांभळे, सुयश जौंदाळ यासारखे अनेक राष्ट्रीय खेळाडू तसेच विद्यापीठ खेळाडू तयार झाले.
पुरुषांच्याबरोबरच महिला संघानेही राज्यात कबड्डीत दबदबा निर्माण केला. आशा राणे, रुपाली पाटील, अर्चना चौगुले, सोनाली पाटील, अश्विनी पाटील, शर्वरी शेलार, शिवानी देवणे, शिरीषा शेलार अशा राज्य, विद्यापीठ, राष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत.
१९७६ सालापासून सुरू झालेली वडणगेची जय किसान क्रीडा मंडळाची कबड्डीची दमदार यशस्वी परंपरा २०२३ सालापर्यंत अखंडपणे जोमाने सुरु आहे. सध्या मंडळात माती आणि मॅटवर कबड्डीचा सराव केला जातो. मंडळाने वडणगेत आतापर्यंत जिल्हा अजिंक्यपद कबडी स्पर्धा, राज्यस्तरीय स्पर्धा तसेच याच वर्षी महाराष्ट्रात मंडळाने मॅटवरील स्पर्धा पहिल्यांच घेण्याचा मान मिळविला आहे.
४७ वर्षापूर्वी पहिल्या पिढीने सुरू केलेली वडणगेची कबड्डीची परंपरा आज तिसरया पिढीकडे आली आहे. बाराही महिने येथे मुले आणि मुली कबड्डीचा घाम गाळून सराव करतात. आताच्या खेळाडूंना मंडळाचे जेष्ठ खेळाडू वेळोवेळी योग्यप्रकारे मार्गदर्शन करतात.
मंडळाचे आतापर्यत ४६ राष्ट्रीय पुरुष खेळाडू, २३ राष्ट्रीय महिला खेळाडू, २१ पुरुष व महिला खेळाडू विद्यापीठ, सलग २६ वर्षे जिल्हा अजिंक्य निवड चाचणी जिंकणारे एकमेव मंडळ आहे. पोलिस, उत्पादन शुल्क, महसूल, शिक्षक अशा शासकीय सेवेत अनेक खेळाडू कार्यरत आहेत.
४७ वर्षापूर्वी बी.एच.पाटील यांनी व त्याच्या सहकारयांनी व्यसनमुक्त पिढी घडविण्यासाठी आणि कबड्डी टिकण्यासाठी लावलेल्या छोट्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. आज जय किसान क्रीडा मंडळाला किंबहुना मंडळाच्या इमारतीला अनेकांच्या घामाचा, कष्टाचा, श्रमदानाचा इतिहास आहे. आणि या प्रेरणादायी इतिहासावर मंडळाची वाटचाल सुरू आहे. आज कबड्डीला ग्लॅमर आले आहे. कबड्डी आज व्यावसायिक झाली आहे. पण एकेकाळी अंगावरचे कीट मिळणे अवघड होते. अशा काळात पदरमोड करत वडणगेसारख्या ग्रामीण भागात कबड्डीचे मंडळ सुरू करणे आणि यशस्वीपणे टिकवून ठेवण्याचे शिवधनुष्य बी.एच.दादा आणि त्यांच्या टीमने समर्थपणे पेलले आहे.
आज तलावाच्या पश्चिमेला जयकिसान क्रीडा मंडळाची जी दिमाखदार वास्तु उभी आहे. त्या वास्तुला घामाचा, कष्टाचा, श्रमदानाचा प्रेरणादायी इतिहास आहे, हे त्या वास्तुकडे पाहुन प्रत्येक वडणगेकराने अभिमानाने समजून घ्यावे इतकीच अपेक्षा..