July 27, 2024
vasant-jugale-book-on-oraganic-farming
Home » भारतातील सेंद्रिय शेतीचा आढावा
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

भारतातील सेंद्रिय शेतीचा आढावा

शेतीचा चौथा टप्पा आता जन्माला येत आहे. २०३० नंतर त्याचे खुले स्वरुप पाहायला मिळेल. त्यासाठी नवा पिढीतील शेतकरी निर्माण करणे आवश्यक आहे. त्याला शेतकरी न म्हणता अॅग्रोप्रिन्युअर म्हणणे उचित ठरणार आहे.

जगभरात सेंद्रीय शेतीचे क्षेत्र वाढत आहे. गेल्या काही वर्षात रासायनिक खते अन् किटनाशकांच्या अतीवापरामुळे त्याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. यातूनच सेंद्रिय शेतीची उपयुक्तता अधिक जाणवत आहे. भारतात सेंद्रिय शेतीची काय स्थिती आहे ? कोणत्या समस्यांचा सामना करावा लागत आहे ? सेंद्रिय शेतीचे फायदे – तोटे कोणते आहेत ? नैसर्गिक शेती बद्दलही आता अनेकांना उत्सुकता वाटत आहे. या सर्वांचा आढावा प्रा. डॉ. वसंतराव जुगळे यांनी भारतातील सेंद्रिय शेती यामध्ये घेतला आहे.

भारतात २००२ मध्ये सुमारे १४ हजार टन सेंद्रिय शेतीचे उत्पादन होते. त्यातील ८५ टक्के उत्पादनाची निर्यात झाली. आता २० वर्षांनंतर म्हणजे २०२०-२१ मध्ये सेंद्रिय शेतीचे उत्पादन ३४ लाख ९६ हजार ८०० टन झाले. त्यातील २५.३९ टक्के शेतमालाची निर्यात झाली. यातून असे स्पष्ट होते की देशांतर्गत सेंद्रिय शेतमालाचा वापर वाढत आहे. असे असूनही सेंद्रिय शेतीच्या क्षेत्रामध्ये भारत आठव्या क्रमांकावर आहे तर सेंद्रिय पिकाच्या आणि शेतजमिनीच्या गुणोत्तरामध्ये भारत ८८व्या क्रमांकावर आहे. भारतातील सेंद्रिय शेतीचा आढावा डॉ. जुगळे यांनी पहिल्या प्रकरणात घेतला आहे.

भारतातील शेती ही परंपरेने सेंद्रिय होती. परदेशातील बहुतेक संशोधकांनी सेंद्रिय शेतीच्या अभ्यासासाठी भारताला भेट दिली होती. आता सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण करण्यात येते. हा सर्व सेंद्रिय शेतीचा इतिहास डॉ. जुगळे यांनी दुसऱ्या प्रकरणात मांडला आहे. पारंपारिक आणि सेंद्रिय शेती यातील फरक डॉ. जुगळे यांनी तिसऱ्या प्रकरणात मांडला आहे. सेंद्रिय पिकांचे उत्पन्न विश्लेषण, सेंद्रिय उत्पादनांचे प्रमाणीकरण आणि लेबलिंग यावर विशेष प्रकाश टाकण्यात आला आहे. सेंद्रिय शेतकऱ्यांच्या संख्येत भारत पहिल्या क्रमांकावर आहे आणि सेंद्रिय शेतीखालील क्षेत्राच्या बाबतीत नवव्या क्रमांकावर आहे. सेंद्रिय शेतीचे विहंगावनलोकन डॉ. जुगळे यांनी या पुस्तकात केले आहे. सेंद्रीय शेती पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी माती व्यवस्थापन, तण व्यवस्थापन, पीक विविधता, शेतीतील रासायनिक व्यवस्थापन, जैविक कीटक नियत्रण यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. असा विचारही त्यांनी मांडला आहे. सेंद्रिय शेतीच्या फायद्याबरोबरच तोट्यावरही प्रकाश टाकला आहे. सेंद्रिय उत्पादनांच्या उत्पादन आणि विक्री प्रक्रियमध्ये नियामक फ्रेमवर्क सर्वात महत्त्वाचे आहे. भारतात प्रमाणन संस्थांची सख्या ३१ आहे. या संस्थांची यादीही येथे दिली आहे.

सरकारी धोरणांची वाट न पाहता शेतकऱ्यांनीच शेती व्यवस्था बदलावी आणि सर्व जनतेला कोरोनासारख्या महामारीच्या तडाख्यातून वाचवावे. यासाठी एका नव्या शेती व्यवस्थेचा जन्म झालेला आहे. या न्युट्रॅसिटिकल फार्मिंग अथवा पोषणक्षम शेती व्यवस्था म्हटले जाते. यावर विस्तृत चर्चा या पुस्तकात डॉ. जुगळे यांनी केली आहे. नत्र, आरोग्य आणि औषधी वनस्पतींच्या लागवडीचे शास्त्र म्हणजेच पोषणक्षम शेती व्यवस्था होय. न्युट्रिशन व फार्मास्टुर्टिकल अशा दोन शब्दांनी त्यार झालेला शब्द म्हणजे न्युट्रोसिटिकल फार्मिंग म्हणजे शेती व्यवहार अथवा व्यवस्था होय.

शेतीचा चौथा टप्पा आता जन्माला येत आहे. २०३० नंतर त्याचे खुले स्वरुप पाहायला मिळेल. त्यासाठी नवा पिढीतील शेतकरी निर्माण करणे आवश्यक आहे. त्याला शेतकरी न म्हणता अॅग्रोप्रिन्युअर म्हणणे उचित ठरणार आहे. हा शेतकरी नियोजनबद्ध आणि अचूक शेती व्यवसाय करणारा माणूस आहे. शेती व्यवस्थेतील सर्व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारा तज्ज्ञ शेतकरी आहे. कृषी व्यवस्थेमध्ये चौथी क्रांती आणणारा हा कृषी तंत्रज्ञ आहे. २०३० मध्ये असणारे कृषी तंत्रज्ञान कसे असेल यावरही या पुस्तकात डॉ. जुगळे यांनी मते मांडली आहेत. नैसर्गिक शेतीच्या यशासाठी आवश्यक असणारे मुद्देही डॉ. जुगळे यांनी मांडले आहेत. हरितक्रांतीमुळे भुकेची समस्या काही अंशी मिटली पण तिच्या दुष्परिणामामुळे सेंद्रिय शेतीची उपयुक्तता अधिक जाणवते आहे. या अनुशंगाने हे पुस्तक वाचणीय अन् महत्त्वपूर्णही असे आहे.

पुस्तकाचे नावः भारतातील सेंद्रिय शेती
लेखकः प्रा. डॉ. वसंतराव जुगळे
प्रकाशनः तेजस प्रकाशन, कोल्हापूर 9322939040, 8308858268
किंमतः १२५ रुपये, पृष्ठेः ८२


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

पृथ्वीवर असा आघात होऊ नये यासाठी एक उठाठेव

मुलांच्या अभ्यासाची चिंता सतावतेय का ?

जलक्रांतीचा योद्धा जलनायक सुधाकरराव नाईक

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading