October 14, 2024
Changes are needed to increase the usefulness of the curriculum article by Arjun Kumbhar
Home » Privacy Policy » अभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…
काय चाललयं अवतीभवती

अभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…

प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील अभ्यासक्रमाचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी आमूलाग्र बदलाची गरज आहे. नवीन ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ नुसार राज्यात विविध स्तरावरील अभ्यासक्रम आराखडा निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या निमित्ताने….

डॉ अर्जुन कुंभार

प्राचार्य,
सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगूड
98 90 156 911

dradkumbhar@gmail.com

देशाची शिक्षण व्यवस्था ही देशाच्या राष्ट्रीय धोरणाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आपला देश सध्या आणि  भविष्यात दहा वर्षांनी, पन्नास वर्षांनी, शंभर वर्षांनी कसा असायला हवा याचं अतिशय महत्त्वकांक्षी धोरण ठरविताना या देशाची शिक्षण व्यवस्था कशी असायला हवी हा राज्यकर्त्यांसाठी आणि शिक्षणतज्ञांसाठी चा सर्वात प्राधान्याचा विषय असायला हवा.

देशातील शिक्षणाचा दर्जा घसरत चालला आहे. त्याची उपयुक्तता पुरेशी सिद्ध होत नाही आहे. याबाबत अगदी सामान्य माणसापासून ते शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांकडून नाराजी व्यक्त होत आहे. शिक्षणाचा दर्जा आणि उपयुक्तता कमी होण्याला कोणकोणते घटक जबाबदार आहेत याबाबत मात्र मतमतांतरे असल्यामुळे समस्येचे नेमके निदान आणि त्यावर नेमका उपाय होताना मात्र दिसत नाही.

शिक्षणाचे विषय कितीही बदलले आणि ज्ञानाचा व्याप कितीही वाढला तरी सुशिक्षित माणसाजवळ किमान आवश्यक बिनचूक वास्तव माहिती आणि ज्ञान, सभ्यता आणि सुसंस्कृतपणा,  किमान जीवन कौशल्ये  आणि व्यावसायिक कौशल्ये प्राप्त झाल्याचे  मात्र आभावानेच पहायला मिळते ही वस्तुस्थिती आहे.

ही जबाबदारी निश्चित करताना शिक्षक, पालक, शिक्षण संस्था, अभ्यासक्रम,  प्रशिक्षण संस्था, शासन, विद्यार्थी हे घटक एक दुसऱ्यावर दोषारोप करताना दिसत आहेत. यातून समस्येचे नेमके निदान होताना दिसत नाही. त्यामूळे या समस्येच्या निराकरणासाठी कोणतीच नेमकी आणि ठोस पावले उचलली जात नाहीत.

जसे आपणास आवश्यक नैसर्गिक आणि सकस आहाराची सहज उपलब्धता असताना आपण पिझ्झा, बर्गर सारख्या महागड्या आणि आरोग्यास हानिकारक फास्ट फूड, जंक फूड, बेकरी फूडकडे स्वेच्छेने वळत आहोत. तिथला झगमगाट आणि थाटमाट पाहून आपण त्याकडे आकर्षित होतो आणि न परवडणारी किंमत मोजून अगदी रांगेत उभा राहून आपण अनारोग्य खरेदी करत असतो. अगदी याच पद्धतीने  खाजगी, निवासी व इंग्रजी माध्यमांच्या शाळा आपणास आकर्षित करत आहेत.

शासन संचलित आणि खाजगी अशा दोन्ही शाळा-महाविद्यालयातून शिकविला जाणारा अभ्यासक्रम खूपच सदोष आणि कालबाह्यही आहे. ज्या बियाणांच्या भरवश्यावर भरमसाठ आणि दर्जेदार शिक्षण घ्यायचं ते बीयाणंच निकृष्ट आहे आणि त्या अनुषंगाने सारी शिक्षण प्रक्रियाच आपला एक निकृष्ट दर्जा घेऊन कार्यरत आहे. यातील दुष्टचक्र असं की, याच प्रक्रियेतून तयार झालेले शिक्षक, त्यांचं शिक्षक-प्रशिक्षण, नवीन अभ्यासक्रमावरील प्रशिक्षण, इतर सेवांतर्गत प्रशिक्षण,  त्या अनुषंगाने वापरल्या जाणाऱ्या अध्यापन पद्धती आणि तंत्रे आणि परीक्षा पद्धती सर्वच या विशिष्ट दिशाहीन आणि दर्जाहीन पद्धतीने कार्यरत आहेत.

आजच्या शिक्षणातून प्रचंड मोठ्या संख्येने बाहेर पडणाऱ्या दहावी-बारावी आणि उच्चशिक्षित बहुसंख्य तरुणांकडे पाहिल्यानंतर  हेच स्पष्ट होतंय की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, विविध स्तरावरचे अभ्यासक्रम व पाठ्यक्रम आणि पाठ्यपुस्तके, आपली शिक्षक- प्रशिक्षण पद्धती, त्यांची शैक्षणिक क्षमता व गुणवत्ता, शैक्षणिक सुविधा आणि शालेय व्यवस्थापनातील शिस्त व परिणामकारकता हे अतिशय सुमार आणि दिशाहीन पद्धतीने कार्यरत आहे.

जगातील कोणत्याही कारखान्यातून बाहेर पडणारे उत्पादन हे नेहमी पहिल्यापेक्षा सरस, सक्षम आणि आकर्षक असते. प्रत्येक कारखाना अशा कच्च्या मालावर जास्तीत जास्त उत्तम आणि निर्दोष प्रक्रिया करत असतो. त्यासाठी त्यांचे संशोधन आणि विकास (R & D) युनिट सतत  कारखान्याच्या  अद्ययावतीकरणावर खूप कष्ट घेत असते. हे युनिट त्यांची प्रक्रिया-यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी आणि त्यांचे उत्पादन  इतरांपेक्षा सरस आणि आकर्षक होण्यासाठी अथकपणे कष्ट घेत असते. या यंत्रणेतील संशोधन प्रक्रिया आणि कार्यरत मानव संसाधन व त्यांची कार्यप्रणाली यांच्या दर्जा बाबतीत ते अत्यंत आग्रही असते. या कारखान्यातून बाहेर पडणारे उत्पादन हे ग्राहकांना ( समाजाला) आकर्षित करते ते त्यांच्या दिसण्याबरोबरच त्याच्या उपयुक्ततेमूळे. ते त्यांच्या पूर्वीच्या उत्पादनापेक्षा आणि इतरांपेक्षा वेगळे असते.

मोटर सायकल, कार  यासारख्या उत्पादनाच्या बाबतीत कोणत्याही कंपनीची नवी गाडी हाताळताना तिचा लुक, तिची क्षमता इत्यादी गुण-वैशिष्ट्ये आपणास मोहित करतात. कारण ती नव्या काळाशी सुसंगत अशी उत्पादनाची नवी आणि  उत्कृष्ट पिढी असते. म्हणून तर टू स्ट्रोक, फोर स्ट्रोक,  2G, 3G, 5G, युरो – वन, टू , थ्री, फाईव्ह इत्यादी सातत्यपूर्वक  अद्ययावत उत्पादने बाजारात येतात.

शिक्षण ही देशाची सर्वात महत्त्वाची उत्पादन संस्था आहे. तिच्यामध्ये विद्यार्थी नावाचा कच्चामाल येत असतो. त्यावर दीर्घ काळ ( पंधरा-वीस वर्षे) शिक्षणाची प्रक्रिया होत असते. शिक्षक नावाचं उच्च शिक्षित आणि प्रशिक्षित मानव संसाधन कार्य करत असतं. बालभारती, एस सी ई आर टी,  एन सी ई आर टी, विश्व विद्यापीठ, यूजीसी, इत्यादी संशोधन व विकास (R & D) यंत्रणा कार्यरत असतात, तर राज्य व केंद्र शासन नावाची उच्च स्तरिय मॅनेजमेंट सतत कार्यरत असते. विशेष म्हणजे या उत्पादनाशी देशातील प्रत्येक व्यक्ती, कुटुंब, समाज  आणि अखिल देशाचाच संबंध असतो. सर्वांनाच या कारखान्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत. तरीपण आज वेगवेगळ्या शिक्षण टप्प्यांवर  आपण शिक्षणाचं उत्पादन तपासलं तर आपल्याला पुढील प्रश्नांची उत्तरे समाधानकारक मिळतात की नाही याचा सर्वांनीच गांभीर्याने विचार करावा लागेल.

आपलं शैक्षणिक उत्पादन 2G, 3G, 5G, युरो – वन, टू , थ्री, फाईव्ह आहे का? ते पहिल्या पेक्षा सरस आणि आकर्षक आहे का? त्याच बरोबर समाजात नवी कार आणि नव्या मशीन सारखी त्याची प्रतीक्षा आणि त्याचं स्वागत होतं की  समाजातील एक कोणतंही जीवन कौशल्य आणि आत्मविश्वास नसलेला सुशिक्षित बेकार, आणि आत्मविश्वास नसलेली एक समस्याप्रधान व्यक्ती म्हणून ते बाहेर पडतं?…..

शिक्षण ही सर्व सजीवांसाठी त्यांच्या जन्मापासूनच अनिवार्य व अटळ गोष्ट आहे. प्रत्येकाला जीवंत राहण्यासाठी आवश्यक कौशल्ये जन्मापासूनच शिकावी लागतात. यात पर्यावरणाशी जुळवून घेणे, आपणास अनुकूल-प्रतिकूल गोष्टी कोणत्या ते समजून घेणं, आपणास उपकारक गोष्टींशी जोडून घेणं, धोकादायक गोष्टींपासून दूर राहाणं इत्यादी बाबतचं शिक्षण हे कोणत्याही शाळेत न जाता अनौपचारिक पद्धतीने आपण सर्वजण घेत असतो. हे इतर प्राण्यांच्या बाबतीतही घडत असतं.

शाळा हा फक्त मानव प्राण्यांना लावलेला अतिशय महत्त्वाचा शोध आहे. निसर्गाकडून प्रत्येकाला प्राप्त झालेल्या शक्तिशाली  व्यक्तित्वाचा सर्वांगीण विकास करून त्याची स्वतःसाठी आणि समाजासाठी  जास्तीत जास्त उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी तसा उपयुक्त अभ्यासक्रम तयार करावा, त्यासाठी अतिशय तळमळीचे, बुद्धिमान, अभ्यासू व प्रशिक्षित शिक्षक नेमावेत, त्यांनी वेगवेगळी परिणामकारक अध्यापन तंत्रे व पद्धतींचा वापर करून विद्यार्थ्यांचे सुसंस्कृत, सर्जनशील, उद्योगी आणि रसिक व्यक्तिमत्व घडवावे. त्यासाठी आवश्यक सर्व भौतिक सुविधा पुरवाव्यात ही अपेक्षा आहे.

वर्तमान वस्तुस्थिती काय आहे?

पुढील प्रश्नांची सकारात्मक उत्तरे आपणास देता आली नाही तर आपली शिक्षण पद्धती आपली दिशाभूल आणि  भ्रम-निराश करत आहे असंच म्हणावं लागेल.

१.  शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी पुरेशा भौतिक सुविधा आहेत काय?

२.   विद्यार्थ्यांचा पक्का भावनिक विकास होण्यासाठी त्याच्यामध्ये देशप्रेम, मानवता, लोकशाही निष्ठा, धर्मनिरपेक्षता, पर्यावरणप्रेम, रसिकता इत्यादी मूल्ये विकसित केली जातात काय?

३.   विद्यार्थ्यांमध्ये काही नवनिर्मितीची (creativity) वृत्ती आणि आस निर्माण केली जाते काय?
४.   विद्यार्थी त्यांच्या जीवनामध्ये स्वतःच्या उन्नती बरोबर समाजासाठी काही रचनात्मक आणि विधायक कार्य (constructive work) करतात काय?

५.   विद्यार्थ्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी तो काही उत्पादक कार्य (productive work) करतो काय?

६.   त्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासू वृत्ती आणि येणाऱ्या नव्या आव्हानांना सामोरं जाण्याची बौद्धिक क्षमता विकसित केली जाते काय?

या प्रश्नांची उत्तरे आपण निश्चितच समाधानकारकपणे देऊ शकत नाही. आपली शिक्षण व्यवस्था ही उच्च ध्येयांची चर्चा करते मात्र प्रत्यक्षात त्याची कार्यवाही होत नसल्याने स्वातंत्रोत्तर काळात शिक्षण व्यवस्थेकडून उत्तरोत्तर भ्रमनिराशाच होत असताना पाहायला मिळतो. कारण..

१.   तरुणांमध्ये आरोग्याच्या चांगल्या सवयी लागण्या ऐवजी त्यांच्यात व्यसनाधीनता वाढताना दिसते. त्यांच्यात फास्टफूड, धाब्यावर आणि पार्ट्यांमध्ये खाण्या-पिण्यामध्ये रुची दिसते.

२.   सर्वत्र लोकप्रिय होत असलेली शिवराळ आणि असभ्य भाषा, छोट्या मोठ्या कारणावरून आणि चिथावणी वरून किंवा विकृत मनोरंजन म्हणून सार्वजनिक मालमत्तेचे केले जाणारे नुकसान, पर्यटनाच्या नावावर चालू असलेला चंगळवाद, लैंगिक अत्याचार, सामूहिक बलात्कार, सेक्स टुरिझम, वाहतुकीचे नियम न पाळण्याची वाढती वृत्ती, सण-उत्सवात वाढत चाललेली हुल्लडबाजी आणि पर्यावरणाचा ऱ्हास करताना वाटत असलेला आनंद हे पाहिलं की आपल्या शिक्षणातून मुलं काय शिकतात? यांचा भावनिक विकास होतो काय? अशा तरुणांच्या भरवशावर आपल्या समाजाचे आणि देशाचे भवितव्य काय? या व अशा प्रश्नांनी आज प्रत्येक संवेदनशील आणि विचारी नागरिक चिंतातुर आहे.

३.   किती तरुणांकडे स्वतःच्या करिअरचे उन्नतीचे प्लॅन आहेत? त्यातून स्वतःची उन्नती करत समाजासाठी काही विधायक आणि रचनात्मक काम करण्याचा विचार त्यांच्या कधीतरी डोक्यात येत असेल काय? याही प्रश्नांनी आपण सर्वजण त्रस्त आहोत.

४.   शिक्षण घेत असताना आणि ते पूर्ण झाल्यावर स्वतःचा चरितार्थ चालवावा इतके कौशल्य किती विद्यार्थ्यांकडे आहे. ‘मी खरंच कोणत्या कामाचा?’ या प्रश्नाचे सकारात्मक उत्तर किती पदवीधर देऊ शकतील?

५.   तरुणांच्या आणि प्रौढांच्या हातातील आणि गळ्यातील गंडेदोरे पाहिले की त्यांच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे असे वाटत नाही. शिक्षणातून या अंधश्रद्धा आहेत, त्याला सत्याचा आधार नाही हे शिकविले जाते की नाही हा प्रश्न पडतो.
६.  मोबाईल-वेडामुळं तर युवक मोठ्या प्रमाणात निष्क्रिय आणि प्रतिसादहिन बणत आहेत.

या परिस्थितीत अपवादही आहेत परंतु त्यांच्या प्रगतीत शिक्षणाचा किती वाटा आहे, त्यांच्या कुटुंबाचे योगदान, त्यांची महत्वकांक्षा या गोष्टी त्यांना उर्वरित ९५ टक्के तरुणांपेक्षा वेगळं बनवितात. शिक्षण जर पाच टक्के तरुणांच्या या यशाचं श्रेय घेणार असेल तर ९५ टक्के अपयशी, अल्पसंतुष्ट, अंधश्रद्ध आणि असुसंस्कृत समाजाची जबाबदारीही शिक्षणाला घ्यावी लागेल. कारण No society can be better than their education.

आजचा बटबटीत, असभ्य व असुसंस्कृत आणि पूर्णवेळ चंगळवादी आणि करमणूकप्रधान मानसिकता बाळगणारा समाज पाहिला की शिक्षणाकडून या समाजाचे योग्य मार्गदर्शन आणि सुयोग्य पोषण झालेलं नाही असंच म्हणावं लागेल.

याचाच अर्थ असा की विद्यार्थ्यांकडे सर्जनशील आणि विधायक वृत्तीच्या निर्मीती साठी कार्यरत असलेल्या शिक्षणासारख्या  उत्पादक संस्थेकडून  दीर्घकाळ कुचकामी संस्कारच मिळतो आहे हे विदारक वास्तव आपल्या अवतीभवती अनुभवास येत आहे. देशाच्या आणि राज्याच्या शासनाकडून व समाजाकडून यावर बराच पैसा खर्च होत असूनही त्यातून समाधानकारक  निष्पत्ती मात्र मिळत नाही. देशातील कोणतीच शिक्षण संस्था  जागतिक दर्जाच्या क्रमवारीत नाही.
देशात वाढणारी धर्मांधता, प्रादेशिक आणि जाती-धर्माच्या वाढत्या अतिरेकी अस्मिता, वाढता भ्रष्टाचार, बेशिस्त आणि आत्मकेंद्रीतता आणि वाढती बेरोजगारी पाहिली की या शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल होण्याची गरज आहे हे अगदी सामान्य माणसाच्या सुद्धा सहज लक्षात येईल.  हे बदल अगदी देशाच्या शैक्षणिक धोरणापासून ते सक्षम शिक्षकांच्या नियुक्त्या, आवश्यक  पायाभूत आणि भौतिक सुविधा, अभ्यासक्रमातील बदल,  समाजाची मानसिकता  इत्यादी सर्व पातळीवर  होण्याची गरज आहे.

त्यासाठी अभ्यासक्रमाची रचनाच जीवनाभिमुख, सत्याधिष्टित आणि विकासाधिष्ठीत  असणे आवश्यक आहे.  अभ्यासक्रमाचे  कालसुसंगत उपयोगिता मूल्य वाढविण्यासाठी ही पुनर्रचना चार मूलभूत तत्वांवर आधारित असायला हवी.  ती चार तत्वे म्हणजे…
१.  नवनिर्मिती (creativity)
२.  विधायकता / रचनात्मकता (constructivity)
३.  उत्पादकता (productivity)  आणि
४.   रसिकता (aesthetic sense)

या महत्त्वाच्या चार तत्त्वांच्या पार्श्‍वभूमीवर अभ्यासक्रमाची पुनर्रचना करायला हवी. त्यासाठी प्राथमिक व माध्यमिक स्तरांच्या अभ्यासक्रमात पुढील महत्वाच्या व उपयुक्त विषयांचा समावेश असायला हवा.

१.  वास्तव विश्व ज्ञान

मानव हा इतर सर्व प्राण्यांपेक्षा वेगळा आहे कारण त्याला इतर प्राण्यांपेक्षा प्रगल्भ बुद्धिमत्ता लाभलेली आहे  त्यामुळे तो नेहमी त्याच्या गरजा भागविण्याचे सोपे आणि उत्तम मार्ग शोधत असतो. अनुभवजन्य वास्तवाचा कार्यकारण भाव तो शोधत असतो. त्याचे स्वतःच्या प्राथमिक गरजा भागवण्यातील कष्ट आणि वेळ वाचल्यामुळे तो कुतूहलापोटी नजरेच्या आणि अनुभवांच्या पलिकडच्या जगाची आणि विश्वाची कल्पना करतो. या कल्पना म्हणजे त्याचे स्वैर अंदाज, कवी कल्पना, दैववादी ग्रहीतके आणि वैज्ञानिक संशोधन या माध्यमातून तो  सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो.

मानव प्राणी या वाटेवर इतका पुढे गेला आहे की मानवी समाजाने स्वैर अंदाजाने, कवी कल्पनेतून किंवा दैववादी ग्रहितकातून आणि रूढी-परंपरातून शेकडो-हजारो वर्षे उराशी कवटाळलेली ग्रहीतके वैज्ञानिक संशोधनाच्या कसोटीवर साफ निकालात निघत आहेत. काळाच्या ओघात पुढे जात असताना आपण विविध  मानव  समुदायातील  सृष्टीविषयीच्या अशा अनेक कल्पना किती चुकीच्या, अतार्किक आणि मागासलेपणाच्या होत्या हे लक्षात येते. जी व्यक्ती आणि जो समाज स्वतःविषयी आणि विश्वाविषयीची अनुभव आणि संशोधनसिद्ध सत्ये लवकर आणि वेळीच समजून घेतो तो समाज प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर राहतो. तो आपले जीवन त्या अर्थाने सजगपणे जगतो. म्हणून प्रत्येक मुलाला वास्तव विश्वज्ञान मिळावे याची या विषयातून व्यवस्था करायला हवी.

  हा विषय शिकवल्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःविषयी व विश्वासंबंधी किमान पुढील आवश्यक सत्त्ये कळायलाच हवीत.

१.  या विश्वाची निर्मिती प्रक्रिया आणि विश्वाचे सत्य स्वरूप
२.   मानव प्राण्याचे पूर्ण नैसर्गिक स्वरूप, त्याच्या  क्षमता आणि गरजा याचे निर्भेळ आकलन
३.   आपल्या परिसरापासून ते संपूर्ण विश्वातील सजीव आणि निर्जीव सृष्टी

  विविध शैक्षणिक स्तरानुसार  आपल्या गावापासून ते संपूर्ण जगाचे जीवशास्त्र,  भौतिकशास्त्र, खगोल शास्त्र, भूगोल शास्त्र या  माध्यमातून विद्यार्थ्यांना अगदी निसंदिग्ध पणे वास्तव विश्व ज्ञानाची माहिती आणि ज्ञान देणे आवश्यक.

अशा तऱ्हेने जेव्हा खरोखर अस्तित्वात असलेल्या सजीव-निर्जीव सृष्टी विषयीचे संपूर्ण सत्य ज्ञान होईल, त्या बाबतीतील कोणतीही संभ्रमावस्था राहणार नाही तेव्हाच व्यक्ती व समाज या विश्वा विषयीच्या अज्ञान, संभ्रम आणि अंधश्रद्धांपासून मुक्त होईल. त्याचा दृष्टीकोन विशाल होईल.

२.  विज्ञान आणि संशोधन

विज्ञानासाठी विज्ञान शिकविल्यामुळे त्यातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टी आणि संशोधन वृत्ती वाढल्याचे फारच कमी दिसते. यामुळेच सुशिक्षित अंधश्रद्ध लोकांची संख्या  वाढल्याचे दिसते. दैववादी मानसिकतेत वाढ झाल्याची दिसते. पारंपारिक विज्ञानातून बर्‍याच अनावश्यक गोष्टी जसे अनेक अनावश्यक जटील मूलद्रव्यांची यादी,  लॅटिन  भाषेतील बोटॅनिकल  संज्ञा, अव्यवहार्य उदाहरणे व दाखले, जटील सिद्धांत, शोध सूत्रे इत्यादी अनावश्यक आणि कंटाळवाण्या माहितीमुळे विज्ञान विषय  विद्यार्थ्यांना अल्प उपयोगी आणि कठीण वाटतो.
यासाठी वास्तव विश्व ज्ञानातील विज्ञान विषयांबरोबरच वैज्ञानिक दृष्टिकोण निर्माण करत विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती निर्माण करण्याच्या हेतूने ‘विज्ञान आणि संशोधन’ हा पुनर्रचित विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करायला हवा.

या विषयांतर्गत…
१.  विज्ञानाची ओळख : मानवी उत्क्रांतीमध्ये  मानवाच्या सर्वोच्च कामगिरीचे स्वरूप, विज्ञानाची आवश्यकता, निर्मिती क्षमता, उपयुक्तता आणि विज्ञानाचे मुलभूत सिद्धांत शिकवावे लागतील.
२.   विज्ञानाची कार्यपद्धती
३.   वैज्ञानिक दृष्टीकोन
४.   विज्ञानातील श्रेष्ठ संशोधक
५.   मानव जातीला सर्वोच्च उपयुक्त ठरलेले सुमारे १०० ते २०० वैज्ञानिक शोध, त्या संशोधनाची पार्श्वभूमी, त्या त्या शास्त्रज्ञाला त्या त्या शोधासंबंधी पडलेले ‘का’ व ‘कसे’ प्रश्न, शोधाची कार्यपद्धती, या शोधांसंबंधी भविष्यातील संशोधनाच्या शक्यता इत्यादी संबंधी सविस्तर माहिती.
६.   शोध व संशोधन यांचा प्रयोग शाळेतील प्रत्यक्ष अनुभव, आयसीटीच्या माध्यमातून अध्यापन, विज्ञान केंद्र, संशोधन केंद्र, विविध कारखाने यांच्या क्षेत्रभेटी द्वारे प्रत्यक्ष अनुभव,  प्रात्यक्षिके, गटकार्य, गृहपाठ इत्यादींचा समावेश
७.  महत्त्वाच्या वैज्ञानिक संकल्पनांचा परिचय

३.   आपली राज्यघटना

देशाच्या महत्त्वाकांक्षी शैक्षणिक धोरणात  प्रत्येक व्यक्ती ही स्वावलंबी, शिस्तप्रिय, उत्पादक, मानवतावादी, कायदा आणि नितीमत्तेचे जीवापाड पालन करणारी, पर्यावरणाचं महत्त्व समजून घेऊन त्याचं संधारण करणारी असायला हवी. तिचं तिच्या देशावर नितांत प्रेम असायला हवं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिला स्वतःचे घटनात्मक अधिकार व कर्तव्य माहिती असायला हवीत.

या सर्व शैक्षणिक अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अभ्यासक्रमाच्या रचनेमध्ये सर्वात महत्त्वाचा विषय ठरतो तो म्हणजे ‘आपली राज्यघटना’.  ज्या एका ग्रंथाच्या आधारे देशातील सर्व व्यवहार चालतात म्हणजेच    देशाचं शासन आणि प्रशासन, देशाच्या सर्वांगिन विकासाचे धोरण, देशाची प्रगती, देशाचं शिक्षण, देशातील शांतता व सुव्यवस्था इत्यादी, त्या ग्रंथाचं संपूर्ण ज्ञान प्रत्येक नागरिकास असणं  ही नागरिकांची आणि देशाची अत्यंत मूलभूत गरज आहे. हा विषय देशाच्या प्रत्येक नागरिकास दहावीपर्यंत पूर्णतः ज्ञात असला पाहिजे. त्याच्या विचारांचा आणि आचारांचा तो प्रमुख भाग असला तरच येथील प्रत्येक नागरिक खऱ्या अर्थाने भारतीय असेल. त्यांना स्वतःच्या आणि देशाच्या हिताच्या गोष्टी या परस्पर पूरक असायला हव्यात हे कळेल. त्याचं व्यक्तिगत हित हे  देशहिताच्या किंवा समाज हिताच्या विरोधात जाता कामा नये हे कळेल. यासाठी राज्यघटनेचे समग्र ज्ञान  विद्यार्थ्यांना देणे हे अत्यंत गरजेचे असताना आज अखेर  देशाची राज्यघटना पूर्णांशाने शिकविण्याची व्यवस्थाच आपल्या शिक्षणात केलेली नाही.
राज्यघटनेचे ज्ञान ही व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाची आणि पोषणाची गरज असताना दीर्घ काळ ‘नागरिक शास्त्र’ नावाचा एक अगदी नगण्य विषय अभ्यासक्रमात घातल्याने त्यातून संपूर्ण देशातील भारतीय नागरिकत्वाचे कुपोषण झाल्याचेच दिसते. याची काही ठळक निरीक्षणे आणि अनुभव…
•  देशातील कायदा व सुव्यवस्थेची दुरावस्था.
•  भारत हा वाहतुकीच्या नियमांच्या बाबतीत  अत्यंत बेशिस्त असा देश आहे.
•  आपल्या देशातील सण-उत्सवांना कायद्याचा कोणताच धाक नाही.
•  देशातील न्याय  व्यवस्था  जास्तीत जास्त विलंब करून न्यायदान करण्यावर विश्वास ठेवते.
•   देशातील धार्मिक स्थळांकडे असलेल्या अमाप संपत्तीचा देशाच्या विकासात आणि आपत्तीमध्ये कोणताच उपयोग नाही.
•  येथील निवडणूकातील गैरप्रकार, राज्यकर्ते आणि नोकरशाहीचा भ्रष्टाचार, राष्ट्रीय निधीच्या वापरातील  धोरणहीनता याला काहिच धरबंध नाही.
ही केवळ काही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत.

या सर्व दुरवस्थेचे मूलभूत कारण म्हणजे राज्यघटनेचं सार्वत्रिक अज्ञान. स्वतःच्या हक्काचं अवास्तव भान आणि कर्तव्यांकडे पूर्ण दुर्लक्ष करण्याची भावना हे होय.

ही सर्व वस्तुस्थिती लक्षात घेता अभ्यासक्रमामध्ये राज्यघटनेचे देश आणि व्यक्तीच्या विकासातील सर्वोच्च महत्त्व लक्षात घेऊन ती तिसरी ते सातवी पर्यंत बाळबोध स्वरूपात शिकवावी व आठवी ते दहावी या तीन वर्षात तिचे तीन भाग करून प्रत्येकी शंभर मार्कांसाठी ती  सक्षम शिक्षकांकडून उत्तम पद्धतीने शिकवण्याची व्यवस्था करावी.

४.    मोजमापशास्त्र

प्रत्येक व्यक्तीच्या व्यावहारिक आणि सामाजिक जीवनामध्ये मोजमापाची नितांत आवश्यकता असते. आपल्या शैक्षणिक प्राप्ती मध्ये मोजमापाच्या ज्ञानाचे स्थान फार वरच्या दर्जाचे आहे. अगदी बालपणापासून ‘राजूला दोन चॉकलेट आणि मला फक्त एकच दिले’ इथपासून ते माझा पगार, माझे उत्पन्न, त्याचा खर्च, आवश्यक कर्ज, करावयाची गुंतवणूक, कर्जाची परतफेड इत्यादी सर्व ठिकाणी मोजमापाच्या ज्ञानाशिवाय आपण नुकसानीत येऊ आणि आडानी ठरू. म्हणून प्रत्येकाची  अत्यंत मूलभूत गरज आहे ती मोजमाप शास्त्राची. ते सक्षमपणे अगदी सोप्या व रोचक पद्धतीने शिकले व शिकविले गेले पाहिजे. मोजमापशास्त्र दहावीपर्यंत असं शिकवलं जावं की विद्यार्थ्याला त्याच्या दैनंदिन गरजा,  बाजार हाट इथपासून ते करोडो रुपयांचे व्यवहार आणि व्यवसाय करण्यासाठी ते उपयुक्त ठरावे. पुढे अकरावीपासून त्या त्या विद्याशाखांच्या आवश्यकतेनुसार मोजमापशास्त्राचे उच्चस्तरीय ज्ञान देता येईल.

मोजमाप शास्त्राच्या आवश्यकते बद्दल विचार करताना आपणास काही निरीक्षणे आणि अनुभव विचारात घेणे उपयुक्त ठरेल जसे..
१.   उद्योग व्यवसायात अब्जावधींचा व्यवहार व व्यवसाय यशस्वीपणे सांभाळणारे अनेक उद्योजक, मारवाडी व सिंधी लोक हे पदवीधर सुद्धा नाहीत.
२.   अशा व्यवहार व व्यवसायामध्ये बीजगणिताचा वापर कोठेही केला जात नाही.  त्याची बिलकुल आवश्यकताच भासत नाही.
३.   भूमिती म्हणजे जमिनीचे मोजमाप ही कल्पना आणि शीर्षकच सदोष आहे. आपण विविध आकारांचे मोजमाप करत असतो केवळ जमिनीचे नाही, आणि गंमत म्हणजे या विषयांतर्गत आपणास वर्गाबाहेर नेवून जमिनीचे मोजमाप कधीही शिकवलेले नाही.
४.   भूमितीतील प्रमेय, साध्य, सिद्धता इत्यादी आणि बीजगणितातील  (अ + ब) चा वर्ग, कॉस, साइन, थिटा इत्यादी सूत्रांचा किंवा माहितीचा उपयोग पुढे व्यावहारिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये किती जणांनी केला ही संशोधनाची बाब आहे.
याचा उपयोग इंजीनियरिंग, विज्ञान व तंत्रज्ञानासाठी असेल तर त्या त्या विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांना ११वी पासून गरजेचे ज्ञान म्हणून ते देता येईल.

म्हणून गणित आणि भूमिती अशा वेगळ्या नावाचे आणि स्वरूपाचे दोन विषय असण्यापेक्षा मोजमापशास्त्र हा एकच मुख्य विषय आणि त्याअंतर्गत गरजेनुसार भूमितीतील व्यावहारिक भाषेतील विविध आकार आणि कोनांची मोजमापे, संख्याशास्त्र इत्यादी घटक आणि उपघटक घेता येतील.

५.  जीवन कौशल्ये

आपल्या शाळांमधून इतर अनेक अनावश्यक गोष्टी शिकविल्या जात असताना विद्यार्थ्यांना जीवन कौशल्याचं पुरेसं ज्ञान आणि अनुभव मात्र दिला जात नाही. म्हणून तर  महाविद्यालयातून खास जीवन कौशल्ये प्राप्त न करता  पदवीधरांच्या अनेक पिढ्या बाहेर पडत आहेत. या बाबतीत आपणा सर्वांचीच निरीक्षणे आणि अनुभव  असे आहेत…
१.  मुलांच्या मध्ये स्वावलंबनासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्यांचा अभाव दिसतो.
२.   तरुणांचा आणि त्यांच्या प्रभावाने बालकांचा असभ्य भाषा वापर
३.   स्वतःमध्ये कोणतीही क्षमता ( टॅलेंट) नाही हा गैरसमज आणि न्यूनगंड जोपासणे. त्यातून कला क्रीडा क्षेत्रामध्ये बघ्याची आणि केवळ टीकाकारायची भूमिका करणे .

एकूणच शिक्षणातून उत्तम संवाद कौशल्ये,  वरिष्ठांचा आदर, स्वत:च्या सर्व गरजा पूर्ण करणारी किमान आवश्यक कौशल्ये, कला क्रीडेची कौशल्ये, व्यावसायिक कौशल्ये इत्यादी सर्व कौशल्ये शिकविण्याची सक्षम व्यवस्था किंवा विषय प्रचलित अभ्यासक्रमात नाहीत. परिणामी आपणास वरील प्रमाणे परावलंबी, पूर्ण न्युनगंडाने पछाडलेल्या व असुसंस्कृत तरुणांच्याच  फौजा शिक्षणातून बाहेर पडत  असताना दिसतात.. त्यासाठी जीवन कौशल्यांची माहिती आणि प्रात्यक्षिक अनुभव देण्याची सक्षम व्यवस्था अभ्यासक्रमामध्ये असणे आवश्यक.

   थोडक्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यक्तिगत जीवनाशी संबंधित, कौटुंबिक जीवनाशी संबंधित, सामाजिक जीवनाशी संबंधित आणि नागरी जीवनाशी संबंधित  सर्व आवश्यक कौशल्ये प्राप्त करून देण्यासाठी ‘जीवन कौशल्ये’ हा विषय अभ्यासक्रमात असणे आवश्यक आहे.

६.    भाषा

वर सुचविलेल्या उपयुक्त विषयांची आवश्यक माहिती, ज्ञान आणि कौशल्ये प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्याला उत्तम भाषा-ज्ञान असणे आवश्यक आहे. यासाठी मातृभाषेतून शिक्षण हे सर्वात महत्त्वाचे. मातृभाषेइतके उत्तम आकलन इतर कोणत्याही भाषेतून होणे शक्य नाही. म्हणून मातृभाषेचे भाषा, संवाद आणि वाडःमय यांच्या योग्य मिश्रणाचे उत्तम अध्यापन होणे आवश्यक आहे. त्याच्या जोडीला राष्ट्रभाषा हिंदी आणि जागतिक ज्ञान भाषा व लिंक लॅंग्वेज म्हणून इंग्रजी अगदी परिणामकारक पद्धतीने शिकविणे आवश्यक आहे.
या विषयांना दिलेले प्रत्येकी १०० गुण मात्र अवाजवी आहेत. मातृभाषा व हिंदी ला प्रत्येकी ६० व इंग्रजीला ८० गुण देऊन यातील उरलेले शंभर गुण ‘आपली राज्यघटना’ आणि ‘जीवन कौशल्ये’ या महत्वाच्या नवीन विषयांना देता येतील.

७.   इतिहास

इतिहास हा विषय किती ज्ञान म्हणून आणि किती अस्मिता म्हणून शिकवावा, किती वास्तव आणि किती विपर्यस्त शिकवावा याचा गंभीर विचार होणे आवश्यक आहे. इतिहासातुन काय शिकावे याची व्यवहार्य व्याख्या  करायला हवी व त्याबरहुकूम आशय आणि घटना निवडायला हव्यात.
इतिहास हा कोणताही अभिनिवेश न बाळगता सत्य रूपात शिकल्यास आपण कशाचा किती अभिमान बाळगावा हे ज्याचं त्याला कळेल.  इतिहास हा भक्कम पुराव्यावर  आणि संशोधनावर आधारित असावा. तो ललित स्वरूपातील नसावा. म्हणजे त्यातून संकुचित अस्मिता निर्माण होणार नाहीत.

 या सर्व विषयांची उपयुक्तता आणि नेमकेपणा समजून घेतल्यास त्यावर केवळ राज्य किंवा देश पातळीवरच नव्हे तर जागतिक स्तरावर सुद्धा त्याची आवश्यकता निर्विवादपणे सिद्ध होईल. या अभ्यासक्रमातूनच सत्यावर विश्वास ठेवणारा, मानवतावादी विचार आणि वर्तन करणारा, वैज्ञानिक दृष्टीकोन असलेला, कायदा आणि नितीमत्तेचं पालन करणारा, आणि देशावर प्रेम असलेला  असा नागरिक घडेल. अशा या सुज्ञ नागरिकांमध्ये  सर्जनशीलता, विधायकता, उत्पादकता आणि रसिकता या गुणांचा आणि कौशल्यांचा विकास आणि अविष्कार पाहायला मिळेल. अशी ही प्रत्येक व्यक्ती जीवनाविषयी,  विश्वाविषयी आणि वेगाने बदलणाऱ्या काळासंबंधी सजग असेल. अशी प्रत्येक व्यक्ती आत्मविश्वास आणि आत्मसन्मानाने आपले उपयुक्तता मूल्य जास्तीत जास्त सिद्ध करेल. या अपेक्षित क्रांतिकारी बदलासाठी आजची शिक्षणाची वज्र चौकट आता मोडायला हवी.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

2 comments

वसुंधरा जाधव September 17, 2021 at 6:41 PM

अगदी मार्मिक विवेचन या लेखामध्ये केलेले आहे. राष्ट्राचा विकास हा शिक्षण प्रणालीवरच अवलंबून असतो त्यामुळे शिक्षण व्यवस्था मजबूत असणं खूपच गरजेचे आहे. सरांनी मांडलेले निरीक्षण अगदी योग्य आहे. आपल्या समोर एक तरूण पिढी आहे आणि त्या भवितव्य आपल्याला माहिती ही आहे. पण शिक्षण व्यवस्थाच अशी तयार केली गेल्यामुळे आपण काहिही करू शकत नाही. आपण शिक्षक म्हणून हतबल झालो आहोत. पण आपल्याला आता संधी मिळते आहे की आपण आपले विचार मांडून शिक्षण व्यवस्था पोषक बनवू शकतो. सरांनी काही विषय चांगले मांडले आहेत. वर्षानुवर्ष जे विषय शिकवले जात आहेत त्यात बदल होणं आता आवश्यक आहे हे चांगल सुचीत केल आहे. खूप चांगल्याप्रकारे विवेचन केल आहे. असे विचार शिक्षणतज्ज्ञानी पुढे आणणं गरजेच आहे. खूप छान विचार.

Reply
Dr.Barad M.H. September 15, 2021 at 6:12 PM

The article in its first phase opens the eyes of education policy and the entire education system to think on the results of quality education.And in second the second phase the recommendation regarding expected changes in curriculum and syllabus are very important to provide 100%pure products to mould an ideal society and strong nation.

Reply

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading