February 9, 2023
prayogbhumi-kolkewadi-social-institude-in-chiplun-taluka
Home » कोळकेवाडीतील प्रयोगशील उपक्रमांची भूमी
फोटो फिचर शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कोळकेवाडीतील प्रयोगशील उपक्रमांची भूमी

काय झाडी, काय डोंगर दिसायला खूप चांगले वाटतात. मन प्रसन्न होते. पण या डोगरात, या झाडीत राहाणाऱ्या माणसांचे कष्ट अन् दुःख कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का ? येथील मुले शाळेत कशी जात असतील ? या वस्त्यांना वीज, पाणी मिळते का ? या समस्यांचा विचार कधी केला आहे का ? यावरच कार्य करणाऱ्या एका संस्थेविषयी…

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

चिपळूण तालुक्‍यामधील (जि. रत्नागिरी) विविध गावांमध्ये श्रमिक सहयोग ही संस्था निसर्ग शेती, वनसंवर्धन, सूक्ष्म जलविद्युत केंद्र, वंचित समाजासाठी वाडी-वस्त्यांवर अनौपचारिक शाळा असे विविध उपक्रम राबवीत आहे. सन २००४ मध्ये संस्थेने कोळकेवाडी (ता. चिपळूण) येथे ‘प्रयोगभूमी’ हे प्रयोगशील शिक्षण केंद्र सुरू केले. विविध उपक्रमांतून ही संस्था शाश्वत विकासाचे धडे परिसरातील लोकांना देत आहे.

कोकणच्या समस्या जाणून घेण्याच्या उद्देशाने रत्नागिरी जिल्ह्यातील काही ध्येयवादी युवकांनी १९८४ मध्ये चिपळूण तालुक्‍यात ‘श्रमिक सहयोग’ या संस्थेची स्थापना केली.  कोकणातील समस्या नीट समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी अभ्यासगट, चिंतन शिबिरे, प्रशिक्षणे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आदी प्रबोधनात्मक उपक्रम संस्थेने सुरू केले. आदिवासी समाजामध्ये एका पिढीने दुसऱ्या पिढीस शिक्षित करण्याची पारंपारीक पद्धती आहे, त्यांची स्वतःची अशी जिवन पद्धती, बोलीभाषा आहे त्यामुळे या मुलांना औपचारिक शिक्षण घेताना अनेक अडचणी उभ्या राहतात. या मुलांना अभ्यासक्रम बोजड वाटतो. हे लक्षात घेऊन त्यांना रुचेल, पटेल, आपले वाटेल अशा वातावरणात शिकते करण्याची गरज असते. यासाठी श्रमिक सहयोगने मुलांच्या उपजत क्षमता, कौशल्ये शोधून त्यावर आधारित शिक्षण घडविण्याचा प्रयत्न सुरू केला. ग्रामीण स्त्रिया-युवकांचे प्रबोधन व संघटन, कोकणातील पर्यावरणविषयक तसेच विकासपद्धती विषयक मुद्द्यांची हाताळणी, समाजातील कष्टकरी, वंचित घटकांच्या जीवनधारांच्या अधिकाराच्या मुद्द्यांची हाताळणी, वंचित घटकातील मुलांच्या शिक्षणपद्धतीची मांडणी यावर संस्थेचे कार्य सुरू झाले. चिपळूण, गुहागर, संगमेश्‍वर या तालुक्‍यांतील सुमारे १५० गावांत संस्थेचे कार्य उभे राहिले. संस्थेने पहिली १२ वर्षे धनगर व कातकरी- आदिवासी समाजाच्या दुर्गम भागातील २६ वाड्यांवर अनौपचारिक शाळा चालविल्या, त्यातून सुमारे ४५० विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले.

प्रयोगशील निवासी शाळा

वंचित मुलांच्या शिक्षणासाठी २००४ मध्ये संस्थेने कोळकेवाडी येथे १६ एकर जमीन खरेदी करून प्रयोगशील शिक्षण केंद्र सुरू केले. या केंद्रात सध्या २५ मुले शिक्षण घेत आहेत. या मुलांना औपचारिक अभ्यास, व्यवसाय शिक्षण, कला-कौशल्य असे शिक्षण देण्यात येते.  प्रयोगभूमीतील मुलांना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय मुक्त शिक्षा संस्थानमार्फत शालेय शिक्षण व्यवस्थेत सामील करून घेण्यात येते. ‘प्रयोगभूमी’चे संचालन समाजातील शिक्षणप्रेमी व्यक्ती, संस्था, गट यांच्या साहाय्याने चालते.  या सर्वांच्या सहाय्यावरच प्रयोगभूमीचा डोलारा उभा आहे. त्यासाठी ‘पालकत्व योजना’ चालविली जाते. 

संडे स्कूल’मधून मार्गदर्शन

डोंगरी भागातील कातकरी समाजात दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण करू न शकणाऱ्या तरुणांची संख्या अधिक आहे. शिक्षणाची इच्छा असूनही त्यांना शिकता येत नाही. अशा तरुणांसाठी प्रयोगभूमीमध्ये ‘संडे स्कूल’ ही संकल्पना राबविली जाते. दर रविवारी तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांचा अभ्यास घेण्यात येतो.

वाडी अध्ययन केंद्र

प्रयोगभूमी भोवतीच्या काही आदिवासी समाजाच्या वाड्यांमध्ये तेथील शाळातून जाणाऱ्या मुलांना अभ्यासात व एकूणच भविष्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ही वाडी अध्ययन केंद्र चालविली जातात. त्यात १८० मुले सहभागी आहेत.

शेकरू महोत्सवाचे आयोजन

कोयनानगर प्रकल्पाच्या चौथ्या टप्पा परिसरातील वनांमध्ये प्रयोग भूमीत येणाऱ्या पर्यावरण अभ्यासकांना शेकरू फिरताना आढळले. या निसर्गरम्य परिसरात वन खात्याने  रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला शेकरूचा अधिवास असल्याची शासकीय नोंद केल्यानंतर वनसंवर्धनासाठी प्रयोगभूमीने पाऊल उचलले. संपूर्ण परिसरात वृक्षतोडीस बंदीची मागणी केली. याबाबत जागृती व्हावी या उद्देशाने संस्थेने आम्ही चिपळूणकर, वन खाते, महाविद्यालये यांच्या सहकार्याने प्रयोगभूमीमध्ये शेकरू महोत्सव आयोजित केला. अनेक युवा अभ्यासक येथे येऊन या  परिसरातील जैवविविधतेची माहिती संकलित करीत आहेत.  निसर्गप्रेमींनी वन परिसरात फिरून, जंगलातील विविध वनस्पती आणि त्यांचे औषधी उपयोग, प्राण्यांच्या पायाचे ठसे, पक्ष्यांचे आवाज, फुलपाखरांचा अधिवास याबाबत माहिती संकलित करतात.

चला वीज बनवूया

हा पावसाळी उर्जा महोत्सवी दरवर्षी प्रयोगभूमीत आयोजित केला जातो. यंदा पार पडलेल्या चला वीज बनवूया महोत्सवामध्ये पारंपारीक मासेमारीचे प्रात्यक्षिक आयोजित केले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रम सहभाग घेतलेल्या शहरी व्यक्तींनाप्रयोगभूमीतील विद्यार्थ्यांनी या मासेमारीच्या तंत्राबाबत मार्गदर्शन केले. त्याच सोबत विजनिर्मितीच्या प्रात्यक्षिकापासून, चिखलणी विरहित भातशेती, एसआरटी, एसआरआय पद्धतीने भात लावणी, मासेमारी याबाबत या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभागी व्यक्तींना मार्गदर्शन केले. नदीतील वाहत्या पाण्यात मच्छरदाणीच्या साहाय्याने मासेमारी करणे हे सामूहिक कौशल्य आहे. पाण्यात डुंबत मासेमारी करण्याचा अनुभव या कार्यशाळेत सहभागी व्यक्तींनी घेतला.  

सूक्ष्म जलविद्युत प्रकल्प

कोयना वीज प्रकल्पाच्या परिसरात असणाऱ्या अनेक वाड्या-वस्त्या, तसेच प्रयोगभूमीतही वीज नव्हती. अशा या परिस्थितीवर मात करण्याच्या उद्देशाने श्रमिक सहयोगचा अभ्यास सुरू झाला. नागालॅंडमध्येही डोंगरी भागात ही समस्या आहे. तेथे सरकारने झरे-ओढे, धबधब्याच्या वाहत्या पाण्यावर छोटी जलविद्युत केंद्रे उभारली आहेत. हे पाहून तसाच प्रयोग प्रयोगभूमीत करण्यात आला. प्रयोगभूमीच्या परिसरात  वाहणाऱ्या झऱ्यावर २००७ पासून प्रत्येक पावसाळ्यात वीजनिर्मिती करण्यात येत आहे. नागालॅंड सरकारच्या सहकार्याने वीजनिर्मितीचे यंत्र येथे बसविले आहे. वाहत्या झऱ्याचे पाणी १५ मीटर उंचीवर अडवून तेथून पाइपने हे पाणी ३ किलोव्हॉट जल विद्युत निर्मिती यंत्रापर्यंत आणले आहे. या यंत्रात ठराविक दाबाने पाणी सोडून वीजनिर्मिती करण्यात येते. चार-पाच महिने दररोज तीन किलोवाॅट विजेची निर्मिती या यंत्रातून होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही या कार्यक्रमात या वीज निर्मितीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.  पर्यटन, प्रबोधन, मनोरंजन, शिक्षण, प्रत्यक्ष अनुभव असे उद्देश ठेवून आयोजित या कार्यशाळेमध्ये राज्यभरातून अनेकजण सहभाग घेतात. सहभागी व्यक्तींना या यंत्राची सर्व तांत्रिक माहिती देऊन स्वतः हे यंत्र जोडणी करून वीज तयार करण्याचे प्रात्यक्षिक करण्यास सांगण्यात येते.

भाताच्या पारंपरिक जातींचे संवर्धन

चिपळूण तालुक्‍याच्या डोंगरी भागात खामडी ही पारंपरिक भाताची जात आढळते. सध्याच्या काळात ही जात दुर्मिळ होऊ लागली आहे. प्रयोगभूमीमध्ये  अर्धा एकरावर खामडी (लाल तांदूळ) या भाताच्या पारंपरिक जातीचे संवर्धन करण्यात येत आहे. एसआरआय पद्धतीने भात रोपांची लागवड करण्यात आली असून, सेंद्रिय पद्धतीने संगोपन केले आहे. संस्थेतर्फे शेतकऱ्यांसाठी भात लागवडीबाबत कार्यशाळा घेण्यात येतात. एसआरआय पद्धतीने भात लागवडीतून येणाऱ्या उत्पन्नांची नोंद ठेवण्यात येत असून पारंपारिक पद्धतीने लागवड व नव्या तंत्रांने लागवड यातून मिळणाऱ्या उत्पन्नातील फरक निश्चित प्रबोधन करणारा असा आहे.

स्वयंसहायता गटातून महिला विकास

चिपळूण आणि गुहागर तालुक्‍यातील ६५ गावांमध्ये संस्थेने २५० स्वयंसहायता गट स्थापन केले आहेत. यातून सुमारे ३७०० स्त्रिया संघटित झाल्या असून त्यांच्या आर्थिक विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यासाठी महिला पतसंस्था, बचत गट महासंघाची स्थापना करण्यात आली आहे. श्रमिक सहयोग परिसरातील सहयोगी गटांना सातत्याने प्रशिक्षण, कौशल्य विकास इत्यादी स्वरूपात मदत करते. कोकण संघर्ष समिती, सह्याद्री वाचवा अभियान, कोंकण नारी मंच, आम्ही चिपळूणकर, आदिम कातकरी आदिवासी संघटना इत्यादी संस्थांना सहकार्य केले जाते.

संस्थेस मिळालेले पुरस्कार

 संस्थेला व कार्यकर्त्यांना वीजनिर्मिती व पर्यावरण संवर्धनासाठी महाराष्ट्र शासन व पर्यावरण शिक्षण संस्थेचा पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) यांचा समाजकार्य गौरव पुरस्कार, राष्ट्र सेवा दलाचा साने गुरुजी समाजशिक्षक पुरस्कार, मेरी पाटिल स्मृति पुरस्कार,  सत्यशोधक पुरस्कार, शिक्षण महर्षी स्व. गोविंदराव निकम सह्याद्री सन्मान, लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिशन कडून कोकण गौरव पुरस्कार, डॉ. रा. गो. प्रभुणे विद्यारत्न पुरस्कार- कराड, सामाजिक कार्यासाठीचा अस्मि प्रतिष्ठानचा पुरस्कार इ. अनेक नामवंत पुरस्कार  मिळालेले आहेत.

संस्थेसंदर्भात अधिक माहितीसाठी संपर्क – राजन इंदुलकर 9423047620

Related posts

अमिया महालिंगचा सन्मान

बहुगुणी, औषधी आवळा

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Leave a Comment