पाहा कैसे कैसे । देवे उद्धरिले अनायासे ॥१॥ ऐका नवल्याची ठेव । नेणता भक्तिभाव ॥ध्रु.॥ कैलासासी नेला । भिल्ल पानेडी बैसला ॥२॥ ऐका नवल्याची ठेव । नेणता भक्तिभाव ॥ध्रु.॥ पांखांच्या फडत्कारी । उद्धरुनी नेली घारी ॥३॥ ऐका नवल्याची ठेव । नेणता भक्तिभाव ॥ध्रु.॥ चोरे पिंडी दिला पाव । त्या पूजने धाये देव ॥४॥ ऐका नवल्याची ठेव । नेणता भक्तिभाव ॥ध्रु.॥ तुका म्हणे भोळा। स्वामी माझा हो कोवळा ॥५॥ ऐका नवल्याची ठेव । नेणता भक्तिभाव ॥ध्रु.॥ निरूपण : डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४). शब्दार्थ: अनायासे- कष्ट न पडता. नवल्याची-नवलाईची. पानेडी-जलाशय,तलाव. पाखांच्या-पंखांच्या. पाव-पाय. धाये-संतुष्ट झाला.
अर्थ: या देवाने फारसे कष्ट न देता पहा जीवांचा कसकसा उद्धार केला तो.॥१॥
जीव भक्तिभाव जाणीत नसले तरी त्याने त्यांचा उद्धार केला ही नवलाची गोष्ट ऐका॥ध्रु.॥
कुणी एक भिल्ल झाडाच्या फांदीवर तलावात बसून चुकून बेलाची पाने खाली शिवाच्या पिंडीवर टाकीत होता, पण शिवशंकराने तीच पूजा मानून त्याला कैलासास नेले.॥२॥
पंखांच्या फडत्कारामुळे घारीचाही उद्धार झाला.॥३॥
चोराने चुकून पिंडीवर पाय दिला पण या देवाने यामुळे आपली पूजा घडली असे मानले तो संतुष्ट झाला.॥४॥
तुकोबा म्हणतात, असा हा माझा स्वामी फार मोठा असून अतिशय कोवळ्या अंतःकरणाचा आहे.॥५॥
विवरणः ईश्वर, भक्तीस कसा भुलून जातो व आपल्या भक्तास कोणत्याही प्रकारचे कष्ट न देता तो, त्याचा उद्धार कसा करतो यासंबंधी तुकोबांनी या अभंगात थोडी वेगळी अशी उदाहरणे दिलेली आहेत.
भोळा । स्वामी माझा हो कोवळा॥
या ओळीमधील भोळेपणा शिवशंकराचा अभिप्रेत असावा, असे या अभंगातील उदाहरणांवरून वाटते. भागवत संप्रदायातील हरिहर यांचे ऐक्य समजावून घेतल्यास बुवांनी शिवाच्या भोळेपणाची उदाहरणे येथे दिली. त्यांचे रहस्य समजून येण्यासारखे आहे. बेलाच्या वृक्षावर बसून मृगांची शिकार करणाऱ्या एका भिल्लाकडून शिवपूजन कसे घडले ? याची एक शिवरात्रीसंबंधीची मनोहर कथा शिवपुराणात आलेली आहे.
चोरीमारी व मृगया करणारा एक क्रूर स्वभावाचा भिल्ल गुरुद्रुह नावाचा होता. एके दिवशी भुकेने पीडित होऊन जलाशयाच्या आसपासच्या एका बेलाच्या झाडावर तो मृगयेची वाट पाहात रात्रभर बसून राहिला. पाणी पिण्यासाठी येणाऱ्या मृगीवर धनुष्यबाण रोखण्याच्या गडबडीत, धक्क्यामुळे काही बिल्वपत्रे खाली असणाऱ्या शिवलिंगावर पडली. या शिवपूजेने व्याधाचे पातक संपत आले. रात्रभर याच मार्गाने त्याच्याकडून शिवपूजन घडले. शिवशंकर त्याला प्रसन्न झाले व त्यांनी त्याला कैलासपदाची प्राप्ती करून दिली. एका घारीने आभाळात उडताना अजाणपणे भर दोन प्रहरच्या उन्हात खाली जमिनीवर असलेल्या शिवलिंगावर छाया धारण केली त्यामुळे तिचाही उद्धार झाल्याची कथा सांगितली जाते.
साैजन्य – http://tukaram.com/marathi/gatha/mahadev/sadashiv.html