March 23, 2023
Rajendra Ghorpade article on Dneshwari Bhajan
Home » देवाच्या भजनास तोच योग्य
विश्वाचे आर्त

देवाच्या भजनास तोच योग्य

पैशाच्या अहंकाराने केली जाणारी भक्ती ही श्रद्धा नसून अंधश्रद्धा आहे. यासाठी देवाच्या भजनास कोणता भक्त पात्र आहे, याचा विचार प्रथम करायला हवा व तसा भक्त व्हायला शिकले पाहिजे. तशी भक्ती करायला हवी. तीच खरी भक्ती आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

म्हणोनि माझिया भजना । उचितु तोची अर्जुना ।
गगन जैसें अलिंगना । गगनाचिया ।। 564 ।। अध्याय 15 वा

ओवीचा अर्थ – म्हणून अर्जुना, माझ्या भजनाला तोच योग्य आहे. ( तें कसें तर ) आकाश जसें आकाशाच्या आलिंगनास योग्य आहे.

सद्‌गुरूंचे, देवाचे नामस्मरण म्हणजे भजन. भक्‍तीची गोडी भजनाने लागते. सध्याच्या नव्या पिढीत भजनाची आवड निर्माण होणे, याची गोडी लागणे, या गोष्टी अशक्‍यच आहेत. नव्या पिढीला पैशाची गुर्मी आहे. सर्वच गोष्टी ते पैशाने मोजतात. भक्ती, अध्यात्म या गोष्टीही ते पैशाने विकत घेण्याचा प्रयत्न करतात; पण या गोष्टी पैशाने विकल्या जात नाहीत याची कल्पना त्यांना नाही, याचेच मोठे दुःख वाटते. या गोष्टीचा अभ्यास त्यांनी केलेला नाही.

भगवंतांना फक्त मनाने विकत घेता येते. फक्त फूल, फळ तेही शुद्ध भावनेने दिलेले एवढेच ते स्वीकारतात. महालक्ष्मी या नावातच लक्ष्मी आहे, पण या मंदिरातही दानपेटी असते. त्यात ते दान टाकतात. काही मंदिरात, धर्मात तर दान टाकण्याची स्पर्धा असते. सर्वाधिक दान देणाऱ्यांचा सत्कारही होतो. सर्वाधिक मान पैशाने मोजला जातो. याचे लिलावही चालतात. हे अध्यात्म नाही. ही भक्ती नाही. कारण देवाला याची काहीच गरज नाही. भक्तीत याची आवश्‍यकता नाही.

निरपेक्ष बुद्धीने दिलेले दानच भगवंत स्वीकारतात. पैशाच्या अहंकाराने केली जाणारी भक्ती ही श्रद्धा नसून अंधश्रद्धा आहे. यासाठी देवाच्या भजनास कोणता भक्त पात्र आहे, याचा विचार प्रथम करायला हवा व तसा भक्त व्हायला शिकले पाहिजे. तशी भक्ती करायला हवी. तीच खरी भक्ती आहे. तीच खरी श्रद्धा आहे. देवाला काय आवडते हे ओळखायला हवे. देव देण्यासाठी बसला आहे. आत्मज्ञानाच्या प्रसादाचे वाटप त्यांच्याकडून सुरू आहे. पण हे घेण्यासाठी भक्ताला सुद्धा त्या प्रकारची भक्ती करावी लागते.

म्हणजे काय तर आत्मज्ञानासाठी आवश्‍यक असणारी साधना त्याने करायला हवी. त्याला या व्यतिरिक्त काही नको आहे. आकाश जसे आकाशात सामावले आहे. तसा शिष्य सुद्धा गुरूमध्ये सामावला पाहीजे. शिष्याने सुद्धा गुरूच्या पात्रतेचे व्हायला हवे. आत्मज्ञानी व्हायला हवे. ही त्यांची अपेक्षा आहे. देवाच्या भजनास तोच योग्य आहे. त्यालाच ते आपलेसे करून घेतात आणि आपणासारखे बनवतात.

Related posts

तवं नवल म्हणौनि बिहालें । चित्त माझे ।।

साधनेसाठी असे हवे आसन…

विश्वरुपाचे मर्म

Leave a Comment