साईप्रसाद देसाई एक युवा अभिनेता. कोल्हापूर शहरात लहानाचा मोठा झाला. पण आवड म्हणून त्याने अभिनयाचे क्षेत्र निवडले. त्याने आत्तापर्यंत अनेक चित्रपट आणि मालिकात काम केले आहे. पण तो या क्षेत्राकडे कसा वळला. एकंदरीत त्याचा हा अभिनयाचा प्रवास अगदी त्याचाच शब्दात…
कोल्हापुरातील भक्ती सेवा विद्यापीठ हायस्कुलमध्ये माझे शिक्षण झाले. तेव्हापासूनच मला चित्रपट पाहण्याची आवड होती. दर रविवारी दूरदर्शनवर तेव्हा चित्रपट दाखवले जायचे. चित्रपट पाहण्यासाठी सर्व अभ्यास पूर्ण करून टीव्ही चित्रपट पाहण्यासाठी बसायचो. तेव्हा मला मराठी चित्रपट मालिकांबरोबर हिंदी चित्रपट पाहण्यात खूप रस वाटत होता.
नववी, दहावीला मराठी आणि हिंदी दोन्ही विषयात मला खूप आवडायचे. तसेच त्यात चांगले गुण सुद्धा मिळायचे. आम्हाला स्वामीसर मराठी शिकवायचे. तर बी. डी. कुंभारसर आम्हाला हिंदी विषय शिकवत होते. या दोन्हीसरांच्या उत्कृष्ट शिकवण्याच्या पद्धतीने तसेच मार्गदर्शनाने माझे आयुष्य उत्साही बनले. हायस्कुल जीवनात या दोन्ही सरांच्या तासाला आम्ही कधीच दांडी मारली नाही. कारण त्याचे शिकवणे उत्साही आणि चांगले होते. कितीही अवघड वाटणारी गोष्ट ते अगदी सहज आणि सोप्या भाषेत समजेल अशा पद्धतीने शिकवायचे.
चित्रकलेच्या सोनार सरांकडून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. आयुष्य आनंदाने कसे जगावे याबद्धल चित्रकलेच्या सोनारसरांचे मार्गदर्शन हे आम्हाला आयुष्यभर न विसरण्यासारखे आहे.
मेकॅनिकल अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना महाविद्यालयामधील मित्र आणि मैत्रिणी मला सांगायचे की साईप्रसाद तू चालताना सगळेजण तुझ्याकडे बघत असतात हे तुला माहिती आहे का? सुरवातीला मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले, पण दुसऱ्या वर्षाला गेल्यावर मी जरा या गोष्टीवर अभ्यास केला की मी दिसायला एवढा काही खास नाही, तरी पण सगळे जण माझ्याकडे असे का बघतात ? यावर मला आमच्या महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील एक शिक्षक म्हणाले की साईप्रसाद तुम्ही नीटनेटके राहता त्यात काही प्रश्न नाही त्याच बरोबर तुम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक खास शैलीने वागता हे तुम्हाला नाही दिसणार पण तुम्हाला जे रोज बघतात त्यांना नक्की जाणवते. त्यामुळे तुम्ही महाविद्यालयामध्ये खास वाटता. असे मला ज्यावेळी समजले त्यानंतर मी थोडा थोडा कलाक्षेत्राकडे वळलो. त्यावर अधिक लक्ष देवू लागलो.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी एकदा चित्रपटाचे चित्रिकरण कसे चालते हे पाहण्यासाठी सहजच गेलो. तेथे चित्रपट दिग्दर्शक सतिश रणदिवे हे चित्रिकरणात व्यस्त होते. त्यांच्याकामातून ते थोडे रिकामे झाले असे दिसताच मी त्यांची भेट घेतली. त्यांना सहजच विचारले की सर मला जमेल अशी एखादी अभिनयाची भूमिका असेल तर मला जरूर द्या. मला नक्कीच ती करायला आवडेल. मी अभिनय करण्यासाठी उत्सुक आहे, असे बोलून मी निघणार एवढ्यात त्यांनी मला दुसऱ्या दिवशी कोठे आणि किती वाजता चित्रिकरण आहे आणि मी कोणती भूमिका करायची आहे हे सुद्धा त्यांनी सांगितले.
अचानक आलेल्या या आव्हानामुळे मी खूप आनंदी झालो. कारण ती माझ्या अभिनयाच्या करिअरची सुरुवात होती. इतकेच नव्हेतर इतक्या सहजपणे मला मिळालेली ती संधी होती. त्या चित्रपटाचे नाव होते, “दुसऱ्या जगातली…” त्यानंतर मी अँड यु, आक्रनदन, एका वरचढ एक, wonted बायको नंबर – 1, जन्मदाता या चित्रपटात काम केले आहे.
झी मराठी वाहिनीवरील मालिका तुझ्यात जीव रंगला, यामध्ये सुद्धा मी भूमिका केली आहे. तसेच स्टार प्लस वरील हिंदी मालिका मेहेंदी है रचणे वाली, कलर्स मराठी वाहिनीवरील मालिका राजा राणी ची गं जोडी… यामध्ये सुद्धा मी भूमिका करत आहे. अशा पद्धतीने मी साईप्रसाद आज अनेक चित्रपट मालिकात सहकलाकाराच्या भूमिकेत दिसतो आहे. दिग्दर्शक किंवा निर्मात्यांना कधीच कोणत्याही प्रकारचा आग्रह न करता जशा भूमिका मिळतील ते काम सुरू ठेवले आहे. अशाप्रकारे मी माझ्या अभियन करिअरची सुरुवात केली आहे मित्रानो…
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.