March 28, 2024
Sunetra Vijay Joshi article on Mind
Home » मनाचिया गुंफी..
मुक्त संवाद

मनाचिया गुंफी..

Sunetra Joshi

कुणाच्या मनातले कधी ओळखू येत नाहीच. अन कुणी चुकून ओळखले तर अगदी मनकवडा आहे असे.. या मनाबद्दल किती लिहू अन किती नको असे झालेय. पण त्याच्या असंख्य तर्‍हा शब्दात पकडणे कठिणच.. किती गुपिते दडलेली आहेत.

सौ सुनेत्रा विजय जोशी,

रत्नागिरी मोबाईल 9860049826

मन हे एक अजब रसायन आहे. मन चिंती ते वैरी न चिंती म्हणतो ते काय उगाच. आपले मरण सुध्दा आपणच काळजीने चिंतत असतो. आपल्या भावविश्वात आपण न घडू शकणारे सगळे काही मनात करुन बघत असतो. मनातल्या मनात तर काय काय बोलत असतो. ते प्रत्यक्ष परमेश्वरही जाणू शकत नाही..

मनाचा वेग तर विचारूच नका. क्षणात इथे तर क्षणात सातासमुद्रापार असते. मनाचे वाटणे तर… काहीही वाटू शकते. खरे तर मन नावाचा अवयवच आपल्या शरीरात नाही. सगळे व्यवहार मेंदू चालवतो. हृद्य निदान दिसते तरी.. पण तरीही या न दिसणारे मनाला आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्व आहे.

मनाला पटत नाही, अशी गोष्ट करतांना मनाला खूप त्रास होतो. तेच मनाला आवडणारी गोष्ट मनाला आनंदी करते. जसे की श्वासावाचून जिवात काही राम नाही. तसेच मनावाचून जगण्याला अर्थ नाही. कुणात मन गुंतणे हे जितके छान आहे तितकेच तो मनाचा गुंता वेळ आलीच तर सोडवणे खूप कठीणच काय तर कधीकधी अशक्य होते.

मनाचा पसारा आवरता आवरत नाही. जरा कामातून वेळ मिळाला की मन पसारा मांडून बसलेच समजा. मन कधीकधी एखाद्या गोष्टीसाठी हटून बसते. मग या मनाच्या हट्टातूनच काही वेळा खूप चांगल्या विधायक गोष्टी घडतात. पण कधी मग नको त्या वाईट किंवा विघातक पण घडते.

मनाला संयमाचा लगाम हवाच. हा संयम इतका सहजासहजी जमत नाही पण त्याला प्रयत्न पुर्वक अंगी बाणावे लागते. मनाचे श्लोक.. आपल्या मनाच्या समजावणीसाठी उपयुक्त आहेत. मनानेच मनाला सांगीतलेले.. हे मना असे वाग किंवा हे मना असे करू नकोस. मनावर विचारांचा ताण पडला की आपण सहजच म्हणतो मनावर मणामणाचे ओझे आहे. आणि तेच कुणा प्रिय व्यक्तीच्या सान्निध्यात मन मोकळे केले की मन हलके होते.

कसे ना या मनाबद्दल काही कळतच नाही. मन मनास उमगत नाही असे मग आपण म्हणत राहतो. ते वाऱ्यावर स्वारी क्षणात होते अन इच्छित स्थळी पोहोचते सुध्दा. हवे ते मिळवते मनातल्या मनात. त्याचे असंख्य कप्पे. एकातले दुसर्‍यात मिसळत नाही. सहजासहजी उघडता येणारे अन बंद करता येणारे. मग आपण म्हणतो हा अमका अमका कधी कुणासमोर मन उघड करत नाही.

कुणाच्या मनातले कधी ओळखू येत नाहीच. अन कुणी चुकून ओळखले तर अगदी मनकवडा आहे असे.. या मनाबद्दल किती लिहू अन किती नको असे झालेय. पण त्याच्या असंख्य तर्‍हा शब्दात पकडणे कठिणच.. किती गुपिते दडलेली आहेत.

प्रत्येकाच्या मनाचिये गुंफी हे ज्याचे त्याचे मनच जाणे. आपले मन आपल्याला नेहमीच चांगले काय वाईट काय हे सांगत असते पण आपणच आपल्या बुद्धीच्या ऐकण्यात येऊन नको ते करतो. पुन्हा म्हणतो खरे तर मन सांगत होते पण मी तेव्हा ऐकलच नाही. मनाचा आणि बुद्धीचा हा झगडा नेहमीचाच आहे.

बरे त्यातही हे मन एकच नसते तर एक मन जेव्हा काहीतरी सांगत असते तेव्हा दुसरे मन दुसरच काही सांगते आणि मग या मनाचे ऐकावे की त्या मनाचे यात आपण मात्र कात्रीत सापडतो… आणि शेवटी आपले मन हे परमेश्वराने दिलेले निरभ्र पवित्र आकाश आहे त्यात वाईट विचारांचे काळे ढग जमणार नाहीत आणि ते मलिन होणार नाही याची काळजी मात्र आपणच घ्यायला हवी एवढेच.

आणि आपण इतरांशी कितीही खोटे वागलो बोललो तरी आपल्या मनाशी मात्र खोटे नाही बोलू शकत. तुमचे मन हे आरशासारखे असते. पण त्यावर धूळ जमली तर स्पष्ट दिसत नाही. तेव्हा मनाचा हा आरसा सतत स्वच्छ ठेवा. ज्यात तुम्हाला तुमचा खरा चेहरा नेहमी बघता यायला हवा.

Related posts

लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज ?

क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातें । जाणणे जे निरुते । (एकतरी ओवी अनुभवावी)

अभ्यासावर मन केंद्रित कसे करायचे…

Leave a Comment