April 19, 2024
Negative Thinking Nervousness Creates steps to Suicide
Home » ती वेळ…
मुक्त संवाद

ती वेळ…

कधीतरी दोन-तीनदा ती व्यक्ती नैराश्यातून जगावेच वाटत नाही किंवा तत्सम वाक्ये जेव्हा बोलते तेव्हाच जवळच्या व्यक्तिने जर तिला सकारात्मक काही सांगितले तर कदाचित बाजू पलटू शकते. पण तेव्हा कुणी ते गांभीर्याने घेतच नाही. आणि तो विचार मग पक्का होत जात असावा. संधी मिळताच ते घडून जाते… पण वेळ निघून गेली असते.

सौ सुनेत्रा विजय जोशी

रत्नागिरी. मोबाईल 9860049826

अनुने सगळे आवरले आणि वर्तमानपत्र वाचायला घेतले. पहिल्याच पानावरच्या बातमीने विचारात पडली. किरकोळ भांडणावरून एका महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न. प्रकृती गंभीर असून उपचार चालू आहेत. भांडणाचे कारण कळले नव्हते. पोलीस तपास चालू आहे.

बातमी वाचून तिचे मन भूतकाळात गेले. तिला आठवला तो  प्रसंग.. तिची मैत्रीण नेहा. खूप हसतमुख बोलघेवडी छान घट्ट मैत्री होती. शाळेपासूनची काॅलेज संपेस्तोवर. मग लग्न झाले आणि वेगवेगळ्या गावात. पुढे दोन तीन वर्षात भेटच नव्हती. तेव्हा मोबाईल नव्हता. फोन पण कमीच लोकांकडे असायचे. मग काही हालहवाल कळायचे नाही. मग कळले तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. दवाखान्यात अ‍ॅडमिट केलेय. तेव्हा अनु तिला भेटायला गेली. पण भेटली तेव्हा बघून धक्काच बसला. अगदी चिपाड झालेली. सगळी रयाच गेलेली. कसनुशी हसली. अनुने तर तिला बघताक्षणी ओळखले नाही. 

अनुला बघून म्हणाली.. अनु मला जगायचंय माझ्या मुलीसाठी. मला वाचव. मी नाही वाचले तर माझ्या मुलीकडे बघशील? अनु.. अग इतकी मुलीची काळजी आहे तर मग जीव देण्याचा विचार तरी कसा केला? हो ग चुकलेच माझे. नंतर मग वाटून काय उपयोग? मग अनु म्हणाली आधी बरी हो मग बोलू.

दोन दिवसांनी घरी आल्यावर सगळी रामकथा समजली. म्हणाली सासुचा सासुरवास आहेच त्याचे काही वाटत नाही ग, पण नवर्‍याला दारूचे व्यसन लागलेय. लग्न झाले तेव्हा नव्हते पण. धंद्यात खोट आली. मग सुरवातीला कधीतरी म्हणता म्हणता रोजच पिऊन यायला लागला आहे. मग काय घरात रोजची भांडणे. क्वचित अंगावर हात पण पडायचा. थकले आता सहन नाही होत. कधी कधी कुठेतरी जाऊन जीव द्यावा वाटायचा. पण छोटी मुलगी आहे. तिचा विचार मनात येऊन बरेच दिवस थांबले पण त्या दिवशी कहरच झाला आणि प्यायले ते विष..

ऐकून अनुचा जीव खालीवर झाला. अनुने तिला समजावले. मग तिच्या आईवडिलांना समजावले. मुलीपेक्षा प्रतिष्ठा मोठी वाटते का? तिला आता आधार दिला नाहीत तर, कधीतरी तिने जीव दिल्याचे कळेल. मग मात्र वडील जागे झाले. आधी तिला मुलीसकट घरी आणले. तिची तब्येत नीट झाली. दोनचार शिकवण्या करु लागली.

नेहा सोडून गेल्यावर नवरा पण थोडा ताळ्यावर आला. तिची माफी मागून घरी चल पुन्हा दारु पिणार नाही म्हणाला. पण नेहाने स्पष्ट सांगितले आधी न पिता दोन-चार महिने राहून दाखव. मग बघू. अनुने त्याला सांगितले ती येईल. तुम्ही धंदा नीट बसवा. दारू पिऊन झालेले नुकसान भरून येणार आहे का? त्यापेक्षा ती सोडली तर तेवढेच पैसै वाचतील. नेहा पण शिकवण्या घेऊन थोडा हातभार लावेल. पण आधी तुम्ही मेहनत करा. एकदम सगळे आधीसारखे कसे होईल. मुलाचा संसार मोडायला आलेला पाहून मग सासू पण भानावर आली. माझे पण चुकले.मी पण उगाच तिलाच बोलायचे.

हळूहळू गाडी रुळावर आली. आता तिचा संसार आणि ती पुन्हा बहरलीय. आणि त्या आठवणींच्या रानातून ती बाहेर आली. पण मनात विचारांचे वादळ भिरभिरत होतेच. खरेच जीव देऊन सगळे प्रश्न सुटतात का? काहीतरी मार्ग निघू शकतोच ना? पण त्या वेळेस कुणीतरी आधार देणारे भेटायला मात्र हवे. ती एक वेळ निघून गेली की मग पुढे सगळे निभावून नेता येते. मनाला उभारी पण मिळते. पण ती वेळ निघायला कुणीतरी वाचवणारे अन आधार देणारे मिळायला हवे. प्रत्येकाचे कुणी ना कुणी जवळचे असतेच ना ? मनातले त्याला सांगायला काय हरकत आहे ? आणि आत्मघाताचा विचार हा एकदा वाटले आणि लगेच केला असा नसणार.

कधीतरी दोन-तीनदा ती व्यक्ती नैराश्यातून जगावेच वाटत नाही किंवा तत्सम वाक्ये जेव्हा बोलते तेव्हाच जवळच्या व्यक्तिने जर तिला सकारात्मक काही सांगितले तर कदाचित बाजू पलटू शकते. पण तेव्हा कुणी ते गांभीर्याने घेतच नाही. आणि तो विचार मग पक्का होत जात असावा. संधी मिळताच ते घडून जाते… पण वेळ निघून गेली असते. त्यामुळे जवळच्या व्यक्तीच्या म्हणण्याकडे लक्ष द्या ती वेळ सांभाळा एवढेच..

फोनच्या आवाजाने अनु भानावर आली. तिच्या जावेचा होता. अनु यांची नोकरी गेली ग.. कंपनीने तीन चार जणांना कमी केलेय. खूप नैराश्य आले आहे. मला तर काय करावे तेच कळत नाही.. ती रडवेली झाली होती… अग रडू नको. काही न विचारता त्यांच्या सोबत मात्र रहा. धीर देत रहा.एकटे अजिबात सोडू नकोस. मी उद्या येतेच… मग बघू… हो ही वेळ सांभाळायला हवी.. अनुने फोन ठेवला आणि राजेशला उद्या गावी जायचे सांगण्यासाठी फोन लावला..

Related posts

आई आपली म्हणायची…पण आता त्याचा अर्थ कळतो…

मैत्री…

अवघाची संसार…

Leave a Comment