February 1, 2023
Blatentiya Balasaheb Labde Book Review
Home » आतून सोलून निघणार्‍या सामान्य माणसाचा हंबर : ब्लाटेंटिया
मुक्त संवाद

आतून सोलून निघणार्‍या सामान्य माणसाचा हंबर : ब्लाटेंटिया

‘ब्लाटेंटिया’ शिर्षकामागे झुरळ आणि झुरळाचे जग विशद केले आहे. भाषा, भाषाविचार, भावनांचं जग यातून त्यांच्या कवितेत आलेल्या असंख्य प्रतिमा स्वतःला नव्या भाषेची – आकलनाची अभिव्यक्ती मांडतात. जगण्यातली नेमकी उत्सुकता आणि एकूण जगण्यातली संवेदनाच बोथट झाल्यानंतरचे माणसाचे जग यात केवळ शोषक आणि शोषणधर्म यांची सरमिसळ कवी करतो.

डॉ. चंद्रकांत पोतदार,
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, हलकर्णी
चंदगड, कोल्हापूर, 416552,
मो. 9423286479

कुठलाही कवी आपल्या सभोवतालच्या सूक्ष्म नोंदी टिपतो, तेच त्याच्या कवितेचे भाष्य असते. कविता काहीतरी सांगते, वाचकांशी बोलते, कवीच्या अंतर्मनातली भावना व्यक्त होत असते. कवीचे चिंतन म्हणजे त्याची कविता असते. स्वतः सावलीवरही विश्वास नसलेला आणि स्वतःचा जीव मुठीत धरून जगण्याचा आजचा काळ आहे. अशा गुदमरल्या काळात एखाद्या किड्या-मुंगी सारखी अवस्था माणसाची झाली आहे. मनाच्या तळाला साचलेला गाळ ढवळून वर येतो, तेव्हा जगण्याची सगळी पाळंमुळंच उखडून वर येतात. हरवलेला भूतकाळ, हाती नसलेला भविष्यकाळ आणि आज घडीला असणारी वर्तमानाची जाणीव या सगळ्यात पसरलेलं असतं ते आपलं अस्वस्थ जगणं. या जगण्याच्या अस्वस्थ नोंदी म्हणजे व्यवस्थेच्या जगरहाटित अत्यंत शून्यवत् बनलेला आजचा माणूस. एखाद्या झुरळासारखी झालेली त्याची अवस्था सांगणारी कविता म्हणजे बाळासाहेब लबडे यांचा ‘ब्लाटेंटिया’ हा कवितासंग्रह होय.

वाट्याला आलेले आयुष्य जगणे हा एक रणसंग्राम आहे. असे जगणे म्हणजे आयुष्याच्या चढउताराला सामोरे जाणे होय. एखादे घर बांधताना लांबी-रुंदी मोजून एक नकाशा काढता येतो आणि घर साकारते. पण मेंदूची लांबी रुंदी कशी मोजणार? मात्र कवी लबडे ही मेंदूची लांबी-रुंदी-ऊंची खोली भोजतात आणि प्रत्येक सामान्य माणसाच्या जगण्याची जी आत्मगत नाळ आहे, ती व्यक्त करतात. रंगावर माणसाचे जीवन नसते, मात्र त्याच्या प्रकृती पुरुषाचा व्यापक धागा ते व्यक्त करतात. जगाच्या प्रत्येक क्षणाची नोंद कवी-लेखक आपल्या शब्दांन घेत असतो. लबडेंच्या कवितेत ही शब्दरूपी नोंद खूप अचूकतेने येते. माणसाच्या जगण्याभोवतीची चौकट मांडताना एक काळ व्यक्त होत असतो. काळाची मोडतोड करून माणूस म्हणून आपण जगत असतो; कारण आपल्या अस्तित्वाचा शोध घेत घेत जगत असलो तरीही आपण अस्तित्वशून्य माणूस असतो. अनेक संस्कृतींना एकवटून जगतो, तरीही आपण केवळ एक बिंदू असतो; आपल्याच पावलांची सावली चुकवत चालत राहणार्‍या मुंगीचा जीव किती? पण आपला कुडीतला जीव सांभाळतेच ना! तसीच माणसाची अवस्था. बंद मुठीतलं आकाश कवटाळावं तर आपल्याला या एकूण व्यवस्थेनं झुरळासारखं पावलापावलाला झटकलंय. वाळूवरच्या पाऊलखुणा लाटेसरशी पसरत जातात आणि पुसत जातात. रिकाम्या वाळूसारखं पुन्हा आपण विशून्य होतो, एकूणच या सगळ्यात आपण कुठे आहोत याचा शोध घेणं म्हणजे सर्जनाचा आयाम सांभाळणं होय, जगण्याचं रूप वाढत असताना सगळ्या भावनांचा निचरा या काळाबरोबर होतो आहे. हरघडी दुःख आणि नैराश्य यातूनच आपले जीवनमान सुरू आहे. नेमकं काय होणार आहे आपलं? अशा प्रश्नांच्या गदारोळातच जगण्याच्या वाटा धुंडाळायला आहेत. अशावेळी आपण एक निमितमात्र होऊन जगत राहायचं असतं, याचं भान मांडताना कवी लिहितो

,”तू म्हणायसास देव नाही, स्वर्ग नाही, नरक नाही
मृत्यूनंतर माणसाला गती नाही,
हे ब्रह्मांड फक्त वाढत चालले आहे
मी आपला कविता लिहितोय
सईच्या टोकानं
दोन ओळीत आशयघनता यावी म्हणून
मी आपला … – पृष्ठ 16,

दिवसेंदिवस जगणे कठीण होत निघालेल्या काळाचे हे भयावह चित्र कवीच्या संवेदनशील मनातून व्यक्त होतं: कुचेष्ठेने वागणारा समाज फार चांगल्या पद्धतीने जगू देणार नाही, अशावेळी स्वतःची पाऊलवाट नव्याने घडवायला हवी. मानवी आयुष्याचं सांधलेपण जुळवून घेताना काळाची असंख्य पावले आपण नव्याने अनुभवत असतो. दोन ओळीच्या दरम्यान आम्ही आपलं जगणं शोधत असतो. टोकदार आयुष्याचा अर्थ काय? काळे – गोरेपणापेक्षा मनाचा मोकळेपणा कधीही माणसाला मोठे करत असतो. जगण्यातली कुत्तरओढ नव्याने घडवत असते. यासाठीच कवितेचे शब्द मोलाचे तर असतातच, शिवाय एक आत्मगत नाळ जोडलेली असते. अणूरेणूपेक्षाही आपण लहान असतो, तरीही काळाची पोतडी आपण बांधत राहतो.

जागोजागी तडा जाणारी जमीन, तुटत जाणारा माणूस, कोरडी होत जाणारी पायाखालची जमीन, अफाट गर्दीत हरवलेलं आपलं एकाकीपण सगळाच कोरडा ठक्कपणा. यातूनही आपण सुखाचे पंख लावून, तग धरून जगत राहतो. सामान्य माणसाचे एखाद्या झुरळासारखे झालेले आयुष्य. कवितासंग्रहात माणसाला दिलेली झुरळ ही प्रतिमा आणि झुरळाच्या प्रतिमेत वावरणारा माणूस लक्षवेधी ठरतो. एखाद्या झुरळासारखीच त्याची अवस्था झाली आहे. माणसाचे अस्तित्ववादी रुप, वर्तमानाच्या प्रगल्भ जाणिवा, महानगरातले भयावह जगणे, जीवनमूल्यांची ठळक नोंद अशा कितीतरी गोष्टी कवी मांडतो. मुंबईसारख्या महानगराच्या जाणिवा कवीने अनुभवल्या आहेत. त्यामुळे त्यातून येणारी आंतरिक भावना कवी गाळू शकत नाही. मात्र समोरच्या विस्तीर्ण काळाचं आकंदन तो मांडत राहतो. माणसाची अत्यंत शुन्यवत झालेली अवस्था अंतर्मुख करते.

पर्यायाने समाजाची उकल होत जाते. समाज दुटप्पी आहे. चांगल्याचे पाय ओढत वाईटाला खतपाणी घालतो. यामागे समाजाची कृत्रिम संवेदनशीलता दिसते. समाजाच्या मानसिकतेला बदलायचं कसं? हा कवीला पडलेला प्रश्न संपूर्ण समूहाचा आहे. याच समाजवास्तवाचे असंख्य प्रश्न कवी सोडवू पाहतो. केवळ कल्पनेने पोट भरत नाही. त्याला वास्तवाची जोड द्यावीच लागते. तरच जगणे सुसह्य होईल. अशावेळी कवीचे चिंतन आणि कवीचे आत्मगत स्पंदन खूप महत्त्वाचे असते. कारण सभोवताली केवळ जगण्याचा पसाराच असतो. अवकळा आलेल्या अवकाशात आपण केवळ जगत राहतो. जीव आहे म्हणून, नाहीतर केवळ अर्थहीन जगतो. मेंदूचे सगळे कप्पे धुंडाळले तरी तपशील शून्य उतरतो, यासाठीच जगणे म्हणजे केवळ श्र्वासांची सोबत होय. जगण्याच्या लढाईतलं एक पिचलेपण म्हणजे लबडेंची कविता, म्हणूनच यात माणूस एखाद्या झुरळासारखा वाटतो. अणु-रेणूपेक्षा सूक्ष्म माणूस झालोय. आपण कोणत्या काळात जगतोय आपण सगळेच. कवी लिहितो –

,”मी ब्लाटेंना आदिम होऊन अगणित पंखांचा
ही काळाची गती खातेय
रितेपणाची ओल
ब्रम्हांडात शोधतो
नागडेपण काळाचं
ही अस्वलं पांढरी भुकेलेली
केव्हाची मनाच्या धृवावर
सागर झाकलाय पांढर्‍या झाकणानं
सूर्य कुठंय?
वारा विमानाच्या वेगानं
थंडीशी सलगी करतोय
अणु-रेणूपेक्षा सूक्ष्म माझ्यातला मी
वार्महोलातून काळयात्रेत शिरलोय
आता कुठं पृथ्वी निळी वाटू लागली आहे.”
– पृष्ठ 20 – 21, वार्महोलातून ….

काळयात्रा कुठली? निळी पृथ्वी कोणती? पांढरी अस्वलं कोणती? पांढरं झाकण कोणतं? सूर्याला झाकणं शक्य आहे काय? अशी गूढ – अनाकलनीय कविता काही वेगळेपण मांडते. पावसाच्या जत्रा, मेंदूची लांबी-रुंदी, पंखवाला साप, काळाची पोतडी, अनलिमिटेड एन्जॉय, कंपन्यांचं महाभारत, आंधळ्यांची माफी यासारख्या प्रतिमा निश्चितच एक वेगळेपण दाखवून देतात. ही केवळ प्रतिमा म्हणून येत नाही, तर त्यामागे एक तात्विक विचार आहे. सुख ही सजीव प्रतिमा देऊन माणूस आणि जीवन यातील व्यापकत्त्व अधोरेखित केले आहे.

‘ब्लाटेंटिया’ शिर्षकामागे झुरळ आणि झुरळाचे जग विशद केले आहे. भाषा, भाषाविचार, भावनांचं जग यातून त्यांच्या कवितेत आलेल्या असंख्य प्रतिमा स्वतःला नव्या भाषेची – आकलनाची अभिव्यक्ती मांडतात. जगण्यातली नेमकी उत्सुकता आणि एकूण जगण्यातली संवेदनाच बोथट झाल्यानंतरचे माणसाचे जग यात केवळ शोषक आणि शोषणधर्म यांची सरमिसळ कवी करतो. जगू पाहणार्‍या माणसाचे प्रदीर्घ चिंतन आणि प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. तत्वज्ञान’ सारख्या कवितेत पंख लावून जन्म घेणार्याची मांडणी करणारा तात्विक सिद्धांत /मार्क्सचे तत्त्वज्ञान आदि सारख्या कवितेत मांडतो. सुंदर स्वप्नांची धार्मिकता आणि झुरळाचे पंख लावून जन्म घेणारी जगण्यातली उत्कटता याची सांगड कवी घालतो. अनेक प्रश्नांचा गुंता होतो. प्रश्नांची अनेकविध रूपे मांडताना सामान्य माणसाच्या कुचेष्ठेची गोष्ट कवीला सलत राहते. सामान्य सामाजिक-आर्थिक आणि कौटुंबिक दृष्ट्या जगण्यालायक व्हावा, तरच त्याची अरिष्टे थांबतील. सामान्याची होणारी गळचेपी संवेदनशील मनाला बोचत राहते. धर्मकल्पनेचा प्रभाव पडला की माणूस आपला उरत नाही. केवळ एक व्यक्ती नको तर संपूर्ण समूहमन आनंदाने जगावे, अशी सामुहिक भावना कवीची सामाजिक दृष्टी मांडते. माणसापेक्षा माणसांचा समुदाय महत्त्वाचा. एक नको अनेक ही प्रामाणिक भावना कवीच्या आंतरिकतेला अधोरेखित करते. कारण जगणं म्हणजे जटिल बनत चाललेले कोडं आहे, ते सोडवताना आयुष्य पणाला लागतं. माणसांच्या महाकाय अभ्यारण्यात जगताना आलेले दाहक अनुभव आणि माणसामाणसांमधलं वाढत जाणारं अंतर यातून सलणारी तीव्र वेदना कवीमनातून येते. ती अखिल मानवजातीची वेदना आहे. कातडीचा रंग बदलणार्‍या समाजव्यवस्थेत सामान्य माणूस उपरा बनला आहे; म्हणून त्याच्या अंतःकरणातील वादळाचे भोवरे कवीला सतत छळत राहतात, तरीही या सामान्याला जगत राहण्याची आश्वासक हाक देऊन प्रेरणा देतो तेव्हा कविता नव्या वाटेवर येते. आशेचा किनारा शोधताना कवी लिहितो –

,”तूच आहेस संस्कृतीचा निर्माता
ग्रंथांच्या मागची विद्या प्रतिभा
तत्वज्ञान, रूढी, परंपरांचा जनक
तू दगडांना अर्थ दिलास म्हणून मूर्ती तयार झाल्या.
तूच मोडल्या आहेस अन्यायकारक चौकटी
तूच मिळवून दिलं आहेस माणसाला माणूसपण
तू आहेत म्हणून या सार्‍यांना अर्थ आहे तुझ्यामुळं
तू पांथस्था! तू चालत राहा, तू चालत राहा ?”
( पृष्ठ 28-29, हे पांथस्था)

कवी लबडे यांच्या कवितेची आजच्या सभोवतालाशी एक नाळ आहे. आज वर्तमानात काळाच्या आडव्या तिडव्या रेघोट्या अंतर्मुख करतात. विश्वातली पंचमहाभूतांची सोबत, दुष्काळानं भारलेली माणसं, लोप पावत निघालेली नद्यांची संस्कृती, पर्वतरांगांमधल्या गुहा, काळाचा अमर्याद धावणारा घोडा या सगळ्यात आपण आपलाच शोध घेत राहतो. ही परिस्थिती काय सांगते? स्वप्नांची आमिषं दाखवून आपला गळा कापून टाकावा, अशा प्राप्त परिस्थितीचं अचूक भान कवी रेखाटतो.

जागतिकीकरणाचे पडसाद त्यांच्या कवितेत येतात, तेव्हा त्यामागची सांकेतिकता महत्त्वाची आहे. टूजी, फोरजीच्या वातावरणात भटकणारे वारे आणि डिजिटल स्वप्नांचे उंच मनोरे, ब्युटी ट्रिपलचे सौंदर्यपूर्ण वातावरण, ई कचर्याची व्यापकता, अवकाशाच्या निर्वात पोकळीतलं यंत्र, आकाशाच्या निळ्या कंठाची मार्केटिंगची जाहिरात, क्लोनचा जमाना आणि कटपेस्टच्या भावनांचं ओथंबणारं जग यात एक विचित्र काळाची कसोटी आहे. अशा स्वरूपाची अनेक प्रत्यंतरं त्यांच्या कवितेत येतात.

सोफेस्टिकेटेड जगण्याची प्रत्येकाची धावपळ कुठे नेणार आहे. कळत नाही, अशावेळचे सूक्ष्म भाष्य खूप महत्त्वाचे वाटते. “पटकथा काळवेळची” सारखी कविता एक भयाण वास्तव मांडते, ज्यांच्या मनाचा तळ हळवा आहे, त्याने हे सर्व विकायला हवे, कारण ते आजच्या वातावरणात चालणारं नाही. एखाद्या चित्रपटाच्या पटकथेची जशी अनेक दृश्यं असावीत, तशी दृश्यांमागून दृश्य कवी टिपतो आणि त्यातून एक मार्मिक भाष्य करतो; कारण त्यात माणसाच्या अस्तित्वाचा केवळ शोध नाही, तर काव्यातून येणारा ठळक अनुभव आहे. माणसाच्या रक्तवाहिन्या, धमन्या, बुबुळं काही कामाची असतात, ती असल्यावर आणि नसल्यावर अशा दोन ठिकाणची परिस्थिती वेगवेगळी असते.

सरळमार्गी जगण्याचा माणूस आणि त्याचे आयुष्याची गाथा, कविताच बाजारात घेवुन बसलेल्या कवीचे जगण्याचे वारूळ, प्रकाशकांची चिंताग्रस्त भयावह अवस्था, प्रतिकांच्या मागे धावणार्‍याची उंच उडी या चार दृश्यातून कवीचे गंभीर चिंतन व्यक्त होते. कवीच्या अंतरंगात मुरलेले महानगराचे चिंतन आणि जागतिकीकरणाच्या रेट्यात खुजा झालेला माणूस यांची अनेकविध रूपे त्यांच्या कवितेत येतात. संवेदना हरवल्या तरीही डिजिटल यंत्रयुगाच्या आहारी गेलेला माणूस जिंदगीच्या धावपट्टीवर बिनचेहर्‍याचा धावतो आहे.

अश्वत्थामाची जखम घेऊन भिरभिरत राहावं, तसं चिंध्याभर कुरुतड सुरु आहे अखंडपणे. मानवी भावसंवेदनांना गिळंकृत करणारी ही कसली संस्कृती? जगण्यासाठीचा एवढा कसला आटापिटा! भूक आणि भाकरीचं अंतिम सत्य काय? झुरळ होऊन जगण्यापलिकडे माणूस काही करूच शकत नाही काय? आपण फक्त ब्रेकिंग न्यूज पुरतेच काय? हल्ला करणारी हत्यारं कसली? आभासी पाण्यातल्या बुडबुड्यांवर तरंगणारा जीव कसला? विकासाचं पोट रिकामं कसं? पेस्टकंट्रोलचा जमाना कसला? इच्छांची वारुळं का वाढताहेत माणसांची? असे प्रश्नांमागून येणारे प्रश्न जगाच्या अगतिकतेचे, अस्वस्थतेचे आणि बकालपणाचे चित्र अधोरेखित करतात. हे प्रश्न नाहीत, तर जगण्याची धडपड करणार्‍या, झुरळ बनलेल्या माणसांची अस्वस्थता आहे. भयानक वास्तव आहे, कुरुप वास्तव आहे. बेदरकारपणे चिरडली जाणारी स्वप्ने आहेत, अंतःकरणात चिरडलेला उजेड आहे त्यामुळे पापण्यांवर अंधाराचे सावट आहे. अशा प्रदीर्घ चिंतनातून येणारी कवितेची भाषा गावशिवारापासून दूर फेकल्या गेलेल्या माणसाची वेदनेची भाषा आहे. माणूस म्हणून मिळालेल्या हीन वागणुशीची भाषा आहे. आतून सोलून निघणार्‍या अस्वस्थ माणसाची हंबरणारी व्याकुळता आहे. मात्र, असे असूनही झोपडीत पणती पेटत राहावी, ही आशावादाची जाणीव वाचकमनावर चैतन्य निर्माण करणारी आहे.
,”कोणतंय गाव मला आपलं म्हणत नाही.

मी मला कधीपासून झुरळ समजतोय
हा गलबला माझ्याभोवती
अंधार पापण्यांचा सुरात गायला लागलाय
डोळे माझेच मला दिसत नाहीत आता आरशात.
बहुतेक हीच सुरुवात असावी आणि शेवटही
डोळ्यांपासून डोळ्यांपर्यंत एक पणती पेटत राहावी झोपडीत.”

  • पृष्ठ 71, पापण्यांचा अंधार –

वैफल्यातली अर्थहीन निरसता आपल्याच जगण्यावर सूड उगवत राहते. गाव सुटत नाही आणि शहर आपलं म्हणवत नाही, अशा कोंडीतली अवस्था खूप वाईट आहे. आठवणींची खैरात होते, अश्रूंचा बांध फुटतो, काळीज रितं होतं, अशावेळी केवळ एक दृष्टीचं दान कवी मागतो. हे चिंतन केवळ कवितेचं नाही; कादंबरीचं नेमकं सूत्र पकडण्याचं सामर्थ्य आणि कवितेच्या मुळाशी शिरून नेमका आशय शब्दबद्ध करण्याचं सामर्थ्य लेखकाकडे, कवीकडे आहे; याची प्रचिती त्यांच्या कविता वाचताना येते, इथे चिंतनासह स्वतःला सोलून घेण्याची भक्कम मानसिकता त्यांच्या कवितेतून व्यक्त होते. जगण्यामरण्याचं गणित कोणा चुकते. ,” जानते अजानतेपणाची कुरूप कुरूपं
धड तुटलं तरी श्वासाचं कुठं अडतं?
झुरळाच्या पंखावर पाणी कुठं थांबतं ?”

  • पृष्ठ 74, जगण्या मरण्याची …

अशी असंख्य कुरूपं घेऊन वावरताना स्वतःला कुरवाळण्यातही अर्थ नाही. याचंही नेमकं भान कवी मांडतो. मग परिवर्तनाची अपेक्षा करायची तरी कशी आणि कुठवर? वरवर मोकळा वाटणारा आणि वागणारा माणूस आतून जातीपातीच्या आवरणातच जगतो, हिंसा आणि अहिंसा यांचं एक द्वंद्व असतं, उपदेशाचे डोस सगळे स्वीकारतीलच असे नाही, करुणेच्या सागराने पाझरणारे डोळे जगण्याचं उदात्त तत्त्वज्ञान शिकवतात. यासाठीच प्रत्येक राबणार्‍या माणसाच्या कष्टाला काही विशिष्ट किंमत असावी. तरच खरं परिवर्तन होईल. अशा बदलाचं भाष्य मांडणार्‍या कवितेची स्वतंत्र विचारसरणी महत्त्वाची आहे. आंबेडकरवादाच्या आरस्यात (79), परिवर्तन (77), माणसांच्या प्रेतावरून (87), फोबिया (50), बाई सुरळ झिंगलं (90), भयगंडाचा आलेख (94), अशोक अस्वस्थ होतो कुठे? (100), मार्क्सचे तत्वज्ञान (60-61) सेझची कविता (120) अशा काही कविता परिवर्तनातील बदल मांडणार्‍या आहेत. हा बदल अखंड मानवजातीचा आहे. हसण्या – रडण्याच्या दुनियेत जगण्याला पर्याय जगणे हाच असतो. सुखदुःखांचे पापुद्रे स्वीकारूनच आपण जगत राहतो.
,”जाणीवांचे चिमटे उघडे हाती ठेवू
काळोखा खरवडतो
आम्ही झुरळं असतो
दाखविण्याला थोडं थोडं वरवर हसतो
हसतो नंतर रडतो आम्ही झुरळं असतो”

  • पृष्ठ 103, जेव्हा जेव्हा मरतो

मात्र, अशी झुरळं असलो तरी आमचे हात मातीचे, भाषा मातीची, वादळं आली की नव्यानं हा आशावाद कवी पेरतो. सुखदु:खांचे पापुद्रे आहेत, ती शोषणाची व्यापकता आहे, धर्माची संकल्पना आहे तशी तत्त्वज्ञानाची दीर्घ गाथा आहे आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी सामान्य माणूस आहे. त्याची अवस्था झुरळासारखी आहे. झुरळ हा सजीवांचा प्रतिनिधी आहे. बुद्धी असूनही ती गहाण ठरावी, पंखात ताकद असूनही उडता येवू नये, अशा कात्रीतली त्याची अवस्था आहे. समृद्ध जीवनशैलीत स्वतःचा चेहराच सापडू नये म्हणजे काय? आपल्याच अस्तित्वापासून आपण म्हणजे काय? अशा अस्तित्व शोधाची ही कविता आहे.

सातत्याने नवनवे प्रयोग करत नवनवा आशय समृद्ध करणारी ही कविता आहे. प्रतिमांनी युक्त अशी ती आहे. अस्तित्वाच्या मुळाशी शिरून नवनवे प्रयोग करणारी आणि अनेकांगी दर्शन घडवणारी कविता आहे. संघर्ष प्रत्येकालाच असतो, अशा सामाजिक दुःखाचं आणि सामाजिक संघर्षाचं कथन करणारी कविता मानवी मेंदूतली भाषा अधोरेखित करते. तत्वज्ञान केवळ नावाला येत नाही, तर तत्वज्ञानाच्या विवेचनातून युगानुयुगापासूनची रुजलेली मूल्ये आणि त्यांचा स्वीकार ठळक बनतो. समाजकारण आणि राजकारण याचीही तीव्र नोंद कवी घेतो. “झुरळांविषयी” या कवितेतून शोषणव्यवस्थेची कला आणि राजकारणातील गदारोळाचे भयावह चित्र कवी मांडतो. तर”अघोरी” सारख्या कवितेत माणूसच माणसाला खायला उठेल आणि आपलंच मांस खात सुटेल, हा काळ फार लांब नसल्याची सूचकताही देतो, यासाठीच कुठलाही काळ आला तरी सामोरे जाता यायला हवं, ही नोंद महत्त्वाची देतो.

राक्षसी समाज, लुतभरात्यासारखी कुत्र्यांची अवस्था, चिमणी एवढा मुठितला जीव, काळजातली भीती, साथीच्या रोगांची पाठलागाची वृत्ती यात एक मृत्यूचे आकडेच मोजत भीषण सत्य दडले आहे, यात जीभ नावाचा प्राणी फक्त असतो. हे सगळे ऐकून काळीज धस्स होतं. कुत्र्याच्या ओरडण्याची ती सूचकताच असेल काय? हा संभ्रमित प्रश्न कालांतराने खरा ठरतो. ही अचूकता /कुत्रं केकाटायला लागलं की अस्स होतं (126) या कवितेतून हतबल महासत्तेच्या कोसळण्याचे हेच ते संकेत आहेत. जगण्यापेक्षा मृत्यू फार सोपा आहे. फक्त कसं मरायचं, तेवढंच ठरवणं बाकी आहे, हे सांगताना कवीची आतली घालमेल समजून घ्यायला हवी. ही बाब अनेक प्रतिमांतून होते. प्रायश्चिताची कबुतरे काळाचा देठ, हसरी रोगराई मेंदूची लांबी, पापण्यांचा अंधार, कंपन्यांचं महाभारत, पावसाची जत्रा, मुकेपणाचा चिवचिवाट, अनलिमिटेड एन्जॉय, अशा असंख्य प्रतिमा कवितेची ऊंची वाढवतात, शिवाय माणूस आणि झुरळ यांच्या नात्याला अधोरेखित करताना कविता वाचताना आपण परत परत वाचतो, उलगडत जातो. सशक्त कविता आकलनापलिकडे जात आस्वादण्यापेक्षा अंतर्मुख चिंतनाची दिशा दाखवते.

बाळासाहेब लबडे यांची कविता या सर्वात आशयसंपन्न आहे. संवेदनेचा प्रांत व त्यांचा आवाका मोठा आहे. तात्विकतेचे विवेचन, शोषक आणि शोषण यांतील व्यापकता, जगण्यातली उत्कंठा आणि हिरमोडीचे आयुष्य, गळून पडणारी माणुसकी, संवेदनांची प्रदीर्घ चिंतनशीलता अशा अनेक गुणांसह कविता व्यक्त होते. अनेक अर्थांची वलये घेऊन येते विविधांगी जीवनाचे दर्शन घडवत ही कविता आपल्याच डौलात व्यक होते तेव्हा झुरळ आणि माणूस यांची अद्वैतता थक्क होते. माणूस म्हणजे झुरळ आणि झुरळ म्हणजे माणूस हे समीकरण ठळक बनते. संपूर्ण कवितासंग्रहात सुख ही प्रतिमा प्रत्येक ठिकाणी होते आणि ते सहृदयी वाचकाला अंतर्मुख करते झुरळासारखी झालेली माणसाची अवस्था अंतर्मुखतेबरोबरच चिंतनशील आहे. “ब्लाटेंटिया” हे शीर्षक केवळ प्रतिमा म्हणून येत नाही तर, संपूर्ण कवितांना न्याय देणारे आहे. बाळासाहेब लबडे यांची काव्यजाणीव ,प्रतिमा, प्रतिकांना, योजनेतून समर्पक आशयाने व्यक्त होते. सरळ वाचकांपर्यंत कविता पोहोचतात, माझ्यातील वाचकमनाला रसिकवृत्तीने जी कविता भिडली तीच उलगडली आहे. शब्दांचं नेमकं वलय घेऊन प्रकटणारी ही कविता आहे: कवितेचे नेमके सूत्र उलगडणारी कविता भूत-भविष्यापेक्षा वर्तमानाचे व्यापक चिंतन आणि आवाका मांडते. समकालीन कवितेत एक महत्त्वाची कविता म्हणून लबडेंच्या कवितेचे मोल वेगळे आहे.

पुस्तकाचे नाव – ब्लाटेंटिया (कवितासंग्रह)
कवी/लेख : बाळासाहेब लबडे
प्रकाशकः न्यू ईरा पब्लिशिंग हाउस, पुणे
पृष्ठेः 155 किंमतः 200 रुपये
पुस्तकासाठी संपर्क – 8600045007

Related posts

Saloni Art : टाकावू प्लॅस्टिकपासून सुंदर मुखवटे…

राजकीय नाटक आणि गो. पु.

‘गुणीसोबत शिकूया’ तून मनोरंजनातून मुलांचे ज्ञानवर्धन

Leave a Comment