March 29, 2024
Need of Non Violence in Mind article by Rajendra Ghorpade
Home » मनातच अहिंसा असेल तर…
विश्वाचे आर्त

मनातच अहिंसा असेल तर…

तसे गुंडामधील गुंड प्रवृत्ती काढून त्यालाही उत्तम माणूस बनवता येणे शक्य आहे. वाल्याचा वाल्मीकी झाला हा इतिहास आहे. इतिहासात घडले तसे सध्याच्या युगातही ते शक्य आहे. यासाठी प्रत्येकाच्या मनामध्येच अहिंसावृत्ती उत्पन्न करायला हवी. अहिंसावादी मने घडवायला हवीत.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

पैं मानसींचि जरी । अहिंसेची अवसरी ।
तरी कैंची बाहेरी । वोसंडेल ।। २९७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ – परंतु, मनांतच जर अहिंसा नसेल तर बाहेर कशी येईल. ?

मनात अहिंसा नसेल तर कृतीत अहिंसा कोठून येणार. हिंस्रप्राण्यांच्या मनातच हिंसा असते. त्यानुसारच त्यांच्या शरीराचाही विकास झालेला असतो. त्यांचे दात सुळेदार असतात. ते मांस पचविण्याची ताकद त्यांच्या पोटात असते. त्या प्राण्यांनी गवत खाल्ले तर त्यांना ते पचनी पडत नाही. कारण ते पचविण्याची ताकद त्यांच्यात अस्तित्वातच नसते. गवत खाऊन सिंह, वाघ जगलेले कोठेही पुरावे नाहीत. पण इतके खरे आहे की त्यांना भूक लागल्यानंतरच ते हिंस्र होतात. इतरवेळी ते हिंसा करत नाहीत. तसा विचारही त्यांच्या मनात येत नाही.

भूक माणसातही हिंसा उत्पन्न करते. पोट भरलेले असेल तर हिंसेचा विचार येत नाही. उलट झोप येते. पण भूक लागलेली असेल तर मन कासावीस होते. पोटात अन्नाचा कण पडल्यानंतरच मनाला शांती मिळते. सर्व सुविधा उपलब्ध असणाऱ्यांची मुले बऱ्याचदा शिक्षणात मागे पडतात. पण गरीब, सर्वसामान्यांची मुले खूप शिकलेली पाहायला मिळतात. त्यांनी मोठी प्रगती केल्याचीही उदाहरणे आहेत. म्हणजे मनाची अवस्थाही परिस्थितीनुसार बदलत असते.

परिस्थितीच माणसाला घडवते. पण मनाने दृढ निश्चय केला तर अशक्य गोष्टही सहज शक्य होते. यासाठी ती गोष्ट मनाला पटली पाहिजे. मनाला भिडली पाहिजे. मनावर ती बिंबली पाहिजेत. मांसाहार करायचा नाही असे ठरवले तर ते शक्य आहे. फक्त तो विचार मनात पक्का झाला पाहिजे. आहारानुसारही माणसाची वृत्ती बदलत असते. पण मनावर नियंत्रण असेल तर ही हिंस्रवृत्तीही नष्ट होऊ शकते.

जगात शांतता नांदण्यासाठी माणसांची मने बदलायला हवीत. माणसांच्या मनात अहिंसेचा विचार बळकट करायला हवा. दुष्टांना मारायचे तर आहे, पण कसे? तर त्याच्या मनातील खलवृत्ती काढून. हिंस्रप्राणीही माणसाळू शकतात. ते मांसाहार जरूर करतील कारण जगण्यासाठी त्यांना अन्नाची गरज आहे पण तो आहार त्यांना योग्य वेळी पुरविला जायला हवा. त्यांची योग्य निगा राखली तर तेही माणसांमध्ये वावरू शकतात. त्यांच्यात ती वृत्ती उत्पन्न करता येऊ शकते. मांसाहार करणा ऱ्यांमध्येही अहिंसा उत्पन्न करता येऊ शकते.

तसे गुंडामधील गुंड प्रवृत्ती काढून त्यालाही उत्तम माणूस बनवता येणे शक्य आहे. वाल्याचा वाल्मीकी झाला हा इतिहास आहे. इतिहासात घडले तसे सध्याच्या युगातही ते शक्य आहे. यासाठी प्रत्येकाच्या मनामध्येच अहिंसावृत्ती उत्पन्न करायला हवी. अहिंसावादी मने घडवायला हवीत.

Related posts

सीलबंद वस्तू नियमामध्ये केंद्र सरकारकडून सुधारणा

गणपतराव पाटील यांचे काम देशाला दिशादर्शक: डॉ. लॉरी वॉकर

अस्वस्थ मनांचा हुंकार-हंबर

Leave a Comment