काळ आणि अवकाशाची वेगळी जाण या कवितेत आहे. आजच्या काल गतीची असंख्य रूपे या कवितेत आहेत. भूतकाळ आणि वर्तमान हा सांधता येत नाही. तो अलग राहतो. याची दुखरी जाण या कवितेत आहे.
प्रा. रणधीर शिंदे,
मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
औटघटकेची युगांतरं या संग्रहातील कविता लोकविलक्षण स्वरूपाची आहे. ही कविता गर्दीची कविता नाही. ती बहुप्रिय नाही. वाङ्ममयीन पर्यावरणात बहुप्रिय साहित्याचीच चर्चा जास्त होते. मात्र त्या त्या भाषिक व वाङ्ममयीन संस्कृतीला अल्पप्रिय साहित्यच जास्त समृद्ध करत असते. त्यापैकीच एक प्रवीण अक्कानवरू यांची कविता आहे.
ही आधुनिकतावादी परंपरेतील कविता आहे. तिचे नाते मर्ढेकर व लघुनियकालिक चळवळीतील कवितेशी सांगता येते. अस्तित्वशोधाची नित्य नवी रूपे या कवितेत आहेत. ती जशी स्व शी निगडित आहेत तशीच ती समाज आणि संस्कृती शोधाशी देखील निगडित आहेत. ही कविता व्यंग्यार्थाची कविता आहे. स्पष्टीकरणे आणि फाफट पसाऱ्याला त्यात अजिबात स्थान नाही. ही कविता आजच्या काळाची कविता आहे. एकांड्या परात्मतेची अनंत रूपे या कवितेत आहेत. सत्तेची अदृश्य छायेची वेधक रूपे या कवितेत आहेत. ‘ दर दिवशी फाळणी होत राहते इथे ‘ किंवा ‘ उडू द्या विखाराचा नांगर मऊशार राष्ट्रवादी भूईवर ‘ किंवा हे धुळीचे दानव वाऱ्याच्या इशाऱ्यावर मिंधे ‘ या प्रकारच्या सत्ता जाणिवेची उपस्थिती या कविताभर आहे.
काळ आणि अवकाशाची वेगळी जाण या कवितेत आहे. आजच्या काल गतीची असंख्य रूपे या कवितेत आहेत. भूतकाळ आणि वर्तमान हा सांधता येत नाही. तो अलग राहतो. याची दुखरी जाण या कवितेत आहे. उखडलेले बालपण आणि विस्कटलेल्या वर्तमानाच्या नोंदी कवितेत आहेत. ‘ जुन्या काळाचे प्रमेय उमजले नाही, आता तर काळच कालबाह्य झालाय/ स्थित्यंतराला अवकाशाचं वरदान नाही/ वेग खेचत राहतो मला अनिर्बंध अरेरावीने ‘ या काळ जाणिवेची चैतन्यरहित गोठवलेली आक्रमण रूपे कवितेत आहेत.
या अस्थिर काळामुळे गाव आणि शहर, भूत आणि वर्तमान यात ताण आहे. दंद्व आहे. ‘ गाव आपलं म्हणत नाही/ शहर आपलंसं वाटत नाही/ मागे दूर क्षितिजावर राहिलेले गाव/ आणि समोर शहराचं मृगजळ/ शहर तोंडी लावत ओरपलेले बीभत्स नॉस्टॅल्जियाचे भुरके ‘ या पद्धतीने गाव आणि शहर यातील अंतरायाची जाण व्यक्त झाली आहे. स्मृतीच्या राशी आणि अधिभौतिकाचीही जाणीव रूपे या कवितेत आहे. इतिहास आणि संस्कृती चिंतनाचे अनेक पदर या कवितेत आहेत. तसेच तिशीच्या बखरीतले ताळेबंदीचे हे आख्यान आहे. त्यात भीती, कुतूहल आणि संभ्रम या त्रिदल दर्शंनातून गतकाळ आणि वर्तमानाचा धांडोळा घेतला आहे.
रूपाचे चिरेबंदी भान या कवितेस आहे. या कवितेची शब्दकळा नित्य नवी आहे. प्रतिमा आणि प्रतिकांचा त्यात अभिनव वापर आहे. अंतरीकतेची रूपे कवितेत आहेत. लिरिकल वळणाची ही कविता आहे. एक समृद्ध ज्ञानसंपन्न ही कविता आहे. ‘ रात्रीतल्या दीर्घकवितेला मात्र सापडू नये कधीच ठावठिकाणा गद्य पहाटेचा ‘ किंवा ‘ कवितेला असंख्य पाय फुटल्याचं / काल पुन्हा एकदा स्वप्नात पाहिले ‘ अशा ध्यासाची ही कविता आहे.
पुस्तकाचे नाव – औटघटकेची युगांतरं (कवितासंग्रह)
कवी – प्रविण अक्कानवरू
प्रकाशक – हस्ताक्षर प्रकाशन गृह, नांदेड
मुखपृष्ठ चित्र – वेदा पंडित
पृष्ठे- १३२
किंमत –२०० रुपये
संपर्क- विनायक येवले ९०९६९९९८६५