November 30, 2023
Tourist BIrds and Tree in Kashmir Traveling article Prashant Satpute
Home » काश्मिर सफरीतील.प्रवासी, पक्षी अन् वृक्ष…
फोटो फिचर

काश्मिर सफरीतील.प्रवासी, पक्षी अन् वृक्ष…

काश्मिर पर्यटनात प्रशांत सातपुते यांना इथे भेटलेले प्राणी, पक्षी, वृक्षसंपदा अन् त्यांना आलेले अनुभव यावर आधारित लेख….

हिंदी चित्रपटातून नेहमीच पाहिलेली पिवळी जर्द ‘मोहरीची शेती’ इंदोर ते जम्मू रेल्वे प्रवासात पाहावी असे वाटत होते. परंतु, ती मोहरीची, सूर्यफुलाची शेती पाठीमागे धावत होती. जम्मू येथे सुरुवातीलाच काली माता मंदिर परिसरात वानरसेनेने सलामी देत आमचे स्वागत केले. अगदी वाहनाच्या टपावरील प्लास्टिक कागद उचकटून ! कुठेही पर्यटनाला जा, तेथे हे आपले वंशज आपल्या स्वागताला हजर असतातच. हा अनुभव नवा नाही.

Trees in Kashmir
Trees in Kashmir

पर्वत शृंखलेत उंच सरळ रेषेत वाढलेला देवदार हा वृक्ष सर्वत्र आढळतो. त्यापासून बॕट बनवली जाते. शिवाय डेरेदार पसरलेला चिनार हा देखील नित्याचाच बनलेला. फर, पाईन ही वृक्षसंपदाही सोबतीला ठरलेली आहे. सफरचंदाची लागवड ही तेथील प्रमुख उत्पन्न देणारी शेती आहे. झाडावर लगडलेली लाल सफरचंद पहायचा खरा हंगाम सप्टेंबर-आॕक्टोबरचा असतो. सफरचंदाच्या या बागेत छायाचित्रे घेण्यासाठी येथील शेतकरी दहा ते वीस रुपये शुल्क आकारतो. केशराच्या प्रत्येक फुलातील पुंकेसर म्हणजेच केशर होय. या महागड्या केशरने मोठा रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.

इमारतीच्या प्रांगणात वा अन्य रस्त्यांकडेला विविध रंगाचे कश्मिरी गुलाब हे आणखी एक इथलं वैशिष्ट्यं आहे. दल सरोवराच्या भोवतीने हे पांढरट, पिवळसर, गुलाबी टपोऱ्या गुलाबांचे ताटवेच्या ताटवे दिसतात. शंकराचार्यांच्या मंदिराकडे जाताना अशाच गुलाबातील मकरंद गोळा करताना मधमाशी दिसली. पुढे ती मुघल गार्डनमधील टुलीपवर्गीय फुलातील मकरंद घेतानाही आढळली.

“ज्यावेळी मधमाशी या जगातून संपेल त्यानंतर अवघ्या चार वर्षानंतर मनुष्य जातीचे अस्तित्वच संपुष्टात येईल.” असे अल्बर्ट आइंस्टीन म्हणतो. सपुष्प वनस्पतींना मधमाशीचा होणारा स्पर्श हा परिस स्पर्शापेक्षा कमी नसतो. फल धारणेसाठी पर परागीकरणात महत्वाची भूमिका पार पाडत असते.

हे मंदिर उतरुन येताना जापनीज टीट हा पक्षी दिसला. डोके, गळा आणि छाती पूर्ण काळा तर, चेहऱ्याच्या दोन्ही बाजू पांढऱ्या शुभ्र होत्या. पंख, शेपूट अणि पाठीकडील भाग राखाडी तर, पोटाकडील भाग पांढरट होता. मानेभोवती काळी कडा होती.

Kashmir Birds Prashant Satpute
Kashmir Birds Prashant Satpute

शासनाच्या फूलशेती विभागाच्या नेहरु स्मारक वनस्पती बागेच्या दारातच गरुड फांदीवर बसलेला. शिकाऱ्यातून दल सरोवराचा फेरफटका मारतानाही घार आणि गरुड पहायला मिळालीत. अगदी तेथील पाणकोंबडींच्या पिलांवर नजर ठेवून असलेले.

दल सरोवर हे पक्षांची मेजवानी ठरलेले. ध्यानस्तपणाचे सोंग घेतलेले गायबगळे इथेही दिसले. बदक आणि पाण कोंबड्या आपल्या पिलांसह विहारताना अन्न साखळीतील टपलेल्या घारी आकाशात घरघरत होत्या. तर, हाऊसबोटीत आपल्या हालचालीने जागे करणारी बर्न स्वालो अर्थात निळी, जांभळी, तपकीरी, काळसर, राखाडी, पांढरट छटेची अणि शेपटीला दोन तारा असणारी पाकोळी भेटली. उगीचच इकडून तिकडे पाण्यावर भिरभिरत होती. सूर्योदयात ती अधिक चमकदार दिसत होती.

सिंधू नदीच्या काठावर चहा-पानसाठी थांबल्यावर जंगली मैना अर्थात साळुंखी बिनधास्तपणे जवळून कॕटवाॕक करत होती. कोवळ्या आक्रोडाची झाडे तर, हाॕटेलभोवतीच पहायला मिळाली.

पश्मिना बकरा गुणी ‘सलमान’ सोबत छायाचित्रे काढण्यासाठी आम्ही पर्यटक पैसे देत उत्सुक होतो. कटरा येथे माता वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाताना पुन्हा वानरसेना होतीच. शिवाय ती बिनधास्तपणे यात्रेकरूंजवळ वावरत होती. या ठिकाणी हरीण आणि जंगलात राहणारा हिमालयीन कालीज तितर दिसला. तकतकीत निळसर-काळा पिसारा असलेला, डोक्यावर तुरा, डोळ्याभोवती लाल रंग, पोट अणि छातीकडे पांढरट राखाडी पिसांचा देखणा तितर प्रथमच कितीतरी वेळ पहात होतो.

कटराहून इंदोरकडे परतीच्या प्रवासात विशेष करुन पंजाबमधून जाताना विशिष्ट झाडांची शेती केल्याचे दिसले. काही ठिकाणी मध्यम वाढीची ही झाडे पाहून ती पेरुची असावीत असे सुरुवातीला वाटले. पण, ती सरळ उंच वाढलेली झाडे पाहून पेरुची बाग नसून, सागाची असावी, असे वाटले. त्याविषयी इतर सहप्रवाशांना खास करुन सरादारजींना विचारले असता, ती सफेदाची शेती असल्याचे म्हणाले. आपल्याकडे जशी सागवान शेती करतात, तशीच ही सफेदाची फायदेशीर शेती असल्याची माहिती मिळाली. शिवाय तेथील रोप वाटिकेमधून सर्वत्र रोपे पाठवली जात असल्याचे त्यांनी सांगितले. फर्निचरसाठी याचा मोठा वापर होतो.

एकूण या पर्यटनातील हे ‘सांगाती’ ज्ञानात नवी भर घालून तर गेलेच, अन् आठवणीच्या पटलावर स्मृती कायम कोरुन राहिल्या त्या वेगळ्या.!

– प्रशांत सातपुते

Related posts

सूर्य ग्रहण – सावल्यांचा खेळ

सेल्फी वूईथ म्हस !!!

पोवारी बोली संवर्धनासाठी सामुहिक प्रयत्नाची गरज – ॲड. लखनसिंह कटरे

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More