October 18, 2024
Book Review of Ankush Kadam book by Ajay Kandar
Home » Privacy Policy » या भारताची मातृभूमी कोणती?
मुक्त संवाद

या भारताची मातृभूमी कोणती?

Ankush Kadam book conference
Ankush Kadam book conference

रविवार 13 ऑक्टोंबर 2024 रोजी सावंतवाडी येथे कार्यकर्ते अंकुश कदम लिखित ‘हस्तक्षेपाच्या कणखर भूमीतून’ या ग्रंथावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने या ग्रंथाची बलस्थाने उलगडून दाखविणारे हे लेखन !

अजय कांडर
लेखक विख्यात कवी, व्यासंगी पत्रकार आहेत. 9404395155

अलिकडल्या दहा वर्षात राजसत्तेने भांडवलशाहीच्या केंद्रस्थानी सर्व व्यवस्था आणून ठेवल्यामुळे या देशातच आपोआप दोन देश निर्माण झाले आहेत. एक देश आहे कष्टकऱ्यांचा – शोषितांचा; ज्यांना एका दिवसाच्या रोटीचाही प्रश्न सोडवता येत नाहीय. तर दुसरा देश आहे भांडवली व्यवस्थेचा आणि या व्यवस्थेला चंगळवादी वृत्तीतून प्रोत्साहित करणाऱ्या मध्यमवर्गाचा. हा मध्यमवर्ग ज्या व्यवस्थेचा पाठीराखा झाला आहे त्या सगळ्यांची भारत ही मातृभूमी आहे. पण ती संकुचित राष्ट्रवादाची ! मात्र यात अक्षरशः भरडल्या गेलेल्या कष्टकऱ्यांची – शोषितांची भारत ही मातृभूमीच नाही की काय ? असे वाटावे एवढा संघर्ष आता या वर्गाला करावा लागत आहे. टोकाचे अस्मितावादी राजकारण, जात – धर्मभीमानी राष्ट्रवादाला मिळालेले प्रोत्साहन, महापुरुषांचे विकेंद्रीकरण, वैचारिक मतभेदाचा कडेलोट आणि विशेष म्हणजे भांडवलशाही व्यवस्थेची पाठराखण करताना या व्यस्थेचेच केले जात असलेले केंद्रिकरण. या सगळ्यामुळेच हा देश कधी नव्हे एवढा दुभंगला गेला आहे. अंकुश कदम या विचारशील कार्यकर्त्याचा ‘हस्तक्षेपाच्या कणखर भूमीतून ‘ हा नवा ग्रंथ वाचताना त्यांनी हीच आजच्या कळीच्या प्रश्नांची प्रगल्भ अशी मांडणी केली आहे. कार्यकर्ता म्हणून काम करू पाहणाऱ्या आणि असे काम करतानाही स्वत:च्या वर्तुळाच्याही पलीकडे न पाहणाऱ्या अनेकांनी हा ग्रंथ आवर्जून वाचायला हवा !

अंकुश कदम हे शोषित, कष्टकरी लोकवर्गासाठी काम करणारे कृतीशील कार्यकर्ते. पक्की भूमिका आणि नाही रे वर्गाच्या बाजूने लढण्याचे धाडस यामुळे हा कार्यकर्ता तळकोकणात गेल्या पंचवीस वर्षात एक चांगले संघटन उभारू शकला. हे करताना त्यांनी कायम महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांच्या विविध चळवळींना जोडून घेतले. यामुळे कोकणातील प्रश्नांना वाचा फोडायला त्यांना चांगले बळ मिळाले. पण याहीपलीकडे त्यांना व्यवस्थेच्या हस्तक्षेपाचे राजकारण काय असते हे चांगले माहीत आहे. त्यामुळे सामजिक काम करणे म्हणजे स्वतःच्या प्रतिष्ठेची ओझी वाहणे नाही. त्यासाठी प्रसंगी ‘जात – धर्माच्या, व्यक्तिगत अहंकाराच्या पलीकडे जावून समाज हितासाठी व्यापक भूमिका घेणे गरजेचे आहे.

या संदर्भात त्यांची वैचारिक बैठक पक्की असल्याचेही ‘हस्तक्षेपाच्या कणखर भूमीतून ‘ हा ग्रंथ वाचल्यावर स्पष्ट होते. क्रांतिज्योती प्रकाशनतर्फे या ग्रंथात एकूण २० लेखांचा समावेश आहे. हे सर्व लेखन म्हणजे ब्राह्मणी वर्चस्वाला छेद आणि अब्राह्मणी व्यवस्थेची चिकित्सा आहे. दुर्दैव असे की आपण आपली म्हणजे बहुजनच स्वतःची चिकित्सा करायला कमी पडल्याने आणि सांस्कृतिकीकरणाने प्रत्येकाला वरच्या वर्गात जायची घाई झाल्याने बहुजनांची सगळीच व्यवस्था मोडकळीस आल्याचे या लेखनातून स्पष्ट होते.

अंकुश कदम हा कार्यकर्ता आंबेडकरवादी असला तरी त्यांचा कम्युनिस्ट पर्यंतचा प्रवास महत्त्वाचा आहे. अण्णाभाऊ साठे आंबेडकरवादी कार्यकर्ते कलावंत होते परंतु ते कम्युनिस्ट होते. त्यामुळे उपेक्षितांमध्येही ते उपेक्षित राहिले असे या लेखनात कॉ. कदम दाखवून देताना दुसऱ्या बाजूला खुद्द कदम यांच्यावरही अशीच टीका करणाऱ्या संकुचित गटबाजीला त्यांनाही सामोरे जावे लागले आहे. तरीही हा कार्यकर्ता स्वतःच्या विचार भूमिकेवर अविचल निष्ठा ठेवून ठाम उभा राहिला. म्हणूनच असे समष्टीला कवेत घेऊ पाहणारे लेखन ते करू शकले. हे येथे आपण समजून घ्यायला हवे.
शोषितांना आवाज देतानाच दुसऱ्या बाजूला जातीअंताच्या चळवळीत आंबेडकर आणि कम्युनिस्ट विचारधारा महत्त्वाची ठरते. या पार्श्वभूमीवर कॉ. अंकुश कदम यांनी कॉ. शरद पाटील यांची विचारधारा महत्त्वाची मानल्यामुळे त्या चिंतनातूनही या लेख संग्रहात मांडणी केली गेली आल्याने या लेखनाला एक वैचारिक बैठक प्राप्त झाली आहे.

याचे कारण ते फक्त सामाजिक चळवळीशी बांधिलकी मानत नाहीत तर जातवर्ग स्त्री दास्यत्वाच्या चळवळीत कायमच ते अग्रभागी राहिलेले आहेत. साहित्य, संस्कृती, शिक्षण यातही त्यांनी योगदान दिले आहेच. त्यामुळेच त्यांना समग्र भान येत गेले. यामुळेच विशेषतः हे लेखन करताना आत्मटिकेलाही त्यांनी महत्त्व दिले. ‘अजेंडा नसलेली रिपब्लिकन चळवळ ‘ या लेखनात त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या बहुस्तरसत्ताक राजनीतीच्या सापळ्यात रिपब्लिकन नेतृत्व अडकले आणि थिटे झाले. यातून डॉ. आंबेडकरांच्या स्वप्नातल्या पक्षाची वाताहात सुरू झाली ती अद्याप पर्यंत थांबलेली नाही. मात्र आजची पिढी प्रस्थापित राजकीय नेतृत्व विरुद्ध बंडखोरी करत नाही याचा अर्थ फुले आंबेडकरी विचार परंपरेने जे भान दिले ते भान आजची पिढी विसरली गेली आहे असे म्हणता येणार नाही. असेही त्यांनी निरीक्षण नोंदवले आहे.

ankushkadam
ankushkadam

छत्रपती शिवाजींचे प्रतीक: वारसदारांनी गमावलेली संधी हा एक लेख या ग्रंथात आहे. शिवाजी महाराजांचे प्रतीक ब्राह्मणी वर्गाच्या ताब्यात असल्याची खंत त्यांनी मांडली आहे. जाती अस्मिता आणि मर्यादित वर्गापुरतेच महापुरुषांना ठेवले की त्यांचे काय होते हे आपण वारंवार अनुभवत आहोतच. शिवाजी महाराजांबाबत हाच अनुभव येत आहे. शोषणमुक्त चळवळीला शिवाजी महाराजांचे प्रतीक जोडले गेले असते तर आज झेंडे हातात घेणारे बहुजन दांडे हातात घेऊन स्वतःच्या हक्कावरच स्वार झाले असते.

ज्येष्ठ अभ्यासक प्रा. उमेश बगाडे यांची प्रदीर्घ प्रस्तावना ही या ग्रंथाचे मोल वाढविते. ते म्हणतात, माफुआचा इतिहासविचार आत्मसात केल्यामुळे समकालीन फॅसिस्ट संक्रमणाच्या सूक्ष्मतांना भिडणे कॉ. कदम यांना सहज शक्य झाले आहे. ब्राह्मणवादाची विचारसरणी व सांस्कृतिक यंत्रणा समकालीन समाजातील ब्राह्मणवादाची भूमिका भांडवलशाही बरोबरचे तिचे आंतरिक संबंध प्रभुत्वप्राप्तीचे तिचे राजकारण तिने सुरू केलेल्या जमातवादी राजकारणाच्या पोटात असलेले जात पितृसत्ताक प्रभुत्वाचे राजकारण या सर्वांची नीट उकल कदम यांनी या लेखनात केली आहे. त्यामुळेच ब्राह्मणी विचार परंपरेच्या कणखर भूमीवर उभे राहून हस्तक्षेपाच्या राजकारणाची भूमिका आपल्या लेख संग्रहातून त्यांनी जाहीर केली आहे.

प्रा. बगाडे यांचे म्हणणे बरोबरच आहे. आहे रे वर्गाचे असमतावादी राजकारण विस्कटून दाखविणे हे कॉ.अंकुश कदम यांच्या ‘हस्तक्षेपाच्या कणखर भूमीतून’ या ग्रंथातील लेखनाचे मूळ प्रयोजन आहे. आज भारत ही ‘नाही रे वर्गाची भूमीच नाही’. अशी परिस्थिती निर्माण होणाऱ्या कारणांचा शोधही कॉ.कदम आपल्या या लेखनातून घेत असल्यामुळे ते ज्या आजच्या बलदंड व्यवस्थेत हस्तक्षेप करू पाहतात तो हस्तक्षेप अधिकाधिक होत राहिला पाहिजे. याचे भान मात्र हे ग्रंथ लेखन देते. एवढे आपण निश्चित खात्रीने म्हणू शकतो.

पुस्तकाचे नाव – हस्तक्षेपाच्या कणखर भूमीतून
लेखक – अंकुश कदम
प्रकाशक – क्रांतीजोती प्रकाशन
किंमत – 280 रुपये


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading