October 18, 2024
Kavivarya Rendalkar Library Literary Award for the year 2023 has been announced
Home » Privacy Policy » कविवर्य रेंदाळकर वाचनालयाचे सन २०२३ चे साहित्य पुरस्कार जाहीर
काय चाललयं अवतीभवती

कविवर्य रेंदाळकर वाचनालयाचे सन २०२३ चे साहित्य पुरस्कार जाहीर

रेंदाळ , जि. कोल्हापूर – येथील कविवर्य ए. पां. रेंदाळकर वाचनालयाच्या वतीने २०२३ सालासाठीचे विविध साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले.

वाचनालयाच्या वतीने कोल्हापूर परिसरातील ज्येष्ठ आणि उल्लेखनीय अशा दोन लेखकांचा त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल सन्मान करण्यात येतो. यावर्षी ज्येष्ठ लेखक आप्पासाहेब खोत आणि नव्या पिढीतील आश्वासक नाटककार हिमांशू स्मार्त या दोघांची निवड केली आहे.

आप्पासाहेब खोत (जन्मः १९५५) यांनी कथा, कादंबरी आणि ललित गद्य अशा प्रकारांत संख्येने विपुल आणि लक्षणीय असे लेखन केलेले आहे. त्यांचे आतापर्यंत सुमारे वीसहून अधिक ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या ‘रानगंगा’, ‘माती आणि कागूद’ या दोन ग्रंथांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. याबरोबरच महाराष्ट्रातील नामवंत संस्थांचे वीसहून अधिक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे. खोत यांचे ‘गवनेर’, ‘महापूर’, ‘काळीज विकल्याची गोष्ट’ हे कथासंग्रह, ‘पळसफूल’, ‘गावपांढर’ या कादंबऱ्या तर , ‘अनवाणी पाय’, ‘कुणब्याची पोरं’, ‘चांदवडी रुपया’ इ. ललित गद्याची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

हिमांशू स्मार्त (जन्मः १९७४) हे नव्वदीनंतरच्या कालखंडातील नाटक या प्रकारातील महत्त्वाचे आणि एक आश्वासक नाव. ‘वाटले होते काही मैल’, ‘प्रदर्शन’, ‘परफेक्ट मिसमॕच’ या नाट्यसंग्रहांबरोबरच, ‘गंधाचे मौन’, ‘अवंडबराच्या निचऱ्याचे प्रकरण’ ही ललित गद्याची पुस्तके प्रकाशित आहेत. स्मार्त यांच्या अनेक नाट्यकृतींना प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर अनेक महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ‘जत्रेतील जायंटव्हील’ या नाटकासाठी महाराष्ट्र फाऊंडेशन, एशिएटिक सोसायटी मुंबई यांची डॉ. टिकेकर अभ्यासवृत्ती, झी नाट्यगौरव पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव केला आहे.

सन २०२३ च्या ग्रंथ पुरस्कारांसाठी कविता या प्रकारातील पुरस्कार अनिल धाकू कांबळी (नांदगाव, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) यांच्या ‘इष्टक’ या कवितासंग्रहास जाहीर झाला . ‘कादंबरी’ या प्रकारासाठीचा पुरस्कार पी. विठ्ठल (नांदेड) यांच्या ‘संभ्रमाची गोष्ट ‘ या कादंबरीस, तर कथासंग्रहासाठीचा पुरस्कार महादेव माने (खंडोबाची वाडी – भिलवडी ता. पलूस, जि. सांगली) यांच्या ‘वसप’ या ग्रंथाला जाहीर करण्यात आला. रोख रक्कम रुपये तीन हजार आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

या पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातील सुमारे नव्वदहून अधिक लेखक- कवींनी आपली पुस्तके पाठविली होती. या पुरस्कार निवड समितीत डॉ. रफीक सूरज, डॉ. गिरीश मोरे आणि डॉ. गोपाळ महामुनी यांनी काम पाहिले. पुरस्कार वितरण समारंभाची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल असे वाचनालयाचे अध्यक्ष श्री. आर. एम. पाटील (सर) यांनी सांगितले.

वसपची पाठराखण

महादेव माने यांची कथा ग्रामीण माणसांच्या दुःख आणि ताणतणावातून निर्माण झालेली आहे. रानशिवारातील शेतकरी-शेतमजुरांचे जीवघेणे कष्ट, विवंचना आणि समस्या चित्रणाची ही कथा आहे. अभावग्रस्त माणसांच्या करुण कहाण्यांनी हा कथाप्रदेश व्यापलेला आहे. एका अर्थाने शेतकरी समाजातील माणसांच्या अगतिकतेची ही कथा आहे. शेतीच्या जीवापाड जपणुकीतून येणारे उत्पन्नस्वप्न आणि या स्वप्नभंगातून येणाऱ्या गडद निराशेच्या चित्राने या कथेस वेगळी परिमाणे मिळाली आहेत. या कथेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शेतमजूर आणि पशुपालन जगाच्या सहजीवनाचा तसेच अडचणींचा आलेख या कथेत आहे. म्हशी, शेरडं, करडं आणि शेतकरी यांच्यातील परस्परावलंबित्वाची ही कथा आहे. पाळीव पशूंच्या मरणछायेतील व्याकूळतेचे त्यास संदर्भ आहेत. परंपराशील शेती आणि श्रद्धाभावावर झालेल्या आधुनिकतेतील सुरुंगरूपी आघात, कटररूपी आक्रमणांच्या नोंदी या कथेत आहेत. याबरोबरच शेती जीवनातील विविध कारणांमुळे उद्भवलेल्या मानसिक चिंताभ्रमभयाची ही कथा आहे. 'पैसा' केंद्री रासायनिक शेतीने उद्भवलेले प्रश्नदेखील या कथेतून प्रकटलेले आहेत. शेतीसंस्कृतीविषयीचे हे प्रवाही वेधक असे कथन आहे. माने यांच्या कथेत संवादाचा आणि परिसरबोलीचा प्रभावी वापर आहे. ग्रामीण परिसरातील वातावरण निर्मितीचा गतिशील चित्रफलक सतत हिंदोळता ठेवला आहे. एका अर्थाने 'वसप' रूपी संकट छायेखाली वाढलेल्या खुरट्या, निर्मितीहीन जीवांची ही कथा आहे. या कथेचे वर्णन ग्रामीण माणसांच्या व्यथाकथा आणि 'रंजीस' कथा असेही करता येईल. या कारणांमुळे महादेव माने यांची कृष्णाकाठची कथा मराठीत वैशिष्ट्यपूर्ण व नवीनतम ठरते.

- प्रा. रणधीर शिंदे

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

1 comment

सुहास रघुनाथ पंडित. सांगली. October 17, 2024 at 12:36 PM

पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन

Reply

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading