दान देणे हा शेतकरी कुटुंबाचा स्वभाव आहे. घरात आलेला पाहुणा मोकळ्या हातानं कधीही माघारी जाणार नाही याची काळजी घेतली जाते. कोणतीही अपेक्षा न ठेवता हे दान दिले जाते. हे दान ते झाकतात. याची वाच्यता ते कोठे करत नाहीत. शेती करतानाही हाच विचार त्यांच्यात असतो.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
नाना कृषीवळु लपवी । पांघुरवी पेरिलें ।
तैसें झांकी निपजले । दानपुण्य ।। 206 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 13 वा
ओवीचा अर्थ – अथवा शेतकरी पेरलेले बीज जसें माती टाकून झाकतो, त्याप्रमाणे तो आपल्या हातून झालेलें दान आणि पुन्य झाकतो.
कृषी म्हणजे शेती. वळू म्हणजे कसणारा, वळणारा. संत ज्ञानेश्वरांनी येथे शेतकऱ्यांना कृषीवळु असे म्हटले आहे. शेतकऱ्यांचा स्वभाव कसा असतो ? कोणत्याही ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकरी कुटुंबाकडे भेट द्या. तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल. जाताना ते तुम्हाला कधीही मोकळया हाताने परतू देत नाहीत. घरात असणारा धान्याचा कण तरी ते तुम्हाला देतीलच. गुळाची ढेप, शेतातील ताजी भाजी किंवा परसातील झाडाला लागलेले एखादे तरी फळ तुमच्या हातावर ठेवतातच. पावशेरभर डाळ, गहू, तांदूळ हे काही तरी देण्यास ते कधीही विसरत नाहीत. काहीच नाही मिळाले, तर वळचणीला ठेवलेला शिल्लक भोपळा तरी देतातच. काहीच देण्यासारखे उरले नसेल तर लहान मुलांच्या हातावर पाच-पन्नास रुपये तरी ते ठेवतातच. शेतकरी कुटुंबात हा गुण तुम्हाला पाहायला मिळतोच.
दान देणे हा शेतकरी कुटुंबाचा स्वभाव आहे. घरात आलेला पाहुणा मोकळ्या हातानं कधीही माघारी जाणार नाही याची काळजी घेतली जाते. कोणतीही अपेक्षा न ठेवता हे दान दिले जाते. हे दान ते झाकतात. याची वाच्यता ते कोठे करत नाहीत. शेती करतानाही हाच विचार त्यांच्यात असतो. पेरणी करताना धान्य कोठे उघडे पडले आहे का हे पाहतात. धान्य उघडे पडले तर ते व्यवस्थित उगवत नाही. त्याची वाढ होत नाही. ते वाया जाते. दानाचेही असेच आहे. दान उघडे केले तर त्यापासून प्रेमाचा अंकुर फुटत नाही. दानाची वाच्यता केली तर तो व्यवहार होतो. दानाची मोजदाद केली तर ते दान राहत नाही.
शेतकऱ्यांच्या स्वभावातच मुळी प्रेम आहे. व्यवहारातही प्रेम ओसंडून वाहते. मुक्या जनावरांच्यावरच तो प्रेम करतो. ही जनावरे त्याला देवतेसमान असतात. त्यांचे कुटुंब त्याच्यावर उपजीविका करते. दुसऱ्यावर प्रेम केले तर तोही आपणास प्रेम देतो. मारकुटी म्हैस मालक जवळ आला तर त्याला मारत नाही. कारण तो मालक तिच्यावर जिवापाड प्रेम करतो याची तिला जाणीव असते. प्रेमाने जग जिंकता येते. शहरातील व्यक्तींची दुःखे ऐकून शेतकऱ्यांचे मन हेलावते. अशा या त्याच्या हळव्या स्वभावाचा फायदा घेणारेही अनेकजण आहेत.
शेतकऱ्यांची फसवणूक ही त्याच्या ह्या स्वभावमुळेच होते. पण फसगत झाली म्हणून दुःख करत बसत नाही. हे त्याच्या स्वभावात नाही. तो एकदा फसेल. वारंवार त्याला फसवण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकणार नाही. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाता येत नाही. दान देतो म्हणून वारंवार त्याच्याकडून अपेक्षाही ठेवणारे फसतात. दान कोणाला करायचे हे शेतकरी चांगल्याप्रकारे जाणतो. दिसेल त्याला तो दान देत नाही. पण दान देणे हा धर्म तो कधीही सोडत नाही. दानाची मोजदाद तो करत नसल्याने ते वाया गेले तर त्याचे दुःख त्याला होतच नाही. दान देण्यात जो आनंद असतो तो दानशूरपणा मिरविण्यात नाही, हे तो जाणतो.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.