April 25, 2024
Article on Swadharma in Vishwache aart by Rajendra Ghorpade
Home » स्वधर्म कोणता ?
विश्वाचे आर्त

स्वधर्म कोणता ?

मी आत्मा आहे, हे जाणणे हाच प्रत्येकाचा धर्म आहे. तोच स्वधर्म आहे. याचे आचरण करून आत्मज्ञानी होणे हेच खरे स्वधर्माचे पालन आहे. हा मानव जन्म हा यासाठी आहे. 

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

म्हणोनि ऐकें पांडवा । हा स्वधर्मु कवणें न संडावा ।
सर्वभावें भजावा । हाचिं एकु ।। १४३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय ३ रा

ओवीचा अर्थः म्हणून अर्जुना ऐक, आपला हा धर्म कोणी सोडू नये. काया वाचा मने करून ह्या एकाचेंच आचरण करावे.

स्वधर्म कोणता ? स्वतः लाच स्वतःमध्ये पाहणे हाच स्वधर्म आहे. म्हणजे काय ? स्वतःचे रूप स्वतःच पाहणे. मी कोण आहे ? जग मला एका नावाने ओळखते. माझे जगात नाव आहे. इंटरनेटच्या माध्यमातून आता नाव जगभर पोचवता येते. एकाक्षणात तुमचा पराक्रम जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊ शकतो. आता जग जवळ आले आहे. आपण टाकलेली एखादी पोस्ट एकाक्षणात सर्वांना पोहोच होते. जगात आपला नावलौकिक होतो. पण जग ज्या नावाने मला ओळखते तो मी आहे का ? याचा अभ्यास करण्याची गरज आहे. याचा विचार करणे गरजेचे आहे. म्हणजेच स्वः चा विचार करणे आवश्यक आहे.

नावामध्ये काय आहे. मृत्यूनंतर फक्त नावच उरते. तो मी आहे का ? तो नाही तर, मग मी कोण आहे ? हा प्रश्‍न स्वतःच स्वतःला विचारायला हवा. यावर विचारमंथन करायला हवे. जग जिंकायला निघालेल्या एका शुराला भारताच्या सीमेवर एका साधूने हा प्रश्‍न विचारला होता. त्याला राग आला. त्याने त्या साधूला उलटे टांगले. पण तरीही साधूने त्याला उपदेश देणे सुरूच ठेवले. साधू म्हणाला, स्वतः प्रथम कोण आहेस याचा विचार कर ? स्वतःवर विजय मिळव. तेव्हाच तू सर्व जग जिंकशील. या साधुच्या विचाराने तो शूरवीर अस्वस्थ झाला. पण त्याच्या डोक्‍यात हा विचार घोळू लागला. साधुच्या बोलण्याचा अर्थ त्याला कळेना. त्याने विचारलेल्या प्रश्‍नांचे उत्तर त्याला सापडेना. शेवटी त्याने नतमस्तक होऊन त्या साधूला या प्रश्‍नाचे उत्तर विचारले.

तो साधू म्हणाला, तू एक प्रदेश जिंकलास, उद्या दुसरा प्रदेश जिंकशील. असे करून तू जग जिंकल्याचा स्वाभिमान मिरवत असशील. पण तू स्वतःला जिंकू शकलास का ? स्वतः कोण आहेस याचा विचार कधी केला आहेस का ? अरे, तू केवळ एक आत्मा आहेस. या तुझ्या देहात हा आत्मा आला आहे. तोच आत्मा माझ्याही देहात आहे. सर्व प्राणीमात्रामध्ये तो आत्मा आहे. सर्व चराचरामध्ये त्याचे वास्तव्य आहे. तो देहात येतो आणि जातो. पण तो अमर आहे. त्याला मृत्यू नाही. त्याला जन्मही नाही. तो नाशवंत नाही. अविनाशी आहे. तो आत्मा तू आहेस. हे तू जाणण्याचा प्रयत्न कर. हे जाणणे हाच तुझा खरा धर्म आहे. हा तुझा स्वतःचा धर्म आहे. हे जेव्हा तुला समजेल तेव्हा तू स्वतः अमर होशील. तेव्हा तू खरे जग जिंकले असे समज. ज्याने स्वतःवर जय मिळविला, त्याने सर्व जगावर विजय मिळवला. मी आत्मा आहे, हे जाणणे हाच प्रत्येकाचा धर्म आहे. तोच स्वधर्म आहे. याचे आचरण करून आत्मज्ञानी होणे हेच खरे स्वधर्माचे पालन आहे. हा मानव जन्म हा यासाठी आहे.

Related posts

2022 वर्ष अखेर आढावा : पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालय

नवदुर्गाः ‘दि ग्रेट मॅन.. अरूणाताई..’

गोरबंजारा समाजाची निसर्गपूजक विज्ञानवादी होळी

Leave a Comment