संग्रहातील सहापैकी तीन कथा ह्या नायिकाप्रधान आहेत. ग्रामीण मुलींचे मनोबल वाढविणा-या ह्या कथा आहेत. स्त्रीसक्षमीकरणाचा संदेश देणाऱ्या ह्या कथा आहेत. सहकार्य, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, समजूतदारपणा आदी मूल्यांचा संस्कार बिंबविणा-या ह्या कथा आहेत.
डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांनी कथा आणि कादंबरीच्या क्षेत्रात मोलाची भर घातली आहे. सध्या त्यांच्या ‘पाचोळा’ ह्या पहिल्या कादंबरीचा सुवर्णमहोत्सव साजरा होतो आहे. अगदी अलीकडेच त्यांनी आपला मोर्चा बालसाहित्याकडे वळवला आहे. दरवर्षी त्यांची बालकादंबरी आणि बालकथेची उत्तमोत्तम पुस्तके नियमित येत आहेत. त्यांचा ‘शाळेची वाट’ हा बालकथासंग्रह पुण्याच्या संस्कृती प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. ह्या संग्रहात एकूण ६ बालकथा आहेत.
पहिली ‘आम्हीच आमच्या भाग्यविधात्या’ ही शालेय विद्यार्थिनींचे मनोबल वाढविणारी संस्कारक्षम बालकथा आहे. हर्षदा आणि रेणू ह्या दोघी मैत्रिणी. जिजामाता माध्यमिक शाळेत नववीत शिकणाऱ्या. दोघीही सावध, धीट आणि कणखर स्वभावाच्या. एक मुलगा रेणूला एकटी गाठून तिच्यासोबत सेल्फी काढू इच्छित होता. सेल्फी काढून तिचा गैरफायदा घेण्याचा त्यांचा डाव होता. हर्षदाच्या मदतीने रेणूने प्रसंगावधान राखत, मोठ्या हिमतीने त्यांचा डाव उधळून लावला. मुख्याध्यापकांच्या मार्फत पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुंडा गैंगला जेरबंद केले. रेणू आणि हर्षदाच्या सावधगिरीमुळेच हे शक्य झाले. पोलीस आयुक्तांच्या हस्ते ह्या दोघींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ह्या कथेच्या माध्यमातून लेखकाने मुली ह्या अबला नाहीत, तर आपणच आपल्या भाग्यविधात्या आहेत, स्वसंरक्षणासाठी सक्षम आहेत, हा प्रेरणादायी संदेश दिला आहे.
‘शाळेची वाट’ ह्या कथेचा नायक आहे मल्हार नावाचा एक शाळकरी मुलगा. एकदा तो घाईघाईत शाळेला जात असताना एक आजोबा चक्कर येऊन रस्त्यावर पडतात. मल्हारने प्रसंगाचे गांभीर्य ओळखून, समयसूचकतेने त्या आजोबांना रिक्षातून दवाखान्यात दाखल केले. मल्हारच्या तत्परतेमुळे घेवारे आजोबांना वेळेवर औषधोपचार मिळाले आणि त्यांचे प्राण वाचले. हे आजोबा म्हणजे डॉ. घेवारे यांचे वडील. आजोबांनी ह्या उपकाराची लवकरच परतफेड केली. शाळेत जाऊन मुख्याध्यापकांच्या हस्ते मल्हारला रोख बक्षीस दिले. मुख्याध्यापकांनी भाषणात मल्हारचे खूप कौतुक केले. बोराडे गुरुजींनी दाखविलेली वाट ही केवळ साक्षर करणाऱ्या शाळेची वाट नाही, तर ही सद्गुणांची पायवाट आहे.
‘आंघोळीचा घोळ’ ही एक मजेदार गोष्ट आहे. प्रतीक हा तसा हुशार मुलगा आहे. त्याने सकाळी आंघोळ केली आहे, पण त्याचे सगळे मित्र त्याला तू आज आंघोळ केली नाहीस, असे सांगतात. प्रतीकलाही ते खरे वाटू लागते. आई रागावल्यावर सगळे मित्र सांगतात, प्रतीक आठवणीचा पक्का नाही, हे आम्हाला त्याला पटवून द्यायचे होते. पुस्तकी ज्ञानाबरोबरच स्वतःवरचा विश्वासही महत्त्वाचा असतो, हेच मित्रांनी प्रतीकच्या लक्षात आणून दिले.
पूर्ण माहिती न घेता माणूस कधीकधी उगीचच गैरसमज करून घेतो. ही काही चांगली गोष्ट नाही. ‘नको थारा गैरसमजाला’ ही अमेय आणि मंगेश ह्या दोन मित्रांची ह्रदयस्पर्शी गोष्ट आहे. एके दिवशी मंगेश अमेयच्या घरी जातो. अमेयच्या आईने आपल्याला खायला प्यायला काही विचारले नाही, म्हणून तो नाराज होतो. गैरसमज करून घेतो. नंतर अमेयच्या आईचा आजार आणि दु:ख समजल्यावर तो खजील होतो. यापुढे वस्तुस्थिती समजून घेतल्याशिवाय कोणाविषयीही मनात गैरसमजाला थारा देणार नाही, असा मनाशी निर्धार करतो. जीवनाविषयीची ही जाण फारच महत्त्वाची आहे.
मॅट्रिक झालेली अंकिता घरच्या गरिबीमुळे पुढचे शिक्षण घेऊ शकत नाही. मोलमजुरी करणारी विधवा आई तिला शिकवू शकत नाही. अशा परिस्थितीत अंकिता आपली टी. सी. काढून घरी आणून ठेवण्याचा विचार करते. ही गोष्ट तिच्या मैत्रिणींना समजते. त्या सगळ्या मिळून अंकिताचा शैक्षणिक खर्च भागविण्याची हमी देतात आणि तिला आपल्या कॉलेजात प्रवेश मिळवून देतात. ‘आम्ही मैत्रिणी’ ही एक सहवेदना जागविणारी, सहकार्याचा संदेश देणारी आनंदपर्यवसायी गोष्ट आहे.
‘राखोळी’ म्हणजे रखवाली करणे. खेड्यात सामान्यतः गाईगुरं राखोळी दिली किंवा घेतली जातात. ‘राखोळी’ ह्या कथेचा नायक धना हा एका कर्जबाजारी शेतकऱ्याचा शाळकरी मुलगा आहे. धनाच्या वडलांना आत्महत्येच्या विचारांनी घेरले आहे. एकान्तात ते मनोविकल होतात. सैरभैर होतात. शाळकरी धनाला आणि मजुरी करणाऱ्या त्याच्या आईला ही गोष्ट समजते. धना शाळा सोडून बापाची रखवाली ( राखोळी) करतो. इटुकला धना बापाशी गप्पा मारतो. त्यांना सोबत घेऊन खेळतो. जेवतो. बापाला आत्महत्येच्या विचारांपासून परावृत्त करतो. धनामुळे एक कुटुंब सुखी होते. ह्या कथेत लेखकाने बापलेकाच्या प्रेमाची ताकद अधोरेखित केली आहे.
संग्रहातील सहापैकी तीन कथा ह्या नायिकाप्रधान आहेत. ग्रामीण मुलींचे मनोबल वाढविणा-या ह्या कथा आहेत. स्त्रीसक्षमीकरणाचा संदेश देणाऱ्या ह्या कथा आहेत. सहकार्य, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, समजूतदारपणा आदी मूल्यांचा संस्कार बिंबविणा-या ह्या कथा आहेत. ज्या वयात लिहिताना हात थरथरतात, हातात लेखणी धरता येत नाही, अक्षर नीट वळत नाही, अशा वृद्धावस्थेत बोराडे गुरुजींनी ह्या कथा लिहिल्या आहेत. ह्या लेखनात पक्व फळांच्या बिया आहेत. काही सांगायचे राहून गेले, लिहायचे राहून गेले, असे वाटायला नको, म्हणून बोराडे गुरुजी लिहितात. बोराडे गुरुजींची ही लेखननिष्ठा अतुलनीय आहे. सुनील मांडव यांचे आकर्षक मुखपृष्ठ आणि गिरधारी यांच्या कथाचित्रांनी पुस्तकाचे सौंदर्य वाढविले आहे.
पुस्तकाचे नाव – ‘शाळेची वाट’ ( बालकथासंग्रह)
लेखक : रा. रं. बोराडे
प्रकाशक – संस्कृती प्रकाशन, पुणे. (मोबाईल – 9823068292)
पृष्ठे : ४८ किंमत रु. १००