October 10, 2024
Avinash pasati book review by chandrakant Potdar
Home » Privacy Policy » ‘ अविनाशपासष्टी ‘ : सामाजिक मन:स्थितीचे वर्तमान चित्रण
मुक्त संवाद

‘ अविनाशपासष्टी ‘ : सामाजिक मन:स्थितीचे वर्तमान चित्रण

अविनाश सांगोलेकर यांची कविता वर्तमानाच्या अनेक प्रश्नांसह प्रेमातल्या विरहालाही अधोरेखित करते. काळ , विचार,भावना, सामाजिक बांधिलकी, शिक्षक, समाज , माणूस, शब्द, प्रेम, राग, विद्रोह , ‘ स्व ‘ चा शोध , आत्मसंवादी रूप, अशा असंख्य विषयांना करत ही गझल स्वतःचं वेगळेपण जपते, भावगर्भ आशयातून आंतरिक विश्व गडद करते. समकाळाच्या पडझडीबरोबर सामाजिक – सांस्कृतिक मूल्यांचे संदर्भ आणि मानवाला जोडून ठेवणारी मूल्यांच्या संवर्धनाची जपणूक करत या गझलेनं समृद्ध भावाशय मांडला आहे.

डॉ.चंद्रकांत पोतदार ( हलकर्णी , जि.कोल्हापूर)

गझलकार अविनाश सांगोलेकर हे मराठी गझलसृष्टीतलं महत्त्वाचं नाव. ‘ अविनाशपासष्टी ‘ हा अलीकडेच प्रकाशित झालेला त्यांचा महत्त्वाचा गझलसंग्रह. नेमक्या आणि मोजक्या शब्दांमध्ये वाचकमनावर विचार बिंबवताना गझलकार हा विरह – इशारा – ज्ञान – प्रबोधन अशा विविध पातळ्यांवर काही समजूतदारपणे सांगतो, हे इथं पदोपदी जाणवतं. एखादा इरादा मांडणं, त्यातल्या आशय – विषयाची दिशा पकडणं आणि गझलेची विविध वृत्तं सांभाळत निष्ठापूर्वक काही सांगणं, हे गझलेत महत्त्वाचं असतं. कारण गझल काही सूचित करत असते. गझल हे एक चिंतन असतं.समजूतदारपणा आणि सामाजिक संदेशासाठीची सावधगिरी यातून काही विचार पेरणारी गझल एक माध्यमरूपात व्यक्त होणारी वाड्मयीन जाणीव आहे. समाजव्यवस्था, ढोंगी आणि लबाड लोकांचे वेगळेपण, चंगळवाद, भोगवादी संस्कृती या सगळ्यात पिचून गेलेला सामान्य माणूस गझलेच्या केंद्रस्थानी आहे. त्याचे अस्वस्थणे गझलकाराला चिंतनीय वाटते. अशा वेळी समाजाविषयीची आस्था संवेदनशील मनात निर्माण होते. तीच ही गझल होय.

दु:ख कुरवाळणं एरव्ही चांगलं नाहीच मुळी. मात्र दु:खाला येणारा रंग अंतरंगाला छेडत राहतो. यंत्रवत झालेले जग , माणुसकीचा ऱ्हास,पायदळी तुडवली जाणारी जीवनमूल्यं, वैचारिक अधोगती, मानवा – मानवांमधला संघर्ष, धूळफेक करणारी दुनिया, सहजपणे ढळणारे अश्रू,मनाची सैरभैर अवस्था, टोळ्यांचं राजकारण अशा असंख्य गोष्टींचं व्यापकत्ध गझलकार खूप नेमकेपणानं लिहितो. ” यंत्रापुढेच सारे हे विश्व वाकलेले,

माणूस जाणण्याचा आता रिवाज नाही! “( पृ.३५ ) यांसारख्या ओळीतून यंत्रयुगाची हुकूमत आणि सामान्य माणुसकीचा होत निघालेला पराभव खंतावल्या मनाने गझलकार लिहितो. या सगळ्यात स्वतःला छिलून घेणं खूप महत्त्वाचं असतं. एका अर्थानं गझलकाराची गझल ही छिलतच असते. ” बोलायचे तर बोल ना !
आता स्वतःला सोल ना ! “(पृ. ४५) एवढ्यात एक भाव व्यक्त होतो. मात्र लगेच पुढच्या ओळी अचूक भान देतात , ” पाहू नकोस अशी मला ,
जाईल माझा तोल ना ! “(पृ. ४५) ही प्रेमाची गुंतागुंत, दुरावा आणि विरह या भावनांसह ती व्यक्त होते. जीवनात चढ – उतार असतातच. काळाच्या बरोबरीनं जगताना सुखदुःखाला कवेत घेऊनच जगावं लागतं. दु:खाला कुरवाळताना सुखही असावं वाटणं गैर नाही.मात्र त्यातून स्वतःला आधार देणं , खंबीर बनवणं खूप महत्त्वाचं असतं. यासाठी दु:खालाही इशारा द्यावाच लागतो.
” दारात रोज दु:खा , येऊ नकोस आता !
देण्या तुला न काही , घरटेच ओस आता !”

संपेल रात्र मित्रा, होऊ नकोस भित्रा,
येणार सूर्य आहे , अंधार सोस आता ! “(पृ. ४९)
इथं दु:खाबरोबर मनाचीही समजूत आहे. प्रश्नाबरोबर उत्तर असावं, तसं रात्र संपून सकाळ उजाडणार आहे, काळ्याकुट्ट अंधारानंतर उजेडाचा सूर्य येणारच आहे,हे दैनंदिन जगण्यातले प्रामाणिक सूत्र गझलकार खूप खुबीनं सांगतो. काळ , वेळ , विचार , भावना , संवेदना , स्वतःची भूमिका या सगळ्यात एक विश्व दडलेलं आहे. त्याच्या अंतरंगात शिरून नम्रता , विनम्रता याचे भान गझलकार पटवून देतो. दु:ख आणि आनंद, आयुष्यातली जगण्याविषयीची ऊर्मी आणि एखाद्या प्रश्नामुळं येणारं ग्रासलेपण यातून खुशालचेंडू जगणं हाताशी राहात नाही.माणूस स्वस्त होतो.माणसाची गणती शून्यवत होते.कुणीही अमर नाही. तरीही अमरत्वासाठीची धडपड मोठी असते.वाटसरूचं खस्ता खात जगणं , सूर्याचं अस्ताला जाणं, विश्वात्मक पातळीवरच्या दुकानातून बस्ता काढणं, माणसाचं स्वस्त होणं , या सगळ्या गोष्टी कशासाठी , हा गझलकाराचा प्रश्न अंतर्मुख करतो.कधी ना कधी आपण जाणारच असतो.तरीही ओढ कशासाठी,हे नेमकेपणानं गझलकार लिहितो.

” जाणार प्राण आहे, देहातुनी अखेरी ,
चालू परंतु साऱ्या , गस्ता खुशाल येथे ! ” (पृ.५०)
असे असले , तरी आपण सखोल काही बोलायला हवं , हे आंतरिक सूत्र महत्त्वाचं आहे.आंधळे कायदे आणि पांगळे राज्यकर्ते, तहांची बोलणी , युद्धजन्य परिस्थिती, भ्रष्ट व्यवस्था, तख्त फोडणारे हात , सज्जनांचा घात आणि दुर्जनांचा ऊत , या घटनांमुळं होणारी मनाची अस्वस्थ घालमेल एकूणच व्यवस्थेविरुद्ध व्यक्त होते.सभ्यता आणि संस्कृती यांचा नाश, जन्मदात्यांची मुलांना होणारी अडचण, माणसाचा बनलेला श्वापद , अंधश्रद्धांचं पेव , माणसाला माणसाकडूनच होणारा छळ , जुन्या – जाणत्यांची वाटणारी अडगळ , असमानता येणारी गझल असल्यानं तिचा किंवा अशा गझलांचा समावेश यात केला असावा.

एकूणात , अविनाश सांगोलेकर यांची कविता वर्तमानाच्या अनेक प्रश्नांसह प्रेमातल्या विरहालाही अधोरेखित करते. काळ , विचार,भावना, सामाजिक बांधिलकी, शिक्षक, समाज , माणूस, शब्द, प्रेम, राग, विद्रोह , ‘ स्व ‘ चा शोध , आत्मसंवादी रूप, अशा असंख्य विषयांना करत ही गझल स्वतःचं वेगळेपण जपते, भावगर्भ आशयातून आंतरिक विश्व गडद करते. समकाळाच्या पडझडीबरोबर सामाजिक – सांस्कृतिक मूल्यांचे संदर्भ आणि मानवाला जोडून ठेवणारी मूल्यांच्या संवर्धनाची जपणूक करत या गझलेनं समृद्ध भावाशय मांडला आहे. प्रेम, माणुसकी यांचे तुटत किंवा विरळ होत निघालेले नाते गझलकाराइतकंच वाचकालाही अस्वस्थ करते. या सर्वच गोष्टींना ‘ अविनाशपासष्टी ‘ तून अनुभवता येते. ग्रंथालीच्या निर्मितीचं वेगळंपणही कायम आहे.

पुस्तकाचे नाव – अविनाशपासष्टी ‘ (गझलसंग्रह)
लेखक : अविनाश सांगोलेकर
प्रकाशक – ग्रंथाली , मुंबई,
पृष्ठे : ९६ , मूल्य : रु. १००


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading