September 9, 2024
Shahu Maharaj Memory article by Raosaheb Pujari
Home » शाहूंनी चांदीचे खोरे वापरून केला रेल्वे कार्याचा प्रारंभ
मुक्त संवाद

शाहूंनी चांदीचे खोरे वापरून केला रेल्वे कार्याचा प्रारंभ

कोल्हापूर सारख्या संस्थानाच्या राजा म्हणून राज्याभिषेक झाल्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी दुसऱ्या दिवशी संस्थानचे लोककल्याणकारी काम म्हणून कोल्हापूर ते मिरज या रेल्वेमार्गाची पायाभरणी केली होती. राजर्षी शाहूंचा पहिला समारंभ होता. याप्रसंगी शाहू महाराजांनी चांदीचे खोरे वापरून कोल्हापूर स्टेट रेल्वेच्या कार्यास प्रारंभ केला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज महोत्सवानिमित्त या इतिहासाचा घेतलेला आढावा…

रावसाहेब पुजारी

संपादक, शेतीप्रगती मासिक

कोल्हापूर रेल्वे राजर्षी शाहूंचा पहिला जाहीर समारंभभारतात कार्यक्षम प्रशासनासाठी 1849 साली पहिल्यादा रेल्वे सेवा सुरू झाली जी.आय.पी. रेल्वे म्हणजेच ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे कंपनीने ही जबाबदारी घेतली होती. त्यानंतर काही वर्षांनी ब्रिटीश सरकारने दौंड, पुणे येथून एक रेल्वेमार्ग सातारा, कोल्हापूर, बेळगाव, गोवा, हुबळी, बंगळूरला जोडण्याची योजना तयार केली. कोल्हापूर-मिरज रेल्वेमार्ग योजना मुंबई सरकारने फेब्रुवारी, १८७९ मध्ये मंजूर केली. हे काम लवकर पूर्ण करण्याचा संकल्प कोल्हापूर संस्थानच्या कौन्सिल आफ ॲडमिनीस्ट्रेशन यांनी घेतला. तेव्हा कोल्हापूर संस्थानचे रिजंट म्हणून राजर्षी शाहू महाराजांचे जनक पिता जयसिंगराव ऊर्फ आबासाहेब घाटगे होते. या रेल्वे मार्गाची पायाभरणी हा राजर्षी शाहू यांच्या कार्यकिर्दीतील पहिला जाहीर समारंभ होता. कोल्हापूर सारख्या संस्थानाच्या राजा म्हणून राज्याभिषेक झाल्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी दुसऱ्या दिवशी संस्थानचे लोककल्याणकारी काम म्हणून कोल्हापूर ते मिरज या रेल्वेमार्गाची पायाभरणी केली होती. राजर्षी शाहूंचा पहिला समारंभ होता. याप्रसंगी शाहू महाराजांनी चांदीचे खोरे वापरून कोल्हापूर स्टेट रेल्वेच्या कार्यास प्रारंभ केला.

भाषणात ते म्हणाले, सर्व लोकांच्या संबंधीचे काम करण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग आहे. त्या कामी आपण मला मेहेरबानी करीत आहात. त्याबद्दल मी आपले आभार मानतो. जे थोडेबहुत शब्द बोलण्यास मला सुचविले आहे, ते मी बोलण्याचा प्रयत्न करतो. हे आगगाडीचे काम तडीस गेल्याने माझ्या राज्याची संपती साधने वाढण्याच्या कामी त्यांचा फायदेशीर परिणाम होईल, अशी माझे उमेद आहे, की साहजिक रीतीने घडून येणाऱ्या क्रमाप्रमाणे आजपासून तीन वर्षाच्या आत हा आगगाडीचा रस्ता करण्याचे काम माझ्या हातून होईल. कोल्हापूर स्टेट रेल्वे प्रकल्पाचे ४८ किलोमीटर म्हणजे २८ मैल लांबीच्या प्रकल्पाचे भूमिपूजन गुरूवारी ३ मे, १८८८ ला सायंकाळी साडेपाचला शाहूपुरीतील माळरानावर म्हणजेच सध्याच्या कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी झाले. कार्यक्रमास खास निमंत्रित म्हणुन युरोपियन अधिकारी, संस्थानचे मानकरी, अधिकारी, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या रेल्वे प्रकल्पाचा प्राथमिक खर्चाचा अंदाज २२ लाख ७५ हजार रूपये होता. रेल्वेमार्ग बांधणीसाठी मुख्य अभियंता म्हणून आर. जे. शानन यांची कोल्हापूर संस्थानने नेमणूक केली आणि कोल्हापूर स्टेट रेल्वे नावाने ही योजना आखली गेली.प्राथमिक अंदाजाप्रमाणे तीन वर्षाच्या कालावधीत कोल्हापूर ते मिरज हा २८.३/४ मैलाचा म्हणजे ४८ किलोमीटरचा मार्ग बांधण्यात कोल्हापूर दरबारने यश मिळविले. पंचगंगा आणि कृष्णा नदीवरचे छोटे-मोठे पूल व मोऱ्या यांची संख्या ७५ वर गेली. प्रकल्प तीन वर्षात पुर्णत्वास गेला. यावरून कोल्हापुरी जिद्द व चिकाटी दिसून आली. एक राजा लोहमार्ग बांधतोय, याचेच सगळ्यांना अप्रुप होते. या रेल्वेमार्गासाठी सुरवातीस लाकडी स्लिपर वापरण्याचे ठरविले होते. पण नंतर लोखंडी स्लिपरचा वापरण्याचे ठरले. त्यामुळे वाढीव आर्थिक तरतूद करणे आवश्यक ठरले. अपेक्षित खर्च २२ लाख ७२ हजार २५० रूपयांवरून २३ लाख ५ हजार १२३ रूपयांपर्यंत वाढला. पण राजर्षी शाहू महाराजांची आपल्या संस्थानच्या विकासाविषयीची तळमळ व महत्त्वाकांक्षा यामुळे हे मोठे कार्य निर्विघ्नपणे पार पाडले. या कार्यासाठी मिरजेच्या राजेसाहेबांची हद्द कृष्णा नदीपर्यंत होती. हा मार्ग त्यांच्या अखत्यारीत असूनही त्यांनी या कामी संस्थानकाला सक्रिया सहकार्य केले.कोल्हापूर-मिरज रेल्वेमार्गावर सुरूवातीला रूकडी, हातकणंगले व उदगाव ही स्थानके होती. उदगाव स्थानकाचे कालांतराने नामकरण शिरोळ रोड झाले. त्यानंतर १९१७ मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी आपले जनकपिता जयसिंगराव यांच्या स्मृतिनिमित्त जयसिंगपूर स्थापन केले. त्यानंतर जयसिंगपूर रेल्वे स्थानक असे नामांतर झाले. रूकडीजवळ पंचगंगा नदीवर पंचगंगा नदीवर, तसेच उदगावनजीक कृष्णा नदीवर दोन मोठे पूल बांधले गेले.

कोल्हापूर-मिरज प्रवास झाला सोपा –..

  • रेल्वे सुरू झाली तेव्हा डब्यात फक्त बसण्याची सोय होती. विजेचे दिवे व पंखे नव्हते. फर्स्ट क्लास, सेकंड क्लास आणि थर्ड क्लास असे वर्ग होते. थर्डक्लासच्या डब्यात मलमुत्र विसर्जनाची सोय नव्हती. युरोपियन लोकांसाठी स्वतंत्र डबा असे…
  • कोल्हापूर-रूकडी दोन आणे, हातकणंगलेस दोन आणे नऊ पैसे, जयसिंगपूरला चार आणे नऊ पैसे व मिरजेस सहा आणे तीन पैसे असे तिकीट होते…
  • कोल्हापूर स्टेट रेल्वे या नावाने ओळखली जाणारी ही रेल्वे कालांतराने मद्रास आणि सदर्न मराठा रेल्वेच्या तर २ आक्टोंबर, १९६६ पासून द.म. रेल्वेच्या आणि १ एप्रिला, २००४ पासून मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या नियंत्रणाखाली आहे…
  • १९४७ ला देश स्वतंत्र झाल्यानंतर मीटरगेज मार्गाचे रूंदीकरण करण्याचे ठरले…
  • १९६८ मध्ये पुणे-मिरज रेल्वेमार्गाचे रूंदीकरण ब्राडगेजमध्ये करण्याचे निश्चित झाले. पण कोल्हापूर-मिरज रेल्वेमार्ग मीटरगेजच राहणार होता. यावेळी शाहूपुरी मर्चंटस असोसिएशनचे कै. शांतिनाथ पाटणे, बाबूभाई पारीख, कोल्हापूर नगरपालिकेने आग्रही मागणी केली. ११ मे, १९७१ रोजी कोल्हापूर-मुंबई मार्गावर धावणारी प्रतिष्ठेची महालक्ष्मी एक्सप्रेस धावू लागली…
  • ७ नोव्हेंबर, १९६८ ला कोल्हापूर-मिरज-पुणे रेल्वेमार्ग ब्राडगेज रूपांतर प्रारंभ देशाचे गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी रेल्वेमंत्री सी. एम. पुनाचा, मुख्यमंत्री वसंतराव नाईक व शांतिनाथ उर्फ तात्यासाहेब पाटणे यांच्या उपस्थितीत मिरज येथे प्रारंभ समारंभ झाला… कोल्हापूर-मिरज या मार्गावरील मीटरगेजची शेवटची गाडी ९ मे, १९७१ ला सुटली…
  • कोल्हापूर-मिरज मार्गाचे ब्राडगेजमध्ये रूपांतर झाल्यानंतर श्री शाहू मार्केट येथे मालवाहतुकीसाठी ठे गुडस यार्ड गूळ मार्केट या नावाने उभारले गेले.

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

लिखित आशयाचं काय करायचं ? उत्तर हवंय. मग वाचाच..पॉडकास्टिंग

काळ्या हळदीचे औषधी उपयोग

क्रोध, अहंकाराच्या विकारावर अशी करा मात…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading