मालवणचा निसर्ग देखणा आहे. निळा सागर, निळे आकाश, वनस्पतीने झाकलेले हिरवे डोंगर, समुद्र आणि खाडी काठावरील माडांच्या बागा सौंदर्यात भर घालतात. या निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या लोकांत चित्रकार, मूर्तीकार निर्माण झाले नसते तर नवल नाही. शैक्षणिक बाबतीत मालवण गेल्या शतकाहूनही अधिक काळ अग्रेसर आहे.
– लक्ष्मण राजे
मुंबई
मालवण शहराला मोठेपणा मिळाला आहे. सिंधुदुर्गामुळे. हे शहर आणि दुर्ग यांचे अतूट असे नाते आहे. एकमेकांच्या आधाराने ही दोन्ही ठिकाणे मोठ्या दिमाखाने उभी आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा दुर्ग बांधला. तो काळ सव्वा तीनशे वर्षापूर्वीचा होता. त्याकाळी मालवण ही वाडी होती. शहर नव्हते मालवणपासून सहा मैल दूर असलेल्या नांदरुख गावची मालवण ही छोटी वाडी, अवघी अडीचशे वस्तीची होती. तेव्हा नांदरुख गावाचे महत्व फार होते. कारण नांदरुख गाव या भागातील मुख्य बाजारपेठ होती.
“कोंडीच्या भाटी आणि भाटीच्या कोंडी”‘
निसर्ग नियमानुसार सृष्टीमध्ये बदल होत असतात. जेथे डोंगर असतो तेथे काही काळानंतर सपाट जमीन होते जेथे माडाच्या मोठ्या बागा असतात त्या समुद्राच्या आक्रमणाने पाण्यात गडप होतात. खाड्यांचा किनारा खचून रुंदी वाढते. कधी वाळू साचून बेट तयार होते. खाडीचे किंवा नदीचे समुद्राच्या अंतर्गत धरणीकंपामुळे प्रवाह बदलतात. होत्याचे नव्हते व्हायला निसर्गातील बदल कारणीभूत होतो म्हणूनच मालवणी म्हण आहे. “कोंडीच्या भाटी आणि भाटीच्या कोंडी”‘
मालवण, नांदरुखची छोटी वाडी !
मालवण, ही नांदरुखची छोटी वाडी होती. या वाडीच्या स्वरुपाबद्दल लिखित माहिती उपलब्ध नाही. परंतु काही पडके अवशेष, जुनी देवळे आणि आज हयात असलेली जुनी वृध्द मंडळी यांच्या आठवणींच्या आधारे या वाडीवर प्रकाश टाकता येईल. सिंधुदुर्ग बांधला जाण्याचे आधी मालवण शहराचा मेढा आणि देऊळवाडा या भागातील दीड दोन मैलाचा सारा भू-भाग दलदलीचा आणि अंशत: पाण्याखाली होता. आज शहरात जे पूर्व – पश्चिम समांतर रस्ते आहेत आणि ज्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ आहे. त्या ठिकाणी समुद्र होता. वाहतूक होडीने चाले गलबते या ठिकाणी नांगरून असत मालवण वाडीत तेव्हा दोन ठिकाणी वस्ती होती एका टोंकाला देऊळवाडा येथे सातेरी घाटीचा पायथा होता. आणि दुसरे टोक मेढे कोट हे होते. आज या भागाला मेढा या नावाने ओळखतात.
रोझरी चर्च
कळकीच्या बांबूनी वेढलेले मेढा हे बेट होते. सुरवातीला येथे वस्ती भंडारी आणि मच्छिमार समाजाची होती. नंतर ही वस्ती बाहेरून येणाऱ्या माणसांमुळे वाढली.गोव्यात पोर्तुगीज, इंग्रज यांच्या आमदनीत बाटवाबाटवीचे प्रकार होते. जुलुम जबरदस्ती चालू होती या छळामुळे आणि धर्मांतराच्या भीतीने हिंदू समाजातील स्वाभिमानी व धर्माबद्दल निष्ठा असणारे लोक गोमांतकामधून जवळच्या भागात पळून गेले. त्यापैकी काही कुटुंबे आपले देव घेऊन मालवणात आली. त्याकाळी जाती श्रेष्ठतेचे वाद होतेच. मालवणात पळून आलेले मुख्यत: सारस्वत वैश्य व तेली या जातीपैकी होते. आपणास श्रेष्ठ म्हणवणारी मंडळी तेली समाजाला कनिष्ठ मानून आपणामध्ये सामावून घेण्यास तयार नव्हती, त्यामुळे तेली समाज बहिष्कृत झाला. त्यांना अस्पृश्यांसारखी वागणूक मिळू लागली आणि या असहकारीत वागणुकीला कंटाळून तेली समाजानें ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. या तेली समाजाची हिंदू देवी निर्मला माता ही ख्रिश्चन झाली. आजही मालवणच्या बंदर रस्त्यावर या मातेचे मंदिर आहे. ख्रिश्चन या देवीला भजतात पण या मंदिराला चर्चची मान्यता नव्हती. तरीही आज रोझरी चर्च अशी पाटी या ठिकाणी आहे.
आदिलशाहीची जुलमी राजवट
तो तीनशे वर्षांपूर्वीचा काळ, महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी शत्रुच्या ताब्यात होती.जंजिऱ्याचा सिद्दी, गोव्याचे पोर्तुगीज फिरंगी आणि मुंबईचे इंग्रज टोपीकर यांचे या किनाऱ्यावरील सर्व बंदरावर नेहमी हल्ले होत असत. परकी सत्ता. कुणीही सशस्त्र यावे, लुटालूट करावी आणि या अत्याचारामुळे मानहानीचे जीवन कंठावे, अशी समाजाची अवस्था होती तेव्हा आदिलशाहीचे राज्य होते. समुद्र किनारी राहाणाऱ्या वस्तीला दोन शत्रू होते. एक आदिलशाही जमिनीवरून आणि समुद्रमार्गे सिद्धी, इंग्रज, पोर्तुगीज. मालवण येथे या सागरी टोळ्यांचा फार उपद्रव होता लोक सतत हवालदिल, भयग्रस्त असत. तसे आदिलशाहीचे सैनिक खंड वसुलीसाठी गावोगाव फिरत. वीस पंचवीस घोडेस्वार हाती नंग्या तलवारी घेवून येत. त्यांचे सोबत आदिलशाहीचे मांडलिक म्हणून सावंतवाडीचे लखम सावंत असत. तेव्हा प्रजेला एवढी दहशत होती की लोक ही धाड येत असल्याचे समजले की घरे सोडून जंगलात पळून जात. हे सैनिक या लोकांना पकडून आणीत कोणी खंडणीचे पैसे देण्यास कबूल झाला नाही की, त्यांना पालथे पाडून पाठीवर काटेरी फांदी ठेवून त्यावर दगड ठेवीत.
शिवरायांच्या रुपाने प्रकाश
मालवणात त्यावेळी राहणारे कुलकर्णी मध्यस्थाची भूमिका घेत. आलेल्या स्वारांची सरबराई राखीत. त्याकाळचे सावकार कुशे, मालप, सापळे हे होते. या मध्यस्थांमार्फत सैनिक, मांडलिकांशी तडजोड होत असे. ही गावची खंडणी सोन्याच्या रुपात दिली जात असे. या सावकार वर्गाला खोत म्हणत. हीच ती कोकणातील खोती पद्धत. मालवणात आजही खोत आडनावाची घराणी आहेत. अशा रीतीने खुष्कीच्या मार्गाने तसेच सागरी मार्गाने शत्रुंचे दुहेरी थैमान चालू होते. उजाडत होते. मावळत होते. परंतु प्रजेच्या जीवनात आनंदाचा प्रकाश कधी दिसत नव्हता. तो प्रकाश शिवरायाच्या रुपाने दिसला.
शिवाजी महाराजांची राजवट
शिवाजी महाराजांनी सिद्धीशी झालेल्या संघर्षात अपयश येताच, सारा कोकण किनारा आपल्या सत्तेखाली आणण्याचा निर्धार केला त्यांनी कुलाबा ते गोव्याच्या सरहद्दीपर्यंत आरमारी नाकी बसवली. संरक्षक दुर्ग बांधण्यांची योजना हाती घेतली. १६५८ ते १६६४ या काळातील मोहीम, १६६४ मध्ये मालवण हस्तगत झाल्यावर पूर्ण झाली. शिवरायांच्या सैन्याने साळशी महाल म्हणजे वेंगुर्ले, मालवण ते मसुरे भगवंतगड पर्यंतचा टापू जिंकला. जिंकलेल्या प्रदेशाचे रक्षणासाठी सैन्य ठेवले. समुद्रमार्गे शत्रूंना तोंड देण्यासाठी, मालवणातील मायनाक, मयेकर, सावजी, कुबल आदी भंडारी व मच्छिमार समाजातील तरुण निवडले. त्याना गनिमी काव्याने लढण्याचे शिक्षण दिले ती गनिमी लढाईची पद्धत मनोरंजक आहे. ज्याला प्रशिक्षण दिले जात असे त्याला शिक्षणात पारंगत झाल्याबद्दल ताम्रपट दिला जाई.
मालपांचा वाडा
या किनारी चाचेगिरी करणारे शत्रू, बारा गलबतांचा तांडा व खलाशी घेऊन येत असत. त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी हे छोटया नौका ( डुबके ) नऊ इंची व बारा इंची तोफा घेऊन जात असत. असे सुसज्ज डुबके ( नौका ) पाठोपाठ असत. ही शत्रूची गलबते मारगिरीच्या कक्षेत आली की आघाडी शत्रूंच्या गलबतांवर तोफा डागतअसे. ते गलबत बुडाले की त्यावरील खलाशी आणि इतर गलबते आणि त्यावरील माल ताब्यात घेत असत. नंतर शिवरायाचे हे नौकादल किनारी मालवणचे सावकार कुशे, सापळे यांचे वाड्यासमोर नांगरुन ठेवले जात असे. तो लुटीचा माल मोजला की सावकार त्या मालाचा चौथा हिस्सा सरकार जमा करीत, बाकी राहीलेला माल ऐवज या लढाई करुन जिंकणाऱ्या सैनिकांना सारख्याच हिश्याने वाटीत असत. या लुटीचा हिशेब ठेवण्याचे काम मालवणचे मालप सरदार यांच्याकडे असे. मालपांचा वाडा म्हणून अद्यापही पडक्या वाड्याकडे बोट दाखवता येते. लुटीचा हा माल वाड्यातील तळघरात ठेवला जाई.
सागराला समांतर बाजारपेठ
१६६६ साली मालवणचा सिंधुदुर्ग किल्ला बांधून पूर्ण झाला आणि मालवण वाडीचे क्षेत्र व वस्ती वाढू लागली. या दुर्गामुळे दक्षिण वारा अडला. त्यामुळे समुद्रकिनारी लाटांचा मारा कमी झाला आणि वाळुचे थर साचू लागले. समुद्र मागे हटला. पूर्व – पश्चिम असा लांब रुंद जमिनीचा पट्टा तयार झाला. वस्ती वाढली. घरे बांधली, सागराला समांतर अशी बाजारपेठ वसली. हेच ते आजचे मालवण शहर तो पर्यंत मुख्य गाव नांदरुख होते. मालवणात प्रथमपासून राहत असलेले लुडबे या घराण्याची नांदरुखच्या चव्हाण घराण्याशी सोयरिक झाली आणि या विवाहात चव्हाण यांना मालवण जवळील कर्लाचा व्हाळ, आनंद व्हाळ ही बागायत लुडबे यांनी दिली. नंतर चव्हाण मालवणात स्थायिक झाले. पाठोपाठ मराठे आले. राणे, गांवकर हेही आले. पोर्तुगीजांच्या धार्मिक जाचाला कंटाळून काही सारस्वत, वैश्य घराणी आपापले देव घेऊन आले.
पावणाई देवीची स्थापना
शेती, बागायत हे उत्पन्नाचे साधन होते. परंतु एक उणीव होती. तेव्हा मालवणात ग्रामदैवत ‘रामेश्वर’ नव्हता दोन देवळे होती. पूर्वेला सातेरी आणि पश्चिमेला पाण्यात देऊळ असलेली ‘काळबादेवी’ सातेरीचे पुजारी लुडबे व काळबादेवीचे पुजारी धुरी. मूळ देवस्थानाशिवाय गावाला शोभा नाही म्हणून त्या काळच्या रुढीप्रमाणे कांदळगांव व आचरे येथील रामेश्वराला विचारणा झाली. त्या देवाचे औसराने मालवणातील श्रीदेव रामेश्वराच्या स्थापनेला कबुली दिली नाही. त्यानंतर अणावगावच्या रामेश्वराने देवीच्या स्थापनेला कबुली दिली आणि अणावकर या नावांच्या ‘पंचाक्षराने, देऊळवाडा येथे पावणाई देवीची स्थापना केली. व अणावकर हे मालवण येथे स्थायिक झाले.
“मार ढोलावर काठी देवाक बोलावया. “
मालवण शहरातील देऊळवाडा या ठिकाणी ग्रामदेव रामेश्वर, नारायण, भवानी व मारुती ही देवळे मालवणातील जुन्या काळातील सावकार मंडळीनी बांधली अशी आख्यायिका आहे. ज्या सावकाराना संतती नसे, ते देवाकडे गार्हाणे घालण्यासाठी येत. देवळाचा गुरव ढोलकऱ्यांना बोलवी, आणि सांगत असे “मार ढोलावर काठी देवाक बोलावया. ” ढोल जोरजोरात वाजू लागले की औसर उभे राहत असे गुरव देवाला विचारी “लेकरु तुझ्या पायाशी आले आहे. त्याला संतती नाही त्याची इच्छा देवाने पुरी करावी. त्याची काय चुकी असेल तर माफी करावी. मुलगा झाल्यावर तुझ्या शेजारी देऊळ बांधीन.”
असा वसले मालवण
मालवणात बांधलेली देवळे देवाला लावलेल्या कौलांची प्रतीके आहेत. देवळे बांधली, देव स्थापिले, मग देवाची त्रिकाळ पूजा, नैवेद्य हे प्रश्न उभे राहिले. त्यासाठी नारायणाचे पुजारी काकतकर, रामेश्वराचे गुरव रावळ यांना आणले. पुराण वाचायला आणि धार्मिक कार्ये करण्यासाठी पुराणिक, जोशी, अभ्यंकर ही ब्राम्हण मंडळी येथे स्थायिक झाली. त्या सर्वाना भातशेतीची जमीन निर्वाहासाठी नेमून दिली गेली. रांधण्यासाठी घरे बांधून दिली. मूळ देव स्थापनाऱ्या अणावकर यांना नव्वद एकर जमीन दिली. इतर घाडी नौबत करणारे व सेवेकरी भावीण यांनाही जमिनी दिल्या. शिवाजी राजांच्या कारकिर्दीत मालवणच्या वस्तीला संरक्षण मिळाले. स्थैर्य लाभले. सर्व जाती धर्मांचे लोक व्यापार, मच्छिमारी, मिठागरे इत्यादी व्यवसायांच्या निमित्ताने मालवणात आले. मुसलमान वस्तीसाठी मशीद उभारली. ख्रिश्चनांसाठी प्रशस्त जागेमध्ये चर्च बांधले, आणि येथील वैशिष्ट असे आहे की सर्व धर्माचे लोक पूर्वी व आजही इथं सलोख्याने वागत आहेत.
देऊळवाड्यात टिळकांचे शिक्षण
मालवणचा निसर्ग देखणा आहे. निळा सागर, निळे आकाश, वनस्पतीने झाकलेले हिरवे डोंगर, समुद्र आणि खाडी काठावरील माडांच्या बागा सौंदर्यात भर घालतात. या निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या लोकांत चित्रकार, मूर्तीकार निर्माण झाले नसते तर नवल नाही. शैक्षणिक बाबतीत मालवण गेल्या शतकाहूनही अधिक काळ अग्रेसर आहे. मालवणातील सर्वात जुनी प्राथमिक शाळा देऊळवाडा या ठिकाणी होती. ती आजही त्या ठिकाणी आहे. इसवी सन १८६४ मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची शिक्षणाची सुरवात या शाळेत झाली. टिळकांच्या वयाच्या आठव्या वर्षी त्यांच्या वडिलांची शिक्षक म्हणून या शाळेत बदली झाली होती.
वाडीचे रूपांतर सुंदर नगरात
मालवणची लोकसंख्या दहा हजारावर गेली आणि सन १९१८ मध्ये मालवण नगर परिषदेची ( म्युनिसिपालीटी ) स्थापना झाली. तेव्हापासून मालवण शहर विकासाला गती मिळाली. येथील बहुतेक कुटुंबांचा मुंबई शहराशी नोकरीमुळे संबंध आला आणि स्वाभाविक भाषा, राहाणी, पेहेराव या सर्वांवर प्रभाव पडला. मालवण शहराने स्वातंत्र्य संग्राम, मीठ सत्याग्रह, असहकार चळवळ अशा आंदोलनात महत्वाचा भाग घेतला. १९४२ च्या ‘छोडो भारत’ या लढ्यात मालवण शहर हे त्या वेळच्या रत्नागिरी जिल्ह्याचं प्रमुख केंद्र होते. सागरातून नवरत्ने बाहेर आल्याची पुराण कथा आहे. आणि इथे अगस्थीचा पुनर्जन्म झाला अन मालवण वाडीचे रूपांतर सुंदर नगरात झाले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.