April 27, 2025
Poet Habib Bhandare book review
Home » कष्टकऱ्यांना जगण्याचं बळ, आत्मभान देणारी कविता
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कष्टकऱ्यांना जगण्याचं बळ, आत्मभान देणारी कविता

शेतकरी कष्टकऱ्यांना जगण्याचं बळ,आत्मभान देणारी कविता म्हणजे “मरणाच्या दारात जगण्याचा अर्थ शोधणारी माणसं”. कवी हबीब भंडारे यांच्या या चौथ्या कवितासंग्रहात ग्रामीण, मुस्लिम व हिंदु कुटुंबातील जीवन जाणिवा स्पष्टपणे व्यक्त झालेल्या दिसतात.

शरद ठाकर

सेलू, जि. परभणी.

“मरणाच्या दारात जगण्याचा अर्थ शोधणारी माणसं” हा काव्यसंग्रह गोदा प्रकाशन, औरंगाबाद यांनी प्रकाशित केलेला आहे. गोदा प्रकाशनाचे आदरणीय डॉ. दादा गोरे यांनी हा काव्यसंग्रह उत्कृष्टरीत्या प्रकाशित केलेला आहे.

कवी हबीब भंडारे यांचा हा चौथा कवितासंग्रह आहे. यापूर्वी त्यांचे ‘माळावरची पेरणी’, ‘ढेकळाचा गंध’, ‘बांधावरच्या बाभळी आणि इतर कविता’ हे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. भंडारे यांनी ग्रामीण जीवन, जाणीवा आणि गरीबीचे चटके स्वतः सोसलेले असल्यामुळे कष्टकरी, कामगार, शेतमजूर शेतकऱ्यांचे दुःखं त्यांनी ह्या कवितासंग्रहातून मांडलेले आहे. साहित्यिक ज्या भोवतालात रहातो, त्या भोवतालाचा प्रभाव त्याच्या लेखनातून उमटत असतो. त्यामुळे या कवितासंग्रहात ग्रामीण, मुस्लिम आणि हिंदू कुटुंबातील जीवन जाणिवा स्पष्टपणे व्यक्त झालेल्या दिसतात. या कवितासंग्रहात ८० कवितांचा समावेश केलेला आहे. तर प्रसिद्ध चित्रकार सरदार जाधव यांचे मुखपृष्ठ आहे.

मुस्लिम मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष प्रसिद्ध कवी डाॅ. शेख इक्बाल मिन्ने यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना कवितासंग्रहाला लाभलेली आहे, तसेच काव्यसंग्रहाची पाठराखण प्रसिद्ध लेखक व समीक्षक डॉ. दादा गोरे यांनी केलेली आहे. भंडारे यांच्या ‘मरणाच्या दारात जगण्याचा अर्थ शोधणारी माणसं’ या काव्यसंग्रहातील कविता जागोजागी आपल्याला जगण्याचा नव्याने अर्थ सांगत राहतात. आपल्याला शहाणं करायचं काम कविता कसं करत राहते,ते पुढे पुढे काव्यसंग्रहातील कविता वाचताना लक्षात येत जाते.कवी हबीब भंडारे म्हणतात –

“ठाऊकच नव्हतं
मरणाकडे/
डोळे लावून बसणाऱ्यांना/
माणसं आता
जगायला शिकू लागली/
अनुभवाचे गाठोडे घेऊन/
सकाळी सकाळीच/
चार-पाच वाजता उठून धावू लागली”
शेतकरी कष्टकऱ्यांना आपल्या कर्मावर भरवसा असतो,म्हणून ते निसर्ग साथ देईल की नाही याचा विचार न करता आपले कर्म करत राहतात. त्यांचा आशावाद पुढील ओळींतून दिसून येतो
“धरतीचा सूर्यावर असतो भरवसा/
पूर्णतः उजेड देण्याबाबत/
मग अंधाराची नसते यत्किंचितही चिंता/
डोईजड होण्याबाबत”

आपल्या हातात जे कष्ट करत राहायचं काम आहे,ते करत रहावं आणि शेवटी सारं काही निसर्गावर सोडून द्यावं हे कवीला वडिलांनी साध्या सोप्या शब्दात सांगितलेलं तत्वज्ञान कवी पुढील पद्धतीने कवितेत सांगतात-
“तकदीर में होगा तो मिलेंगा/
बे मौसम फुल कैसे खिलेंगा”
या कवितासंग्रहातून बऱ्याच कवितेतून ‘झाड’ही प्रतिमा कुटुंबातील ‘कर्त्या’ माणसासाठी अर्थात वडीलांसाठी वापरलेली दिसून येते.
झाड जसं स्वतः वादळ, वारा,उन्हातान्हात तग धरून राहतं.त्याच्या भरवशावर असलेल्यांना पूर्णपणे सांभाळतं, तसेच
आपल्याला कुटुंबातील कर्ते माणसं आपल्या घरादारासाठी राबत असतात.ते म्हणतात
“झाडं वाळतात वयानुसार/
झुंजतात-संघर्ष करतात काळाशी/
हिंमत सोडत नाही वादळ आलं म्हणून”
अगदी झाडासारखंच निरपेक्षपणे आपले वाडवडील राहत असतात, त्यांना आपल्याकडून काही अपेक्षा नसतात;पण आपलंही काही कर्तव्य असतं,ते कर्तव्य आपण निभावलं पाहिजे.झाडं बहरलेली असतात;तोपर्यंत जसे आपण त्यांच्या सावलीचा,फळांचा;त्यांच्या जिवंत असण्याचा सर्वस्वाचा आनंद घेतो. तसेच आपण त्यांची पानगळ चालू असतांना त्यांची देखरेख करणं हे आपलं कर्तव्य आहे. हे पुढील ओळींतून कवी हबीब भंडारे सांगतात-
“उन्हामध्ये घाल पाणी/
पावसात नको काही/
घेईन संकटे झेलून /
बरं असो की नसो काही”
जेव्हा आपण
बापाच्या जीवावर जगतो, वाढतो,तेंव्हा वरवर कठोर बाभळीच्या खोडासारखा वाटणारा बाप हवाहवासा असतो.हे कवी “बेभरवशाचा दुरावा” या कवितेतून सांगतात.जेंव्हा वेलीत अन् झाडात आपल्याला बाप-लेकीचं नातं दिसून येतं,तेव्हा ते म्हणतात
“वेल लपेटून घेते/ बाभळीच्या खोडाला/
तो खरखरीत रखरखीत असूनही/
सुखावते जीवाला”
आपल्या कुटुंबासाठी झाड नेहमीच तग धरून जगत असतं; पण कधीकधी त्या झाडाकडे दुर्लक्ष व्हायला लागतं,तेव्हा त्या पहाडासारख्या झाडाला रडत- कुढत बसायची वेळ येते. ते म्हणतात-
“हिमतीवर जगणारा पहाड/ एकटा एकटाच झुरत होता/ स्वाभिमानाच्या रक्तामध्ये/ दगा कालवून फिरत होता”
झाडाच्या जीवावर जगणाऱ्यांना नेहमीच त्याची सोबत, त्याचा आधार असतो,तेव्हा काय वाटते ते कवी हबीब भंडारे पुढील शब्दात सांगतात-
“मायबापाच्या आधारानं/
काटे कधी टोचले नाही/
शेजाऱ्यापाजाऱ्याचे शब्द/ मनाला कधी बोचले नाही”

पण जेंव्हा झाडाचं कर्तृत्व, उपकार विसरून मुलं वागायला लागतात,तेंव्हा पहाडासारखं झाड कसं खचतं ते पुढील ओळींतून कवी हबीब भंडारे सांगतात.
“ढळत होतं वय झाडाचं/ माय गेली गहिवरून/लटकून
खेळल्या फांद्या/गाय गेली हंबरून”

पण खचणं- खंगण हे मर्दाला माहित नसतं.आनंदाने जगायलाही अंगात मर्दानगी असावी लागते,हे सांगताना कवी म्हणतात-
“जगणं असं घातपाताचं/ नाहीच काही कामाचं/
नांदा सौख्यभरे/
वागणं हे मर्दाचं”
एकंदरीत “मरणाच्या दारात जगण्याचा अर्थ शोधणारी माणसं” या कवितासंग्रहातून कोणत्याही संकटात खचून न जाता हिमतीने कसं जगायचं हेच शिकायला भेटतं. एकंदरीतच जगण्याकडे आशावादी दृष्टीने पाहायला लावणारा,आत्मभान जागवणारा, मनाला चिंतनशील आणि बुद्धीला विचारप्रवृत्त करणारा हा कवितासंग्रह आहे. कविता वाचून निश्चितच कष्टकरी, शेतकऱ्यांना जगण्याचं बळ मिळेल.आत्महत्या हा काही शेवटचा
पर्याय नाही म्हणून ते म्हणतात.
“मरणार ना फास घेऊन/
ना विष खाऊन उगाच/ कष्टाने उगवतील मोती/ तुम्ही फक्त बघाच”
हा कवीचा आशावाद नक्कीच शेतकऱ्यांचे आत्मबळ वाढवेल आणि शेतकरी,कष्टकरी आनंदाने जगतील,हा सार्थ विश्वास ह्या कवितासंग्रहातील कविता वाचताना वाटत राहतो,हे खूप आशादायी आहे.

कवितासंग्रह- “मरणाच्या दारात जगण्याचा अर्थ शोधणारी माणसं”
कवी – हबीब भंडारे
प्रकाशक – गोदा प्रकाशन, औरंगाबाद.(डॉ.दादा गोरे)
पृष्ठ संख्या – १४४
मूल्य – २०० रूपये


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!