September 16, 2024
Every body part become as Ear article by Rajendra Ghorpade
Home » सर्व अंगास कान यासाठीच करायचे…
विश्वाचे आर्त

सर्व अंगास कान यासाठीच करायचे…

स्वतःच स्वतःमध्ये बदल घडवायचा आहे. सद्गुरु फक्त मार्गदर्शनातून आधार देतात. यातून होणाऱ्या चुका सुधारत प्रगती साधायची आहे. चुका कमी करण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन नित्य उपयुक्त ठरते. स्वःची ओळख स्वतःच करून घेऊन स्वतःच आत्मज्ञानी व्हायचे आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

परी ऐकें गा सुभगा । हा प्रसंगु असे तुजचि जोगा ।
कानचि करी हो सर्वांगा । हियें आथिलिया ।। 67 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 15 वा

ओवीचा अर्थ – परंतु, हे भाग्यवान अर्जुना, ऐक हा विषय श्रवण करण्यास तूंच योग्य आहेस म्हणून हे अंतःकरण संपन्न अर्जुना, तूं आपल्या सर्व अंगास कानच कर.

अध्यात्मामध्ये अवधानाला खूप महत्त्व आहे. साधनेत आपल्या शरीरात काय काय घडत आहे याकडे लक्ष द्यायचे असते. बाहेरचे आवाज आपण कानांनी ऐकतो. आपले लक्ष व्यवस्थित असेल तर अगदी दुरचे आवाजही आपणास स्पष्ट ऐकू येतात. पण शरीरात घडामोडी आपण ऐकू शकत नाही. पण त्या अनुभवू शकतो. त्याची अनुभुती घेऊ शकतो. अंतःकरणातील या गोष्टी समजून घेण्यासाठी सर्व शरीराचे कान करायचे असतात. सर्व संवेदना या कानांनी ऐकायच्या म्हणजेच अनुभवायच्या असतात. या संवेदनामुळे विचलित न होता मनाला त्या संवेदना सहन करण्याची क्षमता निर्माण करायची आहे. त्यातून मनावर नियंत्रित मिळवायचे असते. ज्याला हे जमते तो अध्यात्मिक प्रगती करू शकतो.

यासाठी आपले कानही सुक्ष्म असायला हवेत. म्हणजे आकाराने नव्हे तर सुक्ष्म आवाज ऐकण्याची सवय कानांना असायला हवी. अगदी लहानातील लहान आवाज आपल्या कानांना स्पष्ट ऐकता यायला हवा. तुम्हाला असे वाटेल की यामुळे आपण अधिक विचलित होऊ शकतो. कारण सुक्ष्म आवाजामुळे आपले मन विचलित होऊ शकते. पण तसे नाही. वर्गात आपणास शिक्षक शिकवत असतात. आपले लक्ष शिक्षकांच्या सांगण्याकडे असते. त्यावेळी बाहेर अनेक आवाज होत असतात. झाडाच्या पानांचा आवाज होत असतो. पाण्याचे थेंब पडतानाचा आवाज होत असतो. एखादे वाहन गेले तर त्याचा खडखडाट होत असतो. पक्षांचा किलबिलाटही सुरु असतो. हे सर्व आपल्या कानावर येऊन पडत असते. पण तरीही आपले लक्ष वर्गात असल्याने त्याचा आपणास त्रास होत नाही. पण ते आवाज आपणाकडून ऐकले जात असतात. याचाच अर्थ आपण त्यात गुंतलेले नसतो. आपण वर्गातील शिक्षकांच्या शिकवण्यात गुंतलेले असतो. आपणास या आवाजांचा त्रास त्यामुळेच होत नाही. कारण आपले मन त्यात गुंतलेले नसते. हेच तर आहे मनाचे नियंत्रण. असेच मनाचे नियंत्रण साधायचे असते. म्हणजे आपणाला त्याचा त्रास होत नाही.

आपले लक्ष वर्गात नसले अन् या बाहेरच्या आवाजात गुंतले असेल तर लगेचच ही गोष्ट वर्गातील इतरांच्या लक्षात येते. वर्गात काय शिकवले हे आपल्या कधीही लक्षात येणार नाही. देहाने आपण वर्गात असतो पण मनाने बाहेर असू तर आपणास शिकवलेले काहीच समजणार नाही. एकावेळी दोन्ही गोष्टी ग्रहन करण्याची सवय ही यातूनच शिकायला हवी. वर्गातील शिकवणेही आपण ग्रहन करू शकतो व बाहेरच्या आवाजही ग्रहण करू शकतो. पण तितकी एकाग्रता आपणास साधता यायला हवी. इतके सामर्थ्य आपणास प्राप्त करता यायला हवे. चंचल मनाला इतके स्थिर करता यायला हवे. तरच हे शक्य होऊ शकते. योग्यवेळी योग्य गोष्टीत मन यासाठीच गुंतवायला हवे. आपणास आवश्यक काय आहे ते आपण आधी ग्रहण करायला शिकावे मगच इतरत्र गोष्टी शिकाव्यात. मन इतरत्र गुंतले तर त्याचा तोटा अधिक असतो हे लक्षात घ्यायला हवे. मनाची एकाग्रता ही यासाठीच साधायला हवी.

साधना करताना मन साधनेत गुंतवायला हवे. ही सवय हळूहळू जडते. पण मन एकदा गुंतू लागले की त्यातून एकाग्रता निश्चितच साधली जाते. मन साधनेत गुंतत नसेल तर साधना कितीही वर्षे केली किंवा कितीही वेळ केली तरी त्यातून अपेक्षीत फलप्राप्ती होत नाही. यासाठीच मन साधनेत गुंतवण्याचा प्रयत्न हा करायलाय हवा. साधनेमुळे शरीरात होणाऱ्या सर्व क्रियांची अनुभुती घ्यायला हवी. सर्व घडामोडीवर लक्ष द्यायला हवे. पण मन या क्रियेत गुंतवायचे नाही. शरीरात होणाऱ्या वेदना किंवा अन्य क्रिया उदाहरणार्थ घाम येणे हे सर्व अनुभवायचे आहे. पण त्यात मन गुंतवून विचलित व्हायचे नाही. मन साधनेत गुंतवण्यासाठी फक्त त्या घडामोडींचा अनुभव घ्यायचा आहे. या अनुभवात न गुंतता मन साधनेवर केंद्रीत करायचे आहे. फक्त अनुभव घेऊन शरीराच्या सर्व भागातील क्रिया अनुभवण्यासाठी पुढे जायचे आहे. या अनुभवामुळे मन साधनेत गुंतवण्याची सवय जडते. अशाने मनाची स्थिरता वाढते. मनाची एकाग्रता वाढते.

मन साधनेत गुंतू लागल्यानंतर साधना करताना होणाऱ्या वेदनांनी मन विचलित होत नाही. साहजिकच या वेदना सहन करण्याची क्षमता वाढते. मनाने त्या वेदनांचा अनुभव घ्यायचा आहे व पुढे पुढे जात राहायचे आहे. त्यामुळे मन तेथे गुंतून न राहाता आपले मन साधनेवर केंद्रीत होते. या गोष्टी सवयीने साधता येतात. नित्यता असेल तर हे सर्व अनुभव घेऊन अध्यात्मिक प्रगती साधता येते. यासाठी सर्व शरीराने कान होऊन या सर्व हालचालीचा अनुभव घ्यायचा आहे. त्यात गुंतून पडायचे नाही हे मात्र लक्षात ठेवायचे आहे. या एकाग्रतेतून आत्मज्ञानाची द्वारे उघडतात. म्हणजेच येथे सर्व क्रिया ही स्वतःच करायची आहे. कानाने श्वासाचा स्वर ऐकणे सोहमचा स्वर ऐकणे सुरु ठेवायचे आहे. सर्व शरीरातील संवेदना अनुभवायच्या पण त्यात न गुंतता सोहममध्ये मन गुंतवायचे आहे. या सर्व संवेदनात सोहम स्वराचा अनुभव घ्यावयाचा आहे. यासाठीच सर्व शरीराचे कान करायचे आहे. सर्व संवेदनातून सोहमचा स्वर ऐकण्याची सवय लावायची आहे.

स्वतःच स्वतःमध्ये बदल घडवायचा आहे. सद्गुरु फक्त मार्गदर्शनातून आधार देतात. यातून होणाऱ्या चुका सुधारत प्रगती साधायची आहे. चुका कमी करण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन नित्य उपयुक्त ठरते. स्वःची ओळख स्वतःच करून घेऊन स्वतःच आत्मज्ञानी व्हायचे आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

अवयवदानातून २०२२ मध्ये १५ हजाराहून अधिक जणांचे पुण्यकर्म

मारुतीराव जाधव यांना शिवाजी विद्यापीठातर्फे ‘पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील पुरस्कार’ जाहीर

हरीत क्रांतीचे जनक : स्वामीनाथन !

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading