October 18, 2024
Rukmini who shows a new sun of hope to women through her own experience
Home » Privacy Policy » स्वानुभवातून महिलांना आशेचा नवा सूर्य दाखवणारी रूक्मिणी
मुक्त संवाद

स्वानुभवातून महिलांना आशेचा नवा सूर्य दाखवणारी रूक्मिणी

ओळख : वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!

महिला सबलीकरणाच्या कितीही गप्पा मारल्या तरी बाईच्या समस्या, वेदना, संघर्ष अजून संपलेलाच नाही. ‘बाईपण भारी देवा’ सारखे चित्रपट आले तरी आजही बाईचे बाईपण संघर्षमय व वेदनादायी असते. आज अनेक महिला संघर्षातून वाट काढत आपल्या वेदनेवर फुंकर घालतातच पण आपल्यासारख्या अनेक महिलांना बरोबर घेऊन त्यांच्याही वेदनेवर फुंकर घालून बरोबरीने वाट चालत आहेत. एक बाई काय करू शकते? हा प्रश्न न पडता एक बाई काय काय करू शकते ? हे पहायचे झाले तर बीड जिल्ह्यातील माहेर कुमशी व सासर भांड्याचे अंमळनेर असलेल्या वयाच्या २६-२७ व्या वर्षी पती निधनामुळे एकट्या झालेल्या रूक्मिणी नागापुरे यांचे कार्य कर्तृत्व पहावे लागेल.

ॲड. शैलजा मोळक
लेखक, कवी, समुपदेशक, व्याख्याता
अध्यक्ष शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व जिजाऊ ग्रंथालय पुणे
मो. 9823627244

रूक्मिणीताईंना पुण्यात एका कार्यक्रमात पाहिले, ऐकले आणि मी स्तंभित झाले. त्यांचा पती निधनानंतरचा संघर्ष व धडपड पाहाता या रणरागिणीविषयी लिहिलेच पाहिजे हे तेव्हाच ठरवले. ताईंचा संघर्ष हा जन्मापासूनच सुरू झाला. माहेरची परिस्थिती बेताची. आई विकलांग. वडील सुतारकाम व टेलरिंग करून उदरनिर्वाह करायचे. कित्येकदा उपाशीपोटी राहून घरची जबाबदारी घ्यावी लागायची. खेळण्या-बागडण्याच्या वयात वयाच्या १३ व्या वर्षी ताईंचा विवाह झाला. सासरही जेमतेम. पती सुतारकाम करायचे व रूक्मिणी लहान वयात पडेल ते काम करून संसाराला हातभार लावायची. यथावकाश दोन मुले झाली. संसार सुरळीत होतोय असे वाटतानाच ताईंच्या पतीचे निधन झाले.

वयाच्या अवघ्या २६-२७ व्या वर्षी दोन लहानग्यांसह दुःखाचा डोंगर कोसळला. मुलांसाठी ताईंनी कंबर कसली. जिद्दीने मिळेल ते काम करत मुलांना वाढवले. ताईंनाही लग्नानंतर पतीने ८ वी पासूनचे शिक्षण दिले होते. आपले राहिलेले शिक्षण ताईंनी पती निधनानंतर पूर्ण केले. ताई आज आय.टी. आय. इलेक्ट्रॅानिक्स, आय.टी. आय. फॅशन डिझायनिंग, एम.ए. एम.सी.जे. (पत्रकारिता) झाल्या आहेत. एक मुलगा इंजिनिअर व एक बॅंकेत आहे. सन २०११ ला पतीचे निधन झाले तेव्हा रहायला घरही नव्हते. ते आज केले. महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन आजवर त्यांनी ३००० महिलांना प्रशिक्षित केले आहे. त्या पैशातून स्वतःचे व मुलांचे शिक्षण पूर्ण केले.

एकटीच्या प्रवासात सासर व माहेर कोणाचीच साथ नव्हती. अनेक बऱ्या वाईट अनुभवातून एकल महिलांसाठी काम करावे असे वाटल्याने ताईंनी कोरो एकल महिला संघटनेची स्थापना केली. एकल महिला स्वावलंबी व्हाव्यात, रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांना सन्मान हवा, विधवा महिलांना असलेली बंधने तोडली पाहिजे, या महिला शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात सक्षम होण्यासाठी ताई अहोरात्र कष्ट घेऊ लागल्या. मराठवाड्यात ताईंनी ४ जिल्ह्यातील ११ तालुक्यात ४४२ गावात सुमारे २० हजार एकल महिलांचे संघटन केले आहे. यात विधवा, परितक्त्या, घटस्फोटित, पतीने सोडलेल्या, पतीला सोडलेल्या, प्रौढ कुमारिका, दिव्यांग अशा महिलांचा समावेश आहे. गेल्या ९ वर्षापासून या संघटनेने महिलांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे. शासन दरबारी पण त्यांचे प्रश्न व मागण्या पोहोचवल्या आहेत. समता प्रतिष्ठान व राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत CBM आरोग्य सेवेवर १२ गावात काम केले. शेकडो बचतगट तयार केले. स्वावलंबी महिला निधी लिमिटेडमधे अध्यक्षपदी काम करत आहेत. महिलांसाठी निबंध स्पर्धा, संविधान दिन कार्यक्रम, मनुस्मृती दहन दिन स्त्रीमुक्ती दिन म्हणून साजरा करणे, महामानवांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम, महिलांच्या सन्मानार्थ तिळगूळ समारंभाचे आयोजन, महागाई, जातीयता, अत्याचार विरोधी निवेदने, मोर्चा, आंदोलनात सक्रिय सहभाग, विविध व्यक्ती व विषयावर लेखन हे सारं ताई सातत्याने करतात.

खरं तर एकट्या बाईकडे पहाण्याचा सामाजिक दृष्टिकोन सकारात्मक नाही. विकृत, घाणेरड्या नजरेतून जगणे अवघडच.! पण ताई नीडरपणे डॅा. बाबासाहेब आंबेडकरांमुळे व घटनेमुळे माणूस म्हणून जगायला शिकले हे सांगतात. स्त्रीपुरूष समानता आली पाहिजे, ती आपल्या कुटुंबातून सुरू व्हायला हवी. एकल महिलेचा पहिला संघर्ष तिच्या कुटुंबाशी असतो. कृषीप्रधान संस्कृती असताना ८० टक्के महिला शेतीकाम करतात. पण तिच्या नावावर काही नाही. तिचे आधारकार्ड, पॅनकार्ड, बॅंकखाते नाही. इतकेच नव्हे तर तिची विवाह नोंदणीही कायदेशीर केलेली नसते. रेशनकार्डवर तिचे नाव नसते. एकल महिलांची नोंदणी आवश्यक. कायदेशीर कागदपत्रे महत्वाची असतात. पण तिचे लग्न झाल्याचाही पुरावा नसतो. शिवाय पतीनिधनानंतर तिला मृत्यूचा दाखलाही कुटुंबीय नाकारतात त्यामुळे तिला अनेकदा सरकारी योजनांचाही लाभ घेता येत नाही. शिवाय तिला इस्टेट प्रॅापर्टीतूनही बेदखल केले जाते. अशा अनेक अडचणी व समस्यांमुळे रूक्मिणीताई एकल महिला सक्षमीकरणाकडे ओढल्या गेल्या.

उठ हक्कासाठी कंबर कसून आता पुरे झाले घरात बसून । उठ हक्कासाठी कंबर कसून ॥ चूल आणि मूल पदरी आलं जीवन नारीच वाया गेलं या जगाची तू जननी असून उठ हक्कासाठी कंबर कसून ॥

असे म्हणत महिलांना घराबाहेर काढायचे काम ताई करत आहेत. समाजातील अनिष्ट रूढींना छेद देत महिलांना संविधान मूल्ये समजावून सांगत त्यांच्या हक्क, अधिकाराची जाणीव करून देणे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, संपत्तीत अधिकार मिळवून देणे, अर्धवट शिक्षण पूर्ण करायला मदत करणे, शासकीय योजनांची माहिती व लाभ मिळवून देणे, हिंसाचार, कौटुंबिक हिंसाचाराची माहिती देणे, विधवा, परितक्त्या महिलांना पुर्नविवाह करण्यासाठी मार्गदर्शन करून विवाह घडवून आणणे अशी विविधांगी समाजहिताची कामे ताई निष्ठेने करतात. कोरोना काळात त्या अनेक महिलांचा आधार बनल्या. आपला संसार सांभाळत अनेकींचे संसार मार्गी लावत अन्यायाविरोधात लढण्याचे बळ देणे ही सोपी गोष्ट नाही. पण ताई जिद्दीने ते सारं करत आहेत.

ग्रामीण भागात पती निधनानंतर सौभाग्यलेणी न काढणे ही खूप मोठी बंडखोरी आहे पण ताईंनी एकल महिला संघटनेच्या माध्यमातून ही विधवा प्रथा सुमारे १५ गावात नष्ट केली आहे. रक्षाबंधनाला या सर्व महिला परस्परांना राखी बांधून भगिनीभाव जोपासत आहेत. भाऊ नव्हे तर आम्हीच आमच्या पाठीशी आहोत व सोबत आहोत हा संदेश देत आहेत. असे अनेक नवीन पायंडे ताईंनी निर्माण करून आशेचा नवा सूर्य सर्व महिलांना दाखवून महिलांमधे आत्मविश्वास निर्माण केला आहे.

अशा प्रचंड सामाजिक कामामुळे ताईंची दखल अनेक सामाजिक व राजकीय संघटनांनी घेतली आहे. समाजसेवा गौरव पुरस्कार, रणरागिणी राष्ट्रीय पुरस्कार, सेवा सन्मान, बसवसेवा पुरस्कार बीड, रोटरी क्लब बीड, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई, विश्वकर्मा नवदुर्गा पुरस्कार पुणे, कोविड योध्दा पुरस्कार कोल्हापूर, नवकेशर नवरत्न पुरस्कार आंबेजोगाई, दुर्गा महाराष्ट्राची पुरस्कार, पद्मश्री सिंधुताई सपकाळ सेवारत्न पुरस्कार, यशस्विनी सन्मान पुरस्कार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, राजमाता मॅासाहेब पुरस्कार बीड असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

स्वतःला सिध्द करणाऱ्या व आपल्या सारख्या अनेकींचे जीवन प्रकाशमान व आनंदी करणाऱ्या आधुनिक नवदुर्गा रूक्मिणी ताईंना मानाचा मुजरा..!

रूक्मिणी नागापुरे – 73855 77521


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading