June 18, 2024
Meditatin
Home » ऊठ, जागा हो अन्… ( एकतरी ओवी अनुभवावी )
विश्वाचे आर्त

ऊठ, जागा हो अन्… ( एकतरी ओवी अनुभवावी )

शोक करत बसण्यात काहीच अर्थ नाही. यातून बाहेर पडायला हवे. आज इतक्या माळा साधना केली. उद्या तितक्या माळा साधना करायची आहे. असे करण्यापेक्षा दोन सेकंदाचे स्मरणही सर्व साधनेला मागे टाकते. दोन सेकंदाचे अवधान सर्वांवर उपयुक्त ठरते. यासाठी साधनेतील या गोष्टींचा अभ्यास करून त्यात आपण आपली प्रगती साधायला हवी.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 9011087406

म्हणौनि वहिला उठी । मियां मारिले तूं निवटी । 

न रिगे शोकसंकटी । नाथिलिया ।। 477।। अध्याय 11 वा

ओवीचा अर्थ – म्हणून लवकर ऊठ, मी यांस ( आंतून ) मारले आहे व तूं यांस बाहेरून मार आणि नसत्या शोकसंकटात पडूं नकोस. 

जीवन – मरणाच्या या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी सद्गुरुचा प्रयत्न असतो. यासाठी शिष्याला सद्गुरु मंत्र, दिक्षा देतात. वेळोवेळी त्यास मार्गदर्शन करतात. अनुभुती देतात. ही अनुभुती ही त्याच्या अध्यात्मिक विकासासाठी असते. यामध्ये शिष्य प्रत्येक गोष्ट लगेच ग्रहण करतो असे होत नाही. यासाठी शिष्याला ही गोष्ट अनुभवातून शिकवावी लागते. सद्गुरु हेच अनुभव शिष्याला देत असतात. जितकी व्यकी मोठी तितका त्याचा अहंकार अधिक असतो. तो घालवण्यासाठी तशा पद्धतीच्या अनुभवांची गरज असते. मग तो राजा असला तरीही त्यास मोह, माया, अहंकार हे असतातच. त्याच्यातील हे दोष काढून टाकल्याशिवाय अध्यात्मिक प्रगती शक्यच होत नाही. कारण अध्यात्मात प्रगती ही शिष्यानेच करायची असते. शिष्यानेच त्यासाठी प्रयत्न करत असतात. सद्गुरु फक्त मार्ग दाखवतात. 

Join  and Like Our Page इये मराठीचिये नगरी for updates and Details…
 https://www.facebook.com/IyeMarathichiyeNagari/

आपल्या दैनंदिन जीवनात साधना करताना कंटाळा येतो. कशाला याची गरज असे वाटते. यातून काही मिळत नाही असेही वाटते. अशा गोष्टी म्हणजे फुकट वेळ घालवणे असेही वाटते. या सर्व गोष्टी व्यर्थ वाटतात. याला कारणेही तशीच आहेत. दैनंदिन जीवनात आपणाला लगेच फायदा हवा असतो. फायदा दिसत असेल तर पटकण आपण गोष्टी आत्मसात करत असतो. पण यात फायदाच दिसत नाही. दररोज दहा मिनिटे किंवा दोन दोन तास साधनेला बसून काहीच मिळाले नाही असे वाटते. उलट साधनेला बसल्यानंतर पायात मुंग्या येणे. अवघडल्यासारखे वाटणे असे प्रकार होतात. साधना योग्य प्रकारे करूनही या समस्या जाणवतात. मग साधना का करायची असे म्हणून हळूहळू आपला ओढा कमी होऊ लागतो. साधना होतच नाही. मानसिक समाधान नसेल तर त्या गोष्टीत फारसा रस वाटत नाही. अध्यात्मिक प्रगती साधायची असेल तर अवधानाला महत्त्व आहे हे विसरता कामा नये. सद्गुरु दाखवत असलेले अनुभव आपण योग्य अभ्यासाने हाताळायला हवेत. सद्गुरु साधनेत जागे करत असतात. सर्व काही तुला शक्य आहे अशी अनुभुती देत असतात. पण आपले त्याकडे लक्षच नसते. अवधान ठेवले तर साधनेत निश्चितच प्रगती शक्य आहे. हे जमणार नाही. ते जमणार नाही. असे म्हणून त्या गोष्टी टाळून आपली प्रगती होणार नाही. साधना ही करावीच लागते. 

म्हणून शोक करत बसण्यात काहीच अर्थ नाही. यातून बाहेर पडायला हवे. आज इतक्या माळा साधना केली. उद्या तितक्या माळा साधना करायची आहे. असे करण्यापेक्षा दोन सेकंदाचे स्मरणही सर्व साधनेला मागे टाकते. दोन सेकंदाचे अवधान सर्वांवर उपयुक्त ठरते. यासाठी साधनेतील या गोष्टींचा अभ्यास करून त्यात आपण आपली प्रगती साधायला हवी. सद्गुरु जेव्हा अनुग्रह देतात तेव्हा सद्गुरु आपल्या आतील दोष मारून टाकतात. पण बाहेरून ते दोष तसेच असतात. ते दोष आपण मारायचे असतात. त्या दोषांवर आपण मात करायची असते. सद्गुरुंच्या मंत्राने ते आतून सहज मरतात. आता बाहेरून मारणे हे काम आपणाला करायचे असते. आपल्यातील अहंकार, क्रोध, राग, द्वेष आदी दोष घालवायचे असतात. हे दोष अनुभुतीने जातात. यासाठी सद्गुरु दाखवत असल्याने अनुभुतीकडे लक्ष द्यायला हवे. सद्गुरु हे दोष अनुभुतीने घालवून आपली प्रगती करत असतात. फक्त आपण साधनेत जागे असणे महत्त्वाचे आहे. जागे राहून साधना योग्य प्रकारे साधायची असते. अवधानाने हे शक्य होते. यासाठी साधने संदर्भातील सर्व शंका दूर सारून सद्गुरु दिलेल्या गुरु मंत्राचा जप करून अध्यात्मिक प्रगती साधायची आहे. 

संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा अभ्यास एक तरी ओवी अनुभवावी असा या ग्रुपचा उद्देश आहे. मग होताय ना सहभागी..त्यासाठी लिंकवर क्लिक करा.
 https://www.facebook.com/groups/ShriDnyneshwariStudy

Related posts

पैशाचा मोह माणसालाच संपवितो

गुरुंचे प्रेम हे आईसारखे, म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली

… म्हणूनी ते स्वराज्य सुराज्य

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406