अहंकार गेल्याशिवाय या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होता येत नाही. मनातील अहंकार, भिती नष्ट करण्यासाठी हे विश्वरुप दर्शन आहे. देवाचे विश्वरुप दर्शन हे भक्ताला घाबरवण्यासाठी नाही तर त्याला जागे करण्यासाठी आहे. हे विचारात घ्यायला हवे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685
अरे कोन्ही कोणातें न मारी । एथ मीचि हो सर्व संहारी ।
हे विश्वरुपव्याजें हरी । प्रकटित असे ।। 408 ।। अध्याय 11 वा
ओवीचा अर्थ – अर्जुना, वास्तविक कोणी कोणाला मारीत नाही, यांच मी स्वतःच सर्वांचा नाश करतो हे तत्त्व विश्वरुपाच्या निमित्ताने श्रीकृष्ण उघड करून दाखवित आहे.
हे मी केले, हे माझ्यामुळे झाले. याचा गर्व प्रत्येकाला असतो. राजकर्त्यांनातर याची लागणच झालेली असते. त्यांना तर सर्व जग आपणच चालवतो आहोत असे वाटत असते. त्यांना तर त्यांचे भवितत्व त्याच्यावरच अवलंबून आहे असे वाटत असते. पण हे राजकर्त्ये तितकेच भित्रे ही असतात. याचे उत्तम उदाहरण सांगायचे तर कंसांचे सांगता येईल. देवकीचा पुत्र कंसाला मारणार असे भविष्य कंसाला कोणीतरी सांगितले. तेव्हा कंसाने देवकीचे सर्व पुत्र मारले. देवकीला त्याने तुरुगातही ठेवले. इतका भित्रा तो होता. त्याने दहशत माजवली. ही दहशत भितीपोटी होती. माणसाला स्वतःचा जीव सर्वात प्रिय असतो. पण त्यासाठी त्याने किती निष्पाप जीवांना मारले. शेवटी विधिलिखीत होते तेच घडले. ते त्याला टाळता आले नाही.
जे घडणारे आहे ते कोणी टाळू शकत नाही. नशिबातील गोष्ट कोणी बदलू शकत नाही. जन्म घेणारा जन्म घेतोच. तुम्ही त्याला एकदा माराल. दोनदा माराल. देवकीचे सात पूत्र मारले. पण आठव्याने कंसाला मारले. सध्याच्या युगात स्त्री भ्रुण हत्या हा प्रकार वाढला आहे. गर्भाशय तपासून स्त्री गर्भाची हत्या केली जाते. कंसाचा हा नवा अवतारच म्हणावा लागेल. पण कंसाचे काय झाले याचाही विचार करायला हवा. अहंकारच या सर्वामागे आहे.
अहंकारच आपणास संपवतो हे लक्षात घ्यायला हवे. हा अहंकार घालवण्यासाठी दैवी शक्ती जन्म घेते. प्रत्येकातील अहंकार घालवण्यासाठी अशा घटना घडत असतात. राजाला सु्द्धा स्वतः राज्य घडवल्याचा अहंकार असतो. तो घालवण्यासाठी हे सर्व विश्वरुप दर्शन आहे. अहंकार गेल्याशिवाय या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होता येत नाही. मनातील अहंकार, भिती नष्ट करण्यासाठी हे विश्वरुप दर्शन आहे. देवाचे विश्वरुप दर्शन हे भक्ताला घाबरवण्यासाठी नाही तर त्याला जागे करण्यासाठी आहे. हे विचारात घ्यायला हवे. याचा अभ्यास करून यातील मर्म समजून घ्यायला हवे. हे मर्म समजले तरच खरा अध्यात्मिक विकास होईल.
वाल्ह्याचा वाल्मिकी झाला, तसा या नराचा नारायण होईल. जितकी मोठी व्यक्ती तितका मोठा अहंकार असतो. तो घालवण्यासाठी तितके मोठे विश्वरुप भगवंताला घ्यावे लागते. विश्वरुप दर्शनामागचे प्रयोजन समजून घ्यायला हवे. तरच अध्यात्मिक प्रगती होऊ शकेल. मी, मी, मी..हा मी कोण ? स्वरुपाची ओळख झाल्याशिवाय हा मीपणा जाणार नाही. यासाठी स्वतःची ओळख स्वतः करून घ्यायला हवे. मी कोण आहे ? या स्वरुपाचे ध्यान करायला हवे. स्वरुपात मन रमवायला हवे. तरच या विश्वरुपाचे मर्म कळेल. विश्वरुपाचे खरे दर्शन होईल. मगच भक्तीची द्वारे उघडतील.
संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा अभ्यास एक तरी ओवी अनुभवावी असा या ग्रुपचा उद्देश आहे. मग होताय ना सहभागी..त्यासाठी लिंकवर क्लिक करा.
https://www.facebook.com/groups/ShriDnyneshwariStudy