📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
November 4, 2026
मुक्त संवाद

बाल वाचकांसाठी दिवाळीची खास मेजवानी : जंगलातील दिवाळी

वंदना हुळबत्ते लिखित ‘जंगलातील दिवाळी’ या बालकथासंग्रहात निसर्ग, मैत्री, प्रेम, सद्भाव आणि संस्कारांची शिकवण देणाऱ्या चौदा सुरेख कथा आहेत. बालवाचकांसाठी आनंददायी साहित्यिक मेजवानी!

दिवाळी म्हटले की डोळ्यांसमोर येतात पणत्यांची रोषणाई, आकाशकंदील आणि फटाक्यांची आतषबाजी! पण जंगलात दिवाळी साजरी झाली तर ? झाडांवर लुकलुकणारे काजवे, फुलांचा सुगंध, पशू-पक्ष्यांची धमाल आणि बालमनाला आनंद देणाऱ्या चौदा गोष्टी! वंदना हुळबत्ते यांच्या ‘जंगलातील दिवाळी’ या बालकथासंग्रहातून निसर्ग, मैत्री, प्रेम, सद्भाव आणि संस्कारांचा असा सुंदर दीपोत्सव अनुभवायला मिळतो. एकदा पुस्तक हातात घेतले की शेवटची कथा वाचल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही, हीच या संग्रहाची खरी जमेची बाजू आहे.

सुहास रघुनाथ पंडित, सांगली.
९४२१२२५४९१

‘ जंगलातील दिवाळी ‘ या बालकथा संग्रहाच्या प्रकाशनाला जाण्याचा योग आला. ” हे पुस्तक वाचायला घेतल्यावर संपूर्ण वाचून झाल्यावरच खाली ठेवलं ” असं एक वक्ते त्यावेळेला म्हणाले.आता असं कौतुक करायचच असतं, नाही का ? पुस्तक  (विकत) घेऊन घरी आलो आणि दुसरे दिवशी सहज पुस्तक हातात घेतले.ज्येष्ठ लेखिका उज्वला केळकर यांनी लिहिलेली प्रस्तावना वाचली.एखादी कथा वाचावी म्हणून पुस्तक उघडले आणि पूर्ण चौदा कथा वाचून पुस्तक खाली ठेवले.प्रकाशन समारंभातील त्या वक्त्यांचे म्हणणे खरे ठरले.
            
वंदना हुळबत्ते या कला शिक्षिका आणि बाल साहित्यिका.शिवाय उत्तम चित्रकार आणि कवयित्री.बाल साहित्य निर्मिती आणि बाल तसेच कुमार साहित्य चळवळीत प्रत्यक्ष सहभाग. हा प्रदीर्घ अनुभव पाढीशी असल्याने लहान मुलांच्या मनाला समजून घेऊन त्यांना समजतील अशा शब्दांत गोष्टी सांगण्याची कला त्यांना अवगत आहे.याचे प्रत्यंतर या नव्या बालसंग्रहामुळे पुन्हा एकदा येते.

‘ जंगलातील दिवाळी ‘ संग्रहात एकूण चौदा कथा आहेत.बाल आणि कुमार गटातील वाचकांना आवडतील अशा या कथा तितक्याच सुंदर चित्रांनी नटलेल्या आहेत.त्यामुळे बाल मनाला भुरळ घालून अगदी आनंदाने वाचल्या जातील असा हा कथासंग्रह आहे.

दिवाळी जंगलातील असल्यामुळे रोषणाईसाठी इथे झाडांवर काजवे लुकलुकू लागले आहेत.इथे फुले,पाने,झाडे,पशू, पक्षी आणि त्याचबरोबर काही बाल मित्र मैत्रिणीही आहेत.सूर्यफुलाला पिवळा सोनेरी रंग कसा मिळाला हे कथा वाचल्यावर समजते.झाड,वारा,नदी या सर्वांशी फुलांचा होणारा संवाद त्या वातावरणात घेऊन जाणारा आहे.शाब्दिक उपदेशापेक्षा कृतीतून खूप चांगले संस्कार करता येतात हे सांगणारी ‘ जाणीव ‘ ही कथा रंगवताना लेखिकेतील ‘ शिक्षिका ‘ दिसून येते.

एका फुलामुळे एका मुलाचं आयुष्य कसं बदलून गेलं हे सांगणारी कथा आहे ‘ एका फुलांची करामत ‘. पाऊस पडतो त्याची गोष्ट म्हणजे ‘ पिटुकला ढग ‘.या कथेत कल्पकता , नाट्यमयता आणि चित्रमयता यांचा त्रिवेणी संगम झाला आहे. ‘जडणघडण ‘ या कथेतून, योग्य मार्गदर्शन मिळाले तर आणि गुणग्राहक गुरु असेल तर माणूस कसा घडू शकतो हे दिसते.आलेल्या प्रसंगातून मार्ग कसा काढावा हे ‘ चिनू ‘ ने शिकवले आहे.’ घाम हवा घाम ‘ हे शिर्षकच बोलके आहे.शारिरीक कष्टाचे महत्व सांगणारी ही कथा आहे.’ आईचं ऐकावं ‘ही कथा प्राण्यांचे मुक्त जीवन महत्वाचे आहे ही शिकवण देते.दोस्ती कशी असावी तर अमर आणि अन्वर सारखी.’खरा आनंद ‘ या कथेतून ईर्षेपेक्षा प्रेमाने जग जिंकावे हा संदेश दिला आहे.तर ‘ टिल्लूची सफर ‘ या कथेतून मजेशीर सफरीचा आनंद मिळतो.बालवयातील निष्पापपणा त्यांनी ‘ निष्पाप छकुली ‘ या कथेत टिपला आहे.

शेवटची कथा आहे ‘ आमचं म्हणणं ऐका ‘ . ही कथा केवळ बालांनीच नाही तर प्रौढांनीही वाचावी अशी आहे.कुणाचं म्हणणं ऐकायचं ? काय आहे म्हणणं ? हे सगळं समजून घ्यायचं असेल तर कथा वाचलीच पाहिजे.

बालमनाची पकड घेईल अशा मुखपृष्ठापासून, वैशिष्ट्यपूर्ण अर्पणपत्रिका ते अंतरंगातील शेवटच्या पानापर्यंत सलगपणे वाचत जावे असा हा बाल कथासंग्रह संस्कार, सुविचार,सद्भाव आणि साध्या सोप्या भाषेने संपन्न असल्यामुळे गोष्टींतून नकळत बरेच काही शिकवून जातो.निसर्गाचे केलेले वर्णन आणि काही ठिकाणी म्हणींचा केलेला वापर भाषेला सौंदर्य प्राप्त करून देतात.

पुस्तकाचे नाव: जंगलातील दिवाळी
लेखिका: वंदना हुळबत्ते ९६५७४९०८९२
प्रकाशक: दिलीपराज प्रकाशन प्रा.लि.७८७५८८७३११
मूल्य: रु.२००/-

Related posts

पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस

समाजरंजन करणारी लोककला दंडार

मन अन् बुद्धीचे भांडण..

Leave a Comment

Leave a review

    श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406