📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
November 1, 2026
मुक्त संवाद

“कोण पाहिजे तुम्हाला? ते आता “तुम्हीच पाहिजे मला….” पर्यंतचा प्रवास

अवघ्या सात रुपये रोजंदारीवर काम करण्यापासून ते आंतरराष्ट्रीय संशोधक होण्यापर्यंत डॉ. भरत पाडेकर यांचा प्रेरणादायी प्रवास. वयाच्या ४२ व्या वर्षी पीएचडी आणि साठीचा हीरकमहोत्सव!

डॉ. भरत पाडेकर यांच्या ‘साठी’ निमित्त सिंहावलोकन

सात रुपये रोजाने काम करणारा एक तरुण, परिस्थितीशी दोन हात करत शिक्षणाची वाट चालतो. नोकरी, संसार आणि जबाबदाऱ्यांचा गाडा सांभाळत वयाच्या ४२ व्या वर्षी आयआयटी मुंबईच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियात पीएचडीसाठी झेप घेतो. संघर्षाला जिद्दीची आणि स्वप्नांना ज्ञानसाधनेची जोड मिळाली की वयही अडथळा ठरत नाही, याचा प्रत्यय देणारा हा प्रवास आहे डॉ. भरत पाडेकर यांचा! त्यांच्या वयाच्या साठीच्या हीरकमहोत्सवी टप्प्यावर पत्नी डॉ. लता पाडेकर यांनी उलगडलेली ही कहाणी केवळ एका संशोधकाच्या यशाची नाही, तर सहजीवन, परस्पर विश्वास, त्याग आणि अखंड ज्ञानसाधनेची प्रेरणादायी गाथा आहे.

“कोण पाहिजे तुम्हाला?” असा प्रश्न मी ज्यांना विचारला, त्यांच्याशीच माझी लग्न गाठ बांधली गेली. फारच मजेदार किस्सा आहे हा! उत्तम मुळे यांची मोठी मुलगी शिक्षिका असून ती उपवर आहे, एवढ्याच माहितीवर शंकर पाडेकर हे आपला पुतण्या भरतला भल्या सकाळी आमच्या घरी घेऊन आले होते. अर्थात पूर्वकल्पना न दिल्याने वडील नेहमीप्रमाणे पहाटेच दूधडेअरीच्या कामावर गेलेले होते. आमची आजी (आईची आई) खूप आजारी होती; म्हणून तिच्या शुश्रुषेसाठी आई ओतूरला गेलेली होती. अत्यंत वय झालेली पणजीआई होती. पण हळूहळू का होईना ती रोज सकाळी शिवारफेरी करायची. भाऊ नोकरीनिमित्त मुंबईला होता. म्हणजे घरात फक्त मी, माझी धाकटी बहीण संगीता आणि छोटीशी मामेबहीण निर्मला अशा तिघीच होतो. शाळांना दिवाळीची सुट्टी असल्याने स्वयंपाक पाणी आवरून हातात विळा-मणी घेऊन बांधांचे गवत कापायला आम्ही निघालो होतो. तेवढ्यात M80 वरील हे चुलते-पुतणे अंगणात हजर! आमच्यासाठी दोघेही अनोळखी असल्याने मी पुढे होऊन धाडसाने विचारले, “कोण पाहिजे तुम्हाला?” तेव्हा शंकर नाना म्हणाले, “आम्ही मुलगी पाहायला आलो आहोत. इथे कोणी शिक्षिका आहे का?” आता झाली ना पंचाईत! कारण मीच ती होते. जुने-पाने परकर -पोलके घातलेली. थंडीचे दिवस असल्याने कानाला फडके बांधलेली. मी तशीच घरात गेले. अशा प्रसंगाचा अजिबात पूर्वानुभव नव्हता. पाहुणे आलेत म्हणून कपडे बदलावेत वगैरे हे तर सुचलेही नाही. ‘अतिथी देवो भव’ या संस्काराप्रमाणे मी विझलेली चूल पुन्हा काडा-कुडा टाकून पेटवली. कसाबसा चहा केला. जुजबी संवादानंतर ते गेले. आम्ही ठरल्याप्रमाणे आपापल्या कामाला गेलो. माझ्या आयुष्यात हे काही महत्त्वाचे वळण वगैरे असेल असे वाटलेही नव्हते. घरात लग्नाचा विषय तोपर्यंत कोणीही काढला नव्हता. त्यामुळे मी निश्चिंत होते. पण काही दिवसांनी तशाही अवतारात यांनी मला पसंत केल्याचा निरोप आला. सूत्रे हलली. मोठ्या माणसांची बैठक झाली. माझेही मत विचारात घेण्यात आले….

असो. तर हे आठवण्याचे कारण म्हणजे आज डॉ भरत पाडेकर हे आपल्या वयाचा हीरकमहोत्सव साजरा करत आहेत. ‘दुसरीला अभ्यास न केल्याने नापास होणारा भरत ते आंतरराष्ट्रीय संशोधक डॉ. भरत’ हा प्रवास म्हटलं तर मोठा रोमहर्षक आहे; आणि म्हटलं तर संघर्षमय जीवनाचा यशस्वी किनाराही आहे. लहानपणीचा भरत हा जितका खट्याळ होता, तितकाच गोष्टीवेल्हाळ होता. मेंढ्यांच्या कोकरांना, शेळ्यांच्या करडांना, गाईंच्या वासरांना आणि म्हशीच्या रेडकुला तो खूप जीव लावायचा आणि रानावनात हिंडताना डोंगरातला दगड न दगड ओळखीचा असल्यासारखा त्यांच्याशी घडाघडा बोलायचा. खटल्याच्या घरात मोठ्या बहिणी असल्याने सणावारांची गाणी म्हणायचा. झाडांवर सूर पारंब्या खेळायचा. ओढ्याच्या पाण्यात सूर मारून सर्वांना पोहायला शिकवायचा. शेत शिवारात, बांधांवर, कडंमेरंला हिंडून रानभाज्या खुडायचा; चुलीच्या आहारावर शिजवून भावंडांसह त्यावर ताव मारायचा…..

वडील गिरणी कामगार होते. पुढे संप झाला आणि बि-हाड गावी आले. त्यामुळे प्राथमिक शिक्षण मुंबईला तर माध्यमिक शिक्षण संगमनेर तालुक्यातील नाथाबाबा विद्यालय बोटा येथे झाले. 1983 झाले दहावीला 73 टक्के गुण मिळाले खरे; पण पुढे शिक्षणासाठी काहीच तरतूद नसल्याने सात रुपये रोजाने कामाला जाऊ लागला. यथावकाश बजाज टेम्पो, पुणे येथे एनसीटीव्हीटी हा चार वर्षांचा तर औंधला आयटीआय करून टूल अँड डायमेकरचा दोन वर्षांचा कोर्स केला. या काळात थोरली बहीण विमल नरवडे यांच्या परिवाराचा मोठा आधार मिळाला. पुढे दारूगोळा कारखाना खडकी येथील SQAE (Armts.) येथे परीक्षक म्हणून नोकरी लागली. त्यामुळे बचत करून काही पैसे आता गावालाही पाठवता येत होते. नोकरी करता करता पार्ट टाइम डिप्लोमाला प्रवेश घेतला. १०×१० च्या भाड्याच्या खोलीत अभ्यासाचे टेबल आले. गावी थोडीफार शेती आणि राहायला सपार वाट्याला आलेले होते. शेत लेवल करायला आणि नवीन कौलारू घर बांधायला यांनी हातभार लावला होता. दोघा भावांच्या विचाराने द्राक्षाची बाग लावली. शेतीवाडीची घडी बसत होती. पण आता आई-वडील आणि घरातले सारे जण “दोनाचे चार हात करण्यासाठी” त्याला आग्रह करत होते आणि त्यानुसार वरीलप्रमाणे त्यांनी मला गळ्यात पाडून घेतले. 9 मे 1993 रोजी सामुदायिक विवाह सोहळ्यात आमचे लग्न पार पडले. उंचखडकची लेक केळेवाडीची सून झाली. आमच्या दोघांच्या गावात मध्ये फक्त एक डोंगर आहे. पण तो डोंगर दोन जिल्ह्यांची सीमारेषा असल्याने माहेर पुणे जिल्ह्यात तर सासर अहिल्यानगर जिल्ह्यात असे झाले….

लग्नाच्या बैठकीत हुंडा वगैरे न मागता मला पुढे शिकायचे आहे आणि मुलीनेही शिकले पाहिजे या मुद्द्यावर हे ठाम राहिले होते. त्यानुसार त्यांनी डिप्लोमा आणि मी माझे अर्धवट बीए पूर्ण केले. दरम्यान ललितचा जन्म झाला होता. एकीकडे आम्ही बाळाच्या बाललीला अनुभवत होतो, तर दुसरीकडे नोकरी सांभाळून, रात्रीचा दिवस करून, अभ्यासातही प्रगतीपथावर होतो. भरत यांनी दारूगोळा कारखान्यातील अर्थात केंद्र सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन एआयटी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये फोरमन पदावर नियुक्ती स्वीकारली. बहि:स्थ परीक्षा देऊन इंजिनिअरिंगची AMIE पदवी प्राप्त केली. माझे एम ए (इंग्रजी) पूर्ण होऊन बीएड झाले.

आता ललित, मी आणि हे तिघेही आपापला अभ्यास करू लागलो. पण अजून स्वतःचे घर नव्हते. कॉर्टर मध्ये राहत होतो. दिघी मध्ये दोन गुंठे जागा घेऊन तिथे वर्कशॉप बांधायचे ठरवले होते. पण अचानक कॉर्टर खाली करायला लागल्याने आम्ही त्याच जागेवर कसेबसे डबल रूम बांधून बिना प्लास्टरच्या घरात राहायला आलो. वेळ प्रसंगी कर्ज-पाणी काढून, मंगळसूत्र हा एकमेव दागिना होता; तो देखील गहाण ठेवून कसेबसे घराचे काम केले.‌ मागे वळून पाहता ‘दिवस बसून राहत नाहीत.’ म्हणतात ते खरेच आहे ना…..

अत्यंत अवघड असणारी GATE ची परीक्षा देऊन एआयटीतील भरत बिनपगारी रजा घेऊन सीओईपी मध्ये ९३.१८ परसेंटाइल इतक्या उत्तम गुणांनी एमटेक उत्तीर्ण झाले. त्यासाठी टाटा मोटर्स लिमिटेड पुणे येथील कॅब डिझाईन इंजीनियरिंग रिसर्च सेंटरमध्ये प्रोजेक्ट केला. त्यानंतर इंदिरा कॉलेज परंदवाडी येथे प्राध्यापक झाले. आता कुठे खऱ्या संशोधनाची द्वारे खुली झाली आहेत, असे यांना वाटू लागले. रोज पीएच डी ची स्वप्ने पडू लागली. परिस्थिती, परीक्षा आणि प्रेरणा यांचा उत्तम वेळ घालून एक दिवस सारे चंबुगबाळे बांधून पुण्याचे भरत मुंबईच्या आयआयटी पवई केंद्रातील वसतिगृहात दाखल झाले. मोनॅश युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलिया आणि आयआयटी पवई भारत यांच्यावतीने घेण्यात आलेल्या पीएच डी च्या प्रवेश परीक्षेत भारतातील फक्त १० जणांची निवड झाली होती. त्यात भरत यांचा तृतीय क्रमांक लागला होता. तेव्हा वय होते 42. खरंतर चाकरमानी माणसे या वयात आयुष्याचा आनंद साजरा करतात. परंतु भरत मात्र एकामागून एक कठीणातल्या कठीण परीक्षा देऊन ताऊन सुलाखून निघत होते. ललित नववीत तर स्नेहा सहावीत होती. मी पुणे महानगरपालिकेत शिक्षिका असल्याने वेळोवेळी मुलांसह पतीच्याही पालकत्वाची भूमिका निभावू शकले. कारण त्यांची ज्ञानाची प्रचंड भूक माझ्या लक्षात येत होती. आता वेळ आली प्रत्यक्ष ऑस्ट्रेलियाला जाण्याची. एकेकाळी सात रुपये रोजाने काम करणारा हा मजूर भरत आता सातासमुद्रापार निघाला होता – संशोधनाची जबाबदारी पार पाडण्यासाठी. संशोधनाचा विषय होता. Stress corrosion cracking behaviour of EV31A and Mg-Mn magnesium alloys.

भरपूर मेहनत, रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून केलेले प्रयोग, काढलेले निष्कर्ष, प्रा. व्ही एस राजा (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई भारत) आणि प्रा. रमण सिंग (मोनॅश युनिव्हर्सिटी मेलबर्न ऑस्ट्रेलिया) या मार्गदर्शकांचे मिळालेले अभिप्राय या पायऱ्यांनी सुमारे पाच वर्षांत पीएचडी पूर्ण झाली. काही संशोधन पेपर आंतरराष्ट्रीय स्तरावरही मान्य पावले. त्यासाठी जर्मनीचीही वारी घडली. एमआयटी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग आळंदी आणि पूर्व आफ्रिकेच्या इथिओपियातील डेबरे मार्कोस युनिव्हर्सिटी येथे संशोधनात्मक अध्यापनाचा अनुभव गाठीशी बांधून सध्या डॉक्टर भरत हे कल्याणी सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन (आर ऍण्ड डी मुंढवा) भारत फोर्ज लिमिटेड पुणे येथे मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. करोजन तज्ज्ञ, हायड्रोजन एनर्जी आणि बॅटरी या विषयावर ते सर्वदूर पोहचत आहेत. संशोधनातील नवनवीन आयाम शिकून ते सादर करण्यासाठी आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी न थांबता – न थकता आजही दिवसातील 16-18 तास ते काम करतात….

विविध स्तरांवर काम करताना डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. जयंत नारळीकर, डॉ विजय भटकर.‌ डॉ अनिल काकोडकर अशा सुप्रसिद्ध शास्त्रज्ञांशी अनेकदा सुसंवाद साधण्याची संधी मिळाली. आळंदीच्या एमआयटीमध्ये काम करताना विश्वशांती मंचावर शांतीब्रह्म मारोतीबाबा कु-हेकर आणि महाराष्ट्रातील अनेक नामावंत कीर्तनकारांचे, महंत आणि महामंडलेश्वरांचे सानिध्य लाभले. समाज सुधारक मा. अण्णा हजारे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मा. मोहन भागवत अशा महत्त्वाच्या क्षेत्रातील मान्यवरांच्या मांदियाळीत सहजपणे वावरता आले. फुरसुदीच्या वेळेत जमेल तसे देहू-आळंदीसह विविध तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडले. आयआयटी कॉलेजेस् आणि देश-विदेशातील संशोधन केंद्रांना भेटी दिलेल्या आहेत. छोट्या-मोठ्या प्रोजेक्टनिमित्त एमआयडीसीतील अनेक वर्कशॉप्स धुंडाळलेली आहेत. कितीतरी विद्यार्थ्यांना एमटेक साठी मार्गदर्शन केले आहे…

पहाटे लवकर उठणे, नियमित व्यायाम, योग्य आहार, स्वच्छतेची आवड, पडेल ते काम करण्याची मानसिकता, स्वावलंबन, नामस्मरण, गावातील सर्वांशी जुळलेली नाळ यामुळे माती, नाती आणि आपली संस्कृती जपताना डॉ भरत हे सदैव अग्रभागी राहिलेले आहेत. जगातील युरोप, आफ्रिका ऑस्ट्रेलिया आणि आशिया अशा चार खंडांवर जाऊन आलेले भरत सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्येही सहकुटुंब ट्रेक करतात. हरिश्चंद्रगड आणि महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हणजेच कळसुबाई शिखर हेसुद्धा आम्ही घरातील आठ जणांनी एकावेळी सर केले आहे.‌ पत्नीच्या आग्रहाखातर मांसाहार सोडणारे पती पुढे तिच्या संत साहित्यातील पीएचडी आणि साहित्यिक वाटचालीत खंबीरपणे साथ देतात, तेव्हा समाजासाठी ते आदर्श ठरतात. डॉ भरत त्यापैकीच एक आहेत.

“मी जसा शिकलो, तसेच माझ्या परिवारातील आणि परिसरातील मुलांनीही खूप शिकावे, स्पर्धा परीक्षा द्याव्यात, संशोधनासाठी सज्ज असावे, शेतीतील आधुनिकता जपताना परंपराही पाळाव्यात, असे मानणारे भरत सतत समुपदेशन करतात. संवाद साधतात. तर कधी सढळ हाताने मदतही करतात. व्यसनमुक्तीसाठी तरुणांना कधी समजावतात तर कधी खडसावतात. आईंसह सर्व वडीलधाऱ्यांना वाकून नमस्कार करून शुभाशीर्वाद मिळवतात. कुटुंबात नव्याने समाविष्ट झालेल्या सुना किंवा जावई यांच्याशी ते आधुनिक तंत्रज्ञानातील माहितीचे आदान-प्रदान करतात. स्वभावाने ते जितके तापट आहेत, तितकेच प्रेमळही आहेत. शिस्तप्रिय आणि वेळेचे पक्के आहेत. उशीर-बिशीर चालत नाही. गहाळ आणि गचाळपणा आवडत नाही. लग्नाकार्यात किंवा सणासुदीला जुन्या गोष्टींतील विज्ञान सांगून योग्य त्या चालीरीती पाळतात. भजने, आरत्या, श्लोक, लोकगीते तर फार आवडतात.‌ आणि गोड गळ्याने गातातसुद्धा! अंधश्रद्धांना मात्र थारा देत नाहीत. महात्मा फुले यांची द्विशताब्दी साजरी करताना असे छोटे-मोठे ज्योतिबा जर समाजात असतील तर अज्ञानाचा अंधकार दूर सारून ज्ञानाचे नवनवी क्षितिजेही पादाक्रांत करता येतात, असे मला या क्षणी वाटते. ‘साठी बुद्धी नाठी’ अशी म्हण असली तरी डॉ पाडेकर मात्र त्याला छेद देणारे आहेत. उलट
मार्गाधारे वर्तावे | विश्व हे मोहरे लावावे |
अलौकिक नोहावे | लोकांप्रती || या संत ज्ञानदेवांच्या ओवीप्रमाणे त्यांनी आपल्या वयाची सहा दशके साकारली आहेत. त्यांची अर्धांगिनी म्हणून मला नेहमीच खूप आदर, आधार आणि अभिमानही वाटतो. आतापर्यंत जशी मी त्यांना साथ देऊ शकले, त्याप्रमाणेच त्यांच्या निरामय आरोग्यासह हीरकमहोत्सव ते शताब्दी या उज्वल काळात आम्हाला सोबत काम करण्याची संधी मिळावी, अशी इच्छा मी परमेश्वराजवळ व्यक्त करते. कारण “कोण पाहिजे तुम्हाला? अशा प्रश्नाने सुरू झालेले आमचे आयुष्य आता “तुम्हीच पाहिजे मला….” असे ते मला विनोदाने नेहमीच ऐकवतात.
साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण!

डॉ लता पाडेकर, पुणे
latapadekar@gmail.com
मो क्र ८३०७८१९८०८

Related posts

त्या मुलीकडे पाहून मला उगीचच का भीती वाटावी ?

Neettu Talks : केसांच्या संदर्भातील गैरसमज दुर करून घ्या…

जमिनीची खरी किंमत नेमकी कशी ठरते ? Key Factors That Determine Property Value

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406