October 18, 2024
Poet Sunil Ubale special story by Ajay Kandar
Home » Privacy Policy » सुनील उबाळे : कविताच जगणारा माणूस
मुक्त संवाद

सुनील उबाळे : कविताच जगणारा माणूस

सुनीलची मानव्यावरील आणि कवितेवरील निष्ठा आजच्या काळातली दुर्मिळ अशी आहे. माणूसघृणा बाळगल्या जाणाऱ्या या काळात सुनीलसारखा माणसांवर आणि शब्दांवर प्रेम करणाऱ्या गुणवंत कवीची पुढील कवितेची वाटचाल पाहणे ही उत्सुकता लावणारी गोष्ट आहे.

अजय कांडर
लेखक विख्यात कवी, व्यासंगी पत्रकार आहेत. ९४०४३९५१५५

कामगार वर्गातील कवी सुनील उबाळे जेव्हा आपल्या घराच्या छतावर शेकडो कवींची नावे लिहितो, तेव्हा तो कविताच जगणारा माणूस वाटतो. त्याची माणसावरची आणि कवितेवरची निष्ठा ‘प्रतिष्ठित लेखक – कवी म्हणून’ तळागाळातील वर्गापासून दूर राहणाऱ्या साहित्यिकांसमोर आदर्शच आहे.

होय, मी कामगार आहे आणि माझी कविता माझ्यासह तमाम कष्टकऱ्यांच्या वेदनेचं दुःख मांडते. याचा मला सार्थ अभिमान आहे.असे सांगणारा छ.संभाजीनगर (औरंगाबाद) येथील कवी सुनील उबाळे म्हणजे आरपार कविताचं जगणारा माणूस. अनेक लोक कविता लिहितात; पण अपवाद वगळता दुसऱ्या बाजूला दुसऱ्या कवीच्या यशात मात्र भागीदार होत नाहीत. परंतु कवी सुनीलला इतर कवींच्या यशाचा आनंद होतोच;पण त्याने आपलं घरंच इतर कवींच्या नावाने सजवल्यामुळे सुनीलचे घर म्हणजे खरे कवितेचे घर अनुभवास येते. हा त्याच्या मनाचा मोठेपणा आजच्या मराठी साहित्यात दुर्मिळ असून या त्याच्या निर्मळ जगण्याबद्दल त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच.

‘माझी कविता हेच माझं आत्मचरित्र ‘ असं म्हणणारा सुनील आणि कविता हे दोन शब्द नसून एकच आहेत. अक्षर ओळख असणारा सुनीलसारखा इतरांच्या घराच्या भिंती रंगवणारा पेंटर एखादी कवितेची ओळ लिहितो तेव्हा त्या ओळीचं कौतुक करायला महाराष्ट्रातील मातब्बर लोक संभाजीनगर पैठणगेट समोरच्या छोट्याशा वस्तीत येतात.यापेक्षा एखाद्या कवीला अजून काय हवं असतं? म्हणूनच सुनील म्हणतो, कवितेनं मला भरभरून प्रेम दिले.सोन्यासारखी माणसे दिली आणि जगण्याचे बळ मिळाले.मी छतावर कवींची नावे लिहून माझ्या डोक्यावर मायेचं आभाळ कायमस्वरूपी करुन घेतलं. या छतावर माझं नाव सोडून बाकी तमाम मी वाचलेल्या कवींची नावं आहेत. ही नावं रात्रभर माझ्या जगण्याला ऊर्जा देतात आणि पुन्हा आलेल्या दिवसाशी मी दोन हात करण्यासाठी सज्ज होतो.जेंव्हा जेंव्हा या छतावर नाव असलेले कवी या माझ्या कवितेच्या घरात येतात तेंव्हा ते आपले नाव बघून एकतर भारावून जातात, नाहीतर नि:शब्द होऊन माझ्या गळ्यात पडून मोकळे होतात. मला वाटतं ही श्रीमंती सध्यातरी मला मिळाली आहे.कवी सुनीलची ही कवितेची आणि माणसांवरची निष्ठा अलौकिक आहे.खरंतर बाबासाहेब मिळवणाऱ्याल्या वस्तीत येऊन गेले ही गोष्टच सुनीलसाठी इतकी मंतरलेली आहे, की ती तो शब्दात मांडूच शकत नाही. त्याच्या लहानपणी पैठणगेट बौध्दवाड्यात चावडी होती. जेथे बाबासाहेब येऊन जेवण करुन गेले हे जेव्हा त्याला कळले, तेव्हा तो भारावून गेला आणि तीच त्याच्या जगण्याची प्रेरणा झाली.

सुनील म्हणतो, मी बाबासाहेब पुस्तकरूपी कधी वाचलेच नाहीत. मी पैठणगेट चावडीसह मिलिंद परिसरात बाबासाहेबांना आठवत राहतो म्हणूनच माझी कविता बाबासाहेबांशी थेट संवाद साधते.माझ्या भवतालची दखल कोणीच घेत नव्हतं. दिवसभर उन्हातान्हात राबणारी माणसं जर लिहिती असती,तर कदाचीत ती व्यसनाधीन नसती.जगण्याला एक नशा गरजेचीच असते आणि मला कवितेची नशा आहे ती कधीच उतरता कामा नये.माझ्यासह समस्त कामगारांचा आवाज माझी कविता होते आणि मला त्यांचे मुकी वेदना बोलती करता येते म्हणून मी लिहित राहतो.

सुनीलला वाटतं झोपडपट्टी किंवा वस्तीला जात गोचिडसारखी चिकटलेली दिसते आणि दिवसेंदिवस विविध नांमातराने ती गडद होत जाते. सुनील म्हणतो, अमुक अमुक जातीतून आला म्हणून त्याच्या प्रती आपलेपणा दाखविणे किंवा तसाच पोशाख घालून मिरवणं मला जमलंच नाही. मी कवितेला एखाद्या चौकटीत बसविण्याच्या सक्त विरोधात आहे.ज्यांनी माणसांना माणूसपण बहाल केलं अशा तमाम महापुरुषांना माझी कविता सॅल्युट मारते.मागे एक कविता लिहिली होती तिचं शीर्षकच सुनील दादाराव उबाळे पैठणगेट औरंगाबाद असं आहे आणि ती कविता माझ्या वस्तीचा चेहरा आहे. ती वाचून त्यातल्या प्रत्येक पात्राला महाराष्ट्रभरातून माझे कवी मित्र येऊन भेटून गेले. त्यामुळे मूठभर का होईना आनंद या वस्तीत मला वाटता आला याचं समाधान आहे.

मी माझ्या डोक्यावरचं ऊन झटकून काढण्यासाठी विटाच्या भट्टीवर, चहाच्या हाॅटेलवर, घरगडी म्हणून, दैनिक अंजिठा येथे पार्सल पॅकिंग आणि तसेच रंगारी म्हणूनही कामे केली.म्हणूनच कवितेनं माझ्यावर करुणेची सावली धरली.वस्तीतले रोजचे प्रश्न पाणी, बेरोजगारी, बचतगटाचे हप्ते फेडतांना रडकुंडीला आलेल्या बायका अगदीच न कळत्या वयात व्यसनाधीन झालेली पिढी हे सगळं माझ्या जगण्या आणि लिहिण्याचे केंद्रस्थान आहे.या वस्तीतल्या प्रमोद मुळे नावाच्या पेंटर मित्राने घरावर कवी सुनिल दा. उबाळे नावाची नेमप्लेट लावली आहे. काल परवा दिलिप कांबळे नावाच्या पेंटर मित्राने पारकरच्या पेनाचा सेट दिला.दिपक भुजंगे नावाच्या मित्राने सुखदुःखाची काळजी घेतली.अगदीच कवितेच्या पहिल्या अक्षरापासून भारती भुजंगे माझ्या कवितेची आई झाली. माझ्या परिवाराने माझ्यासह माझ्या कवितेचा सन्मान केला आणि मीही लेकीबाळींसारखं कवितेचं माहेर झालो. माझी कविता माझं नुसतं आत्मचरित्र नसून चारित्र्यही आहे. माझा स्वाभिमान आहे.म्हणूनच आपल्या कवितेच्या घरात ‘एक ओळ लिहिती राहिली पाहिजे माझ्या नंतर ही’ अस सुनीलला वाटते आहे !

सुनीलची मानव्यावरील आणि कवितेवरील निष्ठा आजच्या काळातली दुर्मिळ अशी आहे. माणूसघृणा बाळगल्या जाणाऱ्या या काळात सुनीलसारखा माणसांवर आणि शब्दांवर प्रेम करणाऱ्या गुणवंत कवीची पुढील कवितेची वाटचाल पाहणे ही उत्सुकता लावणारी गोष्ट आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading