अत्यंत लालित्यपूर्ण भाषेत ही माणसं उलगडून दाखवण्याचे काम त्यांच्या लेखनीने केले आहे. त्यामुळे भोवतालची ही मोठी माणसं आपल्याला माहित आहेत. त्या पलिकडेच्या बऱ्यांच गुणांचे दर्शन त्यांच्या ‘ पोर्टफोलिओ ’ या पुस्तकात वाचकांना होत जाते.
संदीप वाकचौरे
आपल्या भोवती असलेल्या माणसांचे मोठेपण अनेकदा माहित असले तरी त्यांच्यात सामावलेल्या अनेक लहान सहान गोष्टी ज्ञात असतील असे नाही. पण जेव्हा या माणसांचे मोठेपण यांच्या तत्वात आणि जीवननिष्ठेत सामावलेले असते असे जाणवत राहते. तेव्हा त्यांचे मोठेपणही वाचकांच्या मनावर अधोरेखित होत जाते. काही माणसं अनेकदा केवळ माहित असतात पण त्यांच्या कार्याचा व्यापक परीचय होतो तेव्हा मात्र ही माणसं खरचं मोठी आहेत..हे पुन्हा पुन्हा मनपटलावर अधोरेखित होत जाते. ही माणसं जीवनभर आपल्या कर्तव्याच्या प्रति निष्ठा बाळगून वाट चालत राहतात. स्वतःच्या स्वार्थापेक्षा त्यांना समाजाची आणि राष्ट्राची वाट अधिक महत्त्वाची वाटत राहते. त्यांच्या या कर्तव्यपरायण भूमिकेमुळेच ही माणसं समाज मनावर आपला ठसा उमटवत राहतात. त्यांच्या कर्तृत्वाचा आणि विचारनिष्ठेचा पोर्टफोलिओ भानू काळे यांनी रेखाटला आहे. अत्यंत लालित्यपूर्ण भाषेत ही माणसं उलगडून दाखवण्याचे काम त्यांच्या लेखनीने केले आहे. त्यामुळे भोवतालची ही मोठी माणसं आपल्याला माहित आहेत. त्या पलिकडेच्या बऱ्यांच गुणांचे दर्शन त्यांच्या ‘ पोर्टफोलिओ ’ या पुस्तकात वाचकांना होत जाते.
महाराष्ट्राच्या शिक्षणाच्या जडणघडणीत अधिक महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षपदी सलग तीस वर्ष पुढे कार्याध्यक्ष राहिलेले रावसाहेब शिंदे यांच्या तत्वनिष्ठतेचे आणि सामाजिक भानाचे दर्शन त्यांच्याविषयी वाचताना सतत होत राहते. जीवनात अनेकदा संधी मिळत असताना देखील नाकारणारी माणसं या पुस्तकात भेटत राहतात.अनेकदा माणसं मागण्यासाठी लाळघोटेपणा करत असतात. त्यासाठी आपले सत्व आणि तत्व गहान ठेवत असतात. मात्र काही माणसं जीवनात तत्व अधिक महत्त्वाची मानत आणि अधिक विचारनिष्ठता बाळगत आपला प्रवास सुरू ठेवतात. या मानसाने सारे सत्तेचे झुली नाकारल्या तरी भविष्यातही त्यांना त्याच्या जीवनप्रवासात त्याचे काही वाईट वाटले नाही.
महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी रावसाहेब शिंदे यांनी श्रीरामपूर मधून उमेदवारी करावी अशी विनंती केली. त्यांनी स्पष्ट नकार दिला. त्यांनीच उमेदवारी करावी म्हणून मुख्यमंत्र्यानी अण्णासाहेब शिंदे यांना रावसाहेबांचे मन वळवण्यासाठी आग्रह करण्याची विनंती केली. ही विनंती मान्य करता अण्णासाहेब शिंदे यांनी देखील आग्रह केला. मात्र त्याला देखील स्पष्ट नकार दिला. नकार देताना त्यांनी दोन कारणे नोंदवले. एकाच घरातील दोघांनी राजकारणात शिरणे हे लोकशाहीच्या दृष्टीने चुकीचं उदाहरण घातल्यासारखे होईल. आपण एकाच परीसरात राजकारणात राहिलो तर आपल्या दोघांमधले सध्याचे प्रेमसंबंध सांभाळणं अवघड होऊन बसेल.
खरतर हा लोकशाहीसाठीचा किती उदार विचार होता. आज असे विचार करणारी माणसं सापडणे देखील कठीण झाले आहेत. आपल्या देशाता भूतकाळात राजकारणातील माणसं मोठीच होती. एकदा यशवंतरावच चव्हाण यांना भेटण्यासाठी आंदोलन करणारी काही तरूण गेली होती. तेव्हा यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की, घरदार सोडून,पोलीसांचा मार खात. असे किती दिवस वणवण भटकणार..पोरांनो, मला तुमची दया येते. सरकार विरूध्द खूप दिवस लढत राहणं अशक्य आहे.
समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आता त्याची गरज नाही. यापेक्षा तुम्ही विधायक काहीतरी करा. सहकारात शिरा. चांगल्या संस्था उभ्या करा. तुमच्या गावच्या चार लोकांना पोटापाण्याला लावा. त्यातच तुमच भलं आहे आणि त्यातच समाजाचंही भलं आहे. आज असं सांगणारी द्रष्टे माणसं राजकारणात हरवत चालली आहे. अशी माणसं होती म्हणून महाराष्ट्र मोठा होता..आज विचाराची माणसं हरवत चालली आहे. राजकारणात लहान माणसांच्या सावल्या अधिक मोठ्या वाटू लागल्या आहेत. त्यामुळे समाजाच्या विचाराची उंची हरवत चालल्याचे दिसते आहे.
शेगाव येथील गजानन महाराज मंदिराच्या संपूर्ण व्यवस्थापनाचे काम पाहणारे शिवशंकर भाऊ यांचे व्यवस्थापन किती प्रभावी आणि परिणामकारक होते. हे तिथे भेट देणाऱ्याला सहजतेने जाणवत राहते. तेथील स्वच्छता,सुविधा आज डोळ्यात भरते.मंदिराच्या विकास व्यवस्थापनासाठी त्यांना सत्तर कोटी रूपये हवे होते. तेव्हा सिटी बॅंकेचे विक्रम पंडित यांनी मंदिरासाठी सातशे कोटी रूपयाचा धनादेश पाठवला होता. त्यांनी त्यातील सहाशे तीस कोटी रूपये परत केले. आमची गरज सत्तर कोटीची होती. अतिरिक्त पैसा अनीतीला व भ्रष्टाचाराला उत्तेजन देतो. ही त्यांची विचारधारा वर्तमानात सर्वत्र पैशासाठी लढणा-या आणि पैशासाठी तत्व,भूमिका, विचार गहान ठेवणाऱ्या प्रत्येकाला ही गोष्ट विचार करायला भाग पाडते.आपल्या समाजात अनेक चांगल्या चळवळी उभ्या राहतात, मात्र त्या चळवळीला समाज स्वीकारत नाही. त्याला फारसा पाठींबा मिळत नाही. त्यामागील कारणांची मिमांसा करताना स्वामी विवेकानंदाच्या विचाराचे संदर्भ मांडलेल्या भूमिकेचा निश्चित विचार करायला हवा. ते लिहितात समाजसुधारणेचे आणि परिवर्तनाचे बुध्ददेवांपासून राजा राममोहन रॉय यांच्या पर्यंतच्या सर्वांचे प्रयत्न फसले आहेत. कारण त्यांनी धर्मावर आघात केला. आपणाला धर्माचा आधार घेऊन धर्मातील अपप्रवृत्तीवर आघात करावा लागेल.
विज्ञान कितीही श्रेष्ठ असले तरी विज्ञान माणसांचे शाश्वत अस्तित्व नाकारते. तू जन्माला येण्यापूर्वी माती वा मातीमधून बनलेले रसायन होतास आणि मृत्यूनंतर माती बनून कायमचा नाहीसा होणार आहे, म्हणून सांगते. हे खरे की खोटे हा वाद बाजूला ठेवू. पण 99 टक्के माणसं हे स्वीकारू शकत नाहीत. माणसाच्या अशाश्वत जीवनात त्याच्या शाश्वत अस्तित्वाचा आधार म्हणून सर्व धर्म उभे असतात. म्हणून माणसांना धर्म आवश्यक असतो. मुळात या विचाराच्या तळाशी जाऊन आपण विचार केला तर देशातील चांगल्या चळवळीला बळ का मिळाले नाही. याचा अंदाज सहजपणे येण्यास मदत होईल. देव नाकारणारा देव माणूस म्हणून अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे काम करणारे नरेंद्र दाभोळकरांचे कार्य अत्यंत विवेक स्वरूपात उलगडून दाखवले आहे. त्यांचे व्यक्तिमत्वही अत्यंत विवेक स्वरूपात उलगडले आहे.
काही माणसं उदयोगपती असले तरी त्यांचे सामाजिक भानही अधिक चांगले असते. देवकिसन सारडा हे नाशिक सुप्रसिध्द उद्योगपती. त्यांच्या जीवन प्रवासात त्यांनी सामान्यांच्या जीवनात शिक्षणाची व्दारे खुली व्हावीत म्हणून अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालये उभी करण्यास मदत केली. समाजात काम करणाऱ्या माणसांच्या मागे ते सतत उभे राहिले. मुस्लिम समाजात प्रबोधन करणारे हमीद दलवाई हे आचार्य अत्रेच्या मराठात कार्यरत होते. नोकरी संभाळून त्यांचे प्रबोधनाचे काम चालत असे. त्यामुळे त्यांची मोठी ओढाताण होत होती. त्यांना तेथे सव्वाचारशे रूपये वेतन मिळत, पण त्याची गरज समाज प्रबोधनासाठी अधिक होती. समाज प्रबोधनासाठी दलवाई यांना पूर्ण वेळ मिळावा म्हणून त्यांनी काही मित्राच्या मदतीने पाचशे रूपये दरमहा मिळतील अशी तरतूद केली. त्याच बरोबर तत्कालीन केंद्रिय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांना पत्र लिहिले. दलवाई यांना भारतभर समाज प्रबोधन करता यावे यासाठी रेल्वेचा प्रथम वर्गाने प्रवास करता येईल असे विनंती केली. हे सारे करूनही याची कल्पना दलवाई यांना येऊ दिली नाही. सारडा यांची देशदूत व सार्वमत ही वर्तमान पत्रे नाशिक, नगर जिल्ह्यात सुरू आहेत.एका बातमीसाठी एका नेत्याने सारडांच्या विरोधात न्यायालयात बदनामीची केल दाखल केली. त्याच बरोबर महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी केसस दाखल केल्या होत्या. सारडांवर अजामीनपात्र वॉरंटही काढले गेले होते. अशा प्रसंगी सारडा मालक असूनही ते आपल्या संपादक आणि बातमीदाराच्या मागे उभे राहिले हे विशेष. आपल्या मताची किंमत चुकवायची तयारी असलेले असे मालक निराळेच म्हणायला हवे.
मुळात व्यावसायात गुंतलेले असताना देखील ते आपला पत्रव्यवहार सातत्याने करत असायचे. एखाद्या माणसांत त्यांना वेगळेपण काही जाणवले तर त्या व्यक्तिशी आपणहून संपर्क साधणे, तीला आवर्जून भेटणे असे घडत होते. सुधा गोखले नावाच्या लेखिकेने लोकसत्तेत एक लेख लिहिला होता. तो पूर्ण पानी लेख वाचला आणि तो वेगळा वाटला. तो लेख काश्मिर विषयी होता. तेथील युवकांचे दर्शन घडवले होते. मात्र वाचून सारडा भारावले गेले मात्र लेखातील माहिती खरी की खोटी याची शहानिशी करावी असे त्यांना वाटले. त्यांनी लोकसत्ताच्या संपादकांना फोन करून लेखिकेचा नंबर मिळवला. त्यांनी त्यानंतर लेखिकेसोबत संपर्क साधला. त्यांना भेटण्यासाठी खास नाशिक वरून पुण्याला गेले. हा सारा प्रवास म्हणजे विचारावर निस्सिम प्रेम करणे आहे. त्यांना एखादे पुस्तक आवडले तर ती पुस्तके खरेदी करून ते अनेकांना भेट देत असायचे.
प्रदीप लोखंडे मुक्काम पोस्ट पुणे म्हटले तरी ते पत्र त्यांना मिळते अशा एका माणसांची कहाणी तर अत्यंत प्रेरक आहे.ग्यान की वाचनालय या उपक्रमाविषयी बरेच काही वाचायला मिळते. महाराष्ट्रातील 1100 वाचनालय शाळांमध्ये सुरू आहेत. 6300 गावात ही योजना राबवण्याचे स्वप्न त्यांचे आहे. लोखंड यांचे कार्य म्हणजे कोणताही स्वार्थ नाही तर केवळ आपण समाजाचे देणे लागतो हीच काय ती जाणीव आहे. रवींद्रनाथा विषयी देखील मिळणारी माहिती नोंदनीय आहे. टागोरांना नोबेल मिळाले तेव्हा ते पहिले आशियाई आणि पहिलेच भारतीय होते. किंबहूना पहिले गौरेतर होते. टागोरांना ज्या गीतांजलीसाठी नोबेल मिळाले त्याची एक कथा सांगण्यात आली आहे. रवींद्रनाथाच्या हातून इंग्लडच्या एका रेल्वस्टेशनवर त्या कवितांचे हस्तलिखित गहाळ झाले होते. नशिबाने ते एका सदगृहस्थाच्या हाती लागले. त्यांने ते स्टेशनवरती ‘हरवले आणि सापडले’ या विभागात प्रामाणिकपणे आणून दिले. चार दिवसांनी ते टागोरांना मिळाले. नोबेलसाठीच्या 15 पैकी 13 परीक्षकांनी त्यांच्या नावाला पाठींबा दिला होता. त्यावेळी 26 उमदेवार स्पर्धेत होते. टागोरांनी 54 नाटके, आठ कांदब-या, चार कादंबरिका, 90 कथा लिहिल्या. चाली लावलेल्या 2200 गाणी आहेत. 70 वर्षाच्या आयुष्यात 2252 कविता लिहिल्या असून एकूण 55 कवितासंग्रह आहेत. टागोरांनी तीन देशांसाठी राष्ट्रगीत लिहिले आहेत. त्याच बरोबर वृक्षदिंडी हा प्रकारच मुळात टागोरांनी सुरू केला ही माहिती देखील नव्याने मिळते.
रवींद्रनाथाच्या वाटयालाही तिरस्कार आला होता. प्रतिभावंताच्या वाट्याला तो नेहमीच येतो. मॅट्रिक्युल्शनच्या भाषाविषयक प्रश्नपत्रिकेत कधी कधी रवींद्रनाथाचा एखादा उतारा देऊन ते शुध्द बंगालीत लिहा असे विद्यार्थ्यांना सांगितले जात असे. त्यांनी भाषेची खूप मोडतोड केली अशी टिका केली जात होती. रवींद्रनाथांना शाळा म्हणजे तुरूंग आणि हॉस्पीटल याचे मिश्रण वाटे असे लिहिले आहे.अशा ब-याच गोष्टी त्यांच्या संदर्भाने वाचायला मिळतात.
जे.आऱ.डींनी देशात चांगले नेतृत्व जन्माला घालण्याकरीता त्यांनी एक संस्था निर्माण करण्याचा केला.त्यांनी केलेला प्रयत्न आणि आलेले अपयश या विषयीचा अनुभव मनाला खेद देणारा आहे. शिक्षणाचा परिणाम म्हणून जगभरातच लोकसंख्या नियंत्रणावर परिणाम होतो. शिक्षण हाच विकासाचा पाया आहे. फ्रान्समध्ये शिक्षण मंत्र्यांना खूप महत्त्वाचे स्थान आहे.शिक्षणासोबत उत्तम नेतृत्त्व तयार करणे महत्त्वाचे आहे. आपल्या देशात चांगल्या नेत्यांची जीवनाच्या सर्वच क्षेत्रात मोठी उणीव आहे.फ्रान्समध्ये नेपोलिअन यांनी एक लिडरशिप संस्था सुरू केली होती.त्याप्रमाणे आपल्या देशात सुरू करण्याचा मानस होता.पण त्याबददलचा सरकारचा प्रतिसाद अत्यंत धक्कादायक आहे.आपण आपल्या कामगाराशी कधी त्यांना नीट समजणा-या भाषेत दिलखुलास गप्पा मारू शकलो नाही.गे माझं आयुष्यातील सर्वात मोठ शल्य आहे. एवढा मोठया माणसाच्या आय़ुष्यातील मोठे शल्य वाचले की,ही माणसं मोठी का ? याची सहजतेने जाणीव होत राहते.इंग्रजी महाकवी थॉमस कार्लाईल हे म्हणाले होते की,मोठया माणसाचे मोठेपण तो छोटया माणसांना ज्याप्रकारे वागवतो त्यातून प्रतीत होते. हे विधान किती खरे आहे हे टाटांना वाचताना लक्षात येते.
उन्मेष प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेले या पुस्तकात एकूण पंचवीस व्यक्तिंच्या कार्याचा आणि व्यक्तिमत्वाचा अत्यंत तरलपणे वेध घेतला आहे. त्यात पु.ना.ओक, रामकृष्ण नायक, अरविंद गजेंद्रगडकर, ज्ञानश्वेर मुळे, शांतीलाल भंडारी, मुकुंदराव किर्लोस्कर, दत्ता हसलगीकर, देवकिसन सारडा, सुश हुंदरे, प्रदीप लोखंडे, नरेंद्र दाभोळकर, राम पटवर्धन, विन्स,प्रेम वैद्य, शिवशंकरभाऊ, रावसाहेब शिंदे, यास्मिन शेख, लक्ष्मण लोंढे, गिरीश प्रभुणे, वि. ग. कानिटकर, आनंद यादव, श्याम जोशी, विलास चाफेकर, रवींद्रनाथ टागोर, जे.आर.डी टाटा यांचा समावेश आहे. अत्यंत सुंदरपणे त्यांच्या जीवनातील आठवणींचा अत्यंत सुंदर,सहज,सुलभ शब्दात व्यक्तिचित्र रेखाटले आहे.
पुस्तकाचे नाव- पोर्टफोलिओ
लेखक- भानू काळे
प्रकाशक- उन्मेष प्रकाशन,पुणे
पाने-200
किंमत-250
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.