December 5, 2024
Maharishi Vittal Ramaji Shindes agricultural thought indrajeet bhalerao article
Home » महर्षींचा शेतीविचार
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

महर्षींचा शेतीविचार

महर्षी शिंदे हे मोठे अध्यात्मिक पुरुष होते. पण त्यांचं अध्यात्म परंपरावादी नव्हतं. ते ब्राम्हो समाजाचं सुधारलेलं, पुढारलेलं अध्यात्म होतं. जीवनाकडं पाहण्याची महात्मा फुले यांची सर्वंकष सामाजिक दृष्टीही त्यात सामावलेली होती.

इंद्रजीत भालेराव

॥ महर्षींचा शेतीविचार ॥

स्वातंत्र्यपूर्व काळातला शेतकरी तसा एका अर्थानं भाग्यवानच म्हणायला हवा. कारण शेतकऱ्यांचा सर्वंकष विचार करणाऱ्या महात्म्यानंतर त्यांना तसाच समतोल शेतीविचार करणारा महर्षी मिळाला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी १८८३ साली ‘शेतकऱ्याचा आसूड’ लिहून शेतकऱ्यांची दुःखं वेशीवर टांगली. त्यानंतर बरोबर ५० वर्षांनी शेती आणि शेतकरी विकासाचा समतोल विचार घेऊन महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुढं आले. १९३० च्या मागेपुढे त्यांनी घेतलेल्या शेतकरी परिषदा आणि त्यातून मांडलेले शेतीविषयक विचार शेतीप्रश्नांचा सर्वांगीण विचार करणारे होते.

महात्मा फुले जसे शेतकरी कुटुंबातून आलेले होते, तसेच महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे देखील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले होते. जन्मापासूनच त्यांनी शेती आणि शेतकरी पाहिला, अनुभवला होता. त्याची सुखदुःखं जाणली होती. पुढं राष्ट्रीय आणि धार्मिक, सामाजिक जीवनाचा तात्विक अभ्यास करताना राष्ट्रीय प्रश्नांचं मूळ शेतकऱ्यांच्या देण्यावस्थेत आहे, हे त्यांच्या लक्षात आलं होतं. शिवाय ते जगभर फिरले तेव्हा त्यांनी आवर्जून जगातल्या शेतीचाही अभ्यास केलेला होता. त्यामुळेच त्यांच्या शेतीविचारांना जागतिक स्वरूपाची पार्श्वभूमी लाभलेली दिसते. ते एका विशिष्ट उंचीवर उभे असल्यामुळे त्यांच्या दृष्टिक्षेपाचा आवाका आणि पल्लाही आणखी मोठा आहे.

महर्षी म्हणतात, “शेतकरी ही सर्वात चांगली अवस्था होय” हे वाक्य शिंदे यांनी अनेक अर्थांनी उच्चारलेलं असावं. त्या पाठीमागं त्यांचा अध्यात्मविचारही असावा. कारण महर्षी शिंदे हे मोठे अध्यात्मिक पुरुष होते. पण त्यांचं अध्यात्म परंपरावादी नव्हतं. ते ब्राम्हो समाजाचं सुधारलेलं, पुढारलेलं अध्यात्म होतं. जीवनाकडं पाहण्याची महात्मा फुले यांची सर्वंकष सामाजिक दृष्टीही त्यात सामावलेली होती. त्यामुळेच त्यांचं वरील वाक्य हे काही भाबडेपणानं केलेलं विधान नाही. त्यामागं अनेक अंगानी केलेला विचार तात्विक रूपात उभा आहे.

क्षात्रधर्म नावाच्या एका लेखात महर्षी शिंदे यांनी पुढील विचार मांडलेले आहेत, “क्षेत्रीय ह्या शब्दाचे निरूक्तही शोधून पाहण्यासारखे आहे. या नावात मुळात लढवय्या असा अर्थ नसावा असे मला वाटते. ‘क्षतात त्रायत इती क्षेत्रिय’ हा माघाऊन सुचलेला विचार दिसतो. निरूक्ताच्या दृष्टीने ही उत्पत्ती या शब्दाची बरोबर नाही. क्षेत्र म्हणजे नुसता जमीनदार किंवा शेतकरी एवढाच अर्थ असावा. शेतावर जेव्हा चालून आलेल्या लुटारूंना हटवणाऱ्यांना म्हणजे रक्षण करणाऱ्यांना हे नाव पडलेले असावे, असे दिसते. या निरूक्ताचा मुद्दा येथे काढण्याचे कारण हेच की क्षात्रधर्म हा सनातन धर्म नसून प्रासंगिक धर्म आहे.”

गरज पडेल तेव्हा शेतकरीच लढत. पण लढणे हा त्यांचा मूळ धर्म नाही. शेती करणे हाच त्यांचा मूळ धर्म आहे. असे महर्षी शिंदे यांचे स्पष्ट मत दिसते. ‘बंदिस्त बळीराजा’ नावाच्या एका टिपणात शेतधर्माविषयी व शेतीकर्माविषयी आणखी काही मूलभूत आणि तात्विक गोष्टी महर्षींनी सांगितल्या आहेत. त्या टिपणात महर्षी शिंदे म्हणतात,” जमीन मालकी व्यक्तीची व व्यक्तीसमूहाची असूच शकत नाही. जमीन ही सर्व समाजाच्या सर्वकालीन सामायिक मालकीहक्काची आहे. एक आपत्धर्म म्हणून राज्यसत्ता निरनिराळ्या व्यक्तीला मालकी हक्काचे वितरण करते. जमीन लहान असल्याने उत्पादन वाढीस अडथळा येतो, असे भांडवलदार कट करून ओरड करतात. त्यांचे ओरडणे वजनदार असल्याने सामाजिक न्यायाची पायमल्ली होत असताना सुद्धा ती स्वीकारली जाते.

शेतकरी असंघटित असल्याने व तो असंघटित राहील या दृष्टीने भांडवलदारांनी केलेली कृत्ये यशस्वी होत राहतात. त्यातल्या त्यात गोरगरिबांना नाना तऱ्हेच्या व्यसनात गुरफटण्यात आनंद वाटत राहील अशी परिस्थिती निर्माण करण्यात भांडवलदार यशस्वी होतात. शेतकऱ्यांची दानत बिघडवली जाते आणि त्यामुळे साधनसामग्रीचे समान वाटप म्हणजे गरिबीचे वाटप, असे त्यांना दृष्टोत्पत्तीस आणता येते. संन्याशाच्या लग्नाची जशी शेंडीपासून तयारी तशी ही शेतकऱ्यांच्या व अस्पृश्यांच्या उन्नतीची त्याच्या मनापासून तयारी करावयास हवी. त्यासाठी त्यांना शिक्षण, सामाजिक शिक्षण मिळावयास हवे.”

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी वरील विचार मांडले तो काळ १९३० च्या आसपासचा. याच काळात जगात मंदीची लाट आलेली होती आणि जागतिक अर्थव्यवस्था विस्कटून गेलेली होती. शेतकरी तर पार उध्वस्त झालेला होता. याच काळात मुंबई विधिमंडळात शेतकऱ्यांवरील शेतसारा वाढवण्याचे व तुकडेबंदीचे बिल मांडण्यात आले होते. अस्मानीला सुलतानीची साथ म्हणतात ती हीच असावी. जमिनीचे छोटे तुकडे शेती करण्यासाठी आर्थिक दृष्ट्या परवडत नाहीत म्हणून ते शेजारच्या मोठ्या जमीनदारांना द्यावेत म्हणजे शेती फायद्याची होईल, असे तुकडेबंदीच्या कायद्याचे स्वरूप होते. म्हणजे गरीब शेतकऱ्यांची जमीन काढून ती जमीनदारांच्या घशात घालण्याचा हा सरकारी डाव होता. तो अजूनही सुरू असलेला आपणास पहावयास मिळतो. १९३० साली या तुकडेबंदीमुळे सुमारे ४०% शेतकरी भूमीहीन होणार होते. आपल्याच शेतीवर त्यांना शेतमजुरी करावी लागणार होती. या भयानक प्रश्नाचे स्वरूप लक्षात आल्यावर महर्षी शिंदे हादरून गेले आणि काही दिवस आपले अध्यात्म बाजूला ठेवून त्यांनी या प्रश्नावर शेतकरी संघटित करण्याचे ठरवले. म्हणून ब्राह्मो समाजाची अधिवेशने सोडून देऊन ते शेतकरी परिषदांना उपस्थित राहू लागले.

या काळात त्यांनी वेगवेगळ्या पाच शेतकरी परिषदांची अध्यक्षस्थाने भूषविली. आपल्या भाषणातून तळमळीने शेतकरी जागा करून, संघटित करण्याचा प्रयत्न केला. योगायोगानं या पाचही परिषदांमधून त्यांनी केलेली भाषणे उपलब्ध आहेत. त्यातून आपणाला महर्षी शिंदे यांची शेतकरीविषयक समग्र भूमिका पाहायला मिळते. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी घेतलेल्या शेतकरी परिषदा अशा स्वरूपाच्या होत्या, १. १९२६ पुणे, अस्पृश्यांची शेतकरी परिषद, २. १९२८ पुणे-मुंबई इलाका, शेतकरी परिषद, ३. १९३१ बोरगाव-वाळवे तालुका, शेतकरी परिषद, ४. १९३२ तेरदाळ संस्थानी, शेतकरी परिषद ५. १९३२ वडनेर-चांदवड तालुका, शेतकरी परिषद. या परिषदांच्या अध्यक्षपदावरून केलेल्या भाषणातूनच आपणाला आता महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा शेतीविचार समजून घ्यायचा आहे.

१९२६ ला पुण्यात जी अस्पृश्यांची शेतकरी परिषद झाली, ती सरकारी शेतकी प्रदर्शनाचा एक भाग होती. ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य’ या चरित्रग्रंथात गोमा पवार यांनी या परिषदेचं समालोचन असं दिलेलं आहे, ” या अस्पृश्यांच्या शेतकरी परिषदेच्या हेतूबद्दल त्यांनी शंका प्रकट केली. कारण जमिनीचे मालक अथवा शेती करणारे ह्यापैकी कोणत्याही नात्याने अस्पृश्यांची गणना शेतीसंबंधीच्या वर्गामध्ये करता येत नाही. एवढेच नव्हे तर त्यांची गणना शेतमजुरांमध्येसुद्धा होत नाही, असे त्यांनी निक्षून सांगितले. इतर इलाख्यात अस्पृश्य समाजाची स्थिती शेतीवरच्या बिनमुदतीच्या गुलामासारखीच आहे, असे नमूद करून अस्पृश्याला शेतकरी म्हणणे म्हणजे त्यांच्या दुःखावर डागण्या देण्यासारखे आहे, असे त्यांनी विधान केले.

अस्पृश्यांचा मूलतः प्रश्न सामाजिक, धार्मिक व विशेषतः राजकीय स्वरूपाचा आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र इतर प्रांतातल्यापेक्षा महाराष्ट्रात अस्पृश्यांची जमीन मालकीसंबंधीची स्थिती किंचित बरी आहे, असे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले. वस्तूतः अस्पृश्य हे दंडकारण्याचे मूळ मालक होत ही जाणीव त्यांना देऊन तुम्ही सर्वांनी एकी करून जमिनीवरील गेलेली सत्ता मिळवली पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.”

१९२८ साली पुण्यात जी मुंबई इलाखा शेतकरी परिषद झाली तिला तिहेरी पार्श्वभूमी होती. त्यातला एक संदर्भ सारावाढीचा, तो वर आलेलाच आहे. दुसरा संदर्भ होता शेतीविक्रीचा. मराठ्यांच्या राज्यात शेतजमीन विकता येत नसे. इंग्रजांच्या राज्यात, जमीन विकता येते, असा कायदा आला. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीनं शेतकऱ्याला फसवून व कर्जबाजारी करून त्याची जमीन हडपण्याची सोय सावकार व जमीनदाराला आयती झालेली होती. त्यामुळे शेतकरी कंगाल होऊ लागला. अशा पार्श्वभूमीवर १९२६ साली बारडोली येथे सरदार वल्लभभाई पटेल यांनी साराबंदीचा यशस्वी सत्याग्रह केला. त्याला मिळालेलं यश व त्याचा देशभर झालेला गाजावाजा यामुळे महाराष्ट्रातला शेतकरीही जागा झाला. कारण गुजरात, महाराष्ट्र हे दोन्ही प्रदेश तेव्हा मुंबई इलाख्यातच होते. या पार्श्वभूमीवर जाग्या झालेल्या शेतकऱ्यांनी ही शेतकरी परिषद आयोजित केलेली होती. तिला शेतसाऱ्याची वाढ आणि तुकडेबंदी या तात्कालिक कारणांची योग्य जोड मिळालेली होती.

या परिषदेला कर्नाटककातून शेतकरी आणि त्यांचे नेते आलेले होते. ५००० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली होती. शेतकऱ्यांनी आपले प्रश्न तडीला लावण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने एकत्रित येण्याची ती पहिलीच वेळ असावी. याचा अर्थ शेतकरी मोठ्या प्रमाणात जागा झाला होता. लोकांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून सर्वच जण भारावून गेलेले होते. महर्षी शिंदे यांच्या भाषणालाही त्यामुळे चांगली धार आलेली होती. तेव्हाच्या आपल्या भाषणात ते म्हणाले होते, ” अज्ञान, दारिद्र्य आणि असाहाय्यतेच्या गाळात देशाच्या ८३% भाग रुतला असता आम्ही थोडी शिकलेली मंडळी स्वराज्याच्या काय गप्पा मारीत बसलो आहोत ? इंग्रजी आमदानीत गिरण्या गोद्या वगैरे मोठ्या भांडवलाचे धंदे सुरू झाल्याने खेड्यातील कसदार तरुणांचा ओघ शहराकडे वळला आहे.

खेड्यात आणि कसब्यात लहान लहान भांडवलाचे मारवाडी, ब्राह्मणवादी पांढरपेशा जातीचे लोक अडाणी शेतकऱ्यास आपल्या सावकारी जाळ्यात गुंतवून त्यांच्या जमिनीचे आपण न कर्ते मालक होऊन बसले आहेत आणि शेतकरी वर्ग आपल्याच शेतावर खंडदार होण्याचीही आयपत न उरल्यामुळे मजूर बनत चालला आहे. सतत फसविल्या गेल्यामुळे त्याची स्वतःची परंपरागत दानत आणि नीती बिघडून तो गावगुंड बनू लागला आहे. मी गेल्या फेब्रुवारी महिन्याच्या सुमारास ऐन हंगामाच्या दिवसात सांगली, जमखंडी संस्थानातील कृष्णा तटावरील गावातून आणि खेड्यातून एक महिना हिंडत होतो. हा भाग पिकांविषयी प्रसिद्ध आहे. परंतु खेडीच्या खेडी शेतकरी मालकाच्या ताब्यातून स्वतः शेती न करणाऱ्या उपटसूळ लोकांच्या ताब्यात गेलेली पाहून माझे हृदय फाटते.”

नामदार चुनीलाल मेहता यांनी तुकडेबंदीचे बिल तेव्हा मांडलेले होते. आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ त्यांनी अतिशयोक्ती करत असे म्हटले होते की, शेतीचे तुकडे इतके लहान होत आहेत की ते माझ्या समोरच्या टेबलाएवढे लहान आहेत. त्याचा उपहास करत महर्षी शिंदे आपल्या भाषणात म्हणाले होते की, नामदार साहेबांचे टेबल मोठे राक्षसी असले पाहिजे. या शेतकरी परिषदेचा आणि नंतर कौन्सिलवर काढलेल्या मोर्चाचा परिणाम असा झाला की, सरकारनं सारावाढीचं आणि तुकडेबंदीचं बिल रद्द केल्याचं लगोलग घोषित केलं. हा या आंदोलनाचा आणि महर्षी शिंदे यांच्या धडपडीचा प्रभाव होता. आपल्या धडपडीला आलेलं यश आणि शेतकऱ्यांचा झालेला फायदा पाहून महर्षीनाही समाधान वाटलं. या घटनेमुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आणि महर्षी शिंदे आपले प्रश्न तडीला लावू शकतात अशी जाणीवही शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली. हे अत्यंत महत्त्वाचं होतं

संस्थानी मुलखातील शेतकऱ्यांसाठी महर्षी शिंदे यांनी जानेवारी १९३२ मध्ये तेरदाळ इथं एक शेतकरी परिषद घेतली. त्या काळात आजूबाजूच्या संस्थानातील खूप मोठ्या शेतकऱ्यांनी तिथं हजेरी लावली. तेव्हा संस्थानिक आपलेच असूनही कसे शेतकऱ्यांना छळतात, त्याच्या सुखाचा विचार करत नाहीत, हे महर्षी शिंदे यांनी उदाहरणासह शेतकऱ्यांना पटवून दिलं. जमीन मालकांनी कुळांना खंडात एक तृतीयांश सूट द्यावी, प्राथमिक शिक्षणाबरोबरच शेतकीचे शिक्षण देणाऱ्या शाळा संस्थानात सुरू कराव्यात, कमी पावसाच्या शेतीमधूनच अधिक पीक घेण्याच्या दृष्टीनं करण्यात येणाऱ्या प्रयोगांचा प्रसार करण्यात यावा, जबर असलेला शेतसारा अथवा तरम आकार कमी करण्यात यावा, आयुर्वेदिक फिरते दवाखाने संस्थानी मुलखात सुरू करावेत असे काही महत्त्वाचे ठराव या शेतकरी परिषदेत मंजूर करण्यात आले. ते किती महत्त्वाचे होते हे आपल्या सहज लक्षात येतं.

वडनेर येथे झालेल्या चांदवड तालुका शेतकरी परिषदेचं अध्यक्षपदही शेतकऱ्यांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनाच दिलं. याआधी तीन परिषदांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविलं होतं. त्यांना वाटत होतं की प्रत्येक ठिकाणी आपणच नेतृत्व करण्यापेक्षा जागोजाग शेतकरी नेतृत्व उभं राहावं. मी एकटा कुठं कुठं पुरणार ? कारण परिषदांशिवाय त्यांचे दौरे आणि सभा सुरूच होत्या.

पश्चिम आणि पूर्व खान्देश, नाशिक, अमरावती, नागपूर, जुन्नर, खेड, हवेली, सासवड, अहमदनगर, सातारा इत्यादी ठिकाणी त्यांचे दौरे आणि सभा झाल्या. महाराष्ट्रातल्या तेव्हाच्या एकंदर सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती महर्षींना चांगलीच अवगत झाली होती. महर्षींच्या या धडपडीमुळे शेतकरी समाज अभूतपूर्व जागा झाला. तरी महर्षींना खंत होती की, शेतकऱ्यांची एकसंघ आणि खंबीर चळवळ उभी राहिली नाही. जागोजाग नवे नेतृत्व उभे राहिले नाही.

सरकार शेतकऱ्यांच्या बाजूनं उभं राहील याची खात्री नाही असं महर्षी या चांदवडच्या भाषणात स्पष्टपणे सांगतात. जसा परकीय सरकारचा भरोसा नाही तसाच स्वकीय संस्थानिकांचाही भरवसा महर्षींना वाटत नव्हता. एक महत्त्वाची हकीकत महर्षींच्या शब्दात मी इथं देत आहे, ” परकीय सरकारांपेक्षा आमच्या संस्थानातील स्वकीय सरकारांनी तर अधिकच ताळ सोडला आहे. हे संस्थानिक पुन्हा आपलीच तुंबडी भरण्यासाठी या परकीय सरकारास शरण जात आहेत.

सुधारणेसाठी नानावलेले म्हैसूर संस्थान तेथील राजा अगदी सत्शील. महाराज कैलास पर्वताची यात्रा करून परत येतात तोच त्यांची राजधानी जे बंगलूर शहर त्या लगतच्या खेड्यात काय प्रकार घडला ? उपासमारीच्या वेदना सहन न होऊन एका शेतकऱ्याने आपल्या बायकोचा व दोन मुलांचा जीव घेऊन स्वतः पण आत्महत्या केली आणि चौघेही खऱ्या कैलासाला गेले. पण तेथे तरी दाद लागेल काय ? अशी हलाखी किंबहुना त्याहीपेक्षा जास्तच हिंदुस्थानात सर्वत्र आहे.” आपण असं समजत होतो की शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा अलीकडील प्रकार आहे. महर्षींच्या भाषणातील वरील भाग वाचला की शेतकऱ्यांचे हे जुनंच दुखणं आहे, असं आपल्या लक्षात येतं. महर्षी शेवटी म्हणतात तसंच थोड्याफार फरकानं तेव्हा सर्वत्र हीच परिस्थिती होती. आणि ती परिस्थिती पाहून महर्षींचं अंतःकरण तळमळत होते.

सरकार हा शेतकऱ्यांचा दूरचा शत्रू आहे त्याआधी त्याच्या जवळचा शत्रू म्हणजे सावकार आणि भांडवलदार, शेतकऱ्यांना आधी त्याच्याशी लढावे लागणार आहे, असं महर्षी सांगतात. शहरातल्या कामगारांनी आणि शेतातल्या कामगारांनी आपल्या जबरदस्त संघटना उभ्या कराव्यात आणि दोघांनी आपल्या एकजुटीनं आपल्या भांडवलदार शत्रूचा सामना करावा, असं महर्षी सुचवतात. संधी साधू लोक या शहरातल्या आणि खेड्यातल्या संघटनांमध्ये भांडणे लावून आपण सुरक्षित राहतील, असंही महर्षींना वाटतं. आज एकमेकांच्या विरोधात उभी असलेली शेतकरी संघटना आणि मार्क्सवादी यांचे भांडण शंभर वर्षांपूर्वीच महर्षींना लक्षात आलेलं होतं, असा याचा अर्थ आहे. महर्षींची ही दूरदृष्टी खरोखरीच अमलात आली असती तर आज शेतकरी जीवनात मोठी क्रांती घडून आली असती.

महर्षींच्या एका भाषणामध्ये महर्षींनी शेतकऱ्यांना पेटून उठायला कशी प्रेरणा दिली ते त्यांच्याच शब्दात पाहूयात. ते म्हणतात, ” शेतकऱ्यांनो तुम्ही नेहमी काबाडकष्ट करणारे नांगरे म्हणून काळ न कंठता राष्ट्राच्या अर्थकारणात तुम्ही आपला एक हात अर्थउत्पादनात गुंतवून दुसरा हात त्या उत्पन्न केलेल्या अर्थाची पुढे विल्हेवाट कशी चालली आहे हे पाहून त्या अर्थगाड्याच्या बैलांची सिंगदोरी खेचण्याकरिता नेहमी मोकळा ठेवणे जरूर आहे. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मागे गेलेल्या अनंत काळाप्रमाणे पुढे येणाऱ्या अनंत काळीही तुम्ही भारवाही केवळ शेपूट व शिंगे नसणारी जनावरे राहणार, ह्यात काय संशय ? आणि ह्याबद्दल इतरांना उगाच वाईट वाटून तरी काय उपयोग.”

महर्षींनी अमेरिकेतल्या बाजारपेठेवर ताबा ठेवून असलेल्या शेतकऱ्यांची उदाहरणं आपल्या त्या भाषणात दिलेली होती. तसा ताबा आपणालाही ठेवता आला पाहिजे, असं महर्षी सांगतात. ती गोष्ट अवघड नाही. पूर्वी स्वयंपूर्ण गावगाडा होता, तेव्हा असा ताबा शेतकऱ्याचा व्यवस्थेवर होताच. गावगाडा विस्कटल्यामुळे शेतकऱ्यांवर ही वेळ आली असे महर्षी सांगतात. नव्या व्यवस्थेवरही शेतकऱ्यांनी आपला ताबा मिळवावा आणि मोक्याच्या जागा आपल्या ताब्यात घ्याव्यात असे महर्षींना वाटते. शेवटी नव्या सामाजिक सुधारणांचा आणि सामाजिक ऐक्याचाही स्वीकार शेतकऱ्यांनी करावा असं महर्षींना अंतकरणापासून वाटतं. अध्यात्म आणि सामाजिक सुधारणा हाच महर्षींच्या आयुष्याचा मूळ गाभा आहे.

महर्षींचे उपलब्ध असलेले शेवटचं आणि अत्यंत महत्त्वाचं भाषण जून १९३२ मध्ये बोरगाव इथं भरलेल्या वाळवा तालुका शेतकरी परिषदेतलं आहे. हे अवघं सहा पानांचं भाषण इतकं गोळीबंद आणि मुद्देसूद आहे की, ही खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याची सनदच आहे. मागं महात्मा फुले आणि पुढं शरद जोशी वगळता या भाषणाला तिसरी तोड नाही. या भाषणाच्या सुरुवातीलाच महर्षींनी शेतकरी म्हणजे काय ? याची व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात,

” माझ्या मते शेतकरी म्हणजे तोच की जो आपल्या कुटुंबाच्या व आश्रितांच्या पोषणाला, शिक्षणाला आणि योग्य त्या सुखसोईंना आवश्यक इतकीच आणि आपल्या आप्ताकडून व आश्रितांकडून वाहवेल इतकीच जमीन बाळगतो. आणि ती आपण स्वतः आपल्या आप्ताच्या आश्रितांच्या श्रमाने योग्य रीतीने खरोखर वाहतो. असे न करता इतर जे जे म्हणून जमीन धारण करतात किंवा तिचेवर हक्क सांगतात ते ते सर्व केवळ भांडवलदार आणि म्हणून ते खऱ्या अर्थाने शेती करणारे शेतकरी नसून उलट त्या शेतकऱ्यांचे अगदी शत्रूच नसले तरी त्यांचे दावेदार आणि प्रतिस्पर्धी असे समजण्यास काही हरकत नाही. त्यांना दावेदार किंवा प्रतिस्पर्धी का म्हणावयाचे ? तर ह्या जमिनीवर जीवापाड मुलाबाळांसह राबणारा एक तर तिच्यावरचा लोण्याचा गोळा संबंध घेऊन उरलेल्या ताकासाठी देखील हेवादावा करणारा भांडवलदार शेतकऱ्यांच्या छातीवर कायमचा बसलेला असतो म्हणून ! हा भांडवलदार कोणत्याही जातीचा, दर्जाचा, स्वकीय किंवा परकीय सरकार असो, अथवा संस्थानिक असो, इनामदार असो किंवा खोत असो हे चट सारे शेतकऱ्यांचे दावेदार आहेत. ते बहुतकरून शेतकऱ्यांचे हितशत्रू आणि कित्येकदा तर अगदी उघड शत्रू असतात.”

शेतकऱ्यांची महर्षींनी केलेली ही व्याख्या आजही कुणालाही पटणारीच आहे. याच भाषणात पुढं महर्षींनी सांगितलं आहे की पूर्वीचे राजे शेतातल्या उत्पन्नाचा सहावा (दहा पैकी सहा म्हणजे ६०% ) हिस्सा घेत पण त्या बदल्यात अनेक सोयी सुविधा शेतकऱ्यांना पूरवित असत. अगदी शेतकऱ्यांना होणाऱ्या जंगली जनावरांच्या त्रासाची जबाबदारीही राजे आपल्या अंगावर घेत आणि जनावरांचा बंदोबस्त करीत.

आजचे संस्थानिक आणि सरकार आपली जबाबदारी टाळत असताना शेतकऱ्यांनी सरकारला शेतसारा कशासाठी द्यावा ? असा प्रश्न महर्षी शिंदे विचारतात. सरकार आपल्या कर्तव्यात कसूर करत असेल तर शेतकरीही आपला कर भरण्यात कसूर करील आणि ती चूक शेतकऱ्याची असणार नाही. कारण तसे करण्यास त्याला सरकारनेच भाग पाडलेलं आहे. म्हणून सरकारच या बाबीला जबाबदार राहील, असं महर्षी म्हणतात. भांडवलदार आणि कामगार यांचे संबंध कसे असावेत याचं फारच चांगलं विश्लेषण महर्षींनी केलेलं आहे. ते त्यांच्याच शब्दात पाहुयात,

” खेड्यात राहून, जमिनीवर श्रम करून, कच्चा माल उत्पन्न करणारे शेतकरी आणि शहरात राहून त्याचा पक्का नग उत्पन्न करणाऱ्या गिरण्या, गोद्या आणि आघाड्यांचे कामकरी हेच खरे राष्ट्राचे धारक आणि चालक आहेत. पण त्यांना भांडवलदारांच्या बुद्धींचे आणि युक्तीचे सहाय्य पाहिजे. ही तात्विक गोष्टही विसरून चालावयाचे नाही. हा भांडवलदार इंग्लंड अमेरिकेतल्या प्रमाणे सावकार तरी असेल किंवा हल्लीच्या रशियाप्रमाणे सरकारचे रूपाने तरी राहीलच. अजिबात नष्ट होईल हे शक्य नाही. पण ह्यापैकी तो भांडवलदार कोणत्या का रूपाने राहीना तो शेतकऱ्यांच्या व कामगारांच्या मांडीखालील तट्टाप्रमाणे चालला पाहिजे.

त्याची चंदी जर वर बसणाऱ्या शेतकरी कामकरी यांच्याच हाती आहे, तर त्याच्या तोंडातील लगामही त्याच्या हातात नको काय ? ज्याची चंदी त्याचाच लगाम, हे तत्व विसरल्याबरोबर भांडवलासूर ताबडतोब बादशहा बनून साक्षात विष्णूचा अवतार म्हणू लागतो. पण उलट ज्या हातात चंदी त्याच हाती लगाम आला म्हणजे हाच भांडवलासूर उग्ररूप टाकून आपसुखानेच अध्यक्षाचे गरीब रूप धारण करणारच. पण त्याचे अगोदर शेतकरी व कामगार या दोघांचे संयुक्त संघ ठीक झाले पाहिजेत. ही मांजराच्या गळ्यात घंटा बांधावयाची ती शेतकऱ्यांनी आणि कामगारांनीच बांधली पाहिजे. त्यांनी ह्यापुढे ह्या कठीण पण स्वतःच्या कामाकरिता येरागबाळ्यांच्या तोंडाकडे पाहत राहू नये.”

महर्षींच्या याच विचारातूनच कदाचित शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली असावी. महर्षींनी स्वतःच अशा प्रकारचा बहुजन पक्ष स्थापन केला होता. पण त्यांचा पिंड मुळात राजकारण किंवा समाजकारणाचा नव्हताच. ते खरे अध्यात्मपुरुष पण समाजासमोरची संकटं पाहून त्यांनी अध्यात्म बाजूला ठेवलं आणि बहुजनांच्या समाजकारणाचा, राजकारणाचा आणि अर्थकारणाचाही पाया घालून दिला.

महर्षी या सर्व सामाजिक भानगडीत पडले ते फार उशिरा. आपत्धर्म म्हणून. ते जगभर फिरले ते तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासाठी. पण सोबतच त्यांनी जगभरातली शेती उत्सुकता म्हणून पाहिली आणि अभ्यासली देखील होती. आंतरिक तळमळ आणि सूक्ष्म निरीक्षण हे महात्मा फुल्यांचे बळ होते तर त्याला शास्त्रीय अभ्यासाची आणि जगभरातल्या शेती निरीक्षणाची जोड देऊन या प्रश्नांची मांडणी करण्यात महर्षी आघाडीवर राहिले.

संदर्भ :

१. धर्म, जीवन व तत्वज्ञान – महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, सं. मा. प. मंगुडकर, ए. के. घोरपडे, गो. मा. पवार, रु. पा. पांजणकर, महाराष्ट्र शासन समाज कल्याण मंत्रालय, मुंबई (१९७९)
२. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य – गो. मा. पवार, लोकवाङ्मय गृह, मुंबई (२००४)
३. निवडक विठ्ठल रामजी शिंदे – सं. गो. मा. पवार, साहित्य अकादमी, दिल्ली (१९९९)
४. एक उपेक्षित महात्मा : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे – प्रा. डाॅ. एन. डी. पाटील, नागनालंदा प्रकाशन, इस्लामपूर (१९९९)


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading