December 5, 2024
Basic needs are not only food clothing shelter but also clean air
Home » मुलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा नव्हे तर शुद्ध हवा
विशेष संपादकीय

मुलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा नव्हे तर शुद्ध हवा

हवा गुणवत्ता निर्देशांक !

पूर्वी केवळ तीन घटकांच्या आधारे हवेची गुणवत्ता निश्चित करण्यात येत असे. आज आठ घटकांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. भारतात सहा भागामध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक विभागण्यात आला आहे.

डॉ. व्ही. एन. शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

दरवर्षी पावसाळा संपला की हवा प्रदूषणाच्या चर्चा सुरू होतात. हवेचे प्रदूषण दिवसेंदिवस गंभीर बनत चालले आहे. हवेची गुणवत्ता कशी आहे, हे ठरवण्यासाठी हवा गुणवत्ता निर्देशांक ही भौतिक राशी निश्चित करण्यात आली. समाजाला हवा कशी आहे, हे समजावे या हेतूने ही नवी राशी निश्चित केली. विविध देशांमध्ये मापनाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. मात्र या विषयाबाबत म्हणावी तशी जागरूकता नाही. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, अजूनही समाज, शिक्षण व्यवस्था मान्य करायला तयार नसल्या तरी अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा नाहीत. त्या अन्न, पाणी आणि शुद्ध हवा आहेत. त्यामुळेच निसर्गाकडून मोफत किंवा मातीमोल किंमतीने मिळणाऱ्या पाणी आणि हवेची कोणीच काळजी घेत नाही. त्याचे गंभीर परिणाम मानवाला त्यातही लहान मुलांच्या आरोग्यावर होताहेत. त्यामुळेच हवेचा गुणवत्ता निर्देशांक समजून घेणे गरजेचे आहे.

हवेची गुणवत्ता हा विषय १९६८ मध्ये प्रथम चर्चेत आला. प्रथम ज्या भागामध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे, अशा भागात हवा जास्त प्रमाणात खराब असल्याचे निदर्शनास आले. हवेची गुणवत्ता चांगली राहण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता यावी, या हेतूने संशोधकांचा एक गट कार्यरत झाला होता. हवेची गुणवत्ता खराब करणाऱ्या घटकांमध्ये ओझोन, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड यांचा समावेश होतो. तसेच धुलीकण, परागकण हेही प्रदूषण वाढते. देशातील भूस्तराजवळ या घटकांचे प्रमाण किती आहे, याचे मापन करून हवेचा गुणवत्ता निर्देशांक निश्चित करण्यात येतो.

ऑस्ट्रेलियामध्ये ० ते ३३ हवेचा गुणवत्ता निर्देशांक असेल तर ती हवा अतिशय चांगली मानतात. ३४ ते ६६ असेल तर चांगली हवा मानतात. ६७ ते ९९ बरी, १०० ते १४९ वाईट, १५० ते २०० अतिशय वाईट आणि २०० पेक्षा जास्त असल्यास धोकादायक समजतात. चीन आणि कॅनडामध्ये १ ते ३ हवेचा गुणवत्ता निर्देशांक धोकाविरहीत, ४ ते ६ असल्यासही सर्वसाधारण, ७ ते १० असल्यास तणावयुक्त आणि १० पेक्षा जास्त असल्यास धोकादायक असते. युरोपमध्ये ० ते २५ अतिशय चांगली, २५ ते ५० धोकाविरहीत, ५० ते ७५ मध्यम दर्जाची, ७५ ते १०० धोकादायक आणि १०० पेक्षा जास्त हवा गुणवत्ता निर्देशांक असल्यास अतिधोकादायक मानली जाते.

भारतातील हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाबद्दलची मानके केंद्रिय प्रदूषण नियंत्रण मंडळाने १७ सप्टेंबर २०१४ रोजी निश्चित केली. भारतातील २४० पेक्षा जास्त शहरामध्ये ३४२ पेक्षा जास्त केंद्रामध्ये हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी यंत्रणा निर्माण केली. इंडियन इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूरकडे याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच डॉक्टर्स, हवेचे अभ्यासक, शिक्षण तज्ज्ञ आणि समाजसुधारक यांचे गट तयार केले आहेत. राज्य प्रदूषण नियंत्रक मंडळांचीही स्थापना केली. पूर्वी केवळ तीन घटकांच्या आधारे हवेची गुणवत्ता निश्चित करण्यात येत असे. आज आठ घटकांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. भारतात सहा भागामध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक विभागण्यात आला आहे.

भारतात ० ते ५० हवा गुणवत्ता निर्देशांक असल्यास, हवा अतिशय चांगली, ५१-१०० मध्ये असल्यास समाधानकारक, १०१-२०० हवा गुणवत्ता निर्देशांक असल्यास मध्यम दर्जाची, २०१-३०० असल्यास हवेचा दर्जा खराब, ३०१-४०० असल्यास हवा अतिशय खराब तर ४०० पेक्षा जास्त असल्यास हवेचा दर्जा गंभीर असतो. ० ते ५० निर्देशांक असल्यास हवा अतिशय चांगली असते. अशा प्रकारची हवाच निरामय जगण्यासाठी गरजेची असते. ५१-१०० हवा गुणवत्ता निर्देशांक असल्यास आजारी असणाऱ्या, श्वसन विकार असणाऱ्या लोकांना थोडाफार त्रास होतो. हृदयाचे विकार असणारे लोक, अस्थमा किंवा फुफ्फुसाचे विकार असणाऱ्या रूग्णांना १०१ ते २०० हवा गुणवत्ता निर्देशांक असल्यास त्रास होतो. २०१-३०० हवा गुणवत्ता निर्देशांक असलेल्या हवेमध्ये दिर्घकाल राहिल्यास अनेक लोकांना श्वसनाचा त्रास होतो किंवा एखाद्या आजारास बळी पडावे लागते. श्वसनप्रक्रियेतही अडथळा येतो. ३०१-४०० हवा गुणवत्ता निर्देशांक असल्यास श्वसनप्रक्रियेचे आजार उद्भवतात. ४०१ पेक्षा जास्त हवा गुणवत्ता निर्देशांक असल्यास आजारी लोकांचे आजार बळावून, त्यामुळे रूग्णांच्या जिवितास बाधा पोहोचते. निरोगी लोकांना आजार उद्भवू शकतात. दक्षिण कोरिया, मेक्सिको, जपानमध्येही हवेचे गुणवत्ता निर्देशांक ठरवण्याची हीच मानके आहेत.

हवेमध्ये प्रदूषके मिसळण्यास आणि त्यांचे प्रमाण वाढवण्यामध्ये मानवाचे वर्तन सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडते. जास्तीत जास्त ऊर्जा वापरण्यासाठी जास्तीत जास्त इंधनाचा वापर करण्याची जगभर जणू शर्यत लागली आहे. काही छोटे देश प्रदूषण कमी करण्यासाठी मनापासून प्रयत्न करतात. मात्र त्यांच्या प्रयत्नातून जगाच्या वातावरणात लक्षणीय परिणाम साध्य होत नाही. दगडी कोळसा, खनीज तेल आणि लाकूड यांचा मोठ्या प्रमाणात ज्वलनासाठी वापरण्यात येतात. त्यांच्यामधून कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड तसेच शिशाची संयुगे वातावरणात मिसळतात. ओझोनचे वाढते प्रमाण जागतिक तापमान वाढीचे कारण बनत आहे. हवेत कोरडेपणा वाढतो. भारतासारख्या देशामध्ये धूळीचे प्रमाण वाढते. वाहनांची वाढती संख्या, रस्त्यांची खराब अवस्था, अनावश्यक पदार्थांचे, कचऱ्याचे, शेतातील पिकांचे उपयुकत नसणाऱ्या भागांचे ज्वलन यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढते. नियमांचे पालन न करता करण्यात येणारे खाणकामही मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढीचे कारण बनते. तापमान वाढीमुळे निसर्ग चक्रामध्ये अनिश्चितता आली आहे.

अंतिमत: याचा परिणाम जल-जंगल-जमीन यांचा समतोल ढळण्यामध्ये होत आहे. एकिकडे रोगाने लोक आजारी पडणे, नैसर्गिक आपत्तीमध्ये जिवितास धोका निर्माण होणे आणि जैवविविधता घटणे या परिणामांची तीव्रता वाढत आहे. हे टाळणे आता कठीण आहे. मात्र ते अशक्य निश्चितच नाही. वातावरणात प्रदूषके मिसळणार नाहीत याची प्रत्येकाने दक्षता घ्यायला हवी. तसेच आहे ते घटवण्यासाठी हरित आवरणाचे क्षेत्र वाढवणे गरजेचे आहे. मात्र पोटाच्या मागे लागले की आपण उपजिविकेसाठी आय कशी वाढेल याचाच विचार करतो. त्या कृतीचे एकूण काय परिणाम होतील याचा कधीच विचार केला जात नाही… हाच सर्वात मोठा धोका आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading