December 5, 2024
Publication of Bhuilek Kavya Sangha by My Aunt Pravin Pawar
Home » माय मावशींच्या हस्ते ‘भुईलेक’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन
काय चाललयं अवतीभवती

माय मावशींच्या हस्ते ‘भुईलेक’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

माय मावशींच्या हस्ते ‘भुईलेक’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

बोरीस : ‘मी पेरेन सर्व धर्म एकतेच्या पांभरीतून, कुणी निरागस भुईचा गर्भ ठेवणार आहे का ?’ असे ग्रामीण, स्त्रीवादी प्रवाहातून लिहिणारे, समकालीन साहित्यात भोवतालाचे प्रतिनिधित्व करणारे धुळे येथील युवा कवी प्रविण पवार यांच्या ‘भुईलेक’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन बोरीस येथे शेताच्या बांधावरून त्यांच्या आई विजया पवार मावशी विमलबाई पवार, जया नेरे, विजया पाटील, सरला साळुंखे यांच्या हस्ते झाले.

ना भुईची लेक होणं सोपं असतं, ना पाठ टेकल्यावर भुईला कळणाऱ्या लेकीच्या वेदनेला शब्द देणं सोपं असतं, ना जखमांच्या हंगामात हळहळून हादरलेल्या भुईसाठी काळीज आंथरणं सोपं असतं. ही जखड उलगडताना अधिकाधिक रूतत गेलेले वंशवेलीचे पीळ या शब्दांत आहेत. हळद शिंपडणाऱ्या बाभळीला बिलगून आलेल्या, विहिरीकाठी डवरलेल्या, धस्कटांनी रक्ताळलेल्या जाणिवांच्या या कविता आहेत. पटणारं, न पटणारं, कल्पित, अकल्पित संचित बोलीतून उगवणार नाही तर कशातून ? हे गढूळ असेल पण सेंद्रिय आहे. म्हणूनच भविष्याची सकस रेघ इथून ठळक होण्याचा आशावाद वाटतो. हे उसळते तरंग चारीमेर व्यापण्याची आश्वासकता वाटते.

शहराला आपला मूळ चेहरा न देणारा हा कवी आकाशगंगेची स्वप्न पाहतोय. आडवळणाचं पाणी प्रवाह हिसळू पाहतंय. कोऱ्या कागदावरच्या या निरागस समकालीन तीव्रतेला नव्या पालवीचे श्वास मिळोत, जगण्याचे चिनभिन कोपरे उजळोत, आटलेल्या नद्या वाहत्या राहोत, सच्चेकच्चे दुवे सखोल होवोत.-

कल्पना दुधाळ

दोन वर्षांपूर्वी प्रविण पवार यांचा ‘भुई आणि बाई’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्या ग्रामीण – स्त्रीवादी प्रवाह लेखनाचे वैचारिक पाऊल ‘भुईलेक’ हा कवितासंग्रह आहे. ‘शहराला आपला मूळ चेहरा न देणारा हा कवी आकाशगंगेची स्वप्न पाहतोय.’ अशा शब्दांत सुप्रसिद्ध ग्रामीण कवयित्री कल्पना दुधाळ ह्यांनी या संग्रहाची पाठराखण केली आहे.

या आगळ्यावेगळ्या प्रकाशन सोहळ्यासाठी बेळगाव कर्नाटक मधील ज्येष्ठ कवी आबासाहेब पाटील उपस्थित होते. याप्रसंगी ते म्हणाले “भुईलेक’ हा कवितासंग्रह समकालीन मराठी साहित्यात महत्वाची वैचारिक भर घालणारा आहे. शोषित वंचित स्त्रियांचे काळालगत वाढत चालले प्रश्न आणि त्यांच्या वेदनेची कळ कवीने शब्दबद्ध केली आहे.”

बोरीस येथील देविदास पारधी यांच्या शेताच्या बांधावरून झालेल्या प्रकाशन सोहळ्यासाठी. साक्री येथील साहित्यिक व उपक्रमशील शिक्षक डॉ. नरेंद्र खैरनार, प्रा.डॉ.नरेश पवार, योगिता पवार, झेंडू ठाकरे, दिलीप पवार, देविदास पवार, चेतन पवार, सपना साळुंखे, कल्पना देवरे, विकास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

 बेळगाव येथील ज्येष्ठ कवी आबासाहेब पाटील यांनी दिलेला प्रविण पवार यांचा परिचय...

कोण हा प्रविण पवार ?

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या 'खंबाळे' गावात एका निरक्षर आदिवासी कुटुंबात जन्मलेला हा मुलगा. 'हातात लेखणी आली नसती तर नक्षलवादी झालो असतो' असं स्पष्ट सांगणारा हा मुलगा. पारधी समाजावर ठळक कोरला गेलेला गुन्हेगारीचा काळा शिलालेख पुसू पाहतोय. पारधी समाजातील अंधश्रद्धेचा रूढी जाचक अंधार दूर करू पाहतोय. त्याला आपला समाज मुख्यप्रवाहात आणायचा आहे. म्हणून तो सातत्याने वाचन, चिंतन आणि नंतर लेखन करतोय.
त्याने 'जागतीज्योत' , 'भुई आणि बाई' , 'भुईलेक' हे कवितासंग्रह आणि 'ऑनलाईन प्रेमाची ऑफलाईन कहाणी' ही पहिल्या दमात ३७४ पानांची मोबाईलवर टाईप करुन लिहिलेली कादंबरी. अशी त्याची एवढ्या कमी वयातली ग्रंथसंपदा. तरीही पाय जमिनीवरच... स्वतःचा ठेंबा मिरवताना कधी दिसत नाही. सकसता असूनही नाकारलं गेलेल्या इतरांच्या समकालीन साहित्यावर सखोल परिक्षण लिहितो. समिक्षा लिहितो. इतरांच्याही कवितेचं तोंडभरून कौतुक करतो. जिथं काही कमी वाटतं तिथं स्पष्ट बोलतो. सुचवतो. ह्यातून माणूस जोडतो.
हा हातावरचं पोट असणारा हा तरुण इतर साहित्यिकांचे पुस्तके विकत घेतो. नाहीतर सातवं वेतन आयोग लागू असणाऱ्यांना पुस्तकं फुकट हवी असतात. कसदार वाचून झालेली पुस्तके भेट देतो. त्याच्या मातीच्या घरात कुठल्याही संतांचा महात्मांचा दैवांचा अगदी त्याच्यासहीत घरातील सदस्यांचा प्रतिमा फोटो नाहीत. मात्र त्याच्या घरात एक सुंदर कोपरा आहे जो सन्मानचिन्ह - पुस्तकांनी भरलेला आहे. बहुतेक वाळवीलाही आवडतो.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. आणि अकरा वर्षांनंतर प्रविणच्या लेखनाला पहिल्यांदाच मराठी नियतकालिक - दिवाळी अंकात संधी मिळाली. प्रविण हा भाषा जगणारा तरूण आहे. कुठल्याही गटातटात न बसणारा, तळमळीचा - चळवळीचा लेखक आहे. ' मुंबई मराठी साहित्य संघाचा 'साहित्य' दिवाळी अंकात प्रविणचा 'बदलते विश्व युवा लेखणी' हा लेख छापून आला आहे जो वाचून मी ही पोस्ट लिहायला घेतली. ज्यांनी प्रवीणची पुस्तके वाचली नसतील त्यांनी 'बदलते विश्व युवा लेखणी' हा लेख 'साहित्य' दिवाळी अंकातून आवर्जून वाचावा, हे माझं सुचवणं आहे वाचकांना. ज्येष्ठ साहित्यिकांना. 'शब्द शिवार' अंकात त्याची 'बिन बापाची पिढी' कविता छापून आली आहे. जी वाचून त्याच्या काव्यप्रतिभेची मूळं शोधायला लावणारी आहे.
नव्या संकल्पना मनात घेऊन जगणारा प्रविण पवार या गुणी मुलाचा तिसरा कवितासंग्रह 'भुईलेक' प्रकाशित झाला आहे. या संग्रहीतील दोन कविता अशा....

(१)
•कौमार्य चाचणी घेशील?•

ये थांब
माझ्या चालण्यावरुन
नको ना तर्क लावून जावूस
अरे मी खरंच
अनुभवला नाहीये रे
पहिला संबंध

आणि
नको फिरवूस नजर
चेहऱ्यावरुन
माझ्या भरगच्च छातीवर
अजूनही कुणी फिरवला
नाहीये रे हात
छातीवरून

नको ना तू
तुझ्या भवतीचा संदर्भ देत
माझ्या वर्तमानाला उबगंवूस
माझ्या हिश्याला नाहीये रे
असा हा वर्तमान...
असता जर कुणी माझ्या हिश्याला
तर राहिला नसता अद्याप माझा
गळा सुना - सुना

मी आवडली असेल ना तुला!
बोल माझ्याशी लग्न करशील ?
की आधी कौमार्य चाचणी घेशील ?

(२)
•बिन बापाची पिढी•

हार्मोन्सच्या इंजेक्शनाचा वापर करून
ते घेऊ पाहताहेत त्वरित हंगाम
भुईच्या गर्भातून

तेच आयव्हीएफचा वापर करून
बहाल करताय ममत्व
बाईच्या गर्भातून

निख्खा काढून घेताय कस भुईचा
भुई विकता येते म्हणून
अन् घेताय वृत्त तळतळा बाईचा
बाई भोगता येते म्हणून

आता
मार्केटला आणतील ते
बिन बापाची पिढी गनमन
प्रयोगशाळेत जमा होईल
माय मातीची तनफन...

पुस्तकाचे नाव – भुईलेक काव्यसंग्रह
कवी – प्रविण पवार ( मोबाईल – 96896 10684 )
प्रकाशक – शब्दान्वय प्रकाशन, मुंबई


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading