July 22, 2024
Home » तूं निमित्तमात्रचि होये । सव्यसाची ।। ( एकतरी ओवी अनुभवावी )
विश्वाचे आर्त

तूं निमित्तमात्रचि होये । सव्यसाची ।। ( एकतरी ओवी अनुभवावी )

मेंढ्यांच्या कळपात सिंह जन्माला आला तर तो मेंढ्यासारखे वागतो का ? सिंहाला पाण्यात पाहील्यानंतर आपण मेंढ्यापेक्षा वेगळे आहोत याची जाणीव निश्चितच होते. त्याची डरकाळी ही आपोआप फुटते. तसे राजा सन्यस्थ असला तरी त्याचा राजधर्म त्याच्या सोबत असतो. त्यातून तो स्वतःची ओळख स्वतः करून घेतो. हेच अध्यात्म आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 9011087406

तूं निमित्तमात्रचि होये । सव्यसाची ।। ( एकतरी ओवी अनुभवावी )

आणि कोरडें यशचि नोहे । समग्र राज्यही आलें आहे ।

तूं निमित्तमात्रचि होये । सव्यसाची ।। 471 ।। अध्याय 11

ओवीचा अर्थ – आणि यांत केवळ रिकामें यशच मिळणार आहे असें नाही तर संपूर्ण राज्य देखील त्यांत आलेले आहे. अर्जुना, तूं केवळ नावांला मात्र कारण हो.

आपण फक्त निमित्तमात्र आहोत. ही अनुभुती येणे अध्यात्मिक प्रगतीसाठी खूप गरजेचे असते. एकदा एक राजा जंगलात भटकत असताना त्याला एक सत्पुरुष भेटला. त्याच्या भेटीत त्याचे जीवनच बदलले. राजाने खूप मोठा पराक्रम केला होता. नुकताच त्याचा राज्याभिषेकही झाला होता. राजाने उभा केलेल्या त्या स्वराज्याचा त्याला अभिमानही होता. तसे असणे स्वाभाविकही होते. राजा जेव्हा या साधूपुरुषास भेटला तेव्हा त्या साधू पुरुषाने त्याला फक्त एकच विचारले. तु काय काय जिंकलास ?  राजा गर्वाने म्हणाला. मी अनेक किल्ले जिंकले आहेत. अनेक साम्राज्य माझ्या प्रभावाखाली आहेत. जवळपास आता जिंकायचे काही उरलेच नाही. ही सर्व भूमी ही माझीच झाली आहे.

तेव्हा तो साधू पुरुष शांत स्वभावाने त्याला म्हणाला. ठिक आहे. तुझा देह म्हणजे ही सुध्दा एक भूमीच आहे. मग तु ती जिंकला आहेस का ?  राजा थोडा कोड्यात पडला. या साधूंना मी सांगतो आहे. तुम्ही उभी आहात ती भूमी सुध्दा माझी आहे. मग या देहाचे हे काय विचारात आहेत. सगळच जिंकले आहे मग देह कसा काय जिंकला नाही असे का या सत्पुरुषास वाटते. त्याला काहीच समजले नाही.

यावर राजा म्हणाला. हे सत्पुरुषा आपण काय बोलत आहात ते माझ्या काहीच लक्षात येत नाही. तरी मला तुम्ही समजावून सांगू शकाल का ? सत्पुरुष म्हणाला हो जरूर. तु सगळं जग जिकला आहेस. पण स्वतःला तु जिंकला नाहीस. मी स्वतःवर विजय मिळवला आहे. स्वतःवर जेव्हा तू विजय मिळवशील तेव्हा तू सर्व जगावर विजय मिळवला आहेस असो होईल. स्वतःच्या देहातील आत्मा मी जिंकला आहे. स्वतःमध्ये असणाऱ्या आत्म्याला तु जिंकू शकला नाहीस. हे जिंकणे तुझे बाकी राहीले आहे. तु स्वतःला जेव्हा जिंकशिल तेव्हा तू खरा आत्मज्ञानी होशील. भूत, भविष्य, वतर्मानावर तुझे राज्य असेल. पण तु अद्याप त्या देहामध्ये अडकला आहेस. देहावर तु विजय मिळवलेला नाहीस. देह आणि आत्मा वेगळा आहे याचे ज्ञानही तुला नाही.

राजाला आता देहावर विजय मिळवण्याची इच्छा झाली. त्याने म्हटले जग जिंकले आहे, मग हा देह काय आहे. त्याच्यावरही विजय मिळवू. यावर तो सत्पुरुष म्हणाला, हे राजन तु म्हणतोस तितके सोपे हे नाही. कारण तु मुळात काही जिंकलेच नाही. मी केले मी केले याचा तुला हा अंहकार आहे ना हा प्रथम तुझ्यातून जायला हवा. कारण तु फक्त निमित्र मात्र आहेस. जग जिंकण्यास तु फक्त एक कारण आहेस. स्वराज्य सुराज्य व्हावे यासाठी हे कार्य तुझ्याकडून करवून घेतले आहे. तु यात फक्त निमित्त मात्र आहेस.

यावर राजा अधिकच बुचकळ्यात पडला. म्हणाला हे आता नवीन काय ? सर्व जगाला माहीत आहे. मी या साम्राज्याचा राजा आहे. मीच निर्माण केले आहे हे राज्य. आमच्या पिढ्यान पिढ्या या भूमिवर राज्य करत आल्या आहेत. आणि तु मला मी काहीच केले नाही असे कसे म्हणतोस. मी अन् निमित्तमात्र छे..हे मला पटणारे नाही..यावर तो सत्पुरुष म्हणाला, तु राज्य उभे करण्यासाठी तुला कोणी प्रेरीत केले. तुला कोणी हे कार्य करण्यास सांगितले. तु केले नसतास तरी हे राज्य उभे राहीले नसते असे तुला वाटते काय याचा विचार कर. राजा मेला म्हणून राज्य चालायचे राहात नाही. आज तु राजा झाला आहेस उद्या आणखी कोणी होईल. कोण मेले म्हणून राज्य उभे राहात नाही असे नाही. तुला तुझ्या मानस मातेने हे राज्य उभे करण्यासाठी प्रेरित केले आहे. म्हणजे त्या मातेने हे राज्य उभे केले आहे. त्या मातेचे हे राज्य आहे. तु फक्त तिच्यासाठी निमित्त मात्र झाला आहेस. या मातेने लोक गोळा केले. तुझ्यामागे उभे केले. तुला घडविले. मग तुला असंख्य लोकांनी हे राज्य उभे करण्यात मदत केली. काहींनी तुझ्यासाठी रक्तही सांडले. काहींनी जीवही गमावला. मग हे राज्य तु उभे केले असे कसे म्हणतोस. तु काय केलेस मला सांग. या सर्वात तु निमित्त मात्र आहेस.

राजाला ही गोष्ट पटली. पण देहावर विजय मिळवायचा कसा याचे काही कोडे उलघडले नाही. अखेर राजाने या राज्याचा त्याग करण्याचे ठरवले व सन्यास आश्रम स्वीकारण्याचा निर्णय घेतला. राजाने निर्णय घेतला. मी सन्यास आश्रम स्वीकारेन पण जो पर्यंत माझा वारस आत्मज्ञानी होत नाही तोपर्यंत माझा मुख्य वारस हा सन्यास आश्रम स्वीकारेल बाकीचे वारसे राजगादी सांभाळू शकतील. बाकीच्या वारसे सन्यास आश्रमात असतील त्यांना मानाने गादीचा मान देण्यात यावा. भिक मागून कोणी राजा होत नाही. मानाने त्यांना गादी देण्यात आली तरच त्यांनी ती स्वीकारावी. असे काही नियम राजाने केले. पण राजाला एक चिंता सतावू लागलो. तो म्हणाला राज्य सोडल्यानंतर माझ्या वारशांना आपण राजाचे वंशज आहोत याचा विसर पडला तर ते कधीच राजे होणार नाहीत.

तेव्हा तो सत्पुरुष म्हणाला, मेंढ्यांच्या कळपात सिंह जन्माला आला तर तो मेंढ्यासारखे वागतो का ? सिंहाला पाण्यात पाहील्यानंतर आपण मेंढ्यापेक्षा वेगळे आहोत याची जाणीव निश्चितच होते. त्याची डरकाळी ही आपोआप फुटते. तसे राजा सन्यस्थ असला तरी त्याचा राजधर्म त्याच्या सोबत असतो. त्यातून तो स्वतःची ओळख स्वतः करून घेतो. हेच अध्यात्म आहे. स्वःची ओळख करुन घेणे हेच तर अध्यात्म आहे. राजाला त्याची ओळख स्वतःच होते. त्याला आपण राजे आहोत असे सांगावेही लागत नाही. म्हणूनच म्हटले हे जीवन जगताना आपण फक्त निमित्त मात्र आहोत. आपण असलो काय अन् नसलो काय हे जग पुढे चालतच राहणार. ही ओळख करून घेऊन आपण स्वतःचा जन्म कशासाठी झाला आहे हे ओळखून ते कार्य करायला हवे. म्हणजेच स्वतःची ओळख स्वतः करून घ्यायला हवी. या देहावर विजय संपादन करायला हवा. मगच आपण या विश्वावर विजय संपादन करू.

प्रत्येकाने या विश्वावर विजय संपादन केला आहे. फक्त निमित्त मात्र होऊन त्याची ओळख करून घ्यायची आहे. मग जो वारस हे जिंकेल त्याला हे राज्यच काय सर्व विश्वच त्याचे होईल. यासाठीच केवळ निमित्त मात्र व्हायचे आहे. आणि अध्यात्मिक प्रगती साधायची आहे. स्वःची ओळख जेव्हा होईल तेव्हा आत्मज्ञानाने तो निश्चित म्हणेल आणि ओळखेलही हे राज्य माझ्या पुर्वजाने एका मातेच्या इच्छेसाठी, तिच्या मार्गदर्शनाने उभे केले होते. मी फक्त निमित्त मात्र होतो. कर्ता करविता ती माता होती. मातेच्या रुपात स्वयं भगवान कृष्ण होते.   

संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा अभ्यास एक तरी ओवी अनुभवावी असा या ग्रुपचा उद्देश आहे. मग होताय ना सहभागी..त्यासाठी लिंकवर क्लिक करा.
 https://www.facebook.com/groups/ShriDnyneshwariStudy

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

सतविचार अन् आचरण हाच विकारांवर उपाय

उतारवयात प्रेमळ वागणे अन् वाचनाने जीवन सुखकर

“दुर्गांच्या देशातून : वैविध्याने नटलेला दिवाळी अंक नव्हे, संदर्भ ग्रंथ”

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading