अनुभुती आली तरच अध्यात्माचा गोडी लागते. यासाठी भक्ती, सेवाभाव, प्रेम हे असायला हवे. विश्वासहा असायला हवा. पण अनुभव आलाच नाही तर अध्यात्म हे थोतांड वाटणार. साधनेचे महत्त्व त्यांना पटणार नाही. अशा मुर्खांना अध्यात्माचा विचार कधीच पटणार नाही.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल 9011087406
कां चंद्राचा उदयो जैसा । उपयोगा नवचे वायसा ।
मुर्खा विवेकु हा तैसा । रुचेल ना ।। 198 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 3
ओवीचा अर्थ – किंवा ज्याप्रमाणे चंद्राचा उदय कावळ्याच्या उपयोगी पडत नाही. त्याप्रमाणे हा विचार मुर्खांना रुचनार नाही.
चंद्राचा प्रकाश हा शीतल असतो. त्याचा त्रास होत नाही. त्यामध्ये दाहकता नसते. पूर्वी घराघरांत वीज नव्हती. अशावेळी रात्रीचा हा चंद्राचा शीतल प्रकाश हवाहवासा वाटायचा. पण आता चंद्र उगवतो कधी आणि मावळतो कधी हे सुद्धा लक्षात येत नाही. विजेच्या क्रांतीमुळे चंद्राचे अस्तित्वच नष्ट झाले आहे. मानवाला आता त्याची गरज वाटत नाही. कृत्रिम पर्याय उपलब्ध झाल्याने आता नैसर्गिक गोष्टींचे अस्तित्व जाणवेणासे झाले आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगती ही कृत्रिम आहे. यामुळे सगळे जीवनच कृत्रिम होत आहे.. भावनाही कृत्रिम होऊ लागल्या आहेत. स्तुतीही कृत्रिम वाटत आहे. यामध्ये जिवंतपणा वाटत नाही.
जिवंतपणा हा नैसर्गिक असतो. अंतःकरणातून येतो. तो वरवरचा नसतो. कृत्रिम जिवंतपणा मात्र अद्याप संशोधकांना आणता आलेला नाही. कृत्रिम मानव त्यांनी तयार केला आहे. रोबोट तयार केला आहे. तो मानसाची सर्व कामे करू शकतो. पण त्याला भावना नाहीत. त्याला विचार नाही. त्याला मन नाही. नैसर्गिकपणा नाही. त्यामुळे नैसर्गिक चव काय असते हे नव्या पिढीला अनुभवता येत नाही. कृत्रिम जगाचा त्यांच्या मनावर मोठा परिणाम झाला आहे. नैसर्गिक जगाची ओळख नव्या पिढीला करून देण्याची गरज भासू लागली आहे.
निसर्गाचा आस्वाद घ्यायला त्यांना शिकवावे लागणार आहे. इतकी ही नवी पिढी कृत्रिम होत आहे. कृत्रिम जगाला नैसर्गिक जगाची ओळख ही एखादा प्रकोप झाल्यानंतरच होते. त्सुनामी, भूकंप, प्रलय, महापूर अशा घटनांतून त्यांना निसर्गाची ओळख होते. निसर्ग त्यांना भयानक वाटू नये यासाठी निसर्गातील गोडी, चव चाखण्याचीही सवय त्यांना लावण्याची गरज भासणार आहे. अध्यात्म हे सुद्धा नैसर्गिक आहे. कृत्रिम नाही. आत्मज्ञान ही सत् पुरुषांना मिळालेली निसर्गाची देणगी आहे. ही नैसर्गिक देणगी त्यांनी अभ्यासाने आत्मसात केली आहे. तसे निसर्गाचा स्वादही नव्यापिढीला आत्मसात करायला शिकवायला हवे. यामुळे निसर्गाचे भय त्यांच्यामध्ये राहणार नाही. निसर्ग जपण्यासाठी त्यांच्यामध्ये जागृती करण्याची गरज आहे.
संकरित बियाण्यामुळे आज नैसर्गिक गोडवा नष्ट झाला आहे. ती नैसर्गिक गोडी जपण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे. उत्तम आरोग्यासाठी नैसर्गिकपणा जोपासायला हवा. कृत्रिम गोष्टी ह्या क्षणिक असतात. विजेची निर्मिती केली जाते. ही वीज क्षणिक आहे. त्याची निर्मिती बंद केल्यानंतर ती आपणास उपलब्ध होऊ शकत नाही. पण चंद्राचा प्रकाश हा नैसर्गिक आहे. कृत्रिम प्रकाशाची झापड डोळ्यावर आल्याने हा प्रकाश आता आपणास दिसेनासा झाला आहे. त्याची गोडीही मनाला भावत नाही. आत्मज्ञानाचेही असेच आहे. कृत्रिम ज्ञानाचा प्रभाव वाढल्यानेच नैसगिक आत्मज्ञानामध्ये रस वाटेनासा झाला आहे. यासाठी नैसर्गिक गोष्टींचा स्वाद नव्या पिढीस सांगायला हवा.
कदाचित हा विचार त्यांना रुचनार नाही. चंद्राच्या चांदण्यात, घनदाट जंगलात जाताना त्याचे महत्त्व जाणवते. त्या प्रकाशात जाताना एक वेगळात आनंद असतो. त्याचे अस्तित्व तेव्हा गरजेचे वाटते. पण पुन्हा शहरात आल्यानंतर चंद्र उगवला काय अन् मावळला काय दोन्हीही गोष्टी महत्त्वाच्या वाटत नाहीत. कारण नित्य प्रकाशात आपण वावरत असतो. अध्यात्माचेही असेच आहे. अनुभुती आली तरच अध्यात्माचा गोडी लागते. यासाठी भक्ती, सेवाभाव, प्रेम हे असायला हवे. विश्वासहा असायला हवा. पण अनुभव आलाच नाही तर अध्यात्म हे थोतांड वाटणार. साधनेचे महत्त्व त्यांना पटणार नाही. अशा मुर्खांना अध्यात्माचा विचार कधीच पटणार नाही. यासाठी तो सांगण्याचा प्रयत्नही करू नये. अध्यात्मिक अनुभुती ही नैसर्गिक क्रिया आहे. त्यात कृत्रिमता नाही. नैसर्गिक क्रियेतूनच आत्मज्ञानाचा प्रकाश पडतो. त्यातच आपण चालायचे असते. हा अनुभव, ही अनुभुती कृत्रिम मनाला पटणारी नाही. यासाठी त्यांना पटवण्याचा विचार कधीही करू नये.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.