November 22, 2024
The pain of women's oppression is a diverse alchemy of rebellion in Sitayan
Home » स्त्री अत्याचाराचे वेदना विद्रोहाचे विविधांगी रसायन-‘सीतायन’
मुक्त संवाद

स्त्री अत्याचाराचे वेदना विद्रोहाचे विविधांगी रसायन-‘सीतायन’

मनोविकास प्रकाशनाचा तारा भवाळकर लिखित ‘सीतायन’ हा लेख संग्रह प्रकाशित झाला आहे. रामायणातून रामाचे आदर्श पती, एक पत्नीव्रत असे उदात्त रूप आपल्या मनावर वर्षानुवर्षे ठसले आहे. पण त्याच कथांनकातील सर्व व्यक्ति रेखांसोबतच एक स्त्री म्हणून सीतेच्या भावना जाणून घेण्याचा सर्व अंगांनी तारा भवाळकरांनी या पुस्तकाद्वारे धाडसी प्रयत्न केलेला दिसतो. धाडसी प्रयत्न असे म्हणण्याचे कारण असे की हा प्रयत्न आजच्या जेव्हा धार्मिक विचारांच्या कडवेपणाचा पगडा कमी होत आलेला असतानाच त्याला जाणीवपूर्वक खतपाणी घालून राजकीय स्वार्थासाठी तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच्या हल्ले होणाऱ्या काळात पसरवला जातोय त्या काळात हे धाडसच म्हणावे लागते.

किंबहुना तारा भवाळकर यांच्या अगोदर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या ‘रीडल्स इन हिंदूईजम’ या इंग्रजी ग्रंथात ‘रीडल्स ऑफ राम अँड कृष्ण’ या परिशिष्ठात असा विचार मांडला आहे. असाच प्रयत्न तारा भवाळकर यांनी या त्यांच्या नव्या ‘सीतायन’ या पुस्तकाद्वारे केला आहे. सीतेच्या स्त्रीत्वाच्या वेदना व्यक्त करताना त्यांनी ‘जात्यावरच्या ओव्या’, गाण्यातून,वाल्मिकी रामायणातील कथांमधून तसेच ‘दशरथ जातक’, ‘चंद्रावती रामायण’, ‘अंकुश पुराण’ या व अशाच प्रकारच्या उपलब्ध साहित्य कृतींच्या आधारे अभ्यासिल्या आहेत. यातूनच सीतेमधील विद्रोहाची भावना, प्रसंगी सोशीकतेची भावना, हळवेपणा या सर्व भावनांचा ऊहापोह त्या करताना दिसतात. त्यासाठी त्यांनी घेतलेले काही ओव्यांचे संदर्भ खूपच बोलके आहेत. शिवाय ‘सीता’ म्हणजे नांगरलेली भूमी हा सुद्धा वेदकाळापासून ओव्यामधू आलेला अर्थ आणि स्त्री भागधेय म्हणून वाट्याला आलेल्या सासुरवासाच्या वेदनामय जीवनाचाही ऊहापोह त्या करतात. स्त्रीच्या वेदनाना न्याय देऊ इच्छितानाच त्या रामाच्या पुरुषी अहंकाराचाही पाहुणचार घेताना दिसतात. असेच रामजन्माच्या अनेकविध कथांच्या आधारे मग त्या मौखिक असो वा लिखित भवाळकरांनी प्रत्येक कथेचा विचारपूर्वक विश्लेषणात्मक पद्धतीने विचार मांडला आहे.

एवढे सगळे निरनिराळ्या प्रांतातील अथवा भाषेतील उपलब्ध रामायण कथांचा किंवा गीतांचा विचार करताना या सर्वात एक सामायिक घटक म्हणून स्त्रीच्या स्त्रीत्वावर वेगवेगळ्या या न त्या प्रकाराने किंवा मार्गाने अन्यायाचेच दर्शन आपल्याला घडत राहते. यात काही ठिकाणी जशी स्त्रीची सोशीकतेची भावना दिसते तशीच काही ठिकाणी म्हणजेच काही कथांमधून विद्रोही भावनाही आपल्याला जाणवते. उदा. एका ठिकाणी ताराताई लिहितात उत्तरेकडील काही हिंदीभाषी गीतातून तर केवळ वाल्मिकीची आज्ञा म्हणून सीता रामाबरोबर पाच पावलं चालते अन तिथेच भूमिगत होते. पुन्हा ती अयोध्येत जातच नाही. स्त्रियांच्या मनात सीतेचा दूसरा वनवास किती क्षोभकारक ठरला आहे, त्याचा प्रत्यय इथे येतो. अथवा लव- कुशांना पाहून मोठ्या मानभाविपणे सर्व प्रजाजनांसमोर कैकयीने सीतेला विचारलं, ‘एक पुत्र रामाचा दूसरा आणलास तू कोणाचा | होतीस वरले वनी संग केलास तू कोणाचा || ‘या प्रश्नातून सीतेवर सरळ सरळ व्यभिचाराचा आरोप केला. हा घाव सीतेच्या वर्मी लागला आता आपल्याला कुणीही मदत करणार नाही, हे तिला कळून चुकले. तिच्या सहनशीलतेची परिसीमा झाली. या किंवा अशाच प्रकारच्या लोकसंकेत किंवा लोककथांच्या संदर्भातून ताराताई भवाळकरांनी स्त्रीवर तसेच तिच्या चारित्र्यावर होणाऱ्या अत्याचाराचा उहापोह केला आहे.

तर दुसरीकडे दक्षिणेकडील एक नार्ला व्यंकटेश नावाच्या महापंडित व नाटककाराच्या साहित्यावर लिहीलेल्या निबंध पुस्तकाचा संदर्भ देताना त्या लिहितात, अशाप्रकारे दोन संस्कृतीमधील संघर्षाच्या पाऊलखुणा रामायणात ठिकठिकाणी दिसतात. त्यात सीता सातत्याने आदिवासींच्या बाजूने उभी राहिलेली आहे. या सर्वाचं स्पष्टीकरण देताना व्यंकटेश यांचं म्हणणं मांडताना तसेच मामा वरेरकर यांनी व तत्कालीन विद्वानांनी जे म्हटले आहे त्याचा संदर्भ भवाळकर देतात, ‘सीता ही काही अभिजन कुळामध्ये जन्माला आलेली नव्हती. ती राजाला भूमीमध्ये सापडलेली होती. भूमीमध्ये सापडलेली याचा अर्थ उघड आहे की, तिच्या जन्मदात्या आई- बापाचा पत्ता नाहीय. इथे पुन्हा स्त्रीच्या कुळाचा तिच्यावर अन्याय करण्यासाठी उपयोग केला गेलेला जाणवतो. कारण पुढे ती राजकुळाच्या तोलामोलाची म्हणजेच राजकुळातील नसल्याने तिच्या पतीकडूनच सन्मानाने वागवले जात नाही. या अन्यायाचा अवमानाचा आक्षेप वजा उद्रेक म्हणून ती कष्टकरी आदिवासी जमातीच्या बाजूने उभी राहते हे सर्व उल्लेख तारा भवाळकर यांनी या पुस्तकात संदर्भ रूपाने अभ्यासिले आहेत. सर्वात महत्वाचा आणि स्वतः बाबासाहेबांनीच त्यांच्या दशरथ जातकाच्या आधारे लिहीलेल्या लेखात अधोरेखित केलेला मुद्धा म्हणजे आर्यांना उत्तरेकडे तर भूमी अपुरी पडायला लागली. आणि त्यांना नवीन भूमी संपादन करायची होती त्यासाठी त्यांनी ‘राम’ हे प्रतीक निर्माण केलं किंवा टोळी निर्माण केली. ते दक्षिणेकडे आले. दक्षिणेकडे आल्यावर त्यांनी ऋषीमुनींच्या नावावर काही स्थानिक लोकांना हाताशी धरून आदिवासी जमातीचा उच्छेद केला. या सर्व कथा उपकथांचा विचार करता स्त्रीवरील अन्यायाला जशी पुराणकथेची पार्श्वभूमी मिळते तशीच ती भूसंपादनालाही पुष्टी देणारी ठरते.

आजच्या आधुनिक युगात या सर्व गोष्टींचा अर्थ आजच्या काळाशी जुळवण्याचा प्रयत्न केला तर बऱ्याच घटनांचे लागेबांधे आपल्याला जुळून येतील. सनातनी वृत्तीच्या मनुस्मृती धार्जिण्या विचारांच्या प्रेरणा आजच्या स्त्रीयांवरील अन्यायाच्या घटनाद्वारे आपल्याला दिसून येतील.माणिपूर येथील दोन जमातीमध्ये वाद व झगडे लावून जमिनी बाळकवण्याच्या घटना तसेच तेथील आदिवासी स्त्रियांची काढलेली नग्न धिंड . कुस्तीगर महिलांवरील आर.एस.एस. विचारप्रणालीने प्रेरीत भाजप शासनाने महिलांवर झालेल्या अत्याचाराला खतपाणी घालण्याचा प्रकार याही युगात आपण अनुभवतो आहोत हे सर्व सनातन वृत्ती परंपरेतूनच जन्मले आहे याची या पुस्तकाच्या वाचनाने प्रचिती येते हे निश्चित. तीच या पुस्तकाची फलश्रुति ठरावी..

डाॅ तारा भवाळकर यांचं सीतायन पुस्तक वाचले आणि पाठोपाठ बातमी वाचली की रामायण महाभारत NCERT अभ्यासक्रमात घेणार आहेत. ताराताईंनी आपल्या पन्नास वर्षांचा अभ्यास या पुस्तकात मांडलाय. भारतातील विविध प्रदेशातील, विविध भाषांतील रामायणांचा शोध घेतला.धर्मानंद कोसंबी,डाॅक्टर राममनोहर लोहिया, इतिहासाचार्य राजवाडे ,काॅमरेड शरद पाटील यांची मते तपासली…त्यांच्या लक्षात आलं की, मिथकांचे नायक हे ऐतिहासिक सत्य असेल किंवा नसेल..पण विशिष्ट मूल्य रुजवण्यासाठी त्याचा वापर अत्यंत कुशलतेने आणि प्रभावीपणे केला जातो.समूहमनाच्या पातळीवर ते मिथक सत्य वाटत जाते…समाजाच्या घडणीत मिथकांची रूपंही अनेकदा बदलत जातात..अभिजन स्तरात ही मिथकं जाणीवपूर्वक बदलवली जातात.अनेकदा राजकीय हेतूंसाठीही बदलवली जातात.रामकथा या प्रक्रियेतून गेली असावी,असा अभ्यास लेखिका समोर ठेवते. विविध रामकथा अभ्यासताना ताराताईंना त्यांत अनेक ठिकाणी विरोधाभासही दिसले.त्यांत त्यांना सीतेविषयी विलक्षण सहानुभूती,कळवळा दिसला.आणि रामाच्या कौतुकाबरोबरच गरोदरपणी तिचा त्याग करणारा म्हणून त्याच्याविषयी अनादरही दिसला.
‘सीता पतिवर्ता।नाही रामाला कळालं। वनाच्या वाटेवर।चाक रथाचे गळालं॥
किंवा
राम म्हनू राम,नाही सीतेच्या तोलाचा हिरकणी सीतामाई,राम हलक्या दिलाचा॥

वीणा गवाणकर

पुस्तकाचे नाव – सीतायन
लेखिका – तारा भवाळकर
प्रकाशक – मनोविकास प्रकाशन, पुणे
पृष्ठे – १८८, किंमत – २५० रुपये



Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading