‘हे चिंचेचे झाड, दिसे मज चिनार वृक्षापरी…’ हे गाणेनव्याने प्रेमात पडलेल्या अनेक तरूणांच्या तोंडी आपसुक येतअसते. ग. दि. माडगुळकर यांचे ‘मधुचंद्र’ या चित्रपटातील हे गीत, महेंद्र कपूर यांच्या आवाजात अजरामर झाले. या गाण्यावेळचा प्रसंग खूप मजेदार आहे. नायक आणि नायिका गावाबाहेर एका माळावर बसलेले आहेत. ती म्हणते, ‘सगळीकडे काटेच काटे. ही बोरीची, बाभळीची आणि चिंचेची झाडे असलेला माळ म्हणजे नंदनवन समजायचे काय?’ त्यावेळी नायक म्हणतो, ‘त्यातील सौंदर्य बघायला नजर लागते. नजर बदलून पाहिले, तर यातही नंदनवन दिसेल.’ त्यानंतर तो आपल्या डोळ्यावरील गॉगल तिच्या डोळ्यावर चढवतो आणि गाणे सुरू होते. यात नायक सांगतो, ‘हे चिंचेचे झाड मला काश्मीरमधील चिनार वृक्षाप्रमाणे दिसते आणि तू तर मला काश्मीरची नवतरूणी भासतेस. वाहणाऱ्या ओढ्याचे पाणी झेलमचे, तर, पिवळे गवत केशराच्या मळ्याप्रमाणे भासते.’ या नितांत सुंदर गाण्यामुळे सर्व मराठी भाषिकांच्या तोंडी गीतरूपाने चिंचेचे झाड आले.
तसेही चिंचेचे झाड नसले तरी, त्याचे फळ प्रत्येकालाआवडणारे. चिंच शब्द ऐकला तरी तोंडाला पाणी सुटते. सर्व वयोगटातील प्रत्येकाला चिंच हवी असते. चिंच खायला नको म्हणणारा तसा दुर्मिळच. प्रत्येकाच्या मनात चिंचेच्या अनेक आठवणी असतात – चिंचेप्रमाणेच आंबटगोड. तरीही हव्याशा वाटणाऱ्या. लहानपणी सर्वांनाच आंबट खाण्याची भारी हौसअसते. कोवळ्या पोपटी चिंचा, रंग बदलत पांढऱ्या झालेल्या, पण चिंचोका नसलेल्या, त्यानंतर गाबोळी चिंच आणि शेवटी पक्व चिंचोके काढल्यानंतरची चिंच. चिंचफळ कोणत्याही टप्प्यावरचे असो, खायला सर्वाना आवडते.
चिंच भारतात विशेष प्रसिद्ध आहे. तसे हे झाड मूळ आपल्याकडील नाही, असे म्हणतात. चिंचेचे मूळ आफ्रिका खंडातील, असे वनस्पतीशास्त्रज्ञ सांगतात. मात्र भूशास्त्रज्ञांच्यामते, आफ्रिका आणि भारतीय उपखंड हे परस्परांना जोडलेले होते. ते नंतर दूरवर गेले. त्यासाठी अनेक पिकांचे, वनस्पतींचे आणि भूरचनेचे दाखले देतात. त्यामुळे चिंचेचे मूळ भारतातीलच आहे, असेही म्हणता येते. चिंच आफ्रिकेतून येवो किंवा मूळ भारतातील असो, आज चिंचेचे सर्वाधिक उत्पादन भारतात होते, हे सत्य आहे. चिंचेचा वापरही भारतात मोठ्या प्रमाणात होतो. चिंचेचे सर्वच घटक मानवाला उपयुक्त ठरत असल्याने ‘ज्याचे दारी चिंचेचे झाड, तो सावकार’, अशी म्हण तयार झाली. आजही ही म्हण तेलंगणामध्ये वापरली जाते.
- सुपर फूड मटार
- शिक्षणाचिये द्वारी : ज्ञानवर्धक, उद्बोधक संग्रह !
- लाडू हे सर्वार्थाने पूर्णान्न
- व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून साखर कारखान्यांचे खर्चाचे विश्लेषण
- आठवडाभर थंडीस वातावरण पूरकच
- सुशील धसकटे यांचा नव्या कवितेचा शोध
मराठीत चिंच, हिंदीत आम्बली किंवा इमली, संस्कृतमध्ये तिंतिका किंवा अम्लिका, इंग्रजीमध्ये टामारिंड अशी नावे धारण करणारे हे फळ भारतात सर्वत्र वापरले जाते. याचे शास्त्रीय नाव टामारिंडस इंडिका असे आहे. चिंचेचे पक्वफळ खजुरासारखे दिसते. ‘भारतीय खजूर’ या अर्थाने अरबीमध्ये ‘टामार-उल-हिंद’ असे म्हणत. त्यावरून पुढे टामारिंड नाव पडले, असे मानले जाते. त्यावरूनच या झाडाला‘इंडियन टामारिंड’ असेही म्हणतात. तुर्कीमध्ये चिंचेला ‘देमिरहिंदी’ म्हणतात. भारतीय उपखंड, आफ्रिका आणि अमेरिका अशा उष्ण आणि समशितोष्ण कटिबंधातील वातावरणात चिंचेची झाडे वाढतात. चिंच हा दीर्घायुषी वृक्ष आहे. त्याची दोनशे वर्षांपूर्वी लावलेली अनेक झाडे तमिळनाडूमध्ये आजही आढळतात. महाराष्ट्रातही काही जुनी झाडे आढळतात. मात्र त्यांचे प्रमाण आता खूपच कमी झाले आहे.
भारतात रस्त्याच्या कडेला लावण्यासाठी वडानंतर चिंचेच्या झाडाला पसंती दिली जात असे. वर्षभर हिरवे राहणारे झाड असल्याने त्याची सावली छान मिळते. आता त्याऐवजी रस्त्याकडेला विदेशी वाणांच्या झाडांची लागवड केली जाते. ही झाडे जरा जोराचा वारा सुटला की मोडतात. रस्ता अडवला जातो. चिंचेच्या झाडाच्या फांद्या मात्र कितीही मोठे वादळ आले तरी मोडत नाहीत. त्या वाऱ्याला अलगद रस्ता देतात. संकटाला वाट करून द्यायचे आणि आपण सुरक्षित राहायचे कसब चिंचेकडून शिकावे. भारतातील हिमालयामध्ये आणि राजस्थानच्या वाळवंटामध्ये फक्त हे झाड वाढत नाही. चिंचेचे झाड लावणेही सोपे. त्याच्या बिया सहज बांधावर टाकल्या तरी त्यापासून रोप उगवते. पूर्वी भारतात चिंचेची लागवड फार मोठ्या प्रमाणात केली जात असावी. भविष्य पुराणातील एक श्लोक वृक्षा संदर्भात फार महत्त्वाचा आहे. ‘अश्वत्थमेकंपिचुमंदमेकं न्यग्रोधमेकं दशचिंचिणीकम। कपित्थबिल्वामलकत्रयं च पंचाम्रवापी नरकं न पश्येत्’। अर्थात पिंपळ, वड किंवा कडूनिंब यांच्यापैकी एक वृक्ष आणि चिंचेची दहा झाडे किंवा कवठ, बेल किंवा आवळा यापैकी कोणत्याही वृक्षाची तीन झाडे लावणारा नरकामध्ये जात नाही. स्वर्ग आणि नरक या कल्पना प्रत्यक्षात आहेत किंवा नाही, हा मुद्दा महत्त्वाचा नाही. मात्र अशा प्रकारे झाडे लावणारा सुखी असेल, असा त्याचा आपण अर्थ घ्यायला हवा. ज्यावेळी निसर्गसंपन्न भूप्रदेश होता, त्यावेळी सांगितलेली ही बाब अर्वाचीन काळात समजत नाही, हे आपले दुर्दैव!
चिंचेच्या झाडाची निर्मिती त्याच्या बियांंपासून होते. मातीच्या संपर्कात पुरेशा प्रमाणात पाणी मिळाल्यास ते रूजतात. त्याच्या बियांच्या दोन दलांमध्ये एक कोंब घेऊन जमिनीवर येतात. ही दोन दले सुरूवातीला हिरवी असतात. नंतर रोप वीतभर उंचीचे होईपर्यंत ती पिवळी होऊन गळतात. त्यातून पोपटी रंगाची पाने येतात. ही पाने संयुक्त पाने असतात. सुरुवातीला खोडावर दोन बाजूला आलेली पाने ही एका शिरे भोवती दहा ते वीस छोट्या पानांच्या जोड्या घेऊन येतात. पानाची लांबी तीन ते सहा इंच असते. ही छोटी पाने, पाच ते सहा मिलीमीटर लांबीची असतात. ती रात्री मिटतात. ही पाने चवीला आंबट असतात. लहान मुले-मुली अशा कोवळ्या पानांचा बोकाणा भरतात. छोट्या रोपांची पाने शेळ्या आणि मेंढ्याही आवडीने खातात. त्यामुळे अशा जनावरांची पोहोच असलेल्या रोपांना काटेरी कुंपण घातले जाते. झाडाची वाढ सुरुवातीला वेगाने होते. पिशवीत भरलेली रोपे तर तीन महिन्यांत एका फुटापर्यंत वाढतात. त्यानंतर त्याची वाढ हळूवार होते.
चिंचेची मुळे खूप खोलवर जातात. खडकाळ आणि कमी पाण्याच्या भागातही स्वत:ला जिवंत ठेवण्याचे कसब या झाडाकडे आहे. पाणी न देताही हे झाड वाढते. हळूहळू त्याच्या खोडाचा रंग पांढरट तपकिरी होत जातो. झाड जसे मोठे व्हायला लागते तसे खोडही आपला रंग बदलते. भरपूर पाणी असणाऱ्या भागातील चिंचेचे खोड हे गडद काळसर राखट किंवा तपकिरी रंगाचे असते; तर, कमी पाण्याच्या क्षेत्रातील खोडाचा रंग पांढरा, फिकट तपकिरी दिसतो. खोडाच्या सालीवर उभ्या भेगा किंवा खोल रेषा असतात. त्यांना दहा ते पंधरा सेंटीमीटरवर आडव्या भेगा तोडतात. बियांपासून तयार होणाऱ्या झाडाला फळे यायला दहा ते पंधरा वर्षांचा कालावधी लागतो. आज योगेश्वरी २६३, अकोला स्मृती किंवा एकेटी-१०, पीकेम-१, शरद, शिवाई, प्रतिष्ठान, अजिंठा ही चिंचेची संकरित वाणे लावून अगदी तिसऱ्या वर्षी फळे मिळविता येतात. चिंच सदाहरीत वृक्ष असला तरी उष्ण वातावरणात त्याची पानगळ होते. आपल्याकडे एप्रिल-मे महिन्यात पाने गळतात.
Join and Like Our Page इये मराठीचिये नगरी for updates and Details…
पानगळ संपल्यानंतर लाल आवरणाखाली पिवळसर पोपटी कोंब फुटतात. त्या पालवीसोबत गुलाबी पिवळ्या रंगाच्या कळ्या येतात. कळ्यांचा आकार शंकूसारखा असतो. कळ्यांची संख्या जास्त असते. पहाटे पाच ते आठ या वेळेत कळ्यांतून फुले उमलतात. चिंचेच्या फुलात अनेक रंगांचा सुरेख संगम झालेला असतो. लाल, पिवळा, गुलाबी रंगाची सुंदर संगती साधलेली असल्याने ही फुले मनाला भुरळ घालतात. फांदीच्या टोकाला फुलांचा गुच्छ येतो. फुले साधारण सव्वा ते दीड सेंटीमीटर लांबीची असतात. जमिनीकडे झुकलेली सुंदर फुले पाहताना सौंदर्य आणि विनयाचा अप्रतिम अविष्कार पाहावयास मिळतो. लहानपणी चिंचेच्या कळ्या अनेकदा आम्ही खायचो. फुले फुलू लागताच मुंग्यांची झाडावरील हालचाल वाढते. किटकांचे, मधमाश्यांचेही पिंगा घालणे सुरू होते. निसर्गातील मानवाखेरीज सर्व जीव इतरांकडून काही घेताना काही तरी देतात. आपण याला आज ‘रिटर्न गिफ्ट’ म्हणतो. मुंग्या, किटक ही मंडळीही चिंचेकडून आपले अन्न घेताना, फुलांमध्ये परागीभवन घडवून आणतात. अर्थात सर्वच फुलांमध्ये परागीभवन होत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात फुलांची गळ होते. या काळात झाडाखाली पिवळ्या-लाल फुलांचा सडा घातला जातो.
परागीभवनाची प्रक्रिया पूर्ण झालेल्या फुलांचे फळात रूपांतर होते. सुरुवातीला त्यातून तलवारीच्या आकाराची पोपटी कोवळी फळे दिसू लागतात. त्याभोवतीच्या सर्व पाकळ्या गळून जातात. काही दिवसाताच त्यांचा रंग हिरवा व्हायला सुरूवात होते. पुढे त्यावर तपकिरी रंगाचा वर्ख येऊ लागतो. तोपर्यंत आतले बी पांढऱ्या रंगाचे असते. प्रत्येक फळ हे एक ते पंधरा चिंचोके धारण करते. प्रत्येक चिंचोक्याच्या भागाला बोटक, बोटुक किंवा बुटुक म्हणतात. प्रत्येक बोटकानंतर फळाचा आकार आकुंचन पावलेला असतो. ही लांब फळे थोडी गोलाकार असतात. कमी बोटकांची फळे मात्र सरळ असतात. जास्त बोटकांच्या चिंच फळाला आकडा म्हणतात. सहा महिन्यानंतर फळ परिपक्वतेकडे वाटचाल करते. तेव्हा फळांचा रंग पांढरट तपकिरी झालेला असतो. आतले बी पक्व होताना साधारण साडेसहा महिन्यानंतर बियाभोवतीचा गर हा बाह्य आवरण किंवा टरफलापासून अलग व्हायला सुरुवात होते. या चिंचांना ‘गाबोळ्या’ किंवा ‘गाभोळ्या’ चिंचा म्हणतात. त्या खायला सर्वांना आवडतात. विशेषत: डोहाळे लागलेल्या काळात महिलांची अशा चिंचांना विशेष पसंती असते. साधारणत: आठ महिन्यांनी चिंचा पूर्ण पक्व झाल्यानंतर पडतात. फळाचे देठ कठीण असते. पिकलेली चिंच सहा महिने पुढे झाडावर राहू शकते. अशा पडलेल्या चिंचा सापडू लागल्या की शेतकरी फांद्या हलवून किंवा काठीने झाड झोडपून फळे खाली पाडतात. चिंचेचे खोड आणि लाकडे वाकडी नसली, तरी फळे मात्र आकडा करतात.
चिंचफळाचे टरफल किंवा बाह्य आवरण काढून टाकले जाते. त्याच्या आत गुळासारखा तांबडा किंवा पिवळा गर असतो. गराच्या आत चिंचोका किंवा बी असते. गर हा चवीला आंबट गोड असतो. गरावर शिरा असतात. फुगीर असणाऱ्या चिंचामध्ये गर जास्त प्रमाणात असतो. चिंचेच्या गरामध्ये २३९ किलो कॅलरी इतकी ऊर्जा असते. त्यामध्ये टार्टारीक आम्ल, शर्करा, जीवनसत्वे आणि क्षार असतात. शंभर ग्रॅम गरामध्ये ६२.५ ग्रॅम कर्बोदके (कार्बोहायड्रेट्स) असतात. त्यातही ५७.४ ग्रॅम शर्करा आणि ५.१ ग्रॅम तंतूमय पदार्थ असतात. फॅट ०.६ ग्रॅम असतात. ट्रिप्टोफॅन, लायसीन आणि मिथिऑनीन हे प्रथिन घटक २.८ ग्रॅम असतात. चिंच गर जीवनसत्वांचे आगार आहे. त्यातजीवनसत्व अ, थायमीन (बी१), रायबोफ्लेवीन (बी२) नायसीन (बी३), पॅन्टोथेनीक आम्ल (बी५), जीवनसत्व बी६, फोलेट (बी९), कोलीन, क-जीवनसत्व, इ-जीवनसत्व आणि के-जीवनसत्व असतात. त्याचबरोबर कॅल्शियम, कॉपर, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पॉटेशियम, सेलेनियम, सोडियम आणि जस्त (झिंक) या मूलद्रव्यांचे क्षार असतात. तर पाण्याचे प्रमाण ३१.४० ग्रॅम असते.
चिंचेचा गर भारतात मसाल्याप्रमाणे वापरला जातो. घराघरांत विविध खाद्यपदार्थ बनवताना चिंच वापरली जाते. भेळ, पाणीपुरी, आंबील (काही भागात), सांबर या पदार्थांसाठी चिंच अत्यावश्यक असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीला पिकलेली फळे काढली जातात. त्याचे टरफल बाजूला काढून गर आणि बी वेगळे केले जातात. गर वाळवून मीठ लावून वर्षभराच्या वापरासाठी जतन केले जातात. बियांसह गर जतन करावयाचा झाल्यास हवाबंद अवस्थेत ठेवणे आवश्यक असते. तसे न केल्यास कीड लागण्याचा धोका संभवतो. चिंचेच्या गरापासून सिरप, रस, रसाचा संपृक्त अर्क, शितपेय, पेस्ट बनवली जात. भारतातून निर्यात होणाऱ्या मसाला पदार्थामध्ये चिंचेचा सहावा क्रमांक आहे. चिंचेचा वापर भांडी स्वच्छ करण्यासाठीही केला जातो. विशेषत: तांबे, पितळ आणि चांदीच्या भांड्यांना आणि वस्तूंना चकाकी आणण्यासाठी चिंच उपयुक्त ठरते.
गरामध्ये चिंचोका अथवा बी असते. गडद काळसर चॉकलेटी रंगाच्या आवरणात दोन पांढऱ्या भागांनी मिळून बी बनते. चिंचेचे बी हे द्विदल आहे. चिंचोक्यात प्रामुख्याने प्रथिने, शर्करा, तंतूमय पदार्थ आणि पाणी हे घटक असतात. अनेक लोक चिंचोके भाजतात आणि शिजवून किंवा भिजवून खातात. आम्हाला असे चिंचोके खायला घरात बंदी होती. वडील रागावायचे. मात्र ते कोठे गावी गेले की आईकडे हट्ट करून आम्ही इच्छा पूर्ण करून घ्यायचो. भाजलेले चिंचोके खाणे हा त्या काळात आणखी एक आवडता भाग होता. खूप वेळ तोंडात ठेवल्यावर तो खाता येत असे. दहावीत असताना एका मुलाने असा तोंडात चिंचोका ठेवला होता. वर्गात तो खात असल्याने सरांनी त्याला तोंड उघडायला सांगितले. तो तोंड उघडायला तयार नव्हता. शेवटी सरांनी पाठीत जोरात एक धपाटा मारला आणि त्याच्या तोंडातून चिंचोका बाहेर पडला. त्यावरील आवरण काढून टाकल्यानंतर ते चविष्ट लागतात. चिंचोकेही विकत घेतले जातात. चिंचोक्याच्या भुकटीमध्ये सरस घालून ती जोड भरण्यासाठी वापरली जाते. तसेच लाकडासाठी लुकण तयार केले जाते. चिंचोक्याची खळ बनवून ती घोंगड्या, कांबळींना लावल्यास ताठपणा येतो. चिंचोक्यापासून काढलेले तेल अनेक कारणासाठी वापरतात. तसेच त्याची भुकटीही खळ तयार करण्यासाठी वापरतात.
चिंचेची टरफले, पाने आणि फुलांचा पडलेला कचराकुजवून त्यापासून खत तयार केले जाते. या खतामुळे मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. चिंचेच्या कोवळ्या फांद्या गोठा बांधताना लाकडांना आणि वरच्या गवताला बांधण्यासाठी वापरतात. लाकूड शेतीची अवजारे बनवताना काही प्रमाणात वापरले जाते. कायम बांधकामासाठी मोठे लाकूड वापरत नाहीत. मात्र कायम पॉलीश करावयाच्या फर्निचरसाठी ते वापरले जाते. चिंचेच्या झाडाचे सर्व भाग मानवाच्या उपयोगाला येतात. चिंचेच्या फळाला वीस हजार रूपये क्विंटल पेक्षा जास्त दर मिळतो. मोठ्या वृक्षाला दीड ते दोन क्विंटल चिंच सहज मिळते. तर जुनी झाडे तीन-साडेतीन क्विंटल चिंच उत्पादन देऊ शकतात.
सहज बांधावर उगवलेल्या झाडाला लहानपणी जपलेकी ते आपल्याला आयुष्यभर जपते. हे झाड दीर्घायुषी असल्याने त्याचे उत्पादन पुढच्या पिढीलाही मिळते. चिंचेचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. चिंचेपासून मिळवलेले चिंचलावण तेल पोटदुखीवरचे उत्तम औषध म्हणून सुपरिचित आहे. पक्व चिंच वात, पित्त आणि कफ शामक आहे. चिंचेचे सरबत पित्त आणि उष्णताशामक आहे. तोंडाला चव येण्यासाठी मीठ लावलेली चिंच खातात. मुका मार लागलेल्या जागेवर चिंचोक्याचा लेप लावतात. त्यामुळे सूज आणि वेदनाकमी होते. काविळ रूग्णांना अनेक वैद्य चिंचेचे सरबत घेण्यास सांगतात. चिंचेच्या फुलांचा रस मुळव्याधीवर पिण्यास सांगतात. चिंच खाल्ल्यास पचनशक्ती वाढते. पावसाळ्यात पायांना चिखल्या पडल्यास चिंचेचा गर लावला जातो. चिंचेच्या फुलांचा गुलकंदाप्रमाणे बनवलेला पदार्थ पित्तशामक आहे. काही आदिवासी लोक चिंच पाने आणि फुलांची भाजी करतात. तसेच त्याच्या फुलांची चटणी लोक आवडीने खातात. अनेक जीवनसत्वे आणि क्षारांचे आगार असणारी चिंच आपणास हृदय विकार, रक्तदाब, संधीवात, एनिमिया, दातदुखी आदी अनेक व्याधींपासून दूर ठेवण्यास सहाय्यकारी आहे. तसेच चिंच स्नायुंचे मजबुतीकरण, रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ, वजन कमी करणे, त्वचेला चकाकी येणे इन्श्युलिन पातळी नियंत्रण इत्यादीसाठी उपयुक्त असल्याचे तज्ज्ञ सांगतात. असे हे बहुगुणी झाड शेतकऱ्याच्या शेताची शोभा तर वाढवतेच, पण पैसेही मिळवून देते.
चिंचेवर फारशा म्हणी वाक्प्रचार ऐकायला मिळतनाही. आमच्या लहानपणी शेजारी नानी आजी होती. बोलताना कायम म्हणी वाक्यप्रचार वापरणारी, अन् नवऱ्याला कायम टोमणे मारणारी. ती नवरा काही बोलला की म्हणायची, ‘चिंचचा आंबटपणा जाईल, पण तुमचा खवूटपणा काय जायचा नाही.’ चिंचेच्या झाडावर जास्त कविताही नाहीत. मात्र ज्या आहेत त्या मानवी मनाच्या हळव्या कोपऱ्यांना स्पर्श करणाऱ्या आहेत. स्वाती फडणवीस या आपल्या कवितेत ‘आंबट गोड नात्यां’नाचिंचेच्या आकड्याची उपमा देताना म्हणतात, ‘चिंचेचा आकडा… वाकडा गं…, पेरापेरात गाठी… बाटी गं…, चिंचजशी आंबट-गोड नाती गं’. शिला अंभुरे यांनीही चिंचेच्या झाडावर बालकविता लिहिली आहे. विक्रांत तिकोणे यांनी चिंचेचे आणि चिंच फळाचे अचूक वर्णण केले आहे. ते म्हणतात, ‘ फळ आम्र, चिकू, केळी, जरी मधूर चविष्ट, चिंच सम्राज्ञी रसांची, करी स्मरणे प्रकट’. कवी, लेखक देवा झिंजाड यांनी स्त्री मनाला चिंचेशी जोडून ‘चिंचा’ ही सुंदर अन मनाला भिडणारी, अस्वस्थ करणारी कविता लिहिली आहे. तर आनंद जोर्वेकर यांची ‘चिंचेचे झाड’ आणि नवनाथ माझिरे यांची‘शाळेकडेची चिंच’ या कविता प्रत्येकाला आपल्या शालेय जीवनाची आठवण करून देतात. मी मुलुंडच्या बॅरिस्टर नाथ पै विद्यालयाचा विद्यार्थी असताना शाळेच्या मागील बाजूला एक चिंचेचे झाड होते. त्याच्या चिंचा दगडाने पाडून आम्ही मित्र-मैत्रिणी खायचो. त्या विद्यालयातील मराठीचे राठोड सर आणि इंग्रजीचे उत्तम पोटे सर यांनी एकदा चिंचा खाताना पकडले. साऱ्या चिंचा काढून घेतल्या. ‘पुन्हा तेथे जायचे नाही, चिंचा पाडायच्या नाहीत’, असे सांगितले. तरीही आमचा चिंचांचा मोह काही सुटत नसे. त्यांची नजर चुकवून चिंचा पाडायचोच.
चिंचेचे आणि पक्ष्यांचेही नाते फार जवळचे आहे. चिंचेला मोहोर येताच त्यावर पोपटांचे थवे येऊन बसतात. चिंचेचे झाड जुने असले तर, त्याच्या कापलेल्या फांद्याच्या ठिकाणी ढोली तयार होतात. त्यामध्ये पोपट आपले घर-संसार थाटतात. पिवळ्या चिमण्यांचाही मोहोराच्या दिवसात या झाडावर वावर वाढतो. सुगरण नदी-ओढ्याकडेच्या बाभळीच्या झाडावर घरटे बांधायला पसंती देते. मात्र बाभळीसारखी काटेरी झाडे नसली तर चिंचेचे झाड ती निवडते. चिंचेच्या फळानी वाकलेल्या फांदीच्या टोकाला आपले घरटे बांधते. इतरही अनेक पक्षी चिंचेवर वास्तव्याला असतात.
चिंचेच्या झाडाचा आणि माझा ऋणानुबंध जन्मापासूनचा. आमच्या गावाचे नावच मुळात चिंचोली. नाव चिंचोली असले तरी गावात चिंचेची झाडे नव्हती. आम्हाला आठवणारे एकच चिंचेचे झाड होते. ग्रामदैवत निळकंठेश्वराच्या मंदिराकडे जाताना बार्शी-लातूर रोडवर भलेमोठे झाड. त्या झाडाबरोबर आमच्या गावातील सर्वांचे बालपण जोडले गेले होते. त्या झाडांच्या चिंचांनी अनेक पिढ्यांच्या जिव्हांना पाणी सुटण्यास भाग पाडले होते. शिक्षणानिमित्त गाव सोडले आणि या झाडाच्या आठवणीवर धूळ साठली. एकदिवस व्हॉटसअपवर हे झाड पडल्याची वृत्तपत्रातील बातमीची क्लीप आली आणि मी अस्वस्थ झालो. काहीच सुचत नव्हते. जवळचे माणूस गेल्याचे दु:ख मनभर दाटले. मन मोकळे करायचे म्हणून संगणकासमोर बसून या झाडाबाबतच्या सर्व आठवणी आणि भावना शब्दात मांडल्या; तेव्हा कुठे मन शांत झाले. त्यावेळी माझ्या लक्षात आले झाड माझ्या मनाच्या किती आत खोलवर रुजले होते, बसले होते. नोकरीनिमित्त बाहेर राहू लागल्यानंतर गावी गेले की निळकंठेश्वर मंदिराला भेट व्हायची. आज त्या झाडाच्या जागेकडे पाहिले की झाड नसल्याचे पाहून मन उदास होते.
हे झाड रस्त्याच्या कडेला होते. मालकी सर्वांची, मात्र जबाबदारी कोणाचीच नाही, अशी त्याची अवस्था. फळे सर्वजण चाखत. मात्र त्याला हानी पोहोचताना कोणीच लक्ष देत नसे. एकदा रस्ता दुरूस्ती करताना डांबर वितळवण्यासाठी या चिंचेच्या फांद्या तोडल्या. मी त्या कंत्राटदाराशी भांडण काढले होते. कंत्राटदाराचे काम संपल्यानंतर सर्वजण निघून गेले. त्यानंतर मी डांबर वितळवायच्या यंत्रावर दगड मारून माझा राग शांत केला होता. त्यानंतर तर ते झाड मला जास्तच आवडू लागले होते. या झाडाच्या आंबट गोड चिंचांनी जो आनंद दिला तो अवर्णनीय आहे. चिंचेची पिकलेली फळे पडायला लागलीकी आम्ही झाडाकडे चक्कर मारायचो. दगड मारून चिंचा खायच्या. पिकलेल्या चिंचांतील चिंचोके काढून गर कुटायचा आणि तिखट-मीठ मिसळून एकजीव गोळा करायचा. तुरीच्या बारीक काडीला लावला की आमचे बालपणचे ‘लॉलीपॉप’ तयार व्हायचे. कितीतरी वेळ ते चोखत, त्याचा आनंद घेत,आम्ही शेतातून हुंदडायचो.
चिंचातून निघालेले चिंचोके हे फोडून त्याचे दोनभाग करायचे काम कौशल्याचे असे. असे दोन भाग झाले की त्याला आम्ही ‘चंपुळ्या’ म्हणायचो. आजच्या ‘लुडो’ खेळाला बनवणारा लहानपणी चंपुळ्या खूप खेळला असावा कारण त्यात आणि चंपुळ्या खेळात मोठे साम्य आहे. या चंपुळ्यांचा खेळ उन्हाळ्याच्या सुट्टीतील आमचा आवडता खेळ. उन्हात फिरायचे नाही. मग वेळ घालवायला हा खेळ उपयोगाला यायचा. हारणाऱ्याला पाणी घालावे लागे आणि जिंकणाऱ्याला तीन वेळा हुकेपर्यंत फटके खावे लागत. यात भांडणेही खूप व्हायची. पण ती लगेच विसरली जायची. हा खेळ महाराष्ट्रात सर्वत्र खेळला जातो. नियम वेगळे असतात. पण हरणाऱ्याला शिक्षा तीच. कोयासारखा अखंड चिंचोक्याचाही खेळ असायचा. पण चंपुळ्यांची मजा त्याला यायची नाही. पावसाळ्यातही या झाडाखाली आमच्या फेऱ्या होत असत. झाडाखाली नुकतेच रूजलेले बी शोधायचो. त्या अंकुरणाऱ्या रोपांसाठी दोन्ही दलामध्ये अन्न साठवलेले असते, हे आम्हाला त्यावेळी कळत नसायचे. आम्ही ती दोन्ही दले आमच्या आनंदासाठी रोपापासून काढायचो. त्याच्या मध्यभागी बाभळीचा काटा बसवायचो. यातून आमची भिंगरी तयार व्हायची. असले खेळ खेळत निसर्गाच्या सान्निध्यात आमचे बालपण फुलले, वाढले. पुढे आमच्या शेतात चिंचेची मोठ्या प्रमाणात लागवड झाली. त्याला फळे येऊ लागली. मात्र मनाची ओढ जुन्या झाडाकडेच होती. आमच्या शेतातील झाडाच्या चिंचा काढण्यासाठी दगड मारावे लागत नव्हते. त्या हाताने तोडता येत. त्यामुळे बालपणीचा दगड मारून चिंचा पाडून खाण्यातील आनंद येथे मिळत नाही.
चिंचेच्या गर्द फांद्यांत अनेक मधमाशांची पोळी असायची. दिवसा त्यांच्या गर्द फांद्यांमध्ये असणारे मधाचे पोळे लक्षात यायचे नाही. चिंचेच्या झाडांची पाने संध्याकाळी मिटतात, हे माझ्या संशोधक मनाने टिपले होते. चिंचेच्या झाडावरील पोळी शोधण्यासाठी मी सांजवेळी त्या झाडाखाली जात असे आणि त्या झाडावरची सर्व पोळी शोधून ठेवत असे. संध्याकाळी मध काढला तर तो पूर्ण मिळत नाही. त्यामुळे हे काम दुपारी करावे लागते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मध काढायचे काम होत असे. एका चिंचेच्या झाडाला आठ ते दहामधाची पोळी सापडत. झाड मोठे असेल तर यापेक्षाही जास्त. यातून एका दिवशी एका झाडावरच्या पोळ्यातून लिटर- दीडलिटर मध मिळत असे.
पुढे कोल्हापुरात विद्यापीठातील एफ-४ अधिकारी निवासस्थानात राहायला आलो. या घराच्या कोपऱ्यावर एक चिंचेचे झाड होते. त्याला भरपूर चिंचा येत. त्या झाडावर चढून मी अनेक वर्षे चिंचा काढत असे. त्या चिंचेच्या झाडाची फळेनऊ वर्षे आम्ही खाल्ली. फळे खाताना बालपण आठवत राहिलो. झाडाकडे पाहत नकळत ‘मधुचंद्र’मधील ‘हे चिंचेचेझाड दिसे…’ हे गीत गुणगुणत राहिलो. पानाफुलापासून प्रत्येकगोष्ट निसर्गाला समृद्ध करण्यासाठी देणाऱ्या चिंचेची शेकडो झाडे लावत राहिलो
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.