यवतमाळ जिल्ह्यातील रावेरी येथे झालेल्या सातव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनामध्ये वसुंधरा काशीकर यांनी केलेले अध्यक्षीय भाषण…
अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आपण माझी निवड केली त्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार मानते. या पदासाठी माझा अधिकार काय.. माझी खरंच योग्यता आहे का.. याविषयी माझ्या मनात अनेक संभ्रम आणि शंका होत्या आणि आहेत. आदरणीय सरोजकाकू काशीकरांशी मी त्याबद्दल मोकळेपणाने बोलले होते परंतु त्यांच्या आग्रहाखातरच शेवटी ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी मी होकार दिला. महान व्यक्तींच्या केवळ सहवासानेही तुमचं आयुष्य कसं उजळून निघू शकतं याचं प्रत्यंतर परत एकदा येतंय. आदरणीय शरद जोशींचा जो काही सहवास फार थोड्या काळासाठी लाभला त्याचीच परिणती म्हणजे आजची ही जबाबदारी आहे. त्यामुळे हे पद स्वीकारताना माझ्या मनात ‘मी तव हमाल भारवाही’ ही पूर्ण जाणीव आहे. मी विनम्र आहे.
यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगाव तालुक्यातील रावेरी या गावाची सातव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनासाठी निवड करण्यात आली याचे एक वेगळे महत्व आहे. केवळ भारतातलेच नाही तर संपूर्ण जगातले एकमेव असे सीतेचे मंदीर या रावेरी गावात आहे. रामाने सीतेचा त्याग केल्यावर लक्ष्मणाने गर्भार अवस्थेत सीतेला रावेरी या गावी आणून सोडले. लव-कुश यांचा जन्म इथेच झाला. तसेच लव-कुशांनी अश्वमेध घोडा इथेच अडवला अशी आख्यायिका आहे. भारतात ठिकठिकाणी रामाची मंदिरे आढळतात. पण सीतेचं मंदीर दिसत नाही. रामाच्या सोबतीने सीता, लक्ष्मण आणि हनुमानही येतात पण केवळ सीतेचे मंदीर मात्र रावेरी इथेच आढळते. साहित्यामध्येही इंग्रजीमध्ये अमिश यांनी सीतेवर लिहिले आहे. कर्णावर विपुल लिहिल्या गेलं पण वृषालीचा विचार कोणी केलेला दिसत नाही. मध्यंतरी कविता काणे यांनी वृषालीवर लिहिले आहे. थोडक्यात स्त्रियांची उपेक्षा इथेही संपत नाहीच.
शेतकरी संघटनेचे संस्थापक – नेते माननीय शरद जोशी यांनी २०१० साली या मंदिराचा जीर्णोद्धार केला. स्त्रिया आणि लहान मुलं यांच्याबद्दल शरद जोशींना अपार कणव होती. स्त्रिया आणि लहान मुलं यांचं दु:ख मला बघवत नाही. मला ते भाषेत मांडता येत नाही म्हणून मग मी संख्याशास्त्राचा आधार घेतो असं शरद जोशी म्हणायचे.
सीता ही परित्यक्ता स्त्रियांचं प्रतीक. म्हणून रावेरी या गावी परित्यक्ता स्त्रियांसाठी एक आधारगृह चालवावं अशीही त्यांची इच्छा होती. भारतात स्त्रिया, दलित आणि शेतकरी यांची स्थिती थोड्याफार फरकानं सारखीच आहे. तिघांच्याही वाट्याला कायमच उपेक्षा, शोषण आणि अन्याय आलेला आहे. त्या अर्थानं रावेरी या ठिकाणाची संमेलनासाठी निवड होणं हे प्रतिकात्मक आणि महत्वाचं आहे.
मराठी साहित्याचा अभ्यास केला तर असे दिसते की, मराठी साहित्यानं नगण्य म्हणता येईल अशी शेतकऱ्यांच्या दु:खाची व समस्यांची दखल घेतली आहे. काही अपवाद सोडले तर सर्वसामान्यपणे लेखकांचे, कवींचे लिखाणाचे विषय हे मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, शहरी जीवनाचं चित्रीकरण करणारे दिसतात. ग्रामीण भागाचं चित्रीकरण आलं असलं तरी त्यात शेतकरी फारसा दिसत नाही.
ज्या काही थोड्या लेखकांनी त्यांच्या लिखाणातून शेतकरी जीवन व समस्यांचं चित्रण केलं आहे त्यांचा आढावा इथे घेणं मला गरजेचं वाटतं. रवींद्र शोभणे यांची ‘कोंडी’ कादंबरीतून शेतमजुरांचं जीवन, त्यातली हतबलता, ग्रामीण संरजाम वृत्ती, स्वार्थांधता याचं वर्णन आलं आहे. शेषराव मोहिते यांची ‘असं जगणं तोलाचं’ ही कादंबरी शेती करणे म्हणजे भीषण गाळात रुतणे हे भीषण वास्तव मांडते. शेषराव मोहिते यांच्याच ‘धुळपेरणी’मधील नायक म्हणतो, शेतीतल्या हिरवेपणाच्या भरवश्यावर सारे आयुष्य आलटून-पालटून गहाण ठेवावे आणि हे सर्व माहित असूनही आम्ही शेती करावी अशी तुमची अपेक्षा? तुम्ही आम्हाला काय येडझवे समजता की काय? याशिवाय तानाजी पाटील, प्रकाश देशपांडे, कैलास दौंड, कृष्णात खोत, प्रा. महेंद्र कदम यांच्या कादंबऱ्यांमध्येही शेतीचा प्रश्न केंद्रस्थानी आढळतो.
इंद्रजीत भालेराव यांच्या कविता, सदानंद देशमुख यांची ‘बारोमास’ यांचा उल्लेख करावाच लागेल. ही काही मोजकी उदाहरणं सोडलीत तर समाजातल्या इतक्या मोठ्या वर्गाविषयी साहित्याला काही घेणंदेणं दिसत नाही.
समाजाला काही विचार-मूल्य देणे, रंजन करणे आणि सामाजिक बांधिलकी हे साहित्याचे उद्देश मानले तर मराठी साहित्य त्या कसोटीवर कुठे उभे आहे याचा विचार करायला हवा. त्यातुलनेने हिंदी साहित्याचा विचार केला तर प्रेमचंदाच्या लिखाणात शेतकरी आणि सर्वहारा वर्गाच्या समस्यांचं आणि दु:खाचं चित्रण आढळतं. प्रेमाश्रम, कर्मभूमी व गोदान या तीन कादंबऱ्या त्याचं उत्तम उदाहरण आहे. शेतकरी जीवनाचा कोणताही पैलू या कादंबऱ्यांमध्ये अस्पर्श राहिलेला नाही. ‘प्रेमचंद और उनका युग’ मध्ये रामविलास शर्मा लिहितात, ‘’उन्होंने उस धडकन को सुना जो करोंड़ो किसानों के दिल में हो रही थी. उन्होंने उस अछूते यथार्थ को अपना कथा विषय बनाया. जिसे भरपूर निगाह देखने का हियाव ही बड़ों-बड़ों को न हुआ था.’’
हिंदीतले वरिष्ठ साहित्यिक संजीव यांनी विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर ‘फाँस’ नावाची कादंबरी लिहिली आहे. मात्र २००० सालापासून इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या होत आहेत, त्यावर एकही मराठी कादंबरी लिहिल्या गेल्याचे माझ्या तरी ऐकिवात वा वाचनात नाही. मराठी साहित्यिकांना हा विषय महत्वाचा वाटत नाही असा निष्कर्ष यातून काढावा का ? हजारोंनी शेतकरी आत्महत्या करतात, त्यांची मुलं अनाथ होतात, उद्ध्वस्त होत चाललेली ग्रामीण अर्थ व शेतीव्यवस्था, तोट्यातली शेती यावर साहित्यिकांची लेखणी का चालत नाही ?. ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी म्हटलं होतं की, ‘शेती आणि त्याच्याशी संबधिंत अर्थकारण, विषय यांचा अभ्यास साहित्यिकांनी करायला हवा व त्यावर लिहायला हवे’.
मुन्शी प्रेमचंद यांनी अखिल भारतीय प्रगतीशील लेखक संघांच्या अध्यक्षस्थानावरून भाषण करताना म्हटलं होतं की, ‘’शेतावर काम करुन घामाघूम झालेल्या स्त्रीला, आपल्या मुलाला बांधावर झोपवताना बघणं हा ही सौंदर्य अनुभव आहे. तुमच्या सौंदर्य दृष्टीचा विस्तार केला तर तुम्हाला केवळ सुंदर स्त्रीमध्ये सौंदर्याचा अनुभव येणार नाही. तर तुम्ही कष्टकरी महिलेच्या सुकलेल्या ओठांमध्ये आणि तिच्या गालावरच्या सुकलेल्या अश्रूंमध्ये त्याग, सहिष्णुता आणि कष्टाचे सौंदर्य बघू शकाल’’.
सौंदर्यदृष्टीचा विस्तार करण्याचा हा विचार अतिशय मौलिक आहे. इंग्रजीतील ज्येष्ठ नोबेल पुरस्कार विजेते भारतीय वंशाचे साहित्यिक व्ही. एस. नायपॉल हे भारतात आले होते तर नामदेव ढसाळ यांच्यासोबत मुंबईच्या रेडलाईट भागात रिक्षाने फिरले होते. नायपॉल यांची जीवन समजून घेण्याची ही तृष्णा मला विलक्षण वाटते… ही तृष्णा आमच्या साहित्यिकांमध्ये का दिसत नाही? शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय काय आहे तो समजून घ्यावा, त्यासाठी त्या जिल्ह्यांना भेट दयावी, आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेट दयावी आणि त्यावर काही लिहावे असा विचार कोणाच्याही मनात का येऊ नये? हे दु:खद आहे. शरद जोशींनी म्हटल्याप्रमाणे, एका दाण्याचे हजार दाणे करणारा शेतकरी दरिद्री आणि एका किलोचं सव्वा किलोही लोखंड करू न शकणारा कारखानदार मात्र श्रीमंत हे काय गणित आहे हा प्रश्न साहित्यिकांना पडू नये?.
कवी धूमिल यांची एक कविता उद्घृत करण्याचा मोह मला आवरत नाहीये.
इतनी हरियाली के बावजूद
अर्जुन को नहीं मालूम
उसके गालों की हड्डी क्यों
उभर आई है|
उसके बाल
सफेद क्यों हो गए हैं|
लोहे की छोटी-सी दुकान में,
बैठा हुआ आदमी, सोना
और इतने बड़े खेत में खड़ा आदमी
मिट्टी क्यों हो गया है?
हा प्रश्न मराठी साहित्याला कधी पडेल?
म्हणूनच अखिल भारतीय शेतकरी संमेलनाच्या आयोजकांचा पिढ्यांनपिढ्यांच्या अबोलतेला बोलते करण्याचा हा प्रयत्न अत्यंत महत्वाचा आहे. या निमित्ताने का होईना पण जगाच्या पोशिंद्याच्या जीवनाबद्दल, हतबलतेबद्दल, वर्षानुवर्षांच्या दारिद्र्याबद्दल, सरकारच्या धोरणाबद्दल चर्चा घडेल… आणि काहीतरी बदल घडवणारे निर्माण होईल अशी आशा करूयात… ग्रंथसत्तेवर आणि लेखणीच्या ताकदीवर माझा अफाट विश्वास आहे. कार्ल मार्क्सच्या ‘दास कॅपिटल’नेच जगातल्या मोठ्या क्रांत्या घडवून आणल्या होत्या… मराठी साहित्यालाही असे परिवर्तन घडवून आणण्याचे श्रेय मिळावे अशी प्रामाणिक इच्छा आहे.
वसुंधरा काशीकर
vasundhara.rubaai@gmail.com
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.