September 7, 2024
Many indigenous trees including raiwal are destroyed
Home » रायवळसह अनेक देशी वृक्ष नष्ट होतायेत
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

रायवळसह अनेक देशी वृक्ष नष्ट होतायेत

🥭🥭रायवळ आंबे 🥭🥭

आठवणी अशा असाव्या
आठवणी अशा जपाव्या
उघडता कुपी अत्तरांची
सुगंध नभी दरवळावा 🥰

“आंबा ” मुबलक प्रमाणात संपूर्ण भारतात उत्पादीत होणारे फळ, त्यातही कोकणसाठी अभिमानाची बाब म्हणजे इकडील बागांमध्ये पीकविला जाणारा हापूस आंबा ज्याला फळांचा राजा म्हणून देशात मान्यता आहे, असे जरी असले तरी ह्या हापूसच्या मोहपायी कोकणातील शेकडो रायवळ आंब्यांना नामशेष व्हावे लागले 😓त्यातील काही आमच्या वाडीतील पाहिलेले, चाखलेले, भरपूर आस्वाद घेतलेल्या रायवळ आंब्यांविषयीं स्मरण करत आपल्याला सांगावे म्हणून ह्या चार ओळी

ठाऊक आहे मज काही
सांगीन म्हणतो तुम्हा काही
कसे होते ते रायवळ आंबे
असे होते हो रायवळ आंबे 😋

गावातील आमच्या घराशेजारी डवरलेलं भलं मोठ आंब्याचं झाड त्याला आम्ही ” झोळया आंबा ” म्हणायचो कारण त्यावर लगडणारे आंबे घडाने धरलेले असायचे जसे काही द्राक्षाचा घड, इथल्या ग्रामीण भाषेत घडाला घोस किंवा झोळी म्हणायचे, रायवळ असूनही त्याचे फळ बऱ्यापैकी मोठं होतं. मांसल, रसाळ, मधुर तर होतच शिवाय त्याची सालही खाण्याजोगी असल्याने पौष्टीक आणि त्यात औषधी गुणही होते त्यामुळे कितीही आंबे खाल्ले तरी कसलाही त्रास होत नसे, माझा स्वतःचा अनुभव सांगतो, एकदा मी सकाळी नास्ता म्हणून सुरुवात करून दुपारपर्यंत मोजून चाळीसआंबे खाल्लेले आहेत.

झाडावरून आंबे उतरवून त्याची आढी ठेवली जायची, आठवडाभरानंतर ती उघडली असता त्यातील प्रत्येक आंबा सोन्याहूनही पिवळा, रसदार, ready to eat 😋😋😋. झोळ्याचे झाड फार जुने होते त्याचे खोड दोन हात पसरूनही मिळत नव्हते, झाडाला पहिली फांदी जवळपास 20 फुटावर होती तरीही एक फांदी वरून खाली 10 फुटापर्यंत आलेली होती, जणुकाही हत्तीने सोंड खाली करून माहूताला अलगत उचलून आपल्या पाठीवर घ्यावे तसे आम्ही त्या फांदीला शिडी लावून झाडावर चढत असू, अगदी 40/50 फूट वाढलेल्या झाडावर शेंड्यापर्यंत चढून जाण्याची स्पर्धा आम्हा भावांमध्ये लागायची

असां तो झोळया आंबा बहरांत असताना रोज किमान टोपलीभर आंबे पिकवून रात्रभरात आमच्यासाठी खाली टाकायचा व सकाळ झाल्यानंतर आम्ही झाडाखाली धाव घेऊन आंबे जमवून आणायचो व आमचा पहिला नास्ता म्हणजे ते आंबेच असायचे.

आमच्या काजूरमळीत अनेक रायवळ आंब्याची झाडे होती, प्रत्येकाचे वैशिष्ट्य वेगवेगळे, वाडीत एक डेरेदार वृक्ष त्याला नारळी आंबा नाव होते कारण त्याचे फळ चक्क नारळा एव्हडे होते. ते फळ बहुदा लोणाच्यासाठी असावं असं वाटतं कारण त्या झाडाचा पिकलेला आंबा खाल्ल्याचं आठवत नाही, वाडीतील सर्व आंब्याची झाडं नामशेष झाली त्यातील सर्वप्रथम धारातीर्थ पडलेला हा नारळी आंबा होता. 1966 च्या प्रलयकारी वादळात ते झाड अलगत उचलले जाऊन आसपासच्या कुठल्याही घराला जराही धक्का न लावता ते महाकाय धूड चिरनिद्रिस्त झाले.

आणखी एका झाडास हळदणकर आंबा असे नाव होते, त्या नावाचा कुठलाही संदर्भ लागला नाही व त्याचा शेवटही कधी, कसा झाला काही कळले नाही, त्याची फळे सुद्धा अवीट गोडीची होती.
आमच्या बागेतील विविध झाडांपैकी झोळ्या, आमटा व गोडा आंबा असे तीन एकाच वयाचे, आकाराचे डेरेदार वृक्ष सढळहस्ते फळांची उधळण करणारे मात्र त्यातील आमटा आंबा हा आपल्या नावलौकिका प्रमाणे म्हणजे पूर्ण पिकलेल्या फळाची चव सुद्धा आंबटच त्यामुळे ते आंबे खाल्ले जात नसत आणि त्याचा आंबटपणाच त्याच्या नाशाचे कारण ठरले असे वाटते आणि सुक्या सोबत ओलेही जळते ह्या नियमानुसार त्या आमट्याने जाताना त्या शेजारील गोड्या आंब्यालाही सोबत घेऊन गेला.

आणखी एक ‘ पोंग्यारा ‘ हे सुद्धा जुनाट म्हणजे जवळपास दोन मिटरहून अधिक व्यासाचे आंब्याचे झाड. मात्र त्याचा फारसा विस्तार नव्हता, जर्जर अवस्थेतील धोंगा – पोंगाचा असल्याने खोडामध्ये अनेक ढोली होत्या ज्यात अनेक पक्षी, प्राणी वास्तव्य करीत, त्याला फारशी फाळधारणा होत नसे. त्याचा अंतही दुर्दैवी अनाकलनीय झाला, एका भल्या पहाटे आगीने त्याला घेरले, जणुकाही त्याने आत्मदहन करून घेत आपल्या निरर्थक, जर्जर अस्तित्वाची होळी करून घेतली.

आणखी एक ” मिरमीरा ” ह्याची चव तुरट होती, त्या फळातही औषधी गुणधर्म होते, ह्या झाडावर चढून फळे काढणे फार कठीण, कारण 25/30 फुटापर्यंत खोडावर फांद्या नसल्याने त्यावर चढणे फार कठीण काम होते त्यामुळे फक्त पडलेले आंबे खाता येत होते आणि झाडावरच सोनं पिऊन जर्द झाल्यानंतरच आंबा खाली पडायचा असे असले तरी तो रुजला, वाढला, बहरला तोच मुळी चुकीच्या जागी म्हणजे बागेच्या कुंपणावर त्यामुळे आमच्या तुमच्या वादात कसे जगायचे, कुठे झुकायचे असे म्हणत त्यानेही करवतीखाली आपली मान ठेवली.

आता सारांशाने मांडायचे झाले तर ही विविधतेने नटलेली निसर्गदत्त आरोग्यमय धनसंपदा मानवानेच अविचाराने, अज्ञानाने नष्ट केलेली आहेत व त्यासाठीची कारणे ही अगदी शुल्लक होती, प्रतीवर्षी येणारे हमखास भरघोस पीक असूनही रायवळ आंब्याला मागणी कमी, त्यावेळी रस्त्यांचा अभाव , वाहतूक व्यवस्था नसल्याने नाशवंत पीक जागेवरच वाया जात होते व हळूहळू हापूस लागवडीने जोर धरला व तुलनात्मक किफायतशीर हापूस वाढीने रायवळ झाडांवर कुऱ्हाड चालली मात्र ती कुऱ्हाड आपल्याच पायावर चालविली जात आहे हे मानावाच्या ध्यानी येत नाही हीच मोठी शोकांतिका सुरु आहे.

कारण हापूसच्या मोहापायी कोकणातील पारंपारिक फळ झाडं जसे की रायवळ, फणस, चिंच, बोरं, आवळे, जांभूळ, करवंद नष्ट करताना ऐन, किंजल, खैर, वड – पिंपळ, उंडल, कडुनिंब वगैरे ही निसर्गाचा संतुलन राखणारी झाडेही जमीनदोस्त केली जात आहेत. हे काम अतिवेगाने करण्यासाठी बुलडोझर, जेसीबी व्यावसायिक मोठ्या प्रमाणात कोकणात येत आहेत त्यांचे उखळ पांढरे होत आहे, बस्तान बसत असताना विविधतेने नटलेला कोकण उजाड होत आहे, भकास होत आहे.

हापूसचे उत्पादन वाढविताना वेगवेगळी रासायनिक खते, फवारण्या केल्या जातात त्याचे दुष्परिणाम पाहिले जात नाहीत, पूर्वी 20/20 किलो वाजनाचे फणस आता 2/5 किलोवर स्थिरावले तोच प्रकार काजू, चिकू, पेरू, नारळ, सुपारी इ पिकांच्या उत्पादनावर, गुणवत्तेवर झालेला आहे.

आता ह्या गोष्टीची जाणीव झाल्याने मी आमच्या बागेत अनेक फुलझाडांसह रायवळ आंबे, पेरू, चिकू, लिंब, रामफळ, आवळा, कढीपत्ता, निंब आदी झाडांची लागवड करून त्यांची जोपासना करीत आहे. जंगलात वणवा पेटला असता चिमणीने चोचीतून पाणी ओतून तो आटोक्यात आणण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यासारखे असले तरी किमान चर्चा व्हावी म्हणून हा पत्र प्रपंच.

विलास चेऊलकर


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

नाती…

तिरुप्पूरसारखी 75 वस्त्रोद्योग केंद्रे सुरू करण्याचे केंद्रसरकारचे उद्दिष्ट – पीयूष गोयल

ठाणे जिल्ह्यातील मांजरे गावात आढळले नव्या प्रकारचे पठार

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading